Lairai Jatra Stampede: श्री लईराईच्या जत्रोत्सवातील दुर्घटनेचे 'गांभीर्य' खरंच कळले आहे का?

Goa Stampede: एके काळी जे संस्कृतीचे, सामाजिक एकोप्याचे केंद्र होते ते देवस्थान आता असंस्कृत, असामाजिक आणि दुही निर्माण करण्याचे स्थान झाले आहे. सत्ता, सोय, संपत्ती आणि स्वार्थ या ‘स’वर्णीयांचीच चलती आहे.
Lairai Jatra Stampede
Lairai Jatra StampedeDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: देवावरची श्रद्धा आणि देवासमोरच्या रांगा बिथरतील आणि देव ऐन मोक्याच्या ठिकाणीही विजनवासात जाईल, अशी सध्या गोव्यात स्थिती बनली आहे. श्रद्धेतून जो समाज मान देतो, असे देवस्थान समितीशी निगडित (सन्माननीय अपवाद वगळता) मानकरी, कार्यालयाला गाभाऱ्याहून महत्त्वाचे मानू लागले आहेत.

निष्ठा कडव्या बनून अहंभाव शिगेला पोहोचला आहे. या भावकारणाच्या मागे अर्थकारणच जबाबदार आहे. शिरगावातील श्रीलईराई देवीच्या जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीच्‍या धक्क्यातून गोमंतकीय अजूनही सावरलेले नाहीत. काही जखमींवर अद्याप उपचार सुरू आहेत. ज्यांचे आप्त दुर्घटनेत जिवाला मुकले, अशा नातेवाइकांच्या घशाखाली अन्न उतरत नाहीये आणि अशावेळी देवस्थान समितीचे आजी-माजी अध्यक्ष आरोप-प्रत्यारोपांमध्ये मश्गूल आहेत.

हे अत्यंत लाजिरवाणे चित्र आहे. दुर्घटनेला कोण जबाबदार आहे हे एव्हाना पुरता गोवा जाणून आहे. एकमेकांवर चिखलफेक करून जबाबदारी झटकणारे समाजाच्या नजरेतून उतरत आहेत. लईराई देवीचा उत्सव हा समितीपुरता वा गावापुरता मर्यादित नाही, तर तो समस्त गोमंतकीयांचा आहे. परिणामी आयोजनाची जबाबदारी सरकारसह देवस्थान समिती व निगडित घटकांची होती. दुर्घटनेला या साऱ्यांसह धोंडांचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे.

झालेल्या घटनेचे दायित्व स्वीकारून माफी मागायची राहिली दूर, एकमेकांवर चाललेला दोषारोप कीव आणणारा आहे. खाण लीज क्षेत्रातून मंदिर बाहेर काढण्यास असमर्थ ठरलेल्या सरकारने लईराई देवीच्या उत्सवास ‘राज्य महोत्सव’ जाहीर करून स्थानिकांना चुचकारण्याचा प्रयत्न केला;

परंतु मंदिर समितीला सरकारी हस्तक्षेपाची भीती वाटली, त्यांनी राज्य महोत्सव दर्जाला कडाडून विरोध केला आणि तेव्हापासून सरकारी यंत्रणेसोबत समितीने अंतर राखले. जुनी देवस्थान समिती मार्चअखेरीला अस्तंगत झाली. परंतु नव्या समितीचे अध्यक्ष व माजी अध्यक्ष यांच्यातील सवतासुभा आयोजनात शैथिल्यास कारणीभूत ठरला, हे सत्य शाब्दिक चिखलफेकीतून समोर आले आहे.

राज्य महोत्सवास देवस्थान समितीची नकारघंटा असल्याने प्रशासकीय व्यवस्था समन्वयात मागे राहिली, असेही काहींचे निरीक्षण आहे. जत्रोत्सव काळात तळी ते ‘होमखण’ दरम्यानच्या रस्त्यावर बॅरिकेट्स लावणे किती गरजेचे आहे, हे ज्यांना समजले नाही, त्यांनी कसले नियोजन केले मग?

जत्रेपूर्वी दोन दिवस आधी प्रशासनाने ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे व बॅरिकेट् लावण्यास सांगितले, जे कमी अवधीत शक्य नव्हते, हा विद्यमान देवस्थान अध्यक्षांचा आरोप आहे. तो खरा मानल्यास प्रशासन पूर्णतः गाफील होते. देवस्थान समित्यांमध्ये हस्तक्षेपास सरकारला अधिकार नाही, हे शुद्ध थोतांड आहे. मामलेदारांना पूर्ण अधिकार आहेत.

Lairai Stampede Shirgao
Goa StampedeDainik Gomantak

व्यवस्थापनात जे कोणी प्रशासकीय अधिकारी होते, मामलेदार होते, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी होती. परंतु, सरकारही ज्या पद्धतीने अहवालास विलंब करत आहे, ती बेपर्वाई आहे. सरकारला खरेच गांभीर्य कळले आहे का, अशी शंका वाटते. शिरगावातील जत्रा व पेडण्याच्या पुनवेलाच बेशिस्तीचा प्रचंड अनुभव का येतो, याचाही विचार करण्याची वेळ आली आहे.

धोंडांच्या उन्मादाकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष करण्यात आले, देवाची सेवा करणाऱ्यांमध्ये हिंसक वृत्ती असूच शकत नाही. जेथे श्रद्धा आहे, तेथे मानवता आहे, सामाजिक कल्याणाचा हेतू आहे. तो नसल्यास भक्तीचे ते ढोंग ठरते. धार्मिक उन्मादामागोमाग येणारा मानापमानाचा उन्माद देवत्वाचाही विचार करत नाही एवढा अंध आणि बेलगाम होतो.

Lairai Jatra Stampede
Goa Stampede: ‘लईराई’ जत्रेतील दुर्घटनेमागे माजी अध्यक्षांचा हात! विद्यमान देवस्थान समितीचा खळबळजनक आरोप

चेंगराचेंगरीसारखी भविष्यात दुर्घटना घडू नये, यासाठी भविष्यात काय करणे अपेक्षित आहे, हे आम्ही याच स्तंभातून मांडले आहे. पण, त्याचा दृश्य परिणाम संबंधितांची इच्छा आणि शक्ती यावर अवलंबून आहे. सन्माननीय अपवाद वगळता, देवस्थाने आता देवाची स्थाने उरली नाहीत.

ती राजकीय, जातीय व समाजांचे शक्तीप्रदर्शन करण्याचे आखाडे झाले आहेत. पूर्वी असले प्रकार अल्प असले तरी होते, हे कुणीही अमान्य करणार नाही. पण, त्याचा परिणाम अशा पद्धतीने दिसतही नव्हता. आता देव कुणालाच नको, हवाय तो पैसा आणि आपला मानपान.

Lairai Jatra Stampede
Lairai Jatra: लईराई देवीच्या जत्रेत आर्थिक उलाढालीला फटका! 30 ते 35 टक्के परिणाम; व्यावसायिकांना तोटा

दर्शनासाठी पहिल्यांदा गेले काय आणि शेवटचा क्रमांक असला काय, दर्शन देवाचेच होते असा भाव पूर्वी होता. आता देवदर्शनापेक्षाही आत की बाहेर, मागे की पुढे याला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. सत्ता, सोय, संपत्ती आणि स्वार्थ या ‘स’वर्णीयांचीच चलती आहे. एके काळी जे संस्कृतीचे, सामाजिक एकोप्याचे केंद्र होते; ते देवस्थान आता असंस्कृत, असामाजिक आणि दुही निर्माण करण्याचे स्थान झाले आहे. पूर्वी देवस्थाने देवाच्या नावे ओळखली जात होती, आता ती समाजाच्या नावे ओळखली जाऊ लागली आहेत. शिरगाव जत्रेत निष्पापांचे बळी गेले, किमान यापुढे अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी दक्षता घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com