Goa Opinion: हिटलरच्या काळात गेस्टापो रात्रीच येत व लोकांची दारे ठोठावत! ही परिस्थिती गोव्यात येणार आहे का?

Controversy in Goa: छत्रपती शिवाजी महाराज समस्त मानवतेसाठी आदर्शाचे प्रतीक आहेत. ते कुणा एका जातीचे वा धर्माचे नव्हते; दुर्दैवाने आज तशी विभागणी करण्याचा प्रयत्न होत आहे.
Uday Bhembre Controversy
Bajrang Dal Protest Outside Uday Bhembre HouseDainik Gomantak
Published on
Updated on

Mob Mentality and History

पणजी: भूतकाळात घडलेल्या घटना, त्याच्याशी निगडीत व्यक्ती, स्थळे, दिवस आणि कार्यकारणभाव याला इतिहास म्हणतात. १८५७च्या उठावाला कुणी बंड म्हणते तर कुणी स्वातंत्र्ययुद्ध! प्रत्येकाच्या हेतूप्रमाणे मूल्यमापन बदलत जाते आणि खरा इतिहास गढूळ, अर्धसत्य होत जातो. विचार अनुयायी की विरोधक लिहितो त्यावर सगळे ठरते.

उदात्तीकरण वा खच्‍चीकरण या मनोभूमिकांमधून तटस्थ इतिहास वर्तमानात पोहोचत नाही. साहजिकच दोन गट पडतात आणि इतिहास अभ्यासाचा विषय न राहता वादविवादाचा होतो. कधीकधी हा अंतर्विरोध राजसत्ता, संघटना, धर्म पुरस्कृत करतात. समाज अशांत राहण्यात काहींचा स्वार्थ लपलेला असतो.

गोव्यात धर्म आणि इतिहासावरून वर्तमान कलुषित होण्याचा वाढता प्रकार समाजस्वास्थ्य बिघडवणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज समस्त मानवतेसाठी आदर्शाचे प्रतीक आहेत. ते कुणा एका जातीचे वा धर्माचे नव्हते; दुर्दैवाने आज तशी विभागणी करण्याचा प्रयत्न होत आहे.

लेखक, विचारवंत उदय भेंब्रे यांनी मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या संदर्भात केलेले वक्तव्य खोडण्याचा प्रयत्न केला, ज्यावर नक्कीच चर्चा होऊ शकते. ती व्हायलाही हवी. वक्तव्यामागील मूळ हेतू व दिलेले संदर्भ यात फोलपणा असल्यास समोर आणतो येतो. परंतु अस्मितेची ढाल करून अवतरलेल्या तथाकथित शिवप्रेमींनी भेंब्रे यांच्या घराबाहेर झुंडशाहीचे जे दर्शन घडवले ते निषेधार्ह आहे.

भर रात्र निषेध करण्याची वेळ आहे का? अशिष्ट, अप्रस्तुत भाषेत कुणी चर्चा करतो का? ती हुल्लडबाजी होती. त्याचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले आहेत. त्या विरोधात तक्रार करूनही पोलिसांना ‘एफआयआर’ नोंदवावा असे वाटत नाही. सरकारला जे हवे ते मात्र तत्परतेने होते. चर्चेतूनच आक्षेपाचे मुद्दे सुटू शकतात; पण हुल्लडबाजीतून चिघळतात.

झोटिंगपणाला सरकारची मूक संमती मिळते, हे भेंब्रे प्रकरणातून पुन्हा दिसले आहे. भेंब्रे यांच्या घरासमोर जमलेल्यांना शिवराय खरेच कळले आहेत का? हिटलरच्या काळात गॅस्टापो रात्रीच्या वेळेतच येत व लोकांची दारे ठोठावत. ही परिस्थिती गोव्यात येणार आहे का? दबाव तयार करण्याचे हे कुटील मानसशास्त्र आहे. दुर्दैवाने, तेव्हाही भलेभले लोक गेस्टापोचे समर्थन करीत. त्याचे परिणाम पुढे दिसलेच.

इतिहासातून वर्तमानाची वाट सुकर व्हावी, अशी अपेक्षा आहे. गोव्यातील सामाजिक सलोखा देशात नावाजला गेला, त्याला तडे जात आहेत. राजसत्तेला ही दुफळीच हवी आहे. काल ‘अ’च्या चुकीमुळे ‘ब’चे नुकसान झाले. अशी घटना घडली तर तो आज इतिहास होतो. घटना एक असते, परंतु कुणाच्या तरी खोडसाळपणातून, सामर्थ्यातून ती बरोबर उलटही रंगवली जाते आणि इतिहास उभा दुभंगतो. त्यासाठी सत्यता तपासावी, विचारी मार्गाने.

गोव्यासमोर आज अनेक ज्वलंत प्रश्न उभे आहेत. गोवा ऱ्हासपर्वाच्या उंबरठ्यावर आहे. ही परिस्थिती सुधारण्याऐवजी प्रखर राष्ट्रवाद पोसून मूळ समस्यांपासून दूर पळणे सुरू आहे, जे फार काळ नाही टिकणार.

Uday Bhembre Controversy
Uday Bhembre: "शिवरायांचे ध्येय गोवा मुक्तीचेच होते" शिवव्याख्याते ॲड. देसाईंचे भेंब्रेंना सडेतोड उत्तर

मांद्रेत वृद्धेच्या अंगावर कुणी गाडी चढवतो, तेथे पोलिस फितूर होतात. तर फातोर्ड्यात झुंडशाहीची तक्रार नोंदवून कारवाई होत नाही. समाजात फूट पाहण्याचा विडा घेणाऱ्यांना मात्र संरक्षण मिळते. अस्मिता इतक्या टोकाच्याही होऊ नयेत की बोलणाऱ्याचे गळे कापत फिरावे. आपण झुंडशाही केली तरच आपली अस्मिता जागृत आहे हे सिद्ध होते हा विचार समाजासाठी घातक आहे.

तसेच इतिहासाविषयी बोलताना फार सावधगिरीने बोलणेही आवश्यक आहे. शब्द फारच जपून वापरावे लागतात. याचा अर्थ अमान्‍य शब्दांना उत्तर रात्रीच्या वेळेस जाऊन जाब विचारणे समर्थनीय ठरत नाही. दोन्ही बाजूंनी तारतम्य ठेवणे आवश्यक आहे. इतिहास आणि इतिहासाचा अर्थ लावणे यात फरक आहे.

Uday Bhembre Controversy
Margao: 'शिवरायांच्या नावाने हिंदूंना भडकवण्याचा इरादा होता; मला धमकावण्यामागं धर्मवाद, जातीयवाद अधिक'- उदय भेंब्रे

‘एकं सद् विप्रा बहुधा वदन्ति’ ही भारतीय विचारपद्धती आहे. सत्य एकच असते, वेगवेगळ्या पद्धतीने ते मांडले जाते. मांडण्याची ‘वेगळी पद्धत’ किंवा ‘वेगळा विचार’च नको म्हणणे ही झुंडशाही. भेंब्रेंनी न पटणारा मुद्दा मांडला म्हणून इतिहास बदलत नाही याचे भान असणारे लोक त्यांचा प्रतिवाद मुद्दे मांडूनच करतील आणि तेच योग्य आहे. इतिहास, राष्ट्रपुरुष, समाज, ज्ञाती, धर्म यांच्या अस्मिता, उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी वर्तमानाला बळ देणाऱ्या असाव्यात. कुठल्याही राजकीय अभिनिवेशापायी या टोकदार अस्मितांनी समाजाची केलेली चिरफाड घातकच ठरेल. म्हणूनच इतिहासात जाताना वर्तमानाचे तारतम्य ठेवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com