Goa University: गोवा विद्यापीठाचा आलेख सातत्याने का उतरतो आहे? कुलगुरूंचे ‘राम’राज्य

Goa University Paper Leak Scam: आपल्याच गोवा विद्यापीठाची पत, प्रतिष्ठा ज्यांच्या कारभारात काहीच ‘राम’ नाही अशांमुळे धुळीस मिळते आहे, हे माहीत असूनही त्यांच्या पखाली हे ‘राव’ का वाहत आहेत, हे समोर आलेच पाहिजे.
Goa University Controversy
Goa UniversityDainik Gomantak
Published on
Updated on

पाश्चात्त्य जगताला भारतीय चिद्वादाचा तात्त्विक परिचय करून देणारे विचारवंत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् ‘ऑक्सफर्ड’मध्ये नावाजले गेले. भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने ‘राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट’ पुरस्कार ठेवला आहे, जो संशोधकांना दिला जातो.

आपल्या परिघात येणाऱ्या व्यक्तींना डॉ. राधाकृष्णन् एक प्रश्न करीत, जो अनेकांना प्रेरणा देण्यासोबत चिंतनास भाग पाडायचा. तो प्रश्न असा - नीतिमान पण चिकित्सक; विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असे नवे व्यक्तिमत्त्व कसे निर्माण करता येईल?

त्यासाठी शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल? अनेकदा ते याच प्रश्नाच्या अनुरोधाने बोलत. त्या डॉ. राधाकृष्णन यांच्या कार्याचे स्मरण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ‘शिक्षक दिन’ साजरा होतो. परंतु त्यांचे विचार प्रत्यक्षात आचरणात अभावानेच येत असल्याने एकूणच शिक्षण क्षेत्रासह शिक्षक ‘दीन’ झाले आहेत.

गोवा विद्यापीठाचा खालावणारा दर्जा समोर असूनही कामगार नेत्याप्रमाणे तोकड्या युक्तिवादांद्वारे फाटक्या कारभारावर पांघरूण घालण्याचा प्रा. रामराव वाघ यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेला प्रयत्न उबगवाणा आहे.

एक भौतिक शास्त्राचा प्राध्यापक मैत्रिणीसाठी दुसऱ्या विभागातील प्रश्नपत्रिका चोरतो; ते प्रकरण कुलगुरूंच्या साक्षीने दाबण्याचा प्रयत्न होतो आणि ह्या संदर्भात जेव्हा ‘गोमन्तक’ने भांडाफोड केली तेव्हा प्रचंड गाजावाजा झाला.

ती राष्ट्रीय बातमी ठरली, सरकारला चौकशी करावी लागली. मार्चमध्ये प्रकार उघडकीस आला अन् पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यावर प्रा. रामराव वाघ अर्थात शिक्षक संघटनेला, हात काळवंडलेल्या साहाय्यक प्राध्यापकाची बाजू घ्यावीशी वाटते; ‘डोमिसाइल’ अटीचा मुद्दा उपस्थित करून गोमंतकीय प्राध्यापकांच्या कुवतीवर शिंतोडे उडवणाऱ्या कुलगुरूंची पाठराखण करावीशी वाटते ही निव्वळ ‘भाट’गिरी झाली.

अलीकडेच टिळक जयंती झाली. त्या निमित्ताने राज्यात बरेच कार्यक्रम झाले. ‘शोधपत्रकारितेवर भर द्या’, असे बौद्धिक पाजण्याची हौस राजकीय पुढाऱ्यांनी व्यासपीठावरून भाषणे झोडून भागवली. तथापि ह्याच पुढाऱ्यांना शोधपत्रकारितेचे वावडे असते. उदाहरणच द्यायचे तर सरकारनियुक्त सत्यशोधन समितीने अहवाल सादर करून बरेच दिवस उलटले, सावंत सरकारने तो अद्याप जाहीर केलेला नाही.

कुलगुरू आणि तत्कालीन कुलपतींचे संदर्भ असल्याने अहवाल सार्वत्रिक करण्याचे सरकार टाळत असावे. परंतु माध्यम म्हणून गोव्याचे हित जपणे आमचे प्रथम कर्तव्य आहे. म्हणूनच ‘तो’ अहवाल फोडण्याचे काम आम्ही केले. त्याचा आम्हास अभिमान आहे. ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ या उक्तीला साजेसे तपशील, दाखल्यांसह समितीने विद्यापीठाच्या कारभाराचे वाभाडे काढलेत.

त्याची वाघांना चिंता वाटण्याऐवजी ते कुलगुरूंची तळी उचलतात, माध्यमांना दोष देतात हे शिक्षकी पेशाला शोभनीय नाही. वाघांनी अहवाल जाहीर करण्याची मागणी केली असती, तर ती रास्त होती. पेपरचोरी प्रकाराचा ज्यांना साधा निषेध करावासा वाटला नाही, त्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची कशी काळजी असेल!

Goa University Controversy
Goa University: गोवा विद्यापीठाला NAAC कडून A+ ग्रेड! इतिहासात पहिल्यांदाच मिळाला हा मान, CM सावंतांनी केलं अभिनंदन

रामराव वाघ यांचीच पेशाप्रति विश्वासार्हता तपासण्याची वेळ आली आहे. वाघ प्राध्यापक की राजकीय पुढारी? ‘आप’चे पदाधिकारी असताना ते शिक्षक संघटनेचे नेतृत्व करतात. तसे न करण्याचा कायदा नसला तरी नैतिक जबाबदारी नावाची चीज असते. त्याचे भान नसल्यास अशी व्यक्ती विद्येच्या प्रांगणात राजकारणच शिजवणार.

‘एनआयआरएफ’ने जाहीर केलेल्या अलीकडच्या अहवालांत गोवा विद्यापीठाची सातत्याने घसरण झाली आहे. ‘नॅक’चे मानांकन बुडत्याला काडीचा आधार ठरू नये.

Goa University Controversy
Goa University: ‘पेपरलीक’चा तपासणी अहवाल माध्यमांकडे गेला कसा? ‘विद्यापीठ टिचर्स’ने उघडले तोंड; चौकशीची केली मागणी

गोवा विद्यापीठाचा आलेख सातत्याने का उतरतो आहे? राष्ट्रीय स्तरावर आपण पिछाडीवर का? याचा अदमास प्राध्यापकांनी घ्यायला हवा. गोवा विधानसभेत तर त्यावर पक्षभेद बाजूला ठेवून टीका झाली आहे. निदान गोव्यात जन्मलेल्यांना तरी याविषयी चाड असावी. गैरप्रकारांना पाठीशी घालून गलिच्छ राजकारण करायची कुणा प्राध्यापकाला इतकीच खाज असल्यास त्याने राजीनामा द्यावा व खुशाल राजकारण करावे.

आमचे काहीही म्हणणे नाही. दुर्जन तसे वागतात, यापेक्षाही सज्जन गप्प बसतात किंवा त्यांची बाजू घेतात, हे जास्त घातक आहे. आपल्याच गोवा विद्यापीठाची पत, प्रतिष्ठा ज्यांच्या कारभारात काहीच ‘राम’ नाही अशांमुळे धुळीस मिळते आहे, हे माहीत असूनही त्यांच्या पखाली हे ‘राव’ का वाहत आहेत, हे समोर आलेच पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com