Red Clay Ganpati Idols: गोव्यातील 'रक्तवर्ण गणपती'ची अनोखी परंपरा! लाल रंगाच्या मृण्मयी मूर्तीमागे दडला शेकडो वर्षांचा इतिहास

Goa Red Ganpati Tradition: गोव्यातील ही रक्तवर्णीय गणपतीच्या मूर्तीची परंपरा इथल्या वैशिष्टयपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक संचिताचे दर्शन घडवते.
Goa Red Ganpati Tradition
Red Clay Ganpati IdolsDainik Gomantak
Published on
Updated on

राजेंद्र पां. केरकर

गोव्यातील ही रक्तवर्णीय गणपतीच्या मूर्तीची परंपरा इथल्या वैशिष्टयपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक संचिताचे दर्शन घडवते. गणेश चतुर्थीचा हा सण देश विदेशातल्या चाकरमान्यांना गावाकडे भाद्रपदात जेव्हा आमंत्रित करतो, तेव्हा विस्मृतीच्या उंबरठ्यावर वसलेल्या या ऐतिहासिक वास्तू माणसांनी गजबजून उठतात.

गोव्यात गणपतीचे पूजन करताना, ज्या विविध परंपरा निर्माण झाल्या, त्या मागे इतिहासाची जी पार्श्वभूमी आहे, त्याची प्रचिती येते. पेडणे ते काणकोणपर्यंत काही कुटुंबांत रक्तवर्णाच्या मृण्मयी गणपती मूर्तीचे पूजन करण्याची परंपरा असून, त्याठिकाणी असलेले मूर्तीकार दरवर्षी आपल्या गावातल्या कुटुंबांखातर गणपतीच्या मृण्मयी मूर्ती तयार करून परंपरेप्रमाणे रक्तवर्णाने रंगवतात.

Goa Red Ganpati Tradition
Iron Ore Mining Goa: कोडली खाणीला पर्यावरणीय मंजुरीपूर्वी मोठी सुनावणी; 377 हेक्टर क्षेत्रात 35 लाख टन लोहखनिज उत्खननाचा प्रस्ताव

रक्तवर्ण म्हणजे लाल रंग. गोव्याच्या काव मातीतून मुबलक प्रमाणात लाल रंग उपलब्ध व्हायचा आणि त्याच रंगाचा वापर करून मातीच्या मूर्तीचे रंगकाम केले जायचे. भारतभर गणपतीच्या रक्त वर्णातल्या मूर्तींची पुजा करण्याची परंपरा अल्प प्रमाणात आहे. अष्टभूज महागणपती, षष्ठभूज गणपती, नृत्त गणपती, श्रीवर गणपती, एकाक्षर गणपती आणि श्री तरुण गणपतीच्या मूर्ती लाल रंगाने रंगवल्या जातात. अशा रक्तवर्णातल्या गणपतीच्या हाती पाश, अंकुश, मोदकपात्र आणि वरमुद्रा दाखवलेली असते. या गणपतीला रक्तचंदन आणि लाल रंगाची फुले आवडत असल्याने त्याच्या पूजनात या बाबींचा प्रामुख्याने उपयोग केला जातो.

रक्तवर्णातले गणपती इच्छित मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करण्यात कारणीभूत ठरत असल्याची लोकमानसात धारणा प्रचलित असल्याने अशा मूर्तीचे पूजन करण्याची परंपरा गोव्यातल्या काही कुटुंबांत निर्माण झालेली असून नवी पिढीही तिचे काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करत असलेली पहायला मिळते. दरवर्षी कुंभारजुवे या बेटावरची ग्रामदेवी श्रीशांतादुर्गा कुंभारजुवेकरीणीच्या मंदिरात पुजली जाणारी रक्तवर्णीय गणपती मूर्ती सातव्या दिवशीच्या सांगडोत्सवाच्या विसर्जनाचे आकर्षण असून, या मूर्तीला दोन होड्या एकत्र करून निर्माण केलेल्या सांगडात आसनस्थ केली जाते. पूर्वी कुंभारजुवेतल्या वाडीये कुटुंबात रक्तवर्णातल्या गणपतीची पूजा करण्याची परंपरा होती.

परंतु गावात जेव्हा रोगाची साथ आणि दुष्काळ आला तेव्हा वाडजी कुटुंबाने आपल्या घरात चतुर्थीनिमित्त पूजलेली मूर्ती गाव सोडतेवेळी श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीणच्या मंदिरात नेऊन ठेवली. तेव्हापासून गावातील शेजारी स्थायिक अन्य कुटुंबांनी ही परंपरा अव्यहातपणे चालू ठेवली. हा रक्तवर्णीय गणपती आज ग्रामदेवीशी निगडीत असल्याने कुंभारजुवे कालव्यात जेव्हा सांगडोत्सवात ही मूर्ती सांगोडोत्सवात विसर्जनास आणली जाते तेव्हा उपस्थितांची दृष्टी त्या मूर्तीकडे केंद्रीत होते. देवीशी निगडीत झालेल्या लाल रंगातल्या गणपतीला सांगोडोत्सवात महत्त्वाचे स्थान लाभलेले आहे. सांगे तालुक्यातल्या नेत्रावळी गावात शेकडो वर्षांपासून रक्तवर्णीय मृण्मयी गणपतीचे पूजन तेथील प्रभुदेसाई कुटुंबात होत असून, जवळपास दोनशेहून अधिक कुटुंबे गणेश चतुर्थीच्या सणात सहभागी होण्यासाठी शेकडो वर्षांच्या इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या वास्तूत एकत्रित येऊन आनंदोत्सवात सहभागी होतात.

Goa Red Ganpati Tradition
Goa Politics: निंबाळकरांची 'ती' पोस्ट काही तासांत डिलीट; सरदेसाईंवरील टीकेनंतर राजकीय चर्चेला उधाण, 'गोवा फर्स्ट'वर निशाणा

फोंडा तालुक्यातल्या सावईवेरे येथील सूर्यराव सरदेसाई यांचा अडीचशेपेक्षा ज्यादा वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार असणारा राजांगणाने युक्त प्रासाद असून, भाद्रपद चतुर्थीला हे प्रासादतुल्य घर गोव्यात आणि भारत त्याचप्रमाणे परदेशात विखुरलेल्या सरदेसाई कुटुंबीयांच्या आगमनाने गजबजून उठते. दीड दिवसाच्या गणपतीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी मोठ्या उत्सुकतेनं ही कुटुंबे येथे येतात आणि रक्तवर्णातल्या गणपतीच्या मूर्तीच्या पूजनात एकरूप होतात. कधीकाळी या कुटुंबातल्या शूरवीर पुरुषोत्तमांनी आपल्या पराक्रमाने रणभूमी गाजवली होती आणि त्यामुळे शौर्याची स्मृती जागवण्याच्या हेतूने रक्तवर्णी गणपती मूर्तीची परंपरा निर्माण झाल्याचे मानले जाते . रक्ताचा रंग लाल असून , शौर्य गाजवताना रक्तपात होत असतो. शौर्याविषयीची स्मृती चिरंतन रहावी, या हेतूने बहुधा रक्तवर्णीय गणपतीच्या मूर्तीचे पूजन करण्याची परंपरा रुढ झाली.

पेडणेतल्या तुये गावातल्या आराबो येथे ज्या ठिकाणी कोलवाळ नदीच्या खाडीचा जलप्रवाह आलेला आहे तेथे मध्ययुगीन इतिहासाच्या काळात दर्यावदी व्यापाऱ्यांच्या वास्तव्याने गजबजलेला ऐतिहासिक चिरेबंदी वाडा असून, कालांतराने इथल्या वाड्यात देसाई मंडळी स्थायिक झाली आणि वाडयातल्या जुन्या संचितांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याला प्राधान्य दिलेले आहे. नोकरी उद्योग-धंद्यानिमित्त गोवाभर स्थायिक झालेली देसाई मंडळी या ऐतिहासिक वास्तूत पाच दिवसांसाठी साजरा होणाऱ्या गणेश चतुर्थीच्या उत्सवाप्रित्यर्थ एकत्र येतात. दीडशे वर्षांपेक्षा जास्त परंपरा असलेल्या वैशिष्टयपूर्णरितीने सजवलेल्या मखरात रक्तवर्णीय गणपतीच्या मृण्मयी मूर्तीची प्रतिष्ठापना करून उत्साहाने पूजन केले जाते.

पेडणेत देसाई कुटुंबीयांची शतकोत्तर वास्तू असून, इथल्या भिंतीवरती कावी कला आणि रंगशैलीने साकारलेल्या चित्रांत रक्तवर्णीय गणपतीच्या मूर्तीचे पूजन जेव्हा केले जाते, तेव्हा त्या वास्तुच्या वैभवात भर पडते. पेडणेतल्या म्हाऊस वाडयावरचे हरी शेटकर दरवर्षी ४३ तर केपेतील वासुराज करमळकर २१ लाल रंगात रंगवलेल्या मृण्मयी गणपतीच्या मूर्तीची मागणीप्रमाणे निर्मिती करतात. गोव्यातील ही रक्तवर्णीय गणपतीच्या मूर्तीची परंपरा इथल्या वैशिष्टयपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक संचिताचे दर्शन घडवते. गणेश चतुर्थीचा हा सण देश विदेशातल्या चाकरमान्यांना गावाकडे भाद्रपदात जेव्हा आमंत्रित करतो, तेव्हा विस्मृतीच्या उंबरठ्यावर वसलेल्या या ऐतिहासिक वास्तू माणसांनी गजबजून उठतात.

Goa Red Ganpati Tradition
Goa Climate Technology: गोवा बनणार हवामान तंत्रज्ञानाच्या प्रयोगांचे केंद्र? उद्योग, सरकार आणि शिक्षण संस्थांच्या सहभागातून 3 ते 5 प्रायोगिक प्रकल्पांचा प्रस्ताव

पेडणे तालुक्यात जेथे तेरेखोल नदी अरबी सागराशी एकरूप होते, तेथे केरी असून, याच गावात उत्तर भारतात ज्या शिंदे राज घराण्याच्या तेजस्वी इतिहासात आपल्या पराक्रमाची शर्थ गाजवणाऱ्या बक्षी बहाद्दर जीवबादादा केरकर यांच्या स्मृती जागवणारी ऐतिहासिक वास्तु असून, दक्षिण गोव्यात धर्म समीक्षणाने जेव्हा उच्छाद मांडला होता, तेव्हा तेथून स्थलांतरित कुटुंबांना केरी गावाने आपल्या आशीर्वचनाने समृद्ध करण्यात महत्वाचे योगदान केले होते. केरी येथील शेणवी केरकर यांच्या कुटुंबात मृण्मयी गणपतीची मूर्ती घरातच साकारली जाते आणि कुटुंबातल्या वीर परंपरेला साजेल, अशी रक्तवर्णीय गणपती दीड दिवसासाठी पुजला जातो. गोव्यातील ही रक्तवर्णीय गणपती मूर्तीची ही परंपरा कुटुंबाच्या इतिहासाचा वारसाच जणुकाही कथन करीत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com