Goa Politics: 'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना!' गोव्यातील विरोधी पक्षांच्या धरसोड वृत्तीवर राजकीय विश्लेषणातून थेट ताशेरे

Goa Opposition Alliance: खरंतर २०१२ चा अपवाद वगळता भाजपला राज्यात कधीच बहुमत प्राप्त झालेले नाही.
Goa Opposition Alliance
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगूत

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व गोवा फॉरवर्डचे नेते आमदार विजय सरदेसाई यांच्यात जेव्हा बोलणी झाली तेव्हा अनेकांना ‘गंगेत घोडे न्हाल्या’सारखे वाटू लागले होते. पण दुसऱ्याच दिवशी युरी व विजय सरदेसाई यांच्यात ‘फोन कॉल’वरून झालेल्या वादंगामुळे या संभाव्य आघाडीत पुन्हा मिठाचा खडा पडला.

विरोधकांचे एेक्य हा सध्या गोव्यात चर्चेचा मुद्दा बनू लागला आहे. जवळ येत आहे असे वाटत असतानाच हे विरोधक दूर झाल्यासारखे वाटू लागल्यामुळे ‘तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना’ या उक्तीची हे आठवण होते. या अशा धरसोड वृत्तीमुळेच गेल्या निवडणुकीत भाजपचे फावले होते. आणि फक्त ३४% मते मिळूनसुद्धा हा पक्ष सत्तेवर येऊ शकला होता. ६६% मतदार विरोधात असूनही एखादा पक्ष सत्तेवर येऊ शकतो, यातूनच गोव्यातील विरोधकांची स्थिती अधोरेखित होते.

Goa Opposition Alliance
Goa Politics: गिरीश चोडणकरांसमोर 'सेक्युलर' मतांची सर्वात मोठी परीक्षा

खरंतर २०१२ चा अपवाद वगळता भाजपला राज्यात कधीच बहुमत प्राप्त झालेले नाही. आणि २०१२ साली भाजपला बहुमत प्राप्त झाले, त्याचे संपूर्ण श्रेय तत्कालीन विरोधी पक्षनेते व नंतर मुख्यमंत्री झालेले मनोहर पर्रीकर यांना जाते. त्यावेळी त्यांनी दूरदृष्टी दाखवली नसती, तर बहुमत मिळणे कठीणच नव्हे तर अशक्य होते. ‘मगो’शी युती करणे हा या दूरदृष्टीचाच एक भाग होता. वास्तविक फोंडावरून ही युती फिसकटल्यातच जमा होती. दोन्हीही पक्षांना फोंडा हवा होता. पण पर्रीकरांनी हा मतदारसंघ ‘मगो’ला दिला.

भाजपच्या कार्यकर्त्यांना फोंड्याचे मगो उमेदवार लवू मामलेदार यांच्या प्रचाराला पूर्ण शक्तीनिशी रिंगणात उतरवले. म्हणूनच तर तत्कालीन गृहमंत्री रवी नाईक यांच्याविरुद्ध त्यावेळी असाध्य विजयही युती प्राप्त करू शकली. कधी कधी दोन पावले मागे जावे लागते, हा फॉर्मुला पर्रीकरांनी नेहमीच अंमलात आणला. आणि त्यामुळेच ते भाजपला सत्तेवर आणू शकले. मुख्य म्हणजे ते आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ असायचे. म्हणूनच ते २०१२ पर्यंत सत्तेवर असलेल्या काँग्रेसचे पानिपत करू शकले.

Goa Opposition Alliance
Goa Opinion: निवडणुकीच्या काळात लोकांना मोठमोठी 'आश्वासने' दिली जातात, नंतर त्या आश्वासनांची 'पूर्तता' कितपत होते?

पण आजच्या विरोधी पक्षाकडे तो प्रामाणिकपणा आहे का, हाच मुख्य प्रश्न आहे. प्रत्येकाला जर मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पडू लागली तर मग विरोधी पक्षांची आघाडी होणार तरी कशी? गेल्या निवडणुकीत काँग्रेसला अशी स्वप्ने पडू लागली होती. त्यामुळे न फुटण्याची देवासमोर शपथ घेणे काय, निकालादिवशी सर्व उमेदवारांना एका हॉटेलात बंद करून ठेवणे काय, असे सर्व प्रकार त्यांनी करून पाहिले. पण एवढे करूनही हाती आल्या फक्त अकरा जागा.‘खोदा पहाड निकला चुहा’ अशी त्यांची स्थिती दिसली.

त्यामुळे प्रथम सत्तेवर येणे हे ध्येय असायला हवे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व फॉरवर्डचे नेते आमदार विजय सरदेसाई यांच्यात जेव्हा बोलणी झाली तेव्हा अनेकांना ‘गंगेत घोडे न्हाल्या’सारखे वाटू लागले. पण दुसऱ्याच दिवशी युरी आलेमाव व विजय सरदेसाई यांच्यात ‘फोन कॉल’च्या विषयावरून झालेल्या वादंगामुळे या संभाव्य आघाडीत पुन्हा मिठाचा खडा पडला. यात चूक कोणाची हे जाणून घ्यायची कोणालाच इच्छा नाही.

Goa Opposition Alliance
अग्रलेख: एका दिवसात 5 ठिकाणी आंदोलने होणे हा योगायोग नाही! उभयतांनी संवादच टाळला तर प्रश्‍न सुटायचे कसे?

सुरुवातीलाच जर असं. तर मग जागा वाटपावेळी काय, असे अनेकांना वाटणे साहजिकच आहे. सध्या गोवा फॉरवर्डही अनेक मतदारसंघात चांगले कार्य करत आहे. त्यामुळे जागा वाटपात ते आपले घोडे पुढे दामटू शकतात. आम आदमी पक्षाबाबतही असेच म्हणता येऊ शकेल. त्यामुळे काँग्रेस,फॉरवर्ड काय वा ‘आप’ काय सगळ्यांना तडजोडीचे राजकारण करावे लागेल.

आणि सामंजस्याची भूमिका घेतली तरच आघाडीची नाव किनाऱ्याला लागू शकेल. ही विरोधकांकरता शेवटची संधी आहे. यावेळी जर भाजप परत सत्तेवर आला तर विरोधकांना पुन्हा संधी मिळणे ‘नामुमकीन’च. म्हणूनच ‘नाऊ आॅर नेव्हर’ या तत्त्वावर त्यांनी आघाडी टिकवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा ‘तेल गेले तूपही गेले,’ अशी गत झाल्याशिवाय राहणार नाही!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com