
मासळी आणि गोंयकार यांचे समीकरण फार पूर्वीपासून चालत आलेले आहे. यांचे एकमेकांशी नाते, संबंध अतूट आहेत. अनेक दिवस मासे खाल्ल्याविना खूष राहणारा गोंयकार गोव्यात क्वचितच सापडेल. गोव्यात येऊन गोवा खऱ्या अर्थाने, सर्वांगाने, संपूर्णपणे अनुभवायचा असेल तर गोव्याची मासळी आणि माशांच्या अनेक तऱ्हा, अनेक प्रकार अनुभवले पाहिजेत.
गणेशचतुर्थीच्या दिवसांत घरोघरी गणपती पुजला जातो. पण अत्यंत आनंदाने स्वतःच्या घरी गणपती पुजणारा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो. असे म्हणतात की गोव्यातील अनेक घरांत गणपती बाप्पांना मुख्य दारातून बाहेर काढल्याबरोबर मागील दारातून मासळीची सोय केली जाते!
काही वर्षांपूर्वी पावसाळ्यात मासळी मिळणे कठीण होते. याचे कारण म्हणजे मासेमारीवर असलेले निर्बंध. सध्या भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर ही मासेमारी बंदी दरवर्षी १जून ते ३१ जुलै या दरम्यान असते आणि पूर्व किनाऱ्यावर १५ एप्रिल ते १४ जून पर्यंत असते.
ही बंदी भारतीय किनारपट्टीवरील माशांच्या अनेक प्रजातींच्या प्रजनन काळाला अनुसरून लागू केली आहे. ह्या बंदीचा मुख्य उद्देश सागरी संपदेचे संवर्धन आहे. तसेच मच्छिमारांचे जीवित व वित्त यांचे रक्षण हाही या बंदीमागचा उद्देश आहे. हल्ली मात्र पावसाळ्यातही भरपूर मासळी बाजारात मिळायला लागली आहे.
याचे कारण म्हणजे गोव्यात अनेकांनी चालू केलेले मत्स्यपालन. त्यामुळे चणक, तामसो यांसारखे मासे आता गोव्यात कधीही मिळू शकतात. मधूनच एखादा गोंयकार ‘चणक आता पयलीबशेन लागना’ असा सूर लावतो. पण वाढलेल्या या मत्स्यउत्पादनाला सरकारचेही प्रोत्साहन असल्यामुळे हा सूर दबला जातो.
तसा मासेमारी हा अतिप्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय व छंद आहे. शेकडो वर्षांपूर्वी आदिमानव अन्न मिळविण्यासाठी इतर प्राण्यांच्या शिकारीबरोबरच माशांचीही शिकार करत असावा. सामान्य युगपूर्व दहाव्या शतकापूर्वीपासून चीन आणि इजिप्तमध्ये मासेमारी होत असावी, असे काही प्राचीन शिलाचित्रांवरून दिसून येते.
भारतात सिंधू-सरस्वती संस्कृतीत मासेमारी अस्तित्वात होती असे तज्ज्ञ मानतात. त्यांच्या मताप्रमाणे मासेमारीचे मचवे, बंदरातील मासे उतरविण्याच्या जागा वगैरेंचे अवशेष उत्खननात प्रामुख्याने सापडले आहेत. तसेच उत्खननात सापडलेल्या तांबड्या मातीच्या भांड्यावर महाशीरसारख्या माशांची व ते पकडण्यासाठी वापरलेल्या गळांची चित्रे आढळतात.
यावरून तज्ज्ञांचे अनुमान आहे की मासेमारी तेव्हा अस्तित्वात होती. नंतरच्या काळातही मच्छिमारी हा एक स्वीकृत व्यवसाय होता असे चाणक्य यांच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथातून दिसून येते.
दरवर्षी १० जुलै हा राष्ट्रीय मच्छीमार दिन म्हणून पाळला जातो. हल्ली केलेल्या सुधारित मापनानुसार भारताची एकंदर किनारपट्टी ११,०९८.८१ कि.मी. लांब आहे. सागरी मत्स्योत्पादन किनारी भागात जास्त असते. किनाऱ्याजवळील पाण्यात केलेली मासेमारी ही कमी खर्चाची व जास्त लाभदायक असते. पाण्यात असणाऱ्या प्लवकांवर मासे जगतात.
पाण्यातील हरितप्लवकांचे उत्पादन पाण्यात असलेल्या उपयुक्त लवणांवर, तापमानावर व सूर्याच्या प्रकाशकिरणांवर अवलंबून असते. पाण्यातील अनेक घटकांचा माशांच्या उत्पादनावर परिणाम होतो. मत्स्यउत्पादनामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाची सोय होते.
मच्छीमार, मासळी पकडण्यासाठी जाळे तयार करणारे, जाळी विकणारे, दुरुस्त करणारे, मासळीविक्रेते असे अनेक लोक मच्छिमारीवर अवलंबून असतात. मात्र या क्षेत्रात होणाऱ्या यांत्रिकीकरणामुळे मच्छिमारांची संख्या हल्ली कमी होत आहे.
या विषयातील यांत्रिक ज्ञान जसजसे वाढू लागले तसतसे जाळी, त्यांचे आकारमान, होड्या किंवा मचवे व जहाजे, त्यांवरील इंजिनांची रचना व अश्वशक्ती (हॉर्स-पॉवर, horse-power), इतर अवजारे व यंत्रे यांतही सुधारणा होऊ लागली. पूर्वी मासेमारी किनाऱ्याजवळ होत असे. इंजिनांवर चालणाऱ्या लहान नौका उपलब्ध झाल्यावर मासेमारीचे क्षेत्रही जास्त विस्तृत झाले.
त्याची खोली वाढली. यंत्रांनी सज्ज मासेमारी जहाजे अस्तित्वात आल्यावर समुद्रावर दूर अंतरावर आणि खोल पाण्यात मासेमारी करणे शक्य झाले. सर्व राष्ट्रांच्या संमतीने एक आंतरराष्ट्रीय करार अस्तित्वात आला. सागरीसंपदेवर प्रत्येक राष्ट्राचा किती हक्क आहे, यावर विचार करण्यात आला. नुकत्याच मान्य झालेल्या आंतरराष्ट्रीय सागरी सीमेच्या नियमाप्रमाणे किनाऱ्यापासून ३७० कि.मी. पर्यंतचे (२०० सागरी मैलांपर्यंतचे) क्षेत्र हे त्या देशाचे विशेष आर्थिक क्षेत्र (EEZ) गणले जाते.
मच्छिमारीसाठी निरनिराळ्या प्रकारांची जाळी वापरता येतात. यापैकी काटाळी, पागेर आणि रांपोण गोव्यात जास्त लोकप्रिय आहेत. खोल पाण्यामध्ये तळाजवळ राहणारे मोठे मासे पकडण्यासाठी ट्रॉल जाळे वापरतात आणि ज्या जहाजावरून ते वापरतात तिला ट्रॉलर म्हणतात. ट्रॉल जाळे ओढण्यासाठी यांत्रिक रहाटाचा उपयोग हेही एक प्रगत पाऊल होय.
मच्छीमार जहाजावर माशांचे अस्तित्व जाणण्यासाठी प्रतिध्वनिमापक उपकरणे (सोनार), संगणक वगैरे आधुनिक साधनांची योजना केलेली असल्यामुळे मासेमारी क्षेत्रात खूप सुधारणा झाली आहे. प्रतिध्वनिमापन पद्धतीने माशांचे थवे कोठे व किती खोल आहेत ते समजते. याशिवाय मासेमारीचा एक आधुनिक प्रकार म्हणजे पाण्याखालील दिवे वापरून त्यांच्या आकर्षणाने मासे पाण्यातच गोळा करून पंपाच्या साहाय्याने जहाजात खेचून घेणे. यावर योग्य धोरण आवश्यक आहे.
अनेक जातींचे मासे प्रजननासाठी किंवा अन्नाच्या शोधात वा प्रतिकूल वातावरण टाळण्यासाठी ठरावीक ऋतूत स्थलांतर करतात. प्रजननासाठी खाऱ्या पाण्यातून गोड्या पाण्यात स्थलांतर करणाऱ्या माशास समुद्रापगामी (अॅनाड्रोमस) मासे व गोड्या पाण्यातून खाऱ्या पाण्यात स्थलांतर करणाऱ्या माशांस समुद्रगामी (कॅटोड्रोमस) मासे असे म्हणतात. नदीवर बांधल्या जाणाऱ्या धरणामुळे पाण्याच्या प्रवाहात खंड पडतो.
त्यामुळे माशांच्या स्थलांतरास आणि प्रजननास बाधा येते. आपल्या सागरसंपदेच्या संवर्धंनासाठी मासेमारीवर निर्बंध घालणे आणि त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मत्स्यपालन करण्यासाठी बाह्य खाद्याचा वापर करताना त्याचे दुष्परिणाम विसरता कामा नये. पारंपरिक मत्स्यपालनात कुठल्याही रीतीने हस्तक्षेप करताना त्याचे पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन (EIA) लक्षात घेतले पाहिजे.
किनाऱ्यापासून ५ किमी अंतराच्या आत इंजिन असणाऱ्या कोणत्याही नौकेने मासेमारी करता कामा नये. हा भाग पूर्णपणे लहान होड्या व पारंपरिक शिडाचे मचवे यांसाठी राखून ठेवला आहे. जाळयांच्या आकारमानावर निर्बंध घालणे आणि पाळणे जरुरीचे आहे. पावसाळ्यात प्रजनन काळात मासेमारीवर बंदी आहे. याचे पालन झाले पाहिजे. आपल्या सागर संपदेचे संवर्धन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.