आंबा खाताय की विष? कॅल्शिअम कार्बाइडचा नफेखोरीसाठी वापर; ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरु

Artificial Fruit Ripening Health Risks: नफेखोरीला चटावलेले विक्रेते, उद्योग यांच्यावर कठोर कारवाई झाली तरच ग्राहक बिनधास्त खरेदी करू शकतील.
health Risks
Artificial FruitDainik Gomantk
Published on
Updated on

काका कारबोटकर

अन्न आणि औषध प्रशासनाकडून वेळोवळी छापे टाकून अस्वच्छ उपाहारगृहे तपासली जातात. कारवाई केली जाते. कॅल्शिअम कार्बाइडमध्ये पिकवलेली केळी नष्ट केली जातात. त्याच्या बातम्या वाचनात येतात. पण तशाच प्रकारे पिकवल्या जाणाऱ्या आंब्यावर छापे टाकल्याची बातमी माझ्या तरी वाचनात नाही. मार्चच्या मध्यावरच बाजारात आंबे यायला लागतात. नुकतीच कोय तयार झालेली असताना काढलेले हे आंबे भरपूर नफा कमावण्यासाठी कॅल्शिअम कार्बाइडमध्ये घातल्यावर भरपूर उष्णता तयार होऊन त्याला रंग येतो पण चव आंबट किंवा सपक असते.

health Risks
Best Summer Fruits: उन्हाळ्यात खा 'हे' दोन सुपरफ्रूट्स! कडक उन्हातही वाटेल थंडा थंडा कूल कूल

ग्राहक मात्र बाजारात आल्याबरोबर बारा - पंधरा हजार रुपये डझन एवढी किंमत असलेले आंबे आणून खाल्ल्याच्या आविर्भावात, अहंकारात वावरतो. प्रत्यक्षात तो विष खात असतो. आंबा खऱ्या अर्थाने तयार होतो एप्रिलच्या मध्यावर. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात आलेला आंबाच पूर्ण पिकल्यामुळे गोड झालेला असतो. ही बाब अन्न आणि औषध प्रशासनाला ठाऊक असायला हवी. नसेल तर कृषी खात्यात चौकशी करावी.

आता प्रश्‍न येतो विक्रेत्यांवर कारवाई कशी करायची? कारण त्यालाही आंबा कसा पिकवला हे ठाऊक नसते. त्यासाठी सरकारनेच नियम अथवा कायदा करावा. आंबे इतर भाजीपाल्यासारखे पोत्यात किंवा टोपलीत भरून आणता येत नाहीत; ते पेटीत भरून सुरक्षित पाठवावे लागतात. या पेट्यांवर आंबे पाठवणाऱ्याचे नाव आणि इतर तपशील लिहिण्याची सक्ती केली तर ग्राहकाच्या पोटात जाणाऱ्या विषाला रोखता येईल. हा माझा विचार असला तरी यापेक्षा चांगल्या पर्यायाचा विचार होऊ शकतो.

health Risks
Mango Farming: एकाच बागेत घेतात 26 जातींच्या आंब्यांचे उत्पादन, पाली-सत्तरीतील आंब्यांना राज्याबाहेरही मागणी; बाग पाहण्यासाठी होतेय गर्दी

कॅल्शिअम कार्बाइड वापरून पिकवलेले आंबे खाणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. कारण त्यात आर्सेनिक आणि फॉस्फरससारखे विषारी पदार्थ असतात. यामुळे उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि तीव्र जळजळ होऊ शकते. आंबा खाल्यानंतर घशात आणि तोंडात जळजळ होणे किंवा फोड येणे, तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे आणि मूड स्विंगसारखे विकार होऊ शकतात. सिटिलीन वायूमुळे घशात खवखव आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. कॅल्शियम कार्बाइड हे ’कार्सिनोजेनिक’ (कर्करोगजन्य) मानले जाते. दीर्घकाळ असे आंबे खाल्ल्यास यकृत आणि किडनी निकामी होण्याचा धोका संभवतो.

कॅल्शिअम कार्बाइडमध्ये पिकवलेला आंबा पाण्यात तरंगतो. नैसर्गिकरीत्या तयार झाल्यावर पिकवलेला आंबा पाण्यात बुडतो. पण ही चाचणी बाजारात करता येत नाही. घरी आणल्यावर लक्षात आले तर फेकून देणे जिवावर येते. सामान्य माणसाने तिथल्या तिथे परीक्षा करण्यासारखे साधन उपलब्ध नाही. तरीही काही गोष्टी शक्य आहेत. कॅल्शिअम कार्बाइड वापरलेले असल्यास आंब्यास जातिगत मूळ वास येण्याऐवजी वेगळा म्हणजे किंचित रासायनिक वास येतो. शक्यतो सेंद्रिय फळांची जिथे विक्री होते तिथून किंवा खात्रीशीर ठिकाणाहूनच आंबे खरेदी करणे आपल्या हाती आहे.

health Risks
Goa Mankurad Mango: 5 हजारांवरून दर थेट 800 रुपयांवर, स्वस्त झाला 'मानकुराद'! येत्या आठवड्यात दर अजून कोसळण्याची शक्यता

देशात जनता पक्षाची राजवट आल्यानंतर पाकीटबंद वस्तूंवर करांसहित दर छापण्याची सक्ती करण्यात आली. त्यामुळे नफेखोरीला आळा बसला. ग्राहकाची लूट, फसवणूक होऊ नये म्हणून हे आवश्यक होते. त्यापाठोपाठ ग्राहकाच्या आरोग्याकडे लक्ष देणेही महत्त्वाचे असल्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन आले. नफेखोरीला चटावलेले विक्रेते, उद्योग यांच्यावर कठोर कारवाई झाली तरच ग्राहक बिनधास्त खरेदी करू शकतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com