
राजू नायक
केवळ गोवा नव्हे तर संपूर्ण देशाने त्या घटनेकडे स्तंभित होऊन पाहिले. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोव्याचे प्रत्यक्ष तापमान ४७.८ अंश होते. प्रखर आर्द्रता, शिवाय शहरीकरणामुळे निर्माण झालेली उष्णता यामुळे दिल्ली, भोपाळ व केरळसारख्या राज्यांना वितळवणारी उष्णता कधी नव्हे ती आपल्या गोव्यात निर्माण झाली. ४८ अंश तापमान होणे हा प्रकार उत्तर भारतातील राज्यांच्या तापमानालाही मागे टाकणारा होता.
उन्हाळा तीव्र बनला आहे यात शंका नाही. परंतु आपल्या गोव्याला त्याने इतक्या प्रमाणात कधी भाजून काढले नव्हते. आपण जर उपाय ताबडतोब योजले नाहीत, तर पुढच्या काही वर्षांत बंगळुरू आणि हैदराबादला ग्रासणारे प्रश्न येथे उद्भवणार आहेत. वातानुकूलित यंत्रणेची गरज आणखी वाढेल. त्यामुळे विजेची कपात सुरू होईल.
विजेच्या वाढत्या मागण्यांबरोबरच पाणी टंचाई सुरू होईल. आपली प्रगती खुंटेल... देशातील ३० टक्क्यांहून अधिक शहरांना ग्रासणारा वातावरण बदल व बेसुमार शहरीकरणाचा फटका यापूर्वीच आपल्याला बसला आहे. त्यासाठी आपण उपाय योजले आहेत काय?
हा उन्हाळा ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवघेणा ठरतोय. वर्तमानपत्रे काढून बघा, ७० वर्षांपेक्षा अधिक लोकांनी एका मागोमाग जीव गमावले आहेत. त्यांच्या मृत्यूचे एक कारण तीव्र हवामान हेच आहे. त्यांनाच कशाला, उन्हाळा व उष्णतेच्या झळा या मानव जातीसाठी २१व्या शतकातील एक मोठेच आव्हान ठरले आहे.
एका बाजूला उन्हाच्या झळांचे वाढते प्रमाण त्यात वातावरण बदलाची भर व जंगलतोड, इंधनाचा वाढता वापर आदी मानवी हाराकिरीमुळे जीवन कठीण बनले आहे, यात शंकाच नाही. औद्योगिकीकरणाच्या आधीच्या काळापेक्षाही जागतिक तापमान एका अंशाने वाढले आहे. २१००पर्यंत हे तापमान दोन अंशाने वाढू शकते, ही आता काळ्या दगडावरची रेघ ठरेल...
देशात सर्वत्र तापमान ४० अंशांच्या वर गेलेले दिसते. त्यात आता थंड हवेच्या ठिकाणांचाही समावेश झाला आहे. स्वाभाविकच सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा व एकूणच व्यवस्थांवर ताण पडला आहे.
मानवी जीवन होरपळू लागले आहे. शहरांच्या रचनेमुळे त्या संकटात आणखी भर पडली आहे. दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारती, काँक्रीटीकरण, रस्त्याच्या बाजूच्या जमिनींवर टाइल्सची वाढती आच्छादने या सर्व कृत्यांमुळे उष्णता वाढण्यास मदत झाली. मानवी हस्तक्षेप वाढला की हिरवळीवर संक्रांत येते, झाडे तोडली जातात. स्वाभाविकच वातावरण उष्ण बनते.
वाढत्या उष्णतेमुळे एकूणच पर्यावरणीय संतुलनावर व आरोग्य सुविधांवर परिणाम झाला आहे. ‘लान्सेट प्लॅनेटरी हेल्थ’च्या एका सर्वेक्षणात हृदय, फफ्फुसे व मूत्रपिंडाचे विकार वाढू लागल्याचा इशारा देण्यात आला आहे. २०२३च्या उन्हाळ्यात तापमान वाढीचे नवे विक्रम प्रस्थापित झाले, त्यातून शेती व आधीच दबावाखाली आलेल्या आरोग्य सुविधा उद्ध्वस्त झाल्या.
भारतात जरी एकाच वेळेला वेगवेगळे वातावरण पाहायला मिळत असले, तरी एक सारखीच सामाजिक, आर्थिक आव्हाने उद्भवली आहेत. २०२३साली ‘अर्बन क्लायमेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेक्षणात या शतकाच्या शेवटास आपल्या देशातील तापमान ५ अंशाने वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. वातावरण बदलाचा हा उद्रेक ठरेल.
अतितीव्र वातावरणासंदर्भातील घटनांसाठी यापूर्वीच जर्मनीस्थित जागतिक संघटनेने भारताला इशारा दिला आहे. २०२१नंतर भारतात दर १ लाख लोकसंख्येमध्ये २,२६७ मृत्यू घडले. आपल्या सकल घरगुती उत्पादनात ०.७२ टक्के घट झाली. शहरीकरणात झपाट्याने होत असलेली वाढ, जमीन वापरातील बदल व जंगलतोड यामुळे तापमानवृद्धीत फरक पडला. शहरी भागांमधील उष्णतेच्या लाटा ही आता नित्याचीच गोष्ट ठरू लागली आहे व पुढचा काळ दाटीवाटीने वसलेल्या शहरांसाठी जीवघेणा ठरणार आहे.
नवी दिल्लीस्थित केंद्रीय विज्ञान व पर्यावरण संस्थेने (सीएसई) या विषयावर महत्त्वाच्या महानगरांमध्ये सर्वेक्षण केले. २००१ ते २०२३पर्यंत त्यांनी विविध आकडेवारी पडताळून पाहिली, त्यात प्रत्यक्ष तापमान व वाढती आर्द्रता यांचा आलेख घेतला. त्यातून आपले भू-क्षेत्र कसे उकळती काहिली बनू लागले, यावर नेमकेपणाने उजेड पडतो.
भारतीय उन्हाळा हा आता उष्णतेच्या लाटांशी सारखाच जोडला गेला आहे. त्यात भेसूर शहरीकरणाने भर टाकली, याबद्दल शंका करण्याचे कारण नाही. शहरांमध्ये झाडांची कमी झालेली संख्या, काँक्रीटीकरण, दाटीवाटीने उभ्या झालेल्या इमारती, घरबांधणीसाठी उष्णता वाढवणारे साहित्य, हे प्रकार उष्णता धरून ठेवतात शिवाय ती वाढण्यास मदत करीत आहेत.
शहरी उष्णतेचे मोजमाप करताना अजूनपर्यंत आर्द्रतेला फारसे महत्त्व दिले जात नव्हते. परंतु उष्णतेची लाट उद्भवण्यास व शहरी तापमानामध्ये वाढ होण्यास आर्द्रता आता महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे अनुमान शास्त्रज्ञांनी काढले आहे. काही शहरांमध्ये हवेचे तापमान घटूनही आर्द्रतेच्या परिणामातून वातावरणात फरक पडलेला नाही.
गेल्या दोन दशकात भारतातील बहुसंख्य शहरांची आर्द्रता ८ ते दहा टक्क्यांनी वाढली. पश्चिम किनारपट्टीवर जेथे आर्द्रतेचे प्रमाण यापूर्वीच अधिक होते, हवेतील बाष्पामुळे तापमान असह्यतेच्या पातळीवर जाऊन उष्णता वाढण्यास मदत झाली, त्यातून आपल्या सार्वजनिक आरोग्यावर परिणाम झाला. विविध आजार असलेल्या मंडळींना आम्ही दुपारी १२ ते तीन या वेळेत बाहेर न पडण्याचा सल्ला देतो, असे राज्याच्या आरोग्य खात्याचे आजार प्रतिबंधक प्रमुख डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी सांगितले.
शहरी आरोग्य निर्देशांकातील गुंतागुंत वाढण्यास वातावरणात सतत होत असलेले बदल कारणीभूत झाले आहेत. एकेकाळी पावसाळ्यात उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळायचा. परंतु सध्या पावसात आता वातावरण थंड बनेलच, याची शाश्वती राहिलेली नाही. पावसाळापूर्व काळात जाणवते, तसेच काहीसे उष्ण वातावरण सध्या पावसाळ्यातही आपण अनुभवू लागलो आहोत. पावसाळ्यात निर्माण होणारी शीतलता आता आर्द्रतेमुळे जाणवत नाही व पावसाळाही आता उन्हाळ्यात जाणवणाऱ्या झळा निर्माण करू लागला आहे.
शहरी वातावरणातील उष्णतेची भर, बिगरनियोजन व घिसाडघाईतून उद्भवलेला विकास यामुळेच घडते आहे. आपण शहरात दाटीवाटीने इमारती निर्माण केल्या. गोव्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये नवीन इमारती बांधायला जमीनच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे जुन्या इमारती पाडून तेथे महाकाय इमारतींची बांधणी सुरू आहे. कोणालाही तेथे हरित इमारती उभारण्यास रस नाही.
नियमांना बगल दिली जाते. शहरांमधील हिरवळ जवळजवळ ५० टक्क्यांनी घटली आहे. आपल्याकडे पोर्तुगीज काळात लावलेली झाडे टिकून आहेत. नवीन हिरवळ निर्माण करण्याच्या घोषणा केल्या जातात. त्याबाबत अगदीच अविश्वास दाखविण्याचे कारण नाही. खासगी कंपन्यांचीही मदत घेतली जात आहे. हे प्रयत्न वाढवावे लागतील. त्यात लोकसहभाग महत्त्वाचा आहे.
शहरे ही आता ‘उष्णतेची चेंबर’ बनली आहेत. हे प्रमाण वाढवल्यास हिरवळीचाही परिणाम जाणवणार नाही. मी मागच्या एका लेखात म्हटल्याप्रमाणे देशातील बहुतांश शहरांमध्ये रात्रीचेही तापमान घटत नाही. याचा अर्थ आपण इमारतींची संख्या वाढवली व त्यासाठी वापरलेले साहित्य पर्यावरणपूरक नाही.
परिणामी ही सामग्री रात्रीही उष्णता निर्माण करते. आपल्याकडे तशा जलाशय व शेतीखालील जमिनींचेही प्रमाण घटले आहे, त्यामुळे शीतलता निर्माण होत नाही. समुद्र आणि नद्याही दिवसभरातील उष्णता धरून ठेवत असल्याने आसपासच्या भागांना उष्णता जाणवते. रात्रीचे तापमान घटत नसल्याने आरोग्याचे प्रश्न गंभीर बनलेत. विशेषतः कमी आर्थिक गटांना हा प्रश्न गांभीर्याने सतावतो आहे. उघड्यावर काम करणारे कामगार, ज्येष्ठ नागरिक व मुलांचे जीवन संकटात सापडले आहे.
वातावरण बदलाचे संकट तीव्रतेने घोंगावत असल्याने संपूर्ण देशावरच आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यातून मजूर वर्गाच्या क्रयशक्तीवर परिणाम होईल, ऊर्जेच्या मागण्या वाढतील व सार्वजनिक आरोग्यावर नवे ओझे पडेल.
ज्या क्षेत्रात उघड्यावरचे काम आवश्यक आहे, अशा घरबांधणीत कृषी, मत्स्योद्योग व उत्पादन क्षेत्रावर खात्रीने परिणाम संभवत आहे. पुढच्या दहा वर्षांत उघड्यावर काम करण्यासाठी मजूर मिळणेही कठीण होईल. कामगारांची क्रयशक्ती घटणार असल्याने नवीन आर्थिक बोजा पडेल. आपल्या देशाला तर हे आर्थिक संकट अधिक गांभीर्याने विचारात घ्यावे लागणार आहे.
उत्पादकता घटल्यामुळे सकल उत्पन्नावर मोठा परिणाम होऊ घातला आहे. त्यातून शहरी अर्थकारण ढासळेल, असा अंदाज आहे. शहरी उत्पादनक्षमता उन्हाळ्यात घटत असल्याचे संशोधन यापूर्वीच झाले आहे. आपल्या गोव्याला तर उघड्यावरील एकूणच कामांसाठी राज्याबाहेरचा मजूर लागतो. शेती व मत्स्योद्योगाला लागणारा सर्व मजूर आता आयात करावा लागतो. भर समुद्रात मासेमारी करणे पुढच्या काळात कठीण होईल, त्यात आधीच महागलेली मासळी न परवडण्याच्या पातळीवर जाऊ शकते. शिवाय ताजी मासळी मिळणे कठीण होईल.
ऊर्जा वापराचे प्रमाण वाढणे क्रमप्राप्त आहे. गोव्यात यापूर्वीच आम्ही वातानुकूलित यंत्रणेवर अवलंबून राहू लागलो आहोत. पणजी शहराचेच उदाहरण घेतले तर सध्याच्या वातावरणात कार्यालयीन कामासाठी वातानुकूलन यंत्रणा अत्यावश्यक बनली आहे.
घरात रात्रीचे तापमान घटत नसल्याचे संध्याकाळी उशिरापासून लोक वातानुकूलित व्यवस्थेत राहणे पसंत करतात. रात्रभर ही यंत्रणा सुरू राहते, पुन्हा कार्यालयात यंत्रे सुरू ठेवावी लागतात. गोव्यात गेल्या दोन वर्षांत सलग दोन महिने वातावरण ३५ अंशांच्या पुढे गेले होते. वर म्हटल्याप्रमाणे आर्द्रतेची त्यात भर पडून मे महिन्यात हे तापमान ४७ अंशाच्या वर गेले. त्यामुळे वातानुकूलित यंत्रणा व पंख्यांची गरज वाढली. या व्यवस्थांवर जादा अवलंबून राहावे लागत असल्याने ऊर्जेच्या पायाभूत सुविधांवर ताण येऊ लागला आहे.
आपण विजेवर जास्तीतजास्त अवलंबून आहोतच, शिवाय ग्रीन हाउस वायूचे जादा उत्सर्जन करू लागलो आहोत.
भारताने ‘शीतलता कृती कार्यक्रम’ २०१९मध्ये पुढे आणला. तापमानवृद्धी घटवणे हे त्यामधील एक उद्दिष्ट आहे. २०३७-३८मध्ये वातानुकूलित व्यवस्थेची मागणी २५ ते ३० टक्क्यांनी घटवण्याचे हे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आपल्याला ऊर्जेची मागणी २५-४० टक्क्यांनी घटवावी लागणार आहे. दुर्दैवाने वाढती उष्णता शहरी नागरिकांना जीवेघणी ठरली आहे. परिणामी लोकांनी शीतलता निर्माण करण्यासाठी अनियंत्रित ऊर्जेच्या वापरावर भर दिला आहे.
जागतिक बँकेच्या एका अवलोकनानुसार भारतात शीतलता निर्माण करण्याची मागणी २०३७मध्ये आठ पटीने वाढणार आहे. याचा अर्थ दर १५ सेकंदाला वातानुकूलित यंत्रणा एक वाढेल, म्हणजेच पुढच्या दशकात ग्रीन हाउस गॅसेसचे प्रमाण ४३५ टक्क्यांनी वाढणार आहे. त्यामुळे आपण पारंपरिक ऊर्जेवर अवलंबून न राहता कमी कार्बन वापराच्या ऊर्जेची म्हणजे हरित ऊर्जेची कास धरणे आवश्यक बनले आहे.
अतिउष्णतेमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतील यात शंकाच नाहीत. उष्णतेमुळे शरीरातील चैतन्य नाहीसे होते, शिवाय उष्माघात हा सर्वांत मोठा परिणाम आहे. त्यातून आरोग्य सेवा कोलमडून पडतील. ‘हेलियॉन’ या मासिकात २०२४मध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा हवाला देऊन जो वृत्तांत प्रकाशित झाला, त्यात उष्णतेमुळे २४ हजार लोकांना प्राण गमवावे लागले असल्याचा निर्देश आहे.
आपल्याकडेही ज्येष्ठ नागरिक व उघड्यावर काम करणारे मजूर यांचा सतत बळी जात आहे. दुर्दैवाने ७५ वर्षांवरील व्यक्ती आधीच इतर अनेक आरोग्य समस्यांशी झगडा करीत असल्याने उष्णतेमुळे तो दगावला असल्याचे सहज अनुमान काढले जात नाही. परंतु अतितीव्र उष्णतेमुळे शहरातील मृत्यूंचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढल्याचा अहवाल यापूर्वीच प्रसिद्ध झाला आहे. गोव्याच्या आरोग्य खात्याने त्याबाबत अधिक अभ्यास हाती घेणे आवश्यक ठरले. या काळात इस्पितळात भरती होणाऱ्यांचेही प्रमाण वाढत असल्याचे अनुमान आहे.
गोव्यातील सरकारी डॉक्टरांच्या मते, येथे उष्माघाताचे बळी पडत नाहीत, परंतु ज्यांना मधुमेहासारखे आजार आहेत, त्यांच्या समस्या वाढतात. उष्णतेमुळे व्यायाम होत नाही; परिणामी आजार तीव्र बनतात. वृद्धांच्या शरीराची आधीच झीज झालेली असते. ते अस्वस्थ बनतात.
डॉ. विश्वजित राणे यांच्याकडे आरोग्य आणि वनखातेही आहे. टीसीपी हे महत्त्वाचे खातेही ते सांभाळतात. त्यामुळे त्यांच्यावर एक नवीनच जबाबदारी पडली आहे. शहरांमध्ये हरित आच्छादने (त्याला काहीजण ‘ग्रीन लंग्स’ असेही संबोधतात) उभी करण्यावर ते गांभीर्याने विचार करू लागले आहेत, ती दिलासा देणारी बाब ठरावी. महत्त्वाचे म्हणजे गोव्यातील शहरे व वाढती उष्णता यावर मूलभूत विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पर्यटनावर आधारित आपली व्यवस्था संपूर्णतः कोसळू नये, म्हणून हे उपाय तातडीने योजावे लागतील. आत्ताच उष्णतेमुळे पर्यटकांचे येणे कमी झाले आहे.
एका बाजूला हरित आच्छादने तयार करणे व दुसऱ्या बाजूला शहरी जलाशयांचे निर्माण व संवर्धन हाती घ्यावे लागेल. तलाव, जलाशय, खाडींची स्वच्छता, अशा अनेक नैसर्गिक उपायांमुळे तापमान घटू शकते. शिवाय प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक उपाय योजावे लागतील. ताळगावमधील शेतींवर आलेले झोपडपट्ट्यांचे आक्रमण, यामुळे शहर बीभत्स बनतेच शिवाय तापमानातही वाढ होते.
पणजी व ताळगाव ही जोडशहरे सध्या अतिक्रमणांच्या तावडीत सापडली आहेत. पणजीचे तापमान वाढण्यास ताळगावमधील घटलेली शेती ही प्रामुख्याने जबाबदार आहे. हा लेख लिहिला जात असतानाही ताळगावमध्ये शेतजमिनींवर आक्रमण चालू असल्याचे सर्वांनाच उघड्या डोळ्यांनी दिसते आहे.
राज्य सरकारला ते आक्रमण अडविण्याचे धारिष्ट दाखवावे लागेल. याच सरकारच्या काळात शहरी आणि ग्रामीण भागातील बरीच हरित आच्छादने हटवण्यात आली, त्यामुळे राज्यात काँक्रीटीकरण वाढले आहे. हा शाप भाळी मिरवायचा नसेल तर भाजप संघटनेलाही सरकारला काही खडेबोल ऐकवावे लागतील. शहरी नियोजन हा विषय कधी नव्हे तो राज्यातील जनतेच्या आरोग्याशी निगडित झाला आहे. आपण शहरी जीवन असुरक्षिततेच्या खाईत ढकलतो आहोत.
गोवा एकेकाळी शांत-शीतल प्रदेश म्हणून ओळखला जात असे, गेल्या २०-२५ वर्षांत राज्यकर्त्यांनी या निसर्गसंपन्न भूमीचे अक्षरशः लचके तोडले. पर्यावरणाला बोचकारून सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक हित व आर्थिक स्थैर्याचे धिंडवडे काढले. हे सर्व काही राजकीय नेत्यांच्या स्वार्थातून घडले व ही भूमी अक्षरशः दिल्लीवाल्यांच्या ताब्यात गेली आहे. आपल्याला गोव्याची भूमीच नव्हे तर येथील सर्वसामान्य माणसाचे आरोग्य नियंत्रणात ठेवायचे असेल तर काही कल्पक, तर काही दीर्घकालीन उपाय योजण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवावी लागेल. पुढच्या पिढ्यांना गोव्यात सुरक्षित वाटावे, असे वातावरण आपल्याला निर्माण करायचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.