

प्रमोद प्रभुगावकर
दिवाळीची मूळ ओळख पुसत चालली असून श्रीकृष्णाऐवजी नरकासुराच्या नावाने दिवाळी ओळखली जाण्याची भीती याच स्तंभातून गेल्या आठवड्यात व्यक्त केली होती. गोव्यात विविध भागांत यंदा नरकासुर प्रतिमास्पर्धांच्या वेळी जे काय घडले त्यातून ती भीती खरी ठरण्याचे प्रत्यंतर आले.
विशेषतः राजधानी पणजीत व सत्तरीतील होंडासारख्या भागात जे काय घडले त्यानंतर वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी या घटनांतून शहाणे होऊन नरकासुर प्रथाच बंद करावी अशी टिप्पणी केली आहे व ती योग्यच असल्याचे सर्वसामान्यांचे मत पडले आहे.
कारण दिवाळी, चतुर्थी यांसारख्या सणांतही आता राजकारण मोठ्या प्रमाणात डोकावू लागले आहे. त्यामुळे सण उत्सवांना हिडीस रूप येत आहे.
एरव्ही विविध सण वा उत्सव हे समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारे असायला हवेत, त्यांचा मूळ हेतूही तोच होता. पण आता त्या हेतूला नेमका छेद देण्याचे प्रकार होत आहेत. त्याची अशीच सतत पुनरावृत्ती होणार असेल तर या प्रथा चालू ठेवण्यात तरी काय हशील आहे? त्याऐवजी त्या रद्द करणे हाच खरा उपाय आहे. पण त्या प्रथा रद्द कोण करणार हाही मुद्दा उपस्थित होतो.
एका नरकासुराचेच उदाहरण घेतले तर मुळात दिवाळीत नरकासुर नव्हताच. केवळ त्याचे प्रतीक म्हणून सुकी पाने वा सुकलेले गवत गोणपाटांत भरून दिवाळीच्या उत्तररात्री त्याला आग लावून ते पेटविले जाई व नरकासुर दहनाचे समाधान मानले जाई.
नंतरच्या काळात छोटेखानी प्रतिमा आल्या व त्यानंतर महाकाय प्रतिमा. त्यांच्या मिरवणुका, त्या जोडीला बँड, डीजे व बाकीचा सगळा धांगडधिंगा आला. त्यासाठी राजकारणी वा अन्य नेते यांच्याकडून आर्थिक बळ मिळू लागले.
त्यातूनच विविध टोळ्या जन्मास आल्या आणि नरकासुर सगळ्यांच्याच सोयीचा ठरला. त्यामुळे ही प्रथा तशी सहजासहजी बंद करता येईल असे वाटत नाही. कारण अनेकांचे हितसंबंध या नरकासुरामागे दडलेले असतात.
‘सनातन’वाले गेल्या अनेक वर्षांपासून नरकासुराला विरोध करताना व त्यावर बंदी घालण्याची मागणी करत आले आहेत. पण कोणीच ती मागणी गांभीर्याने घेतली नाही उलट ती थट्टेवारी नेली. पण गेल्या काही वर्षांत नरकासुर मिरवणुकीच्या नावाने जे काय घडत आहे व यंदा जे काय घडले ते पाहिले तर ही प्रथा बंद करणे ही काळाची गरज ठरली आहे असे म्हणणे भाग आहे.
पूर्वी नरकासुर मिरवणुकांचे हे फॅड केवळ शहरी भागांपुरते मर्यादित होते पण आता ते गावागावांत पसरले आहे, होंडासारख्या भागात जो काय प्रकार घडला तो पाहिला तर सर्व संबंधितांनी राजकारण व अन्य हेवेदावे बाजूस ठेवून त्याबाबत विचार करणे गरजेचे ठरले आहे.
पण आठवडा उलटला तरी त्या दिशेने विशेष काही घडलेले दिसत नाही. उलट या घटनेला राजकीय रंग देण्याचे व पोलिस यंत्रणेवर ठपका ठेवण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. तसे कोणत्याही गोष्टीत राजकारण घुसडवणे हे आता नित्याचेच झालेले आहे.
फातोर्डा येथे श्रीकृष्ण विजय उत्सवाच्या निमित्ताने विविध राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन हात उंचावून जे काय दर्शन घडविले त्याला राजकारण नाही तर दुसरे काय म्हणायचे? सामाजिक कलह वा द्वेष हा अशाप्रकारेच तयार होत असतो.
पण स्वतःला मुरब्बी राजकारणी म्हणवणाऱ्यांना त्याचाच विसर पडत असतो याचेच वैषम्य वाटते. कोणा एका नेत्याच्या बाबतीत नव्हे तर सरसकट सगळे या बाबतीत एकाच माळेचे मणी शोभावेत असे प्रकार यंदा दिवाळीत घडले आहेत.
एकमेकांना ‘नरकासुर’ संबोधणे तर सर्रास घडले. पण हीच मंडळी त्याच्या स्पर्धांसाठी मात्र घसघशीत रकमेची बक्षिसे पुरस्कृत करत असतात. विविध भागांत होणाऱ्या स्पर्धा व त्यासाठी मदत करणारी मंडळी याचा मुद्दाम शोध घेतला तर नरकासुरांना उदात्त कोण करतो ते दिसून येईल.
यापूर्वी एकदा दिवाळीतील अशा स्पर्धांच्या वेळी मडगावात बॉम्बस्फोट होऊन दोघांचे बळी गेले होते. त्याबाबत ‘सनातन’वाल्यांना दोषी ठरविले गेले होते. पण कोर्टात काही तसे पुरावे सादर करता आले नाहीत व त्यामुळे सगळे संशयित निर्दोष सुटले असले तरी या प्रकरणात काहींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले खरे.
पण त्यातून योग्य बोध काही संबंधितांनी घेतला नाही. वास्तविक त्या घटनेनंतर अशा स्पर्धा रद्द करता आल्या असत्या व नरकासुराविना बाकीचे कार्यक्रम करता आले असते. पण तसे काही झाले नाही. उलट त्यानंतर अशा स्पर्धांना भव्य स्वरूप आले व वर्षागणिक ते वाढतच गेले.
नाही म्हणायला गेल्या वर्षी न्यायालयाने एकंदर धांगडधिंगा होत असल्याबद्दल नापसंती व्यक्त करून निर्देश दिल्यानंतर यंदा सरकारी यंत्रणांनी विविध भागांतील स्पर्धा आयोजकांच्या बैठका घेऊन त्यांना ध्वनिप्रदूषण व वेळेच्या काटेकोरपणाबद्दल सूचना केल्या.
पण त्या तोंडदेखलेपणाच्या ठरल्या. तेवढ्याने भागले नाही तर राजधानीत भाटल्यासारख्या भागांत व होंडासारख्या ठिकाणी जे काय घडले तो अतिरेकच म्हणावा लागेल. राजकीय पाठबळाशिवाय असे प्रकार घडत नाहीत व त्यामुळेच पोलिस यंत्रणा त्याकडे काणाडोळा करत असते.
अन्यथा होंडा येथे पोलिसचौकीच्या आवारात पार्क केलेल्या वाहनाला आग लावणे याचा दुसरा कोणता अर्थ होऊ शकतो? आता त्या प्रकरणाची सांगड दुसरीकडे घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी शंका घेतली जात आहे.
गोव्यात हल्लीच्या काळात ज्या विविध घटना घडल्या आहेत त्यात एकंदरीत पोलिस यंत्रणेची निष्क्रियता वा अकार्यक्षमता उघड झाल्याचे आरोप होत आहेत. ते योग्य नसतील तर आपली कार्यक्षमता सिद्ध करण्याचे आव्हान ही यंत्रणा व सरकारसमोर आहे. त्याचबरोबर ढवळीकर यांनी सुचविल्याप्रमाणे नरकासुर प्रथेला मूठमाती देण्याबाबतही पावले उचलता येण्यासारखी आहेत. पण सरकार त्यासाठी पुढाकार घेणार का, हाच खरा प्रश्न आहे!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.