Name Change: 37 वर्षाच्या व्यक्तीला 42 वर्षांचा मुलगा कसा? नाव बदलून 'नीज गोंयकार' भासवण्याचा परप्रांतीयांचा खटाटोप

Goa Name Change Law: ‘शेक्सपिअर’ने ‘नावात काय आहे?’ असे म्हटले होते, परंतु नावातच सारे काही आहे. मूळ नावे-आडनावे बदलून गोव्यातील प्रचलित नावे लावण्याचा परप्रांतीयांचा सोस अलीकडे अधिकच वाढला आहे.
Goa name change law
Goa name change lawDainik Gomantak
Published on
Updated on

‘शेक्सपिअर’ने ‘नावात काय आहे?’ असे म्हटले होते, परंतु नावातच सारे काही आहे. मूळ नावे-आडनावे बदलून गोव्यातील प्रचलित नावे लावण्याचा परप्रांतीयांचा सोस अलीकडे अधिकच वाढला आहे. गेल्याच महिन्यात अलीसाब अलगुंडी या परप्रांतीयाने ‘सुजल गावकर’ हे नाव धारण करण्यासाठी न्यायालयात केलेला अर्ज सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता.

नाव बदलण्यासाठी गैरमार्गाचा वापर होत असल्याच्या मुद्यावर तेव्हापासून पुन्हा चर्चा झडू लागल्या. विधानसभेत विजय सरदेसाई यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे प्रश्न उपस्थित केला. ज्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘नाव आणि आडनावातील बदल’ कायद्यांतर्गत ज्यांनी नावे आणि आडनावांत बदल केलेले आहेत, त्यांची चौकशी करून जेथे कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होईल, अशांना तुरुंगात धाडले जाईल, अशा घोषणेद्वारे वेळ मारून नेली. कळीच्या मुद्यावर अशी आश्वासने नेहमीच दिली जातात, ज्यांची पूर्तता किती होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

विधानसभेच्या सत्रात गोमंतकाच्या अस्तित्वावरील घाव दररोज नव्या स्वरूपात उद्धृत होत आहेत. त्यातील नामबदल प्रक्रियेत कायद्याच्या उल्लंघनाचा विषय. जो नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. नाव बदलून नीज गोंयकार भासवण्यात अनेक फायदे आहेत, ज्यासाठी असा खटाटोप होत आला आहे.

टायर बदलणारे केरळीयनही नाईक आडनावाचे आहेत. समोर आलेल्या एका आकडेवारीनुसार नाव बदलण्यासाठी वर्षाला दोनशेच्या आसपास अर्ज न्यायपालिकेकडे दाखल होतात. कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यास कुणाची हरकत असण्याचे कारण नाही; परंतु गैरमार्गाने नामबदल करण्याचे प्रकार घडत आहेत, जे अनेक नव्या समस्यांना जन्म देत आहेत.

१९९०साली गोवा नाव आणि आडनाव बदल कायदा अस्तित्वात आला. पोर्तुगीज राजवटीत व त्यानंतरच्या काळातील नावांचे उच्चार व ती लिहिण्यात असलेली तफावत दूर करण्यासाठी त्याचा उपयोग झाला. परंतु, परप्रांतीयांना गोमंतकीय नावे धारण करण्याची आयतीच संधी प्राप्त झाली.

तथापि, गैरमार्गाचा अवलंब व जेव्हा उपद्रव वाढला तेव्हा २०२२साली कायदेबदल करण्यात आला. नाव बदलायचे असल्यास अर्जदाराचा तसेच त्याचे आई-वडील वा आजोबा यापैकी एखाद्याचा जन्म गोव्यात झालेला असणे बंधनकारक झाले.

शिवाय नाव बदलासाठीच्या प्रक्रियेचा अधिकार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे देण्यात आला. प्रक्रियेची चौकट ठरली. नाव बदलानंतर जुने व नवे नाव असलेले प्रमाणपत्र संबंधिताला बहाल करण्यात येते. दोन उल्लेख असणारे प्रमाणपत्रच वापरात येते. इथवर ठीक होते.

परंतु बऱ्याच व्यक्ती आपल्या मूळ दाखल्यात नव्या नावाप्रमाणे बदल करून घेऊ लागल्या, जे बेकायदा आहे. इतकेच नाही तर दाखल्यावरील धर्मही बदलण्यात आल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. धर्म बदल करता येतो, परंतु अशा पद्धतीने नाही!

आजही इस्पितळात मूल जन्मल्यानंतर त्याच्या आई-वडिलांची नावे विचारून जन्मदाखला दिला जातो. पडताळणीची कठोर पद्धत अस्तित्वात नाही. नाम बदलाच्या आधारे कित्येकांनी भूखंड लाटले. मृत व्यक्तीच्या जागी त्याच नावाची दुसरी व्यक्ती आणून जमीन व्यवहार झाले.

न्या. जाधव यांनी अशा प्रकारांवर भाष्य केले आहे. अलीसाब अलगुंडी या ट्रकावर काम करणाऱ्या एका परप्रांतीयाने घरमालकाच्या ना हरकत दाखल्याद्वारे आधारकार्ड काढले, पुढे नाव बदलण्यास अर्ज केला, या उदाहरणातून सरकारी यंत्रणेला किती गृहीत धरले जाते, हे स्पष्ट होते. कायद्याचे उल्लंघन करून कोणी नाव आणि आडनावात बदल केल्यास त्याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. परंतु आजवर अशी शिक्षा किती जणांना झाली?

Goa name change law
नाव, आडनावात बेकायदेशीरपणे बदल कराल तर खबरदार; तीन वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा, अधिवेशनात लक्षवेधी

यापुढे प्रकरणांचा सखोल तपास कोणती यंत्रणा करणार? त्यात दोषी आढळल्यास कारवाई अर्जदारापुरती मर्यादित राहणार की संबंधित यंत्रणेलाही दोषी धरणार हे देखील सरकारने स्पष्ट करावे. नाव बदलण्याचा हेतू काय हे जाणून घेण्याची तरतूद कायद्यात करणे क्रमप्राप्त आहे. शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

तसा पाठपुरावा मध्य प्रदेशमधील पोलिसांनी केला म्हणून पलाश अधिकारी हे नाव धारण करणारी व्यक्ती चक्क बांग्लादेशी नागरिक शेख मोइनुद्दीन असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. या माणसाचे आधार कार्ड, व्होटर आयडी कार्ड वगैरे सगळी कागदपत्रे होती, त्याच्या वडिलांची पडताळणी केली तेव्हा ते नावही खरेच निघाले.

Goa name change law
Goa Assembly: 'भाजपशासित प्रदेशात अल्पसंख्यांकांना धोका' आलेमाव आक्रमक; 'इतरांची उदाहरणं देऊ नका' मुख्यमंत्र्यांचा पलटवार

पण, लग्नाला सदतीस वर्षे झालेल्या व्यक्तीचा मुलगा बेचाळीस वर्षांचा कसा, ही शंका पोलिसांना आल्यामुळे हे बिंग फुटले. अर्थात त्याला शिक्षा झाली, पण ज्यांनी रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड केले त्या अधिकाऱ्यांचे काय? त्यांना काहीच शिक्षा झाली नाही.

कोविडच्या वेळेस गोव्याबाहेर जाऊ इच्छिणाऱ्या कन्नड लोकांचे आधार कार्ड, रेशन कार्ड आणि व्होटिंग कार्ड गोव्यातले होते. अशा घटना घडतात तेव्हा तोंडदेखल्या कारवाईच्या नावाखाली फांद्या छाटल्या जातात; खोल गेलेली मुळे तशीच फोफावत राहतात. नावात काय आहे, ते आणि कुणी बदलले हे शोधल्याशिवाय ‘अशांना तुरुंगात धाडले जाईल’, अशा वल्गनांना काहीच अर्थ नसतो. तोंडाची वाफ निघून जाईपर्यंतही त्यांचे नामोनिशाण राहत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com