Goa Ritual Theatre: जेव्हा भक्ताच्या अंगात ‘भार’ येतो, तेव्हा तो सामान्य माणूस न राहता देवतेचे रूप घेतो, हेच मूळ 'विधीनाट्य'

Goan cultural traditions: आदिमानवाला जेव्हा पाऊस-वीज-जन्म-मृत्यू, यासारख्या निसर्गातील घटनाविषयी कुतूहल आणि भय वाटू लागले, तेव्हा त्यातून विधी (रिच्युअल्स’) जन्माला आले.
Goa ritual theatre
Goa ritual theatre Dainik Gomantak
Published on
Updated on

विकास कांदोळकर

मानवी संस्कृतीचा इतिहास त्याच्या जगण्याच्या संघर्षाचा आणि निसर्गाशी जुळवून घेण्याचा प्रयास आहे. आदिमानवाला जेव्हा पाऊस-वीज-जन्म-मृत्यू, यासारख्या निसर्गातील घटनाविषयी कुतूहल आणि भय वाटू लागले, तेव्हा त्यातून विधी (रिच्युअल्स’) जन्माला आले. या विधींमध्येच नाट्याचे मूळ बीज रोवलेले दिसून येते. संशोधकांच्या मते, विधीनाट्य हे केवळ करमणूक नसून ‘सहज जीवनाची लय’ आहे.

यात प्रेक्षक आणि नट अशी विभागणी नसते तर संपूर्ण समाज समूह त्या विधीचा भाग असतो. पिढ्यान्पिढ्या हस्तांतरित होऊन, सामूहिक जाणिवेमध्ये खोलवर रुजलेल्या आदिबंधाचा शोध घेतल्यास, आपल्याला लोकपरंपरेतील विधीनाट्याच्या स्वरूपात लोकजीवनात पावलोपावली असलेली नाट्यात्मता आढळते.

दुष्काळाच्या वेळी पाऊस मागण्याच्या विधीत निसर्गाला केलेले आर्त आवाहन असते. तसेच, नवजात बालकाच्या शांतीचे विधी, सटी वाजवणे, बारसा, मुंज, विवाहासारख्या लोकविधीतील नाट्यात्मता माणसाच्या भावनांना वाट करून देते.

मृत्यूसारख्या गंभीर प्रसंगीही विधीनाट्य दिसते. उत्तरक्रियेमध्ये केलेली मंत्राग्नीची नक्कल व इतर विधी दुःखाची तीव्रता कमी करण्याचे एक मनोवैज्ञानिक साधन असते. होळी-शिमगा-रोमट तर विधीनाट्याचा कळस आहे.

यात होणारा आरडाओरडा, बोंब मारणे, चोऱ्या करणे, असभ्य वर्तन, वीरत्वाचे दर्शन, हे दडपलेल्या भावनांचे विरेचन (कॅथार्सिस) असते. बैलांचा पोळा, नंदीबैल, पोतराज, गुलालोत्सव, माधुकरी, अशी सर्व विधीनाट्ये परंपरेने प्रवाहित झालेली आहेत. ‘गावबांधणी’तील नाट्यमयता आणि गाव-सीमेवरील विधी हे समूहाच्या संरक्षणाचे आदिबंध स्पष्ट करतात.

गोव्याने इ. स. पूर्वी दुसऱ्या-तिसऱ्या शतकात मौर्य, पहिल्या शतकात सातवाहन/आंध्रभृत्य, नंतर अमीर, ‘वनवासी’, चालुक्य, राष्ट्रकूट, विजयनगर, कदंब, आदिलशाही, पोर्तुगीज अशा विभिन्न सांस्कृतिक अंगे असलेल्या राजवटी पाहिल्या.

या काळात संघर्ष झाले तरीही गोव्याच्या संस्कृतीची परंपरा, विविध ‘जीवन-विशेषांचे’ एकमेकांत मिसळून, समन्वयाचा पुरस्कार करत आलेली आहे. गोव्यातील विधीनाट्याचे वैभव निसर्ग आणि दैवतांच्या उपासनेत दिसून येते. येथे जवळ-जवळ सर्वच भागांत, विधीनाट्य हे ‘देवतावतरण’ किंवा ‘संचार’ या स्वरूपात प्रकर्षाने दिसून येते. गोव्यातील देवतावतरणाचे नाट्य हे अंगावर काटा आणणारे असते. जेव्हा भक्ताच्या अंगात ‘भार’ येतो, तेव्हा तो सामान्य माणूस न राहता देवतेचे रूप घेतो, हेच मूळ विधीनाट्य.

देवतावरणाच्या विधीनाट्यात देवतेच्या भूमिकेत असणाऱ्या व्यक्ती महत्त्वपूर्ण असतात. देवतेच्या वेशभूषेत त्यांच्या कृती-उक्तीतून, त्यांच्याद्वारे देवतेचा आविर्भाव व्यक्त होऊन भाविकांना दर्शन दिले जाते. जमलेले भाविक या विधीनाट्याचे दुसरे महत्त्वाचे घटक.

देवतेच्या वेशभूषेतील व्यक्ती ‘संचारित’ झाल्यावर त्यांच्यातील प्रेक्षक तत्त्व क्षीण होते व आपण प्रत्यक्ष देवतेचे दर्शन घेत आहोत, याची साक्ष पटून, ते देवतेला वंदन करतात. यावेळी देवतेच्या भूमिकेतील व्यक्ती आणि भक्त एका विशिष्ट मानसिक म्हणजेच ‘अतिशायी’ अवस्थेत असतात. ‘अवसारातील’ देव आणि भक्त यांच्यासारख्या अतिशायी अवस्थेत नसलेल्या, तटस्थ असलेल्या व्यक्ती, विधीनाट्याच्या आस्वादकाच्या भूमिकेत असतात.

पेडण्यातील पुनवेत भूतनाथ आणि रवळनाथसारखी तरंगे, भूत काढणे विधी, हे गूढरम्यतेचा अनुभव देतात. गोव्यातील इतर भागात असेच वार्षिक देवतावरण विधी दिसून येतात. गोमंतकातील विविध गावांतील देवांची-पालख्यांची होणारी भेट, कौल, त्यावेळचा जल्लोष आणि वाद्यमेळ हे एक भव्य सांगीतिक नाट्यच असते.

शिगमोत्सवात मल्लिकार्जुन (काणकोण) किंवा चंद्रेश्वर (केपे) येथील उत्सव निसर्गाच्या पुनरुत्थानाचा सोहळा असतो. साखळी-डिचोली-फोंडा-सांगे येथील ‘वीरभद्र’ हे युद्धनाट्याचे प्रतीक आहेत.

Goa ritual theatre
Shankasur Kala: शेकडो वर्षांची परंपरा असलेला ‘शंकासुर काला'! गोव्यातील प्राचीन परंपरा; स्थानिक लोककलेचा आविष्कार

हातात नंग्या तलवारी घेऊन होणारा हा विधीनाट्याचा प्रकार वीररसाचा परिपोष करतो. हातात लाकडी दांडके घेऊन केलेला तोणया मेळ असो किंवा महिलांनी डोक्यावर पेटते दिवे घेऊन केलेला दिवजोत्सव, यात सामूहिक लयबद्धता असते.

मये-गोवा येथील रेड्यांच्या जत्रेत पशुबळीची रूपके किंवा निसर्गदेवतांना शांत करण्याचे विधी दिसतात. कळसोत्सव आणि तुळशीचे लग्न हे गोव्याच्या घराघरांत आणि मंदिरात रंगणारे धार्मिक विधीनाट्य आहे. भिल्ल, धनगर व इतर समाजाच्या रूढींमध्येही, जसे की ‘गार्‍हाणे घालणे’ किंवा ‘संचार’ होणे, यात एक नैसर्गिक अभिनय असतो, जो शिक्षणाने येत नाही तर श्रद्धेतून येतो.

Goa ritual theatre
Konkani Drama: गेल्या 50 वर्षांत नाट्यक्षेत्राने घेतलेली हनुमानउडी अधोरेखित होते! सुवर्णमहोत्सवी कोकणी-नाट्यस्पर्धेचे कवित्व

जेव्हा आदिवासी किंवा मूळ निवासी समूह हे विधी त्यांच्या जगण्याचा भाग म्हणून करतात, तेव्हा त्यात एक पवित्रता आणि नैसर्गिकता असते. परंतु, जेव्हा हे विधी पाहण्यासाठी आपल्या देशातील किंवा परदेशातील ‘आस्वादक-प्रेक्षक’ उपस्थित राहतात, तेव्हा नकळतपणे या ‘सहज जगण्याचे’ रूपांतर ‘कलाविष्कारात’ होते.

‘आपण पाहिले जात आहोत’ याची जाणीव मूळ समूहाला होते आणि यातूनच विधींचे व्यापारीकरण किंवा प्रदर्शनीय रूप वाढीस लागते. उदाहरण म्हणून देव-देऊळ-गाव सोडून पर्यटकांसाठी ‘रस्त्यावर’ आलेल्या शिगमोत्सव-रोमटामेळ-फुगड्या यासारख्या विधींकडे पाहता येईल. संशोधक म्हणून हे स्थित्यंतर टिपणे आजच्या काळात महत्त्वाचे ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com