

मिलिंद म्हाडगुत
राज्यात तिसरा जिल्हा आता आकाराला येत आहे. तशी सरकारने नववर्षाच्या पूर्वसंध्येला अधिसूचनाही काढली आहे. केपे, काणकोण, सांगे व धारबांदोडा या चार तालुक्यांचा समावेश असलेल्या या जिल्ह्याचे ‘कुशावती’ असे नामकरणही करण्यात आले आहे.
तिसरा जिल्हा अस्तित्वात येणे ही राज्याच्या विकासाच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे, हे कोणीच नाकारणार नाही. पण तरीही मिठात खडा पडल्यासारखे वाटते आहे. दिवंगत रवि नाईक हे तिसर्या जिल्ह्याचे प्रणेते होते हे सर्वज्ञात आहे. तिसरा जिल्हा हे त्यांचे मोठे स्वप्न होते. पण आता जो तिसरा जिल्हा आकाराला येत आहे, तो त्यांना अभिप्रेत नव्हता हेही तेवढेच खरे आहे!
तिसर्या जिल्ह्याचे प्रमुख केंद्र फोंडा असावे अशी त्यांची इच्छा होती आणि याचे प्रयत्न त्यांनी ते गृहमंत्री असतानाच म्हणजे २०११साली सुरू केले होते. हे प्रयत्न सफल होणार असे वाटत असताना २०११च्या डिसेंबरमध्ये निवडणूक जाहीर झाली आणि आचारसंहितेमुळे ती फाईल पुढे जाऊ शकली नाही.
पण तरीही रवि यांनी जिद्द सोडली नव्हती. २०१२च्या निवडणुकीत परत निवडून आल्यानंतर आपण ही संकल्पना तडीस नेणार असा निर्धारही त्यांनी केला होता. एवढेच नव्हे तर तिसर्या जिल्ह्याच्या कार्यालयाकरता बेतोडा हायवेवरची एक जागाही त्यांनी बघून ठेवली होती. पण २०१२सालच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यांचे स्वप्न अधांतरीच राहिले. पण एवढे होऊनही त्यांचे प्रयत्न सुरूच होते.
पणजी, मडगाव शहरानंतर फोंडा शहराचा नंबर लागत असल्यामुळे आणि त्यात परत हे मध्यवर्ती शहर असल्यामुळे इथे तिसर्या जिल्ह्याचे कार्यालय व्हावे आणि इथूनच सूत्रे चालावीत, असे त्यांना वाटत होते.
फोंडा जरी मध्यवर्ती शहर असले तरी फोंड्याची अवस्था सध्या ‘न घर का न घाट का’ अशी झाल्यासारखी वाटत आहे. या तालुक्यातील काही भाग सरकारी कामाकरता पणजीशी जोडला गेला आहे, तर काही भाग मडगावशी.
लोकसभा निवडणुकीकरता तालुक्यातील तीन मतदारसंघ दक्षिणेत आहेत, तर एक उत्तरेत. रवि यांना हीच गळचेपी बंद करायची होती! तिसर्या जिल्ह्याचे केंद्र फोंडा करून त्यांना या फोंडा तालुक्याबरोबर सभोवतालीच्या परिसराचाही विकास साधायचा होता.
सध्या फोंडा शहराची व्याप्ती या तालुक्यापुरती मर्यादित राहिलेली नसून ती शेजारच्या धारबांदोडा, सत्तरीसारख्या तालुक्यांपर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे फोंड्याला तिसर्या जिल्ह्याचे प्रमुख केंद्र करून नव्याने स्थापन झालेल्या शेजारच्या धारबांदोडासारख्या ग्रामीण बाज असलेल्या तालुक्याचीही सर्वांगीण प्रगती व्हावी असाही त्यांचा मनोदय होता.
रवि हे दूरदृष्टीने विचार करणारे नेते असल्यामुळे त्यांच्या या मनोदयात काही चूक होती असे कोणीही म्हणू शकणार नाही. पण आता त्यांचे तसेच फोंडावासीयांचे स्वप्न, भंग झाल्यातच जमा आहे.
मगो पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी जरी तिसरा जिल्हा झाल्यामुळे रविंचे स्वप्न पूर्ण झाले, असे म्हटले असले तरी त्यांचे हे म्हणणे वस्तुस्थितीशी फारकत घेणारे आहे हे रविंना जवळून ओळखणारा कुणीही सांगू शकेल. त्यांच्या मृत्यूपूर्वी मी त्यांना होऊ घातलेल्या तिसर्या जिल्ह्यात फोंड्याचा समावेश नाही हे लक्षात आणून देत, ‘आता पुढे काय?’ असा प्रश्नही विचारला होता. त्यावेळी त्यांनी, ‘बघूया’, असे मोघम उत्तर दिले असले तरी त्यांच्या देहबोलीवरून ते या निर्णयावर खूश आहेत, असे बिलकूल वाटत नव्हते.
रवि नाईक हे फोंड्याचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. आज जो काही फोंड्यात विकास दिसतो आहे तो सर्व रवींच्या कारकिर्दीत झाला आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही.
आता फोंड्याला तिसर्या जिल्ह्याचे केंद्र करून त्यांना या विकासाचे शिखर गाठायचे होते. पण आता ते शक्य होईल, असे वाटत नाही. आता तिसरा जिल्हा फोंड्याच्या कक्षेबाहेर गेला असल्यामुळे फोंड्यावरचा ‘फोकस’ कमी होणार हे निश्चित आहे.
फोंडा हे तिसर्या जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्र झाल्यास राज्याच्या विकासाच्या दृष्टीनेही ते सोयीस्कर ठरू शकले असते. पण आता ते होईल, असे दिसत नाही. मुळात फोंड्याला का वगळले, याचाच अर्थबोध होत नाही. यामागे राजकारण आहे का? फोंड्याची जी सध्या उपेक्षा सुरू आहे तिचे हे पुढचे प्रकरण आहे का, याचेही आकलन होत नाही.
सध्या फोंड्यात अनेक समस्या आहेत. इथल्या उपजिल्हा इस्पितळाचे उदाहरण घ्या. हे इस्पितळ सुरू होऊन पंधरा वर्षे झाली; तरी इस्पितळात अजूनही रक्तपेढी नाही, अद्ययावत उपकरणे नाहीत. त्यामुळे गंभीर आजाराच्या रुग्णांना अजूनही मडगाव वा पणजीला नेले जाते.
या प्रक्रियेत अनेक रुग्ण दगावलेलेही आहेत. हे पाहता सध्या या राज्यातील महत्त्वाच्या शहराकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे असेच म्हणावे लागेल. आता फोंड्याला तिसर्या जिल्ह्यातून वगळणे ही याची पुढची आवृत्ती ठरू शकते. म्हणूनच तिसरा जिल्हा झाला याचा आनंद व्यक्त करावा का फोंड्याला या जिल्ह्यातून वगळले याचा विषाद प्रकट करावा हेच कळत नाही.
पण सध्या फोंडा तसेच आसपासच्या परिसरातील लोकांची ’गड आला पण सिंह गेला’ अशी अवस्था झाली आहे यात शंकाच नाही. यामुळे दिवंगत रविंचे स्वप्नभंग होण्याबरोबरच तिसर्या जिल्ह्याचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे होऊ शकणार्या फोंडा तालुक्याच्या व आसपासच्या परिसराच्या विकासाची स्वप्ने पाहणार्या लोकांचाही अपेक्षाभंग झाला आहे, एवढे निश्चित.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.