
मधू य. ना. गावकर
आजच्या घडीला ओल्ड गोव्याचे फेस्त आणि शिरगावची जत्रा सरकारी पातळीवर राज्योत्सव म्हणून साजरे करण्याची योजना सरकार आखत आहे. यंदाच्या वर्षी जुने गोव्याच्या फेस्ताला सुरक्षा व्यवस्था नीट नेटकी ठेवून जनतेकडून वाहवा मिळविली. त्याचप्रमाणे शिरगावच्या जत्रेला देवस्थान समिती, ग्रामपंचायत आणि सरकारी यंत्रणा हातात हात घालून काम करून सुरक्षा व्यवस्था चोख ठेवतील, असे प्रत्येकास वाटत होते. पण त्या रात्री झाले भलतेच. जत्रेत कधी न घडलेली घटना घडून भाविकांचे आणि देवीच्या भक्तगणांचे, निरपराधी माणसांचे जीव नाहक गेले.
गरीब कुटुंबातील कर्ताकरविता आधार गेल्याने पाच सहा गावांत आक्रोश ऐकू आला. कैक गावाचे लोक जखमी होऊन त्यांना मध्यरात्री, दोन तीन ठिकाणच्या हॉस्पिटलात दाखल करावे लागले. जत्रेस गेलेले आपल्या घरातील लोक हॉस्पिटलात पोहोचल्याच्या वार्तेने संपूर्ण गोवा दुःखाच्या सागरात बुडून आपल्या माणसाची विचारपूस करण्यास हॉस्पिटलात अगर शिरगावला पोहोचले. शिरगावच्या जत्रेप्रमाणे हॉस्पिटलच्या दारात लोकांची गर्दी जमली.
कुण्या काळी शिरगाव ग्रामस्थांच्या पूर्वजांनी, महाजनांनी अगर ग्रामस्थांनी एकत्र जमून कृषी संस्कृती रुजवली. त्या आधारावर शेतीभाती फळबागायती पिकवून पिकणारे फळ अगर धान्य देवीला अर्पण केले. तिथल्या झरींच्या रूपाने निर्मळ वाहणाऱ्या थंड पाण्यावर ते जिवंत राहिले.
त्याच पाण्याला पवित्र मानून देवीच्या रूपाने कलशात भरून ते तीर्थ म्हणून पिऊन भक्तीने श्रद्धा वाढविली. तीच श्रद्धा व संपूर्ण गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमाभागातील कोकणी मराठी बोलणाऱ्या भाविकांच्या कानावर पडून लोक देवीचे धोंडगण म्हणून उपवास करून, सफेद धोतर नेसून सफेद बनियन घालून, हातात रंगीत गोंड्यानी सजवलेली बेतकाठी धरून शिरगावला देवीच्या चरणी आपले नवस फेडण्यास येऊ लागले.
नवसाला पावणारी देवी म्हणून सर्वत्र वार्ता पसरल्याने धोंड गणांची संख्या वाढत गेली. ऐकीव माहितीनुसार आज लाखांच्यावर तिचे भक्तगण आहेत. गेल्या कैक वर्षापासून वर्षाकाठी त्यात हजारभर नव्या धोंडाची भर पडत आहे. त्या प्रत्येक धोंडाबरोबर त्यांच्या घरातील चार पाच लोक जत्रेला येतात. म्हणजे हजारात आणखी भर पडून गर्दी वाढू लागली, हे भान पूर्वज बावीस चौगुले महाजनांना होते.
माझ्या बालपणी मी वडिलांबरोबर कैक वेळा खांडोळ्याहून शिरगावला चालत गेलो आहे. त्याकाळी धोंडांच्या तळी परिसरात आंबा, फणस, नारळांची दाट झाडे होती. खालच्या बाजूला विस्तीर्ण वायंगण- सरद खाजन शेती होती. त्या शेतात सोनेरी पीक असलेल्या भाताच्या रोपाला भारदस्त कणसे डोलत.
खाजन भागात मिरची, कांदा, भाजीपाल्याचे मळे होते. वरच्या डोंगराळ भागात काजू आणि जंगली झाडांची वनराई पाहून हिरवाशालू नेसलेली लईराई आई उंच मुर्डी ठिकाणी बसून आपले दर्शन देत होती. संध्याकाळी तळीकडून सुरक्षा व्यवस्था नसताना देवळाकडे जाताना सर्वजण शिस्तीत जाणे येणे करीत होते. त्यात मुलेबाळे, वृद्ध आई, बाबा, बहीण, भाऊ प्रत्येकाला मान देऊन धोंडगण चालत होते.
रस्त्याच्या कडेला मोगरीचे कळे विकण्यासाठी लोक रांगेत रात्रभर उभे राहत. ते गळ्यात घालून धोंडगण कळसाबरोबर नाचत देवळाकडून होमकुंडाकडे आणि होमकुंडाला प्रदक्षिणा घालून तळीकडून मुर्डीवर कळस घेऊन जायचे. नंतर तळीवर धोंड आंघोळ करून देवीने दिलेला कुड्याच्या फुलांचा प्रसाद तोंडात घालून रात्री तीन साडेतीन वाजता पेटत्या अग्निकुंडातून प्रवेश करत.अशा पद्धतीने देवीच्या व्रताची सांगता करत.
पहाटे देवीच्या कलशाने अग्निदिव्य करून चव्हाट्यावर येऊन स्थानापन्न झाल्यावर धोंडगण तिचा आशीर्वाद घेऊन गळ्यातील मोगरीचे हार काढून तिथल्या पिंपळ, आंबा, फणस, वडाच्या फांद्यावर फेकायचे. लोंबकळणाऱ्या मोगरीच्या माळांनी झाडाची सजावट पाहावयास मिळायची.
पूर्वीच्या काळी जत्रेस जाणारे लोक कोणाच्याही घराच्या अंगणातील मंडपात बैठक घ्यायचे, त्यांच्या घरी भोजन करायचे, झोपायचे. इतका मायेचा स्पर्श तिथले गावकरी द्यायचे. कोण? कुठला? म्हणून कोणालाही विचारीत नव्हते. आलेली माणसे आपलीच म्हणून त्यांची सेवा करायचे.
शिरगावात पोर्तुगीज काळात मायनिंग सुरू झाले. पण ते फोफावून गावचा विध्वंस झाला नव्हता. अस्नोडा पार करून शिरगाव देवळाकडे दोन अडीच किमी अंतर भाविक आणि धोंड तांबड्या मातीच्या रस्त्याने पार करत. देवीच्या नावाचा जयजयकार, भक्तीची स्फूर्ती, जयघोष करीत तो मधुर आवाज कानी घुमत होता.
त्याकाळी शिरगाव म्हटले की स्वच्छता आली. तिथे कोंबड्यांचे पालन करीत नाही. नवीन भक्त धोंडव्रताला सुरुवात करताना तीन महिने मांसाहार करीत नव्हता. तो एक महिना मासळी खात नाही. पाच दिवस झर, तळी, तलाव, देवालय परिसरात मंडप उभारून सोवळेपण पाळतो. पूर्वी धोंडांना पोशाख परिधान केलेला पाहिल्यावर विठ्ठलाच्या आषाढी एकादशीला निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीचा भास व्हायचा.
कारण पंढरपूरला वारकरी पायी चालत जातात त्याचप्रमाणे पूर्वी धोंड पायी चालत जात होते. वैशाखावणवा असला तरी चालत जाताना दमत नव्हते. वाटेत तहान लागली तरी त्यांना लईराईच्या भेटीशिवाय काहीच दिसत नव्हते. त्यांना ध्यास होता देवीच्या भेटीचा आणि अग्निदिव्य पार करण्याचा.
घरी आल्यावर पोशाख उतरून तो धुऊन ठेवायचे. हातातील बेतकाठी धुऊन, सुकवून ती व्यवस्थित बांधून ठेवून उपवास संपवायचे. देवीचा उत्सव साजरा करण्यासाठी बावीस चौगुले महाजन एकत्र बसून विचार विनिमयाने निर्णय घ्यायचे. जत्रोत्सव शिस्तबद्ध व्हावा, यासाठी बारा बलुतेदार (सेवा करणारे) त्यांना विश्वासात घेऊन प्रत्येकजण आपले काम चोख, व्यवस्थित बजावत ते देवीच्या श्रद्धेपोटी. जत्रेत होणारी गर्दी काबूत ठेवण्यासाठी फेरीवाले, दुकानदार रस्त्यावर दुकाने थाटत नव्हते.
एकोणीसशे एकसष्ट साली मे महिन्यात जत्रेच्या रात्री काही स्वातंत्र्यसैनिक धोंडव्रत पाळतात ते जत्रेस आले असल्याची बातमी पोर्तुगिजांना कळली. त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना पकडण्यासाठी जत्रेच्या गर्दीत कुत्रे सोडले लोकांची पळापळ झाली, पण गावचे चौगुले, तिथले ग्रामस्थ आणि धोंडगणांनी एकोपा राखून जत्रेच्या भाविकांवर नियंत्रण ठेवून जत्रोत्सव सुरक्षित पार पाडला. ही घटना माझ्या बालपणातील आहे. पूर्वी एकदा जत्रेत वडाची फांदी तुटून गर्दीवर कोसळली. पण आश्चर्य! सर्व लोक सावध होऊन दूर झाले. त्या प्रसंगाला देवी धावून आली म्हणूया. कारण त्यात मी, अहम्, क्रूरपणा नव्हता.
देवीचे होमकुंड रचण्यास शेजारच्या मये गावातून तिच्या बहिणींकडून (केळबाय) लाकडे पाठविली जातात, म्हापशाची बहीण मिलाग्रीकडून अबोलीची फुले पाठवली जातात. मुळगावच्या बहिणीकडून फुलाची पेठ पाठवतात. हा शेजारधर्म, ही संस्कृती आपल्या पूर्वजांनी एकमेकांना मानसन्मान देऊन एकोपा राखण्यासाठी तयार केली आहे.
आज गावचा एकोपा तुटल्याने संजीवनी म्हणजे पाणी आणि सोने म्हणजे मँगनीज अवघ्याच श्रीमंत धनिकांच्या हाती गेले आहे. त्यांनी गावागावांत तुटलेल्या एकोप्याचा फायदा घेऊन हे गाव माती आणि धुळीने भरून ठेवले आहे. त्या जमिनीचे खरे मालक तिथल्या कोमुनिदाद संस्था आहेत. त्यांनी जमीन सांभाळली पाहिजे होती.
जत्रा एका दिवसात साजरी होते आणि तिची सांगता होते. पण तिथल्या पूर्वजांचा कष्टकरी समाज शिरगावात त्या देवीच्या चरणाकडे पिढ्यान्पिढ्या राहत आला आहे. आमचे पूर्वज शिकले नव्हते, पण त्यांना दूरदृष्टी होती. त्यांनी आपल्या गावच्या संस्कृतीला धक्का लागू दिला नाही. जत्रेला गालबोट लागू दिले नाही. पूर्वजांनी कुठलेही शिक्षण नसताना हे केले. त्यांचेच वंशज असलेले महाजन सुशिक्षित, उच्चशिक्षित असूनही किती धोंडगण आहेत याचे रजिस्ट्रेशन नाही. किती गर्दी होणार याचा अंदाज नाही, म्हणूनचे त्याचे नियोजनही नाही.
चेंगराचेंगरीनंतर मी शिरगावला भेट दिली. देवळाकडून पार नदी अस्नोडापर्यंत प्लास्टिक कचऱ्याचे रस्त्याच्या कडेला ढीग दिसत होते. देवळाच्या वरच्या भागात कचरा भरला होता जत्रेनंतरचा सहावा दिवस उजाडला, तरी कचरा उचल झाली नव्हती. जत्रेत दुकाने थाटणारे लोक पंचायत कर आणि देवस्थान कर भरून दुकाने थाटतात.
त्या पोट भरण्यास येणाऱ्या व्यापाऱ्यांची काय चूक? गाव स्वच्छ राखण्याची, ठेवण्याची जबाबदारी पंचायत आणि देवस्थानाची नाही काय? काही जणांनी चेंगराचेंगरीचे बोट धोंडगणांना दाखवले, म्हणजे धोंडभक्त तिथे मारामारी करण्यास जातात काय ? आणि सर्वच धोंड असे वागतात काय? मग पाच दिवस देवीचे व्रत पाळून उपयोग काय?
आज देवीच्या जत्रेसाठी सर्वांनी एकत्र बसून, विचारविनिमय करून चांगला मार्ग शोधून यापुढे देवीची जत्रा कशा पद्धतीने सुयोग्य रीतीने साजरी करता येईल, यावर विचारमंथन झाले पाहिजे. अस्नोडाहून देवळाकडे आणि देवळाकडून पैरापर्यंत रस्त्याचे सर्वांच्या सहमतीने रुंदीकरण झाले पाहिजे. सरकारी यंत्रणा, कोमुनिदाद पंचायत, देवस्थान समिती, बावीस चौगुले आणि महाजन यांनी पुढाकार घेऊन रस्ता रुंदीकरणाचा विषय सोडवला पाहिजे. यापुढे असे प्रकार घडू नये ही लईराई देवीच्या चरणी प्रार्थना करून पुढची जत्रा येण्याअगोदर तिथल्या अडचणी दूर होण्यास सर्वांनी एकोप्याने काम करण्याची बुद्धी देवो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.