Vasai: गोवा काबीज करून, 'अल्बुर्क' भारतातील जमीन जिंकणारा दुसरा युरोपियन बनला; पोर्तुगीज वसई प्रांतात व्यापार करू लागले

History of Vasai: पोर्तुगिजांनी कोची बंदर ताब्यात घेतले आणि वखार घालून जागा बळकट करत व्यवसाय करू लागले. विजापूरची सल्तनत ही दख्खनच्या सल्तनतांपैकी एक.
History of Vasai
History of VasaiDainik Gomantak
Published on
Updated on

सर्वेश बोरकर

पोर्तुगिजांनी कोची बंदर ताब्यात घेतले आणि वखार घालून जागा बळकट करत व्यवसाय करू लागले. विजापूरची सल्तनत ही दख्खनच्या सल्तनतांपैकी एक. १५०६मध्ये गोव्याजवळ अंजदिव बेटाच्या वेढ्यात पोर्तुगिजांची पहिली लढाई विजापूरच्या सैन्याशी झाली.

भारताचे पोर्तुगीज गव्हर्नर अफोन्सो डी अल्बुर्क यांनी १५१०मध्ये गोवा ताब्यात घेतला, कारण गोव्याचा शासक विजापूर सल्तनत भाडोत्री सैनिकांना आश्रय देत असल्याचे आणि पोर्तुगीजांविरुद्ध मोहीमेवर पाठवण्याची तयारी करत असल्याचे त्यांना कळले होते.

या घटनेच्या अगोदर १५०९मध्ये दीव बेटावर लढाईला जाताना व्हाईसरॉय डोम फ्रान्सिस्को डी अल्मेदा यांच्या पोर्तुगीज आरमाराने दाभोळ बंदरात दंडात्मक हल्ला केला होता. त्याच्या बचावकर्त्यांनी केलेल्या तीव्र प्रतिकारानंतरही, वस्तीवर हल्ला करण्यात आला, तोडफोड करण्यात आली आणि ती उद्ध्वस्त करण्यात आली, त्यातील दाभोळचे अनेक रहिवासी मृत्युमुखी पडले.

जेव्हा भारताचे गव्हर्नर अफोन्सो डी अल्बुर्क यांना कळले की दीवच्या लढाईत पराभूत झालेले भाडोत्री सैनिक गोव्यात युसूफ आदिल शाहकडून पुन्हा एकत्र येत आहेत आणि त्यांना पुन्हा सुसज्ज करत आहेत, तेव्हा त्यांनी पोर्तुगीज राज्याची राजधानी म्हणून कायमस्वरूपी करण्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या स्थित असलेले हे गोवा शहर ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला.

२५ नोव्हेंबर १५१० रोजी, संत कॅथरीनच्या दिवशी, दुसऱ्या प्रयत्नात पोर्तुगिजांनी गोवा काबीज केला. विजापूरच्या सैन्याने पहिल्यांदा शहराला वेढा घातला परंतु पोर्तुगिजांना हाकलून लावण्यात त्यांना अपयश आले आणि संघर्षाच्या शेवटी त्यांना गोवा शहर सोडून द्यावे लागले.

कोचीन या केरळ राज्यांमध्ये बांधलेल्या किल्ल्यांच्या विपरीत, गोव्यात एक अंतर्गत प्रदेश होता जो देखील जोडला गेला होता. गोवा काबीज करून, अल्बुर्क अलेक्झांडर द ग्रेटनंतर भारतातील जमीन जिंकणारा दुसरा युरोपियन बनला.

१५२० ते १५३७ दरम्यान जुन्या गोव्याला लागून असलेली मुख्य भूमी व जिल्हे पुन्हा एकदा पोर्तुगिजांच्या ताब्यात आले. बेळगावचा विजापूरच्या सैन्याचा सरदार अशद खानने विजापूरच्या सुलतानाची मर्जी गमावली आणि संरक्षणाच्या बदल्यात तो प्रदेश पोर्तुगिजांना दिला. जेव्हा अशदांचे आदिल शाहशी संबंध सुधारले, तेव्हा त्याने पोर्तुगिजांना दिलेल्या जमिनी परत मिळवण्याच्या प्रयत्नात आक्रमण केले, जरी पोर्तुगिजांनी त्याच्या सैन्याचा पराभव केला.

१५३६-१५३७ मध्ये पोर्तुगिजांनी अशद खानशी शांतता करार केला आणि गुजरातच्या बहादूर शाहवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा प्रदेश परत केला. पुढे अवघ्या १२ वर्षांत पोर्तुगीज तिथून मग थेट वसई - दमण प्रांतात आले आणि तिथेही व्यापार करू लागले. वसईच्या दांडाळे तळे ह्याठिकाणी तटबंदी उभी करून त्यांनी वस्ती केली.

अर्थात हे सर्व प्रांताचा मुसलमान सुभेदार याच्याकडून परवानगी घेऊन अधिकृतरीत्या चाले. आवश्यक तेव्हा पोर्तुगिजांचा वकील दिल्ली दरबारी हजेरी लावी. नंतर नंतर डच, ब्रिटिश, फ्रेंच जसजसे भारतात येऊ लागले तसे पोर्तुगिजांचे वकील हे कायमस्वरूपी दिल्ली-आग्रा येथे राहू लागले. सुरुवातीला त्यांच्या हजेरीत आणि वजनामुळे इतर युरोपीय सत्तांना दिल्लीवरून सवलती मिळवून घेणे कठीण पडत होते.

पुढे तर गोव्यावरून आरमार आणून कप्तान आलमेद याने लष्करीदृष्ट्या वसई ते दमण हा भाग ताब्यात घेतला. थोडक्यात या संपूर्ण प्रांतावर पोर्तुगीज या नव्या राज्यकर्त्यांचे आगमन झाले होते. प्रांतातील देसायांना त्याने काही विशेष फरक सुरुवातीला पडण्याचे कारण नव्हते.

कारण जसे मुसलमान राज्यकर्ते तसेच फिरंगी. धर्म-कर्म आणि व्यापार याला पोर्तुगिजांनी सुरुवातीला कसलेच बंधन घातले नाही. जवळ-जवळ २५ वर्षे इथे बस्तान पक्के बसवल्यानंतर पोर्तुगिजांनी इन्क्विझिशन सुरू केले.

History of Vasai
Alupa Dynasty: हजारो वर्षे जुनी, अल्वाखेडा किनारी प्रदेशातील सत्ता; प्राचीन आलुप घराणे, कर्नाटक तुळु-नाडूची संस्कृती

अनेकांना बाटवले आणि जे तयार झाले नाहीत त्यांना कैद करून गोव्याला पाठवले. आजही वसई प्रांतात मोठ्या प्रमाणावर धर्मांतरित झालेले लोक आहेत. त्यांची आडनावे हिंदू असली तरी ते ख्रिस्त धर्माचे पालन करतात. ह्यात बहुसंख्य लोकांचे पूर्वज हे शेष, सूर्य आणि सोमवंशीय आहेत जे यादव आणि काळात सुखाने नांदत होते. वसई आणि आसपासच्या भागात जसे ख्रिस्ती मोठ्या प्रमाणावर आढळतात तसे ते वैतरणा नदीच्या पलीकडे म्हणजे केळवे - माहीम आणि पुढे डहाणू येथे आढळत नाहीत.

बिंबदेव यादव याचा पुत्र प्रतापशां यादव माहीम भागावर राज्य करत होता. प्रतापशांची स्त्री जिच्या देवशा नावाच्या पुत्राला प्रतापशांने काही गावांचे हक्क दिलेले होते.

History of Vasai
Vijayanagara Dynasty: विजयनगरने बहामनी सल्तनतीकडून जिंकलेले गोवा, हंपीतील कृष्णदेवरायाची भव्य दगडी तुलाभार

ह्या देवशाचा पुत्र रामशा याने १५७२ मध्ये वाडा-जव्हार आणि आसपासच्या भागातील १५७ गावे जिंकून रामनगर स्थापिले होते. आज ठाणे जिल्ह्यातील जे रामनगर आपण ऐकतो ते हेच. त्या प्रांतावर रामशा ऊर्फ यादवांचे वंशज राज्य करीत होते. ह्या प्रांतावर पोर्तुगिजांची नजर गेली आणि त्यांनी रामनगर ताब्यात घेण्याचे ठरवले. त्यावेळी तेथे उमराव नावाचा कोळी यादवांचा कारभार पाहत होता त्याची मदत पोर्तुगिजांनी घेतली आणि त्याला चौथाई देऊन रामनगर सोबत तह केला. पोर्तुगिजांच्या जोरावर उमराव माजला आणि त्याने स्वतंत्र कारभार सुरू केला.

पुढे पोर्तुगिजांनी वसई ते डहाणू अशी २७ सागरी किल्ल्यांची साखळी उभी केली. हे किल्ले लहान असले, काही तर नुसते बुरूज सदृश असले तरी टेहळणीच्या दृष्टीने मोक्याचे होते. दुसरीकडे डोंगरी किल्ले मजबूत करून पोर्तुगिजांनी वसई प्रांतात कायमचे बस्तान बसवले. अखेर १७३९मध्ये चिमाजी आप्पा यांच्या वसई मोहिमेने पोर्तुगीज तिथून हुसकावले गेले. २०० वर्षे पोर्तुगिजांनी दमण ते वसई आणि चौल - रेवदंडा भागात निर्विवाद राज्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com