
एकेकाळी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या पंजाब राज्याला देशाने ‘उडता पंजाब’ म्हणून संबोधले जात होते. पण आता हळूहळू पंजाब त्या विळख्यातून बाहेर पडत असून गोवा त्या विळख्यात पुरता अडकत चालला आहे. गोव्याचा ‘उडता गोवा’ होत आहे.
सध्या गोवा राज्यात स्थानिक, देशी आणि विदेशी नागरिकांकडून ज्या प्रमाणात ड्रग्सचे व्यवहार चालत आहेत, पोलिसांकडून विशेषतः अमली पदार्थ विरोधी पथकाकडून ज्या पद्धतीने ड्रग्ज माफियांना अटक होत आहे व धाडीतून जो लक्षावधी, कोट्यवधी रुपयांचा माल हस्तगत केला जात आहे, त्यावरून आता आपला गोवा हा लवकरच ‘उडता गोवा’ म्हणून प्रसिद्धीच्या - अर्थात, कुप्रसिद्धीच्या - झोतात आला, तर त्यात सरकारला आणि लोकांनाही आश्चर्य वाटायला नको, असे एकूण चित्र दिसत आहे.
आपल्या देशात १९७० ते ८० च्या दशकात निर्माण झालेल्या चित्रपटांमधून दारू, चरस, गांजा, हुक्का इत्यादी अमली पदार्थांचे दर्शन मोठ्या प्रमाणात होताना दिसले आणि हा प्रकार देशभर पसरत गेला. त्यात गोवा हा जागतिक नकाशावर ‘बारमाही पर्यटन क्षेत्र’ म्हणून ओळखला जाऊ लागल्यामुळे येथे पर्यटनाच्या नावाखाली ‘जिवाचा गोवा’ करायला आलेले देशी, विदेशी पर्यटक येथील समुद्रकिनारे, धबधबे, कॅसिनो, अनैतिक व्यवहार यात ‘गुंतून’ गेले.
भरीस भर म्हणून बँड-बाजावर चालवलेल्या रात्री-बेरात्रीच्या रेव्ह पार्ट्या, सनबर्न महोत्सव आदींची भर पडत गेली. सुसंस्कृत, शांत, निसर्गरम्य गोव्याची जणू शानच नष्ट झाली. येथे छानपैकी अमली पदार्थांच्या अमलाखाली छानछौकीपणा सुरू झाला आणि बघता बघता स्वस्तात मस्त पैसा मिळवण्याच्या आमिषापोटी स्थानिकही यात ओढले गेले. तसेच येथील तरुणाईही यात सक्रिय झाली.
आज गोव्यातील एकही प्रमुख शहर किंवा तथाकथित सुधारित खेडे असे राहिले नाही की जेथे अमली पदार्थांनी थैमान घातलेले नाही. शिवाय शाळा-कॉलेजांपासून काही शहरी दुकानांपर्यंत खुलेआम हे सर्व चालू आहे. हे तपासाअंती आपल्या लक्षात येते.
सत्ताधारी आमदार मायकल लोबो यांनी याची ‘पोलखोल’ करताना पत्रकार परिषदेत म्हटले होते, ‘आपल्या मतदारसंघाबरोबरच इतर मतदारसंघातही अमली पदार्थांच्या व्यवहाराने थैमान घातले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने गंभीरपणे यात लक्ष घातले तर सत्य उघडकीस येईल’.
तसेच ते म्हणाले होते की, ‘उत्तर गोव्यातील समुद्रकिनारे आणि दक्षिण गोव्यातील जंगलेही आपल्याला हवे तसे चरायला मिळालेली कुरणे आहेत अशा आविर्भावात विदेशी नागरिक स्थानिकांच्या साहाय्याने वावरत असतात.’ आता फार दूर कशाला, गेली दोन-तीन वर्षे विविध कारणांनी (यात ड्रग्सही आलेच) कोलवाळ कारागृह गाजत आहे, त्या कारागृहाला आपले ‘गृह’ करून नुकतीच ‘ओली पार्टी’ रंगल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे आणि यासाठी यात रंगलेल्या पाच कैद्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून कामावरील तुरुंगरक्षकालाही निलंबित करण्यात आले आहे.
कारण २२ जून रोजी पार पडलेल्या या मेजवानीस कैद्यांना मद्य (ज्यात अमली पदार्थ असल्याचा संशय आहे) आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि अन्य वस्तूही पुरवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे, गेल्या डिसेंबरमध्ये धारगळमध्ये जो ‘सनबर्न’ महोत्सव पार पडला. त्यावेळी इस्पितळात दाखल केलेला दिल्लीस्थित युवक अमली पदार्थांच्या सेवनामुळे मृत्युमुखी पडल्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
नुकताच गोव्यात अमली पदार्थ विरोधी दिनाचे महत्त्व लोकांना कळावे म्हणून शासकीय पातळीवर आम्ही विविध समाजोपयोगी संस्था, संघटनांकडून हा दिवस साजरा करण्यात आला. पण, दुर्दैवाने याला ‘पालथ्या घड्यावर पाणी’ असेच म्हणावे लागेल. याचे कारण गोवा राज्यात अमली पदार्थांचा विळखा किनारी भागांपासून गोव्यातील ग्रामीण भागांपर्यंत पोचल्याची वस्तुस्थिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही ‘अमली पदार्थ विरोधी दिना’बाबत भाष्य करताना मान्य केली आहे. रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहणाऱ्या मुलांची चौकशी करण्याचे आवाहनही पालकांना मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
कोणालाही संशय येऊ नये म्हणून हे ड्रग्स ड्रोनमधून, तर कधी फुटबॉलचा उपयोग करून, तर कधी चपात्यांमधून अशी तस्करी करण्याचा प्रयत्नही झाला आहे. आता तर कोलवाळ कारागृहात अक्षरश: गांजाचे गोळे फेकण्याचा प्रयत्न झाला आहे आणि यासाठी चौघांना पकडण्यातही आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
आता प्रश्न असा उपस्थित होतो की, कोलवाळसारख्या ‘तुरुंगात जर मोबाइल फोन, गांजा, चरस, कोकेन हे अमली पदार्थ आणि कैद्यांना हवे ते जेवण, खाद्यपदार्थ आणि सिगारेटस् वगैरे उपलब्ध होत असतील तर ‘खुल्या’ जागेवर ‘खुलेआम’ सगळे काही या साऱ्यावर ‘डोळा’ ठेवण्यासाठी ठेवलेल्यांना चुचकारून, चुकवून त्यांना चक्राहून आणि ‘डोळा मारून’ जर हे सर्व चालले असेल तर मग गोव्याचा ‘उडता गोवा’ नाहीतर काय कुंभकर्णासारखा झोपलेला गोवा म्हणून उल्लेख होणार आहे?
उपलब्ध माहितीनुसार पाच-सहा वर्षांपूर्वी गोव्याच्या निरनिराळ्या भागांमधून अंदाजे साडेसहा ते सात कोटींचे ड्रग्स जप्त केले होते व देशीबरोबरच विदेशी गुन्हेगारांची रवानगी न्यायालयाने तुरुंगात केली होती. पण आता २०२५ या वर्षात ड्रग्सची व्याप्ती इतकी वाढली आहे की, जानेवारी ते जून १५पर्यंतच्या फक्त सहा महिन्यांपेक्षा कमी अवधीत हा आकडा सत्तर कोटींच्या घरात पोचला आहे.
गोव्यात, आठवड्यातून निदान दोनदा-तीनदा तरी कुठे ना कुठे कारवाया होत असतात. गुन्हेगार पकडले जातात, कैद होतात, जामिनावर सुटतात, माल जप्त होतो हे सारे आपण वाचतो. पण या प्रकरणांमधील प्रमाण कमी झाल्याचे मात्र लक्षात येत नाही. उलट डिचोली, सत्तरी आणि मुरगाव या तीन तालुक्यातील स्थानिक प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या ड्रग्स प्रकरणांमध्ये मुख्यत्वे गुंतल्याचे आढळून आले आहे. शिवाय बार्देश तालुक्यातील किनारी भागातील लोकांचाही यात सहभाग वाढत असल्याचे दिसत आहे.
काय गंमत आहे बघा, एका बाजूने आपले गोवा राज्य हे सर्व प्रकारच्या सोयी-सुविधांनी आणि विकासाच्या प्रत्येक अंगाने आघाडीवर आणायचे स्वप्न बघायचे, किंबहुना हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन काम करायचे व दुसऱ्या बाजूने ज्या अव्यवहार्य, अनैतिक व अश्लील गोष्टी आहेत त्या थोपवून धरण्याबाबत चालढकल करायची? यातून गोवा हे ‘आदर्श राज्य’ बनविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात कसे बरे साकार करता येईल?
आता गोव्याचा ‘उडता गोवा’ होताना पाहून कुठलाच संस्कृतिनिष्ठ गोेवेकरच काय, पण गोव्याची अतिथ्यशीलता, येथील मंदिरे, चर्चेस, मशिदी, गुरुद्वारा यांचे पावित्र्य जपणारा माणूस हे सहन करू शकणार नाही. उलट अशा गोष्टींचा तो मनापासून धिक्कार करेल.
म्हणून प्रत्येक संबंधित घटकाशी नम्रपणे विनंती करावीशी वाटते की, गोव्याची अस्मिता गोव्याचे गोंयकारपण आणि गोव्याची शांतता, निसर्गरम्यता आणि वनसंपदा हे सारे सांभाळण्यासाठी ‘उडता गोवा’वर बहिष्कार तर घातलाच पाहिजे. पण यापासून गोव्याचे रक्षण करण्यासाठी पोटतिडकीने झगडले पाहिजे.
शंभू भाऊ बांदेकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.