
अॅड. सूरज मळीक
चित्रकला हे वार्तालाप करण्याचे एक उत्तम माध्यम आहे असे म्हटले जाते. फुलपाखरांच्या बाबतीत ही गोष्ट ठळकपणे दिसून येते. आवाज काढण्याचे साधनच त्यांच्याकडे नसते. पक्ष्यांसारखे आवाज काढून ते एकमेकांना संकेत देऊ शकत नाही. परंतु आवाज नसतानासुद्धा ते आपल्या हालचाली, रंग, आकार व पंखावरील वर्तुळ, आयात, त्रिकोणी नक्षीदार कलाकृती यांसारख्या चित्रमय आविष्कारातून त्यांच्यामध्ये संवाद सुरूच असतो. अशा चित्रमय पंखांमुळे विशेषत: त्यांना नावे प्राप्त झालेली आहेत.
उन्हाळ्यात गोव्यामध्ये केशरी रंगाची फुलपाखरे कधी ना कधीतरी आपल्या नजरेस येत असतात. कारण आपल्या सभोवताली त्यांच्या जगण्यासाठी उपयुक्त असलेली वनस्पती भरपूर प्रमाणात आढळतात. परंतु आपण त्यांच्याकडे विशेष लक्ष देत नसल्याने आपल्याला त्यांची ओळख होत नाही. या फुलपाखरांना ओळखणे सहज आणि सोपे असते.
बिन पट्टेरी वाघ किंवा रुईकर हे एक निम्फेलिडे कुळातील मध्यम आकाराचे फुलपाखरू आहे जे संपूर्ण भारतभर आढळून येते. त्याचा नैसर्गिक अधिवास जंगलात, माळरानात, खेड्यात व शहरातील भागांतदेखील आढळतो.
या फुलपाखराच्या वरच्या बाजूस पूर्णपणे उजळणारा केशरी रंग असतो. दुरूनसुद्धा नजरेस येणारा हा सपाट केशरी रंग वाघाच्या रंगाशी जुळणारा असतो म्हणून त्याला पट्टे नसलेला वाघ असे म्हटले आहे. पंखाच्या कडेला काळ्या तपकिरी रंगावर लहान पांढरी तुटक रेषा असते व त्याला लागूनच आतील भागात लहान पांढरे ठिपके असतात. वरच्या पंखांच्या टोकाजवळ, वरील आणि खालील बाजूस ठळकपणे दिसणारे पांढरे पट्टेरी ठिपके असतात. त्यांच्या काळ्या डोक्यावरदेखील पांढरे ठिपके प्रामुख्याने दिसतात.
वर्षातील कोणत्याही महिन्यात या फुलपाखराचे सहज दर्शन घडत असते. कारण त्यांना उपयुक्त असलेली खाद्य वनस्पती व अंडी लावण्यासाठी विशेष वनस्पती वर्षभर उपलब्ध असतात. परंतु मान्सूनच्या सुरुवातीपासून त्यांची संख्या वाढत जाते.
भारताच्या राष्ट्रीय प्राण्यावरून नावारूपास आलेल्या फुलपाखराकडे वाघासारखी शारीरिक ताकद नसली तरी तो आपल्या केशरी भडक रंगानेच आपल्या अधिवासात वर्चस्व प्रस्थापित करतो. केशरी हा धोक्याचा इशारा देणारा रंग आहे.
ट्रॅफिक सिग्नलचा केशरी रंगसुद्धा आपल्याला सतर्क व्हायला सांगतो. परंतु या नाजूक फुलपाखरापासून कसला कुणाला धोका? फुलपाखरे आपल्या रंगामुळे माणसाला मोहत असतात तरी आपण हे विसरू नये की काही फुलपाखरे विषारी असतात. ती कुणालाही धोकादायक नसतात. पण त्यांना हात लावला तर ते आपल्याला हानिकारक ठरू शकते.
रुईकर हे फुलपाखरू भारतभरात सर्वोत्तम आढळते. मंदार नामक वनस्पती या फुलपाखराची जीवन वनस्पती आहे. ही वनस्पती तर सर्वांच्याच ओळखीची. हिंदू धर्मियांमध्ये ती हनुमानाला विशेष प्रिय ठरलेली आहे आणि दर शनिवारी त्याची फुले देवाला वाहिली जातात.
त्यामुळे हनुमानाच्या देवळासमोर मंदाराची फुले विकून गावातील लोकांना आर्थिक लाभ होत असतो. मंदाराची पाने तोडली तर तिथून चीक बाहेर पडतो. या द्रव्यामध्ये विष असते. ही वनस्पती रुईकर फुलपाखराच्या सुरवंटाची खाद्यवनस्पती असल्यामुळे मादी फुलपाखरू त्याच्या पानाखाली अंडी लावते.
अंड्यातून बाहेर पडलेली सुरवंट पाने खात असताना हा चीक सेवन करून आपली भूक भागवते. त्यामुळे सुरवंटाच्या शरीरात भरपूर प्रमाणात विष जमा होतो आणि जेव्हा तिचे फुलपाखरांमध्ये रूपांतर होते तेव्हा ते फुलपाखरेसुद्धा विषारी बनतात. त्यामुळे इंग्रजीत त्यांना मिल्कविड बटरफ्लाय असे म्हटलेले आहे. शांततेने उडणारी, आपल्या चित्रमय रूपातून माणसाला आकर्षित करणारी ही फुलपाखरे विषारी असतात याची आपल्याला जाणीव असली पाहिजे.
मंदार या वनस्पतीला गोव्यात रुई असे म्हणतात. भारतभर रस्त्याच्या कडेला ती सहजपणे उगवलेली दिसतात. ती घनदाट जंगलात आढळत नाहीत. मोकळ्या जागेत, थेट सूर्याच्या किरणांमध्ये ती रुजून येते. त्यामुळे आज दिल्ली, लखनऊ, मध्य प्रदेशसारख्या भरपूर उष्णता असलेल्या प्रदेशात इतर फुलपाखरे कमी झाली तरी ही फुलपाखरे काही प्रमाणात नजरेस पडतात.
या फुलपाखरासारखे दिसणारे अजून एक फुलपाखरू आहे त्याला तर चक्क पट्टेरी वाघच म्हटलेले आहे. कारण त्याच्या पंखांच्या वरच्या बाजूस काळ्या पंखावर केशरी रंगाचे पट्टे असतात. त्याच्या पंखांच्या कडेला दोन समांतर रेषेत पांढरे ठिपके असतात त्यामुळे ते अमेरिकेतील ‘मोनार्क’ फुलपाखराशी साधर्म्य दर्शविते. हे फुलपाखरूसुद्धा विषारी वनस्पतीवर जन्म घेते त्यामुळे तेही विषारी असते. गोव्यातील घाट माथ्यावर भरणाऱ्या खुळखुळ्याच्या पिवळ्या फुलावर ती हमखास रस पिताना दिसतात.
फुलपाखरांच्या पंखावरील गडद केशरी भडक रंग ती विषारी फुलपाखरे असल्याचा संकेत देतात. दूरदूरच्या पक्ष्यांना हा उजळणारा रंग आपल्यापासून दूर राहण्यासाठी सावध करतो. जर त्याने या फुलपाखराला पकडून खाण्याचा प्रयत्न केला तर त्याला उलटी होऊ शकते. कारण त्यांच्या अंगात असणाऱ्या विषारी द्रव्यामुळे भक्षक त्यांना पचवू शकत नाहीत. त्यामुळे पक्षी सहसा या फुलपाखराच्या वाटेत येत नाही. आणि याच कारणामुळे जोरात उडणाऱ्या फुलपाखरांच्या तुलनेत ही फुलपाखरे अगदी सावकाश उडून आपले वर्चस्व मिरवीत आनंदाने बागडत असतात.
सर्वच फुलपाखरांना ही संधी मिळत नाही त्यामुळे काही फुलपाखरे सुकलेल्या पानामध्ये लपतात तर काही झाडाच्या पानाखाली जाऊन विश्राम करतात. परंतु काही फुलपाखरे अशीही आहे जी स्वतःचे रक्षण करण्यासाठी विषारी असलेल्या फुलपाखरांचे रूप घेतात. ती त्यांच्या रंग आणि रूपाची नक्कल करतात. तामीळ लेसविंग आणि पाल्म फ्लाय या फुलपाखराची मादी पट्टेरी वाघ फुलपाखरासारखे केशरी पट्टे धारण करतात. तर छोटा चांदवा हे फुलपाखरू बिन पट्टेरी वाघाची नक्कल करून आपल्या वरच्या भागाला केशरी बनवून आपला बचाव करते. त्याला शास्त्रीय भाषेत बतेसियन मिमिक्री असे म्हणतात.
उन्हाळ्यात नदीच्या काठावर, ओलसर भागात, पाणथळ जागेत तुंबा नामक लहान वनस्पती उगवतात. त्यांना पांढऱ्या फुलांच्या बहर येतो. ही फुले त्यांचे आवडते खाद्य आहे. दिवसभर रस मिळविण्यासाठी ती या वनस्पतीभोवती आढळतात.
गोव्यात याचा औषधी वनस्पती म्हणून उपयोग केला जातो. ही वनस्पतीही भारतातील बहुतेक प्रदेशांत आढळते. आसाममध्ये तर याच्या कोवळ्या पानांचा इतर भाजीमध्ये उपयोग करून चविष्ट भाजी बनवून आपल्या आहारामध्ये समावेश केला जातो. आज गोव्यातील गोड्या नदीकिनारी, कुळागरात, बागेत ही वनस्पती सहज उगवलेली आढळते. नदीकिनारी तर भरपूर प्रमाणात ही फुलपाखरे एकत्र येतात. कॉमन क्रो, ब्लू टायगर फुलपाखरांसोबत तुंबा फुलातून रस सेवन करताना आढळतात.
उन्हाळ्यात फुलपाखरांचे छायाचित्र टिपण्यासाठी सकाळची वेळ योग्य असते. भरपूर पाणथळ परिसरात सूर्यापासून ऊर्जा मिळवण्यासाठी ती आपले पंख उघडे करून मोकळ्या जागेत बसलेली असतात. भरपूर वेळ एका जागी थांबलेल्या या फुलपाखरांवरील नक्षीदार रंग अनुभवता येतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.