तेंव्हा इकडे स्वतंत्र भारत, तर तिकडे गोवा होता! याबाजूला भारतीय जवान तर तिकडे पाकल्यांचे ‘सोजीर’ बंदुका घेऊन ताठ उभे होते..

Portuguese Goa childhood memory: पोर्तुगिजांचे राज्य असलेल्या देशात जायचे होते. कोवळ्या उन्हाचा उबदारपणा संपून चटका जाणवू लागला होता.
Portuguese Goa childhood memory
Portuguese Goa childhood memoryDainik Gomatak
Published on
Updated on

यशोधरा काटकर

गोव्यात तेव्हा पोर्तुगिजांचे राज्य होते, असे आई म्हणायची. फोंड्याच्या चौकीवरच्या सोजिरांच्या जीप गावातून फिरत असायच्या, पाकले कधी घरात शिरतील याची शाश्वती नव्हती. तेव्हाच्या प्रथेनुसार माझा जन्म आईच्या माहेरी, कोल्हापूरला झाला.

त्या काळी मुलांनी मामा-आत्याच्या घरी वाढणे ही नित्याची गोष्ट, त्यामुळे माझी रवानगी कोल्हापूरच्या लीलाआज्जीकडे करून आई-पप्पा निश्चिंत झाले होते. मी तिकडचे पहिले नातवंड म्हणून लाडाकोडात वाढत, शाळेत जाऊ लागले होते.

पण कधी ना कधी गोव्याला परतावे लागणार होते आणि तसा तो दिवस उजाडला. त्याचे तपशील अंधूक आठवतायत. पण लहानग्या येशूचे गोव्याचे पहिले ‘संस्मरण’ तेच आहे. ‘संस्मरणे’ म्हणजे माहितीपट नव्हे, तर गतकालीन घटनांचे मनावर उमटलेले ठसे, ते ठसे माझ्या मनावर नीटच कोरले गेले आहेत.

मला आई-पप्पांकडे पाठवायचे म्हणून आज्जीला रडू येत होते. माझाही जीव अर्धा होत होता. तसेच ‘सूं..सूं..’ करत तिने माझे चार कपडे पिशवीत भरले. त्या दोन बंदांच्या पिशवीला श्रशशश्रर लीलाआज्जीच्या फॅशननुसार ‘फ्रिल’ (भगवी!) लावलेली होती

आणि दर्शनी बाजूला छोटासा खिसा, त्यावर भरकाम केलेले चिमुकले फूलही (भगवेच!) होते. मग तिने तेल लावून माझ्या चार केसांचा ‘बो’ बांधून दोन ‘सुंदर’ क्लिपा लावल्या. अंगात एक फुलाफुलांचा झगा चढवत मला ‘तयार’ केले आम्ही चेकपॉइंटवर येऊन पोहोचलो.

आम्ही दोघी स्वतंत्र भारताच्या सीमेवर उभ्या होतो. इकडे स्वतंत्र भारत, तर तिकडे सालाझारच्या आधिपत्याखाली असलेला गोवा होता. पहाटेची वेळ होती. मी उभी होते ती भारतभूमी होती. इथे आज्जीआजोबा होते, मित्रमैत्रिणीबरोबर माळावरच्या साळुंक्यांमागे हुंदडणे होते.

आता पोर्तुगिजांचे राज्य असलेल्या देशात जायचे होते. कोवळ्या उन्हाचा उबदारपणा संपून चटका जाणवू लागला होता. समोर भूमीचा मोकळा तुकडा उलगडत होता, ‘नो मॅन्स लँड’ मखमली हिरवळ पसरत गेलेला.

एखाद्या हॉलिवूड युद्धपटातला लॉंगशॉट असावा तशी ती हिरवळ दूरवर उलगडत, चिंचोळी होत एका बिंदूत लुप्त झाली होती. तिच्या दोन्ही बाजूंना पसरलेले काटेरी तारांचे कुंपणही तसेच अरुंद होत अदृश्य झाले होते. इकडे भारतीय जवान तर तिकडे पाकल्यांचे ‘सोजीर’ हाती बंदुका घेऊन कडक शिस्तीत ताठ उभे होते. त्यांच्या बंदुकांवर लावलेली बायोनेट्स उन्हात चमकत होती.

उन्हाचा कडाका वाढत चालला होता मी आजीकडे पाहिले, तिचा चेहरा लालबुंद झाला होता. पण आम्ही दोघी भित्र्या थोड्याच होतो? शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा आमची साथ सोडून जाणार होत्या थोड्याच? माझ्या डोक्यावर हात फिरवत ती म्हणाली, ‘‘येशू, आता तू जायचं हं इथून!’’

‘‘एकटीनं?’’

तो धोका माझ्या लक्षातच आला नव्हता.

मी भोकाड पसरणार तेवढ्यात ती म्हणाली

‘‘ते बघ, तिकडे तुझे आईपप्पा उभे आहेत.’’

खरंच की, त्या... टोकाला जिथे ती ‘नो मॅन्स लँड’ संपलीशी वाटत होती, त्या बिंदूपाशी आईपप्पा उभे होते. तेही छोटेसे दिसत होते. पण होते ते आईपप्पाच. तोपर्यंत लीलाआज्जीच्या घरातल्या फोटोतले नवरा-नवरीच्या प्रतिमेतले आईपप्पा आज फोटोतून बाहेर पडले होते.

शर्ट-पँट अशा साहेबी पोषाखातले पप्पा. आईच्या झुळझुळीत साडीचा डोक्यावरून घेतलेला पदर थेट लीलाआज्जीसारखाच होता. आणि कपाळावरचे ठसठशीत कुंकूही. दोघांच्या चेहऱ्यावर उचंबळलेल्या उत्सुकतेच्या लहरी स्पष्ट जाणवत गेल्या, ओळखीच्या खुणा मनात जाग्या झाल्या, अंगात जोर आला आणि मी ‘नो मॅन्स लँड’वर पाऊल टाकले.

Portuguese Goa childhood memory
Goa Opinion: आजचा 'गोवा' हा पोर्तुगिजांनी 18व्या शतकाच्या अखेरीस काबीज केलेला भूभाग होय; गोवन आधुनिकता

त्या काटेरी तारांच्या कुंपणातून मी चालत होते. पावलागणिक अंगातला जोर वाढत गेला. हिरवळ, कुंपण, टोकदार काटे मागे पडत गेले. छान ‘हुनहुनीत’ वाटू लागले. मी मध्येच मागे वळून पाहिले. आज्जीच्या चेहऱ्यावर अभिमानाचे, आनंदाचे हसू उमटले होते. तिने हात उंचावून टाटा केला.

अचानक समोरच्या हिरवळीवर साळुंक्यांचा थवा उतरून, चिवचिवत उड्या मारू लागला. ओहो, म्हणजे गोव्यात पण होत्याच त्या !

आई-पप्पा हात उंचावून ‘ये...’ म्हणत होते.

Portuguese Goa childhood memory
Goa Opinion: 'बर्च क्लब'प्रकरणी कठोर कारवाई व्हावी, अन्यथा गोव्यातील पर्यटन मान टाकेल आणि राज्य भयाण आर्थिक संकटात सापडेल..

मी त्या टोकाला पोहोचले तेव्हा पोर्तुगीज सोजीर समोर आला तरी बिलकूल घाबरले नाही. त्याने कागदपत्रांवर शिक्का मारताच मी तिथून पळत सुटले.

आई-पप्पांपाशी पोहोचताच पप्पा हसत-हसत पुढे आले. त्यांनी मला झपकन उचलून घेत, मोठ्ठ्याने ‘हुप्पा ...’ करत हवेत उंच उडवले. आई कौतुकाने बघत होती.

बाय घराक पावली होती...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com