

मधू य. ना. गावकर
भारतात अरवली, विंध्य, सातपुडा, हिमालय हे पर्वत असले तरी या पर्वतरांगांपेक्षा आपला पश्चिम घाट बहुरंगी बहुढंगी आहे. त्या घाटाने अनेक प्रकारची जैवविविधता त्याच्यातील गोड आणि खार पाण्याच्या मीलनाने मत्स्य, वनस्पती, पक्षी, सरपटणारे प्राणी, रानटी पाळीव जनावरे, कृमी कीटक, सस्तन प्राणी, अन्नधान्य आणि मानव या साखळीचा तो पोषणकर्ता आहे.
त्याने अनेक चेहऱ्यांचा मुखवटा परिधान करून तो बहुरूपी पश्चिम घाटाचा मुखवटा त्या सागराच्या निळ्या पाण्यात परावर्तित झालेला पाहावयास मिळतो. त्याच्या सप्तरंगी चेहऱ्यात सर्वात सुंदर आपला गोवा, एका पाचूच्या चकाकणाऱ्या हिऱ्यासारखा दिसतो. या हिऱ्याला पाहण्यास जगभरातील आणि देशी पर्यटक गोव्यात येऊन त्याच्या प्रेमात पडून नलदमयंती होतात. नंतर सरकारी दाखले मिळवून स्थानिक होत असल्याने इवल्याशा गोव्याचा सुंदर चेहरा विद्रूप होत चालला आहे. त्याने गोव्याचे हवामानही बदलण्यास सुरुवात झाली आहे.
गोवा हा प्रदेश प्राचीन काळापासून आदिवासी गोरगरिबांचा, कष्टकरी समाजाचा तारणहार होता. त्यांना इथल्या अवघ्याच धनिकांनी लुटून श्रीमंती मिळवली. इथल्या भूमिपुत्रांनी स्वातंत्र्यसैनिक बनून, भारतीय सैन्याच्या सहकार्याने पोर्तुगिजांशी लढून १९६१साली गोव्याला मुक्त केले.
विकासाची दारे खुली झाल्याने इथल्या भूमिपुत्रांची गरिबी हटवण्याचा प्रयत्न सुरू झाला. पण गोमंतकीय शिक्षणाने मागे असल्याने तज्ज्ञ लोकांना गोव्यात आणले, त्यांच्या सहकार्याने बाहेरील लोकांचे लोंढे गोव्यात येऊन मिळेल त्या जागी झोपडपट्ट्या उभ्या झाल्या. त्याचप्रकारे पर्यटक म्हणून गोव्यात येणारे लोक इथेच स्थायिक होऊ लागल्याने समुद्रकिनारे, शहरे, शेती, बागायती, नदीनाले, डोंगर अशा जागी बंगले, व्हिला, सदनिका, महाप्रकल्प आणि कारखाने उभारून गाव आणि शहरे व्यापून गेली. येथील जनसांख्यिकी बदलली!
आज जरी गोव्याचा विकास झाला, तरी लोकसंख्यावाढीने राज्यात बेकारी वाढली आहे. हे हेरून बाहेरच्या श्रीमंत, धनिक कंपन्यांनी गोव्यातील डोंगर, पठारे अवाच्या सवा किमतीस खरेदी करून सरकारांच्या आशीर्वादाने मिळेल तिथे खनन सुरू केले.
गोव्यातील सर्वच पठारे ही गोड्या पाण्याची भांडारे आहेत. म्हणूनच आमच्या पूर्वजांनी पठारांच्या सभोवार वाहणाऱ्या झरी, ओहळ, नद्यांच्या काठी शेती, बागायती, कुळागरे, वसवून कष्ट करीत आपल्या कुटुंबांना भाजी, भाकर, आंबील, पेज आणि भात मिळण्यासाठी प्रयत्न केला.
गोवा ‘सुजलाम् सुफलाम्’ केला होता. आज विकास साधणाऱ्या गोव्यात गावागावांत आणि शहरात पर्यावरणाचा र्हास थांबवण्यासाठी स्थानिक जनता रस्त्यावर उतरून आंदोलने करीत आहे. त्यात गावपातळीवर आंदोलने मोठ्या प्रमाणात होत आहेत. कष्टकरी समाज आज धरणे धरून महिनोन्महिने आंदोलने करून गोव्याची भूमी वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
कुंडई, मडकई, फर्मागुडी, साकवाळ, वेर्णा, म्हारवासडा, कदंब, बांबोळी, बेतीवेरे, थिवी, आमोणा, नावेली, पर्वरी, तुये, कुंकळी ही पठारे विकासाच्या आणि गृहप्रकल्पाच्या नावाखाली उद्ध्वस्त केली जात आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. त्यामुळे, तिथले स्थानिक आंदोलन करून त्या पठारांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांत येत आहेत. म्हणून त्या गावांत जाऊन खरी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून कारापूर-सर्वण परिसरातील कोठीवाड्यावर पोहोचताच बालपणातील आठवण ताजी झाली. तारीवर भेंडीची टोपली डोक्यावर घेऊन चार, पाच किमी चालत गाठलेला साखळीतला सोमवारचा आठवडा बाजार आठवला.
विठ्ठलापूर, कोदाळवाडा, कोळंबवाडा, भोळवाडा, कुडपवाडा, सावंतवाडा, घाडीवाडा, गवंडीवाडा, कोठीवाडा, धावस्करवाडा, सर्वण, वाठादेव, आणि व्हावटी हे वाडे या पठाराच्या उत्तरदक्षिण आणि पश्चिम दिशांनी वर्तुळाकार व्यापले आहेत.
पूर्वेला पडोशें गावचा आडवा डोंगर उभा आहे, त्या पठाराला उत्तर दक्षिण आणि पश्चिम बाजूने वाळवंटी आणि डिचोली नदीने वेढले आहे व कोठी भागात संगम घडवला आहे. तरी या पठाराला खाऱ्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्याचा जास्त पुरवठा होतो. त्या पाण्यात माडय नावाचे शंखशिंपले मिळतात.
या पठाराचे पाणी कोळमाचे तळे, कोदाळाचे तळे, म्हावळिंग तळे, धावस्करवाडा तळे, सर्वण झर, आणि व्हावटी या तळी, झरी, ओहोळांतून वाहते. या पाण्यावर कारापूर वाठादेव आणि सर्वण गावाची शेती, बागायती, आणि कुळागरे पोसली आहेत.
पठाराच्या जागेला वेगवेगळी नावे आहेत. नायकीगाळ, माट्टीनी, सातोणाचे मळ, सर्पाचे मळ, वडाधाट, सावरीधाट, सर्वणमळ, घोलान, कुळण, या नावांनी तो विस्तीर्ण पठार ओळखला जातो. त्या पठारावर पावसाळ्यात शेतकरी भात, नाचणी, पाखड, वरी, कांग, उडीद, कुळीथ, सावा या धान्यांचे आणि भेंडी, दोडकी, कारली, काकडी, टरबूज, भोपळा, पडवळ असे पीक घेतात आणि आपला संसार चालवतात.
पठारावर पाणी टिकवण्यासाठी उसकी, रंजीण, कुसडी, निवडुंग, गोडवाल, पालकाणे, धावातीवाल कुडा, रानआंबाडा, गेळ, कांगल, माट्टी, कुंफळ, घागरी नागलकुडा, जिना, हुरा, मोय, किंदळ, मारट, फातरफळ, पिटकळ, कणेर, हासळ, चुरन, करवंद, फागल, हरकुली, कुमयो, नाणा, पंगारा, सावर, घोटींग, सातीण, अर्जुन, खैर, तिरफळ, बोर, सुरंग, बकुळी, भिलमाड, कोकम, बहावा, ऐळंब, जांभूळ, आवळा, चिंच, सुळी, शिरमंडोळी अशा पाणी साठवून ठेवणाऱ्या वनस्पती, झाडे, झुडपे आणि वेली आहेत.
औषधी गुणधर्माच्या वनस्पती, रानमेवा, मोठ्या प्रमाणात पिकल्याने या पठारावर पक्ष्यांचे थवे सकाळ संध्याकाळ बागडताना पाहावयास मिळतात.
झाडाझुडपांच्या खाच खळग्यात अगर वारुळात नागसर्प, मांडोळ, घोणस, फुरसे, रक्त मांडोळ, हिरवा साप, धामण, तेलसर्प, सरडे, दुतोंड्या मण्यार, मुंगूस, घोरपड हे सरपटणारे प्राणी वावरतात. त्यांना पकडण्यास पठारावर अनेक होले, ससाणे अगर घारी आकाशात घिरट्या घालतात. ससा, भेकर, मेरू, डुक्कर, रानमांजर, गवा, बिबटा ही जनावरे अन्न अगर पाण्यासाठी या पठाराचा आश्रय घेतात.
कोल्हा रानकोंबड्यास पकडण्यास दबा धरून बसलेला असतो. वेगवेगळ्या प्रकारचे बेडूक पावसाळ्यात या पठारावर जन्म घेतात. त्याचप्रकारे तांंबडे आणि काळे खेकडे पावसाळ्यात प्रकट होतात. तलावात थिगूर, वाळेर, कासव, पिठ्ठोळ, देखळा, खरवा गोडी मासळी सापडते. आंबा, फणस, काजू, नारळ, सुपारी, केळी झाडांच्या बागायती पठाराच्या पायथ्याकडे भरलेल्या आहेत.
त्या खालच्या भागात सरदवायंगण भात शेती मोठ्या प्रमाणात पिकवली जाते. त्या शेतीला ओहोळातून वाहणारे पठारावरील पाणी तळ्यांनी साठवून ते पाणी पाटाद्वारे नेऊन कुळागर आणि शेतीस उपयोग करतात.
हिवाळ्यात शेतात मिरची, वाल, कांदा, अळसांदा असे पीक घेतात. पावसाळा सुरू झाला म्हणजे या पठारावर अळंबी मोठ्या प्रमाणात फुलतात, ती फुलल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांना त्यातील किडे खाद्य मोठ्या प्रमाणात मिळते. हल्लीच्या काळात माणूस त्या अळंब्यावर डल्ला मारतो, कारण ती एखाद्या पक्षी अगर रानटी जनावराच्या शिजवलेल्या रुचकर मासाप्रमाणे चवदार असतात.
पावसाळ्यात सुळी, लूत, ताळखीळा, हरकुली, शिरमंडोळी भाज्या या पठारावर मोठ्या प्रमाणात उगवतात. डिचोली आणि वाळवंटीच्या संगमात शेवटा, चोणकुल, तामसा पालु, घोळशी, काळुंद्र शेतुक, खेकडे, वागी, खरचाणी, सफेदझिंगे आणि इतर रुचिक मासळी मिळते. माडी, सुरण, काटेकणगी, करांदा, चिर्का, या पठाराच्या पाण्यावर तयार होतात.
अशा या पठाराच्या सांनिध्यात वावरत जगणारा भूमिपुत्र आणि त्यांच्या संगीत नायकेगाळीच्या गुफेत राहणारा पट्टेरी वाघ आज संकटात सापडला आहे.
त्या पठारावर येणाऱ्या लोढा कंपनीच्या विशाल गृहप्रकल्पाने लाखो चौमी जमिनीतील झाडेझुडपे तोडली जाणार आहेत. अंदाजे १७०० प्लॉट, तीनशे फ्लॅट क्लब आणि कृत्रिम बीच असा महा गृहप्रकल्प उभा करीत असल्याने त्या सर्वण गावावर प्रदूषणाचे संकट येणार आणि गाव नष्ट होणार म्हणून हा तिथला भूमिपुत्र, शेतकरी, युवावर्ग, आणि विचारवंत प्रकल्पाला विरोध करीत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.