अग्रलेख- समाजाच्या संवेदनांची हत्या..! क्लब मालक, अधिकारी अन् नियंत्रण यंत्रणांच्या कुचराईत 25 निष्पाप जिवांनी गमावला जीव

Arpora Nightclub Fire Case: गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटन राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात सुरक्षिततेची ही पातळी असल्यास, ही घटना केवळ एक इशारा नसून मोठा धोका आहे.
Goa Nightclub Negligence 25 Deaths
Goa Nightclub Negligence 25 DeathsDainik Gomantak
Published on
Updated on

सचिन कोरडे

मृतांच्या गावांत आक्रोश आहे. पण गोव्यात? गोवा शांत आहे. जणू काही घडलेच नाही. कारण या २५ मृतांमध्ये एकही गोमंतकीय नव्हता, ही वस्तुस्थिती आपल्यासमोर सामाजिक संवेदनांच्या बोथटपणाचे कुरूप चित्र उभे करते.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिक, त्यात पर्यटकही, मृत्युमुखी पडले, तेव्हा संपूर्ण देशात वेदना आणि संतापाची प्रचंड लाट उसळली होती. ‘संसदेतून सडक’पर्यंत शोक व्यक्त केला गेला. कारण त्या मृत्यूंना देशाने ‘आपले’ मानले. दहशतवाद हा राष्ट्रीय जखमा उघडणारा विषय असल्याने लोक एकदिलाने उभे राहिले. परंतु, गोव्यातील एका रात्री, कोणत्याही भ्रष्टाचाराच्या पायावर उभारलेल्या नाइट क्लबच्या आगीत हातावर पोट असणाऱ्या २१ कामगारांचे प्राण गेले, चार पर्यटक दगावले पण, त्यांच्याप्रति मानवी संवेदना तीव्रतेने जागल्या नाहीत. का, ती सामान्य माणसं होती म्हणून की ते परप्रांतीय होते म्हणून? झालेली संवेदनांची राखरांगोळी हृदय हेलावणारी आहे.

Goa Nightclub Negligence 25 Deaths
Arpora Nightclub Fire Case: फरार क्लब मालकांचा खेळ खल्लास! लुथरा बंधू लवकरच गोवा पोलिसांच्या ताब्यात; चौकशीत महत्त्‍वपूर्ण माहिती हाती आल्‍याची चर्चा

ज्या नाइट क्लबमध्ये २५ बळी गेले त्या क्लबच्या किचनला आपत्कालीन दरवाजा नव्हता, सुरक्षिततेची साधने नव्हती आणि क्लबकडे परवानाही नव्हता, तरी तो धडाक्यात राजरोस चालत होता. कामगारांना या सर्व बेकायदेशीरतेची माहिती नव्हती; त्यांच्या जिवाचे मोल कोणाच्या नजरेतच नव्हते. आग लागली तेव्हा लोकांना वाचण्यासाठी पळण्याची संधी मिळालीच नाही. शरीरं, स्वप्नं, आयुष्यं काही क्षणांत राख झाली.

ही घटना ‘अपघात’ म्हणण्याची कुणाचीच हिंमत होऊ नये. या घटनेत व्यवस्थेची बेपर्वाई, कायद्याचे दारुण अपयश आणि देखरेखीचा पूर्ण अभाव अत्यंत स्पष्ट दिसतो. या २५ जणांच्या घरांमध्ये आज भीषण शांतता आहे. कुणाचा बाप रडत रडत मुलाच्या फोनची वाट पाहतो आहे. कुणाची माय अजूनही दाराशी बसली आहे, ‘आता येईल’ या शेवटच्या आशेवर. कुणाची बहीण लग्नाची साडी हातात धरून बसली आहे, भाऊ पैसे पाठवेल म्हणून. तिच्या हातात आता साडी आहे, पण भविष्याचा रंगच पुसला गेला आहे.

Goa Nightclub Negligence 25 Deaths
Arpora Nightclub Fire Case: 25 मृत्यूंची गंभीर दखल! हडफडे दुर्घटनाप्रकरणी मानवाधिकार आयोगाची मोठी ॲक्शन; मुख्य सचिव अन् पोलीस महासंचालकांना समन्स

मृतांच्या गावांत वातावरण विदारक झाले आहे. मातांच्या आक्रोशाने हवा भारली आहे. बापांच्या पायाखाली जमीन डळमळते आहे. पण गोव्यात? गोवा शांत. शब्दही शांत. जणू काही घडलेच नाही. कारण या २५ मृतांमध्ये एकही गोमंतकीय नव्हता, ही वस्तुस्थिती आपल्यासमोर सामाजिक संवेदनांच्या बोथटपणाचे कुरूप चित्र उभे करते. नाहीतर निदान मेणबत्त्या तरी पेटल्या असत्या. नाहीतर निदान दोन बॅनर तरी उभे राहिले असते. नाहीतर निदान काही प्रश्न तरी विचारले गेले असते.

हडफड्यातील (Arpora) हा उच्चभ्रू नाइट क्लब. बाहेर जल्लोष, संगीत, नृत्य तर आत श्वासासाठी झगडणारी माणसं. हे दृश्य कोणत्याही सभ्य समाजाला हादरवणारे आहे. ही दुर्घटना नव्हे; ही हत्या आहे. व्यवस्थेची, कायद्याची आणि समाजाच्या संवेदनांची. या प्रकरणात क्लबचे मालक, परवानगी न तपासणारे अधिकारी, आणि मनोरंजन क्षेत्रावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणांची कुचराई स्पष्ट दिसून येते. आता ही कुचराई कुणाच्या पथ्यावर पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Goa Nightclub Negligence 25 Deaths
Arpora Nightclub Fire : हडफडे अग्नितांडव! अजय गुप्ताला दिल्लीतून अटक, 'गोगी टोळी'सह 'काळ्या पैशाचे' लागेबांधे उघड

गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटन राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात सुरक्षिततेची ही पातळी असल्यास, ही घटना केवळ एक इशारा नसून मोठा धोका आहे. मुख्यमंत्री सांगतात की, गोव्याने मृतदेह सरकारी खर्चाने त्यांच्या राज्यांत पाठवले आणि मदतही दिली जाईल. परंतु मदत म्हणजे न्याय नाही. कागदावरची घोषणा, आर्थिक मदत किंवा सांत्वनाची काही वाक्ये यांनी कुणाचं आयुष्य परत येत नाही. जबाबदारी निश्चित होईपर्यंत आणि दोषींना शिक्षा होईपर्यंत ही घटना संपल्याचे गृहीत धरणे म्हणजे संवेदनांची आणखी हत्या होय.

Goa Nightclub Negligence 25 Deaths
अग्रलेख: हडफड्याच्या अग्निकांडाचा उगम कझाकस्थानात? कझाकी नर्तिकेचं नृत्य नसतं तर क्लबला आग लागली नसती?

झारखंडच्या (Jharkhand) ज्ञानेश्वर महातो यांच्या डोळ्यातील अश्रू थांबेनात. तीन मुलांचा हा बाप त्याच्या दोन मुलांच्या परतीची वाट पाहत होता. एका रात्रीत त्याचा संसार उद्ध्वस्त झाला. एका बहिणीच्या लग्नाच्या साडीवर आज राखेचा रंग चढला आहे. अशा असंख्य कहाण्या आज २५ मृतांच्या मागे उभ्या आहेत. प्रत्येक कहाणीची वेदना वेगळी, पण क्रूरता एकच. या मृत्यूंचा आवाज गोव्यात पोहोचला नाही. कारण ते परकीय, परप्रांतीय होते. मित्रांनो, हे अत्यंत धोकादायक संकेत आहेत. आज झारखंड, आसाम, बंगाल, बिहारचे लोक मेले. उद्या अशाच व्यवस्थेचा बळी एखादा गोमंतकीय ठरला, तर आपणही अशाच शांततेत बसणार आहोत का? ही आग विझली असेल; परंतु तिचा धूर अजूनही हवेत आहे. तो धूर दररोज एकच प्रश्न विचारतो, ‘आपल्याला या वेदनेचा वासही येत नाही का?’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com