'आम्हीच देश चालवतो' अशा थाटात वावरणाऱ्या संपादकांचे काय झाले? पत्रकारितेतील स्थित्यंतर

Goa journalism analysis: छोट्यामोठ्या परीक्षा सोडाच कोविडसारख्या मोठ्या परीक्षेत आमची दोन्हीकडील नूतन शवागारे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहेत.
journalism
journalism Dainik Gomantak
Published on
Updated on

छोट्यामोठ्या परीक्षा सोडाच कोविडसारख्या मोठ्या परीक्षेत आमची दोन्हीकडील नूतन शवागारे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहेत, याचे श्रेय समंजस गोमंतकीय जनमानसाला जाते. पत्रकारितेने आपल्या मर्यादा ओलांडल्या असल्या तरी, चांगल्या उद्देशाने केलेले नकारात्मक वृत्तांकन आम्ही नेहमी सकारात्मक घेतो. हेच खरे यशाचे गमक आहे!

परवा गोव्याचा ६५वा मुक्तिदिन साजरा होत आहे, याच मुहूर्तावर आमचे आधुनिक शवागार एक तप म्हणजे बारा वर्षे पूर्ण करीत आहे. ताज्या अग्निकांड दुर्घटनेच्या पहिल्या दोन दिवसांचे वृत्तांकन या शवागराच्या प्रांगणातून होत होते. या वृत्तांकनाच्या व्हिडिओत आमच्या विभागाचे नाव दिसत असलेली भिंत अगदी कला अकादमीच्या भिंतीसारखी वाटते.

अशा दुर्घटनेचे दृकश्राव्य वृत्तांकन करण्यासाठी पत्रकारांना शवागारापाशी जाण्याशिवाय पर्याय नसतो. मी स्वत: न्यायवैद्यक विभागाशी जोडला गेल्यास तीन दशके होऊन गेली आहेत व त्यात आम्ही स्वत: लक्ष घालून उभारलेल्या शवागार वापराची तपपूर्ती या मुक्तिदिनी पूर्ण होत आहे. या विभागाशी जोडल्याने स्थानिक व राष्ट्रीय पत्रकारितेतील मागील तीन दशकातील फरक पाहण्याचा योग मला आला.

मी १९९६साली न्यायवैद्यक विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तो काळ असा होता की येथे प्रोमोशनला संधी दिसत नसल्याने स्व. डॉ. मधुकर उसगावकर सर इथली नोकरी सोडून गोव्याबाहेरील मेडिकल कॉलेजमध्ये रुजू झाले होते. त्यांच्या रिक्त स्थानावर, हॉस्पिसियोमधली जबाबदारी सोडून डॉ सांपेको आले होते. म्हणजे या संपूर्ण विभागात फक्त तीनच शिक्षक जागा उपलब्ध होत्या व त्याही भरलेल्या.

अशावेळी नियमित नोकरीची संधी नाही, म्हणून येथे कुणी पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेत नव्हते. माझ्या आधी प्रवेश घेतलेल्या चार जणांनी पदवी न मिळवताच कोर्स अर्धवट सोडला होता. एकाने पूर्ण केला होता पण जागा रिक्त नसल्याने दुसरीकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांची नोकरी करत होते. येथे संधी तयार झाली तेव्हा त्याला या विभागात रस राहिला नव्हता. थोडक्यात मी या विभागात प्रवेश केला तेव्हा तीन शिक्षक व एकटा पिजी विद्यार्थी अशी परिस्थिती होती.

अशावेळी, पुढील तीन वर्षांत व त्याहीनंतर डॉ. सापेकोच्या प्रयत्नातून अनेक पदांची निर्मिती झाली व त्यामुळे शिक्षक संख्या तीनवरून तेरापर्यंत गेली. आधी नोकरी व मागाहून पदव्युत्तर शिक्षण असा प्रकार येथे झाला. पण यामधून मनुष्यबळ तयार झाले. अशातच २००३साली वैभववाडी येथे मोठा रेल्वे अपघात झाला, ज्यात एकूण ५२ लोकांचा मृत्यू झाला होता. यातील ४८ मृतदेह साठवणीसाठी आमच्या शवागारात आणले होते. त्यावेळी जे शवागार होते ते त्यामानाने देशातील सर्वात मोठ्या क्षमतेच्या शवागारांपैकी एक होते.

या दुर्घटनेत आम्हांला आमच्या मर्यादा कळून चुकल्या. त्यावेळी स्व. पर्रीकर सरकारात स्व. डॉ. सुरेश आमोणकर आरोग्यमंत्री होते. त्यांनी डॉ. सांपेकोना याविषयी सरकारकडे अधिकृत विनंती करण्याचा सल्ला दिला. तिथूनच नूतन शवागार निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली, पुढे आलेल्या दिगंबर कामत सरकारच्या काळात इमारत उभारणीचे काम पूर्ण झाले व परत आलेल्या पर्रीकर सरकारच्या काळात म्हणजे १९ डिसेंबर २०१३ रोजी पर्रीकरांच्या हस्ते तिचे उद्घाटन झाले.

journalism
Goa Assembly Winter Session 2026: विधानसभेचे हिवाळी अधिवेशन हडफडे अग्निकांडामुळे तापणार? 12 ते 16 जानेवारीपर्यंत चालणार कामकाज

उद्घाटन सोहळा साधा होता. त्या प्रसंगी पर्रीकर पत्रकारांना सोबत संपूर्ण शवागार प्रकल्पात फिरले, तेथेच चहा फराळ घेतला. शवागार म्हणजे घाणेरडी जागा ही संकल्पनाच मोडीत काढणारा हा प्रकल्प आहे, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. यापुढे तरी शवागराच्या नकारात्मक बातम्या येणार नाहीत, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

पर्रीकरांना नकारात्मक बातम्या येणार नाहीत, असे वाटले तरी तर प्रत्यक्षात तसे झाले नाही. कुठलीही नवीन व्यवस्था स्वीकारायला मुळात रुळलेली सरकारी कर्मचारी व्यवस्था मानसिकदृष्ट्या तयार नसते. उद्घाटनानंतर जानेवारीपासून शवागार वापर सुरू करायाचे ठरले होते. डॉ. सांपेको सर व मी, आमची कार्यालये नव्या प्रकल्पात नेली पण राहिलेले सहकारी पुढील तीन महिने आपली जागा सोडेनात.

शेवटी एक ‘स्वच्छ’ उपाय म्हणून जुन्या विभागातली साफसफाई बंद केली. तसे एकेक जण नव्या प्रकल्पात आले. हे झाले एक उदाहरण, पुढे यातील एक दोघांच्या साहाय्याने राष्ट्रीय इंग्रजी वर्तमानपत्राच्या एका महिला पत्रकाराने नकारात्मक बातम्यांचा सपाटा लावला. शवागारांच्या त्रुटी दूर राहत गेल्या, त्याविषयी बातम्या मिळत नाही असे झाल्यावर हिचे, येथील ठरावीक कर्मचाऱ्यांना टार्गेट करणे सुरू झाले. अगदी अति झाल्यावर, कायद्यानुसार हिच्याविरुद्ध व हिला खोट्या माहिती पुरविणाऱ्या आतल्या माणसाविरुद्ध आगशी पोलिसस्थानकात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात झाला.

ही बाब कोर्टात नेणे शक्य होते पण एकंदरीत गोव्यातील पत्रकारितेचा आदर राखत, प्रकरण तेथेच थांबविले. या प्रकरणातून एक स्पष्ट संदेश गेला, की आपण राष्ट्रीय वर्तमानपत्रात काम करता म्हणून तुम्हाला हवे ते प्रसिद्ध करता येत नाही! इतकेच नव्हे तर, येथे आपली लुच्चेगिरी समोर आली तर त्या वर्तमानपत्राचे व्यवस्थापन आपल्या पाठीशी उभे राहत नाही. शिवाय, दुसऱ्यांवर कुरघोड्या करण्यासाठी आतल्या पुड्या सोडणारेही आपल्या अंगावर शेकणार हे लक्षात येताच ‘तो मी नव्हेच’ म्हणून वेगळे होतात! हा गुन्हा नोंदणीनंतर शवागाराविषयी हेतुपूर्वक पसरविल्या जाणाऱ्या नकारात्मक बातम्या बंद झाल्या.

journalism
PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

गोव्यात हल्लीच झालेल्या अग्निकांडाचे राष्ट्रीय चॅनलवरून वृत्तांकन व चर्चा झाली, तशी ती पहिल्यांदा बहुचर्चित स्कारलेट प्रकरणात झाली होती. २००८साली तीन प्रकरणांची राष्ट्रीय चॅनलवर मोठी चर्चा झाली होती. फेब्रुवारी-मार्च महिन्यात गोव्यातील बहुचर्चित स्कारलेट खून व बलात्कार प्रकरण, मे महिन्यातील दिल्ली येथे झालेले आरुषी खून प्रकरण व वर्षअखेर ताजवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे प्रकरण. तेव्हाचे रिपोर्टिंग व आताचे रिपोर्टिंग यातील फरक हा, की तेव्हाचे चॅनल संपादक म्हणजे देश आपणच चालवत आहोत, अशा थाटात बोलणारे महाभाग जे आज त्या चॅनलसोबत काम करीत नाहीत.

आपले ‘मतस्वातंत्र्य’ शेवटी आपल्या मालकाच्या मर्जीवर अवलंबून असते, याचा अनुभव त्यांना पुरेपूर आला आहे. स्कारलेट ही विदेशी महिला असल्याने बऱ्याच विदेशी स्वयंसेवी संस्थांकडून मिळणाऱ्या निधीवर दिल्लीतील ‘ल्यूटीअन’ चॅनलनी बरीच मजा मारली. या प्रकरणात दिल्लीवाला पण गोव्यात लुडबुड करणाऱ्या ‘वर्मा’ नामक वकिलाने बहुचर्चित स्कारलेटच्या आईला मदत करण्याच्या नाटकात, या दिल्लीवाल्या पत्रकारांना चांगले खाद्य पुरविले. पुढील काळात विदेशींना गोव्यात जागा घेऊन देण्यासाठी, ड्रग्स गुन्ह्यात अडकलेल्या विदेशींना मदत करण्याच्या नावाखाली, त्यांना लुबाडण्याचे अनेक ‘विक्रम’ त्याच्यावर नोंद आहेत.

journalism
PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

ताज्या प्रकरणात, असाच बक्षी की पक्षी नामक दिल्लीवाला पत्रकार या ‘वर्मा’चे ‘कर्म’ थोड्या वेगळ्या फरकाने पुढे चालवीत आहे. ताज्या प्रकरणात तर तो दिल्लीतल्या सर्वच इंग्रजी व हिंदी चॅनलवर आपले ज्ञान ओकत आहे. जणू काही आपण काही धर्मराजाचा अवतार असे कॅमेऱ्यासमोर दाखवत आहे पण तो स्वत: चोडणामध्ये काय करतो, त्याचा पर्दाफाश आपल्या एका पत्रकाराने केला आहे.

यांना वेळीच आवरले नाही तर भविष्यात अधिक ‘लुथरा’ तयार होतील. एकंदरीत १७ वर्षांपूर्वी या घटनांना टीव्हीवरील चर्चांसाठी संध्याकाळी ‘प्राइम टाइमला’ मोठी मागणी असायची. साहजिकच, त्यामुळे चॅनलअंतर्गत मोठी स्पर्धा असायची. आता या अशा चर्चांत गांभीर्य उरले नाही. म्हणून ‘प्राइम टाइम’ला कुणी विचारत नाहीत. मागाहून चर्चेचे रील सोशल मिडियावर पाहतात. आज चर्चा होते ती सोशल मिडियावर, पण येथेही युट्यूबर, डिजिटल क्रिएटर व पॉडकास्टर म्हणून जे ‘माहिती सैन्य’ समोर आले आहे, ते या ‘हम बोले सो सत्य’ अशा गुर्मीत वागणाऱ्या कथित राष्ट्रीय चॅनलवाल्यांना वस्ताद ठरले आहे.

journalism
Goa Assembly Winter Session 2026: विधानसभेचे हिवाळी अधिवेशन हडफडे अग्निकांडामुळे तापणार? 12 ते 16 जानेवारीपर्यंत चालणार कामकाज

नूतन शवागारात सर्व प्रथम काणकोणमधील रूबी दुर्घटना हाताळली, तर यावर्षी शिरगाव दुर्घटना व आता हडफडे अग्निकांड दुर्घटना निर्विघ्नपणे हाताळली. मोठा प्रकल्प हाताळण्यासाठी मोठे तज्ज्ञ मनुष्यबळ लागते. येथे मोठा प्रकल्प झाला म्हणून वैद्यक मनुष्यबळ चालून आले. जिथे पंधरा वर्षांतून एक विद्यार्थी तज्ज्ञ शिक्षणासाठी प्रवेश घेत होता, तेथे आज बारा एक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. आज उत्तरेत व दक्षिणेत मिळून दहा शिक्षकवर्ग व बारा पिजी विद्यार्थी असे मोठे मनुष्यबळ आज उपलब्ध आहे.

या पिजी विद्यार्थ्यांपैकी एक दोन डॉक्टर गोव्यातील असतात तर राहिलेले गोव्याबाहेरील आहेत, यावरून या प्रकल्पांची राष्ट्रीय पातळीवर किती लोकप्रियता निर्माण झाली आहे ते लक्षात येते. मोठे मनुष्यबळ असले की अंतर्गत रुसवेफुगवे, हेवेदावे या गोष्टी येतातच पण ज्या ध्येयासाठी हे प्रकल्प निर्माण केले जातात, ते सफल होते की नाही, हे शेवटी महत्त्वाचे आहे. छोट्यामोठ्या परीक्षा सोडाच कोविडसारख्या मोठ्या परीक्षेत आमची दोन्हीकडील नूतन शवागारे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहेत, याचे श्रेय समंजस गोमंतकीय जनमानसाला जाते. पत्रकारितेने आपल्या मर्यादा ओलांडल्या असल्या तरी, चांगल्या उद्देशाने केलेले नकारात्मक वृत्तांकन आम्ही नेहमी सकारात्मक घेतो. हेच खरे यशाचे गमक आहे!

- डॉ. मधू स. घोडकिरेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com