Poha In Goa: 'जसे दोहे ही कबीर-तुलसीदासांची ओळख, तसे पोहे ही ‘गोंयकारा’ची ओळख'; गोंयची खाद्यसंस्कृती

Goa poha tradition: सुंदर सकाळ असावी. चहाचा एक कप झाल्यावर पडवीत बसून पोह्यांचा पहिला घास घ्यावा आणि सगळं विसरून आनंद आयुष्याच्या गात्रात भिनवून घ्यावा.
Goa poha traditio
Goa poha traditionDainik Gomantak
Published on
Updated on

केदार साखरदांडे

गोव्याची संस्कृती ही तांदूळ आणि नारळाभोवती फिरणारी आहे. भात कांडून तयार केलेले पोहे यांच्याशिवाय दिवसाची साधी पण उत्तम सुरुवातच होत नाही.खरं तर पोह्यांसाठी फार मोठी तयारी लागत नाही. पोळे करायचे असतील तर तांदूळ भिजत ठेवावे लागतात, भाजीपावासाठी कडधान्य मोडाला घालावी लागतात, वाटणं-कुटणं तर आलंच. पण पोहे? काहीच नाही! एखाद्या दिवशी न्याहारी ठरली नसेल, वेळ कमी असेल, तर बिनधास्त पोह्यांचा बेत घालावा.

असं म्हणतात की सुदामा कृष्णाला भेटायला निघाला तेव्हा त्याची पत्नी थालीपीठ, उपीट करत बसली नाही. तिने तातडीने झटपट तयार होणारे पोहे बांधून दिले. कृष्णाने ते आवडीने खाल्ले; आणि पुढली कथा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे.

पोहे करताना किंचित भिजवलेले पोहे घ्यावेत. छान खोबरेल तेलावर मोहरीची तडतडणारी फोडणी द्यावी. आता करवील (कढीपत्ता) पान येऊ द्या, अशी हाळी दिली जाते. त्यात बारीक मिरची, कुटलेला शंकरछाप खडा हिंग, मीठ-हळद घातली, भिजवलेले पोहे वाफाळले आणि वरून ताजं खोबरं भुरभुरवलं की झाले, स्वादिष्ट, झटपट पोहे तयार.

यात एक प्रयोग अजून करता येतो. फोडणीला मोहरीऐवजी जिरे आणि उडीद घ्यावेत, बाकी सगळं सेम टू सेम; फक्त हळद वगळून. मस्त शाकाहारी पोहे तयार होतात. वर खोबरं भुरभुरवलं की साक्षात हिमालयात हिमवर्षाव अनुभवतो आहोत, असा भास होतो.

किंचित अधिक फुरसत असेल, शाकाहारी दिवस नसेल आणि जीभ थोडी जास्त लांब झाली असेल, तर बारीक चिरलेला कांदा खरपूस परतून घेतला की मोठी बहार येते. बटाटेही चालतात, पण शिजायला वेळ थोडा अधिक लागतो.

आणि जर पोह्यांवर अग्निसंस्कारही करायचे नसतील, तर ‘दडपे पोहे’ हा अजून एक उत्तम पर्याय; दडपे पोहे मसाला, मिरची आणि कच्च्या कांद्याची जोड. उत्तम झटपट न्याहारी. केवळ फास्ट फूड नाही, तर सुपर फास्ट फूड आणि तेही आरोग्यदायक!

दिवाळी सणाला या पोह्यांचे विशेष लाड केले जातात. अभ्यंगस्नानानंतर पाच प्रकारच्या पोह्यांचा नैवेद्य असतो. खरं तर या पाच प्रकारच्या पोह्यांत आयुष्याचं तत्त्वज्ञान दडलं आहे.

पहिले-साधे, खोबऱ्याचे पोहे: नितळ, सुंदर शैशव.

दुसरे-गुळाचे पोहे: गोड, रम्य बालपण.

तिसरे-तिखट-हळदीचे पोहे: कणखर, तिखटसर तारुण्य.

चौथे-रसातले पोहे: प्रपंच अवस्था. योग्य जोडीदार मिळालेला, नवरा-बायकोचं रसायन पोहे आणि खोबऱ्याच्या रसासारखं जुळलेलं; वाढत्या कुटुंबात वेलचीचा सुगंध.

आणि शेवटी..

ताकात किंवा दह्यातले किंचित आंबट, मुरलेले पोहे: अनुभवांनी समृद्ध झालेलं आयुष्य.

Goa poha traditio
Goan Sweet Dishes: 'कुछ मिठा हो जाए' म्हणलं की डोळ्यासमोर कॅडबरी न येता धोंडस, तवसळी, पायस, मणगणे यायला हवेत..

अष्टमीला पुन्हा पाच प्रकारचे पोहे आणि चण्याची उसळ करून कृष्णार्पण. व्हडली दिवाळीला सातशे तीस वाती उजळवल्यावर-(नवरा आणि बायको, प्रत्येकी ३६५ दिवस, साधं गणित!)-पोह्यांचा नैवेद्य, बरोबर तवशाची ‘करम’ आणि अंबाडीची चटणी असा प्रसाद. आमच्या गोव्यातले देवसुद्धा पोह्यांचा नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवत नाहीत, असं म्हणतात.

सण झाले तरी पोह्यांचे प्रकार इथेच थांबत नाहीत. पुढे चटणीचे पोहे, कढीतले पोहे म्हणजे तर पोह्यांच्या उत्क्रांतीचे अत्युच्च बिंदूच. गोव्याच्या संस्कृतीतून, सणवारांतून पोहे वगळले तर ती कल्पनाही करवत नाही.

Goa poha traditio
Goan Christmas Sweets: 'या' मिठायांमुळे गोव्यातील ख्रिसमस बनतो खास! नक्की चाखून पाहा..

जसे दोहे ही कबीर-तुलसीदासांची ओळख, तसे पोहे ही ‘गोंयकारा’ची ओळख. अगदी आधार कार्डच म्हणा ना! समर्थांनी ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ असं सांगितलं आहे. माझ्या शब्दांत किंचित शब्दच्छल करून म्हणावेसे वाटतं, ‘उदरभरणास पोहे जाणिजे यज्ञकर्म’! ती अतिशयोक्ती ठरू नये.

सुंदर सकाळ असावी. चहाचा एक कप झाल्यावर पडवीत बसून पोह्यांचा पहिला घास घ्यावा आणि सगळं विसरून आनंद आयुष्याच्या गात्रात भिनवून घ्यावा. सुख म्हणजे नक्की काय असतं? अहो, हेच तर असतं!

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com