
पावसाळी मौसमात माती आणि पाणी मिसळून ज्या चिखलाची निर्मिती होते, तो प्राणिमात्राला आवडत असला तरी माणसाला तो पायातल्या पादत्राणाला वारंवार चिकटत असल्याने आजच्या काळात अजिबात आवडेनासा झालाय. एकेकाळी पावसाळी मौसम आला की कष्टकरी आपल्या शेतजमिनीत जेव्हा भारताची पेरणी करतो तेव्हा त्याला त्या चिखलात काम करणे आवश्यक असते.
नांगरणी, पेरणीची कामे करताना पायी चिखल तुडवणे आवश्यक असते. एकेकाळी लहान मुलांना मातीत खेळायला खूपच आवडायचे. बालकृष्णाने मातीत खेळता खेळता जेव्हा थोडी माती खाल्ली तेव्हा यशोदा मातेनं त्याचं जेव्हा तोंड उघडले तेव्हा म्हणे तिला चक्क ब्रह्मांडाचे दर्शन झाले. आज छोट्या मुलांना मातीत रांगण्यासच जेथे दिले जात नाही तेथे त्यांना खेळण्यास कोण देणार? त्यामुळे पावसाळ्यात चिखलाचा स्पर्श छोट्या मुलांना कोण करू देणार?
पूर्वीच्या काळी पावसाचे दिवस येणे आणि चिखलाचे साम्राज्य निर्माण होणे हे लोकमानसाने कधी कंटाळवाणे मानले नव्हते. शेतात राबराबणारे हातपाय चिखलात आनंदाची प्राप्ती करायचे. बालकृष्ण गोकुळात नंदाच्या घरी असताना मातीत खेळताना आणि चिखल तुडवताना प्रफुल्लित व्हायचा. त्यामुळेच गोव्यासारख्या कृषिप्रधान राज्यात श्रीविठ्ठल किंवा श्रीकृष्णाच्या मंदिराच्या प्रांगणात चिखलकाल्यासारखी परंपरा निर्माण झाली असावी.
खरे तर विविध खाद्यपदार्थ; दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र करून कालवणे याला ‘काला’ ही संज्ञा लाभलेली आहे. बाळकृष्णाने आपण आणि सवंगडी गोकुळात गायी चारताना या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व भेदाभेद विसरून त्याचे भक्षण केले.
पंढरपुरात आषाढी-कार्तिकी एकादशीनंतर येणाऱ्या पौर्णिमेला गोपाळपूर येथे काला साजरा केला जातो. गोव्यात आणि अन्यत्र गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी काल्यानिमित्त दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होतो. कार्तिकी एकादशीनंतर गोवा कोकणात बऱ्याच गावी गवळण काला, रातकाला साजरा करण्याची परंपरा रूढ आहे. परंतु गोव्यात वरगावातील माशेल, कारापुरातील विठ्ठलापूर आणि सांगे येथे आषाढी एकादशी साजरी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जो चिखलकाला साजरा केला जातो; ती परंपरा वैशिष्ट्यपूर्णच आहे.
फोंडा शहरातल्या श्रीविठ्ठल मंदिराच्या प्रांगणात संध्याकाळच्या सत्रात चिखलकाला गेल्या दोन शतकांपासून चालू आहे. सांगे शहरात उगे आणि गुळेली नदीचा जेथे संगम होतो त्या परिसरातील श्रीविठ्ठल मंदिर भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे.
इथे चिखलकाल्याची परंपरा आहे. माती आणि पावसाचे कोसळणारे पाणी एकत्र येऊन जो चिखल निर्माण होतो त्यात आबालवृद्ध आपले देहभान विसरून, मोठ्या आत्मीयतेनं नानाविध खेळ चापल्य आणि सामर्थ्य प्रदर्शित करत खेळतात. एकमेकांच्या निर्व्याज प्रेमाचे दर्शन घडवत नानाविध प्रकारचे चिखलात खेळले जाणारे हे खेळ मनोरंजन करण्याबरोबर भक्तीभावाचे दर्शन घडवतात. सांगे शहरात व्यापार, उद्योगधंद्यानिमित्त स्थायिक झालेले लोक चिखल काल्यात उत्स्फूर्तरीत्या सहभागी होतात.
कारापुरातील विठ्ठलापूर येथे गेल्या पाच शतकांपेक्षा जास्त काळापासून जे विठ्ठल मंदिर आहे ते गोमंतकीय लोकमानसात प्रतिपंढरपुराच्या लौकिकाला पात्र ठरलेले आहे.
इथे वाळवंटी नदीच्या डाव्या किनारी जे पुंडलिकाचे मंदिर वसलेले आहे त्याच्या प्रांगणात चिखलकाला पारंपरिक खेळांद्वारे सादर करतात. या चिखलकाल्यात सहभागी होण्यासाठी श्रीविठ्ठल, रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्या उत्सवमूर्ती पालखीत विराजमान होऊन येतात आणि त्यानंतर पुन्हा मंदिरात जातात.
माशेलात होणारा चिखलकाला आजच्या घडीस केवळ गोव्यातच नव्हे तर गोव्याबाहेरच्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरलेला आहे. गोवा पर्यटन खात्यातर्फे या चिखलकाल्याची विशेष जाहिरात केली जात असल्याने त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.
या उत्सवात सहभागी होणाऱ्या आबालवृद्ध आणि तरुणाईमार्फत देवकीकृष्ण मंदिराच्या प्रांगणात उत्साहाला अक्षरशः उधाण आलेले पाहायला मिळते. कधी एकमेकांच्या हातात हात गुंफून तर कधी एकमेकाची ताकद दाखवत होणाऱ्या विविध पारंपरिक खेळांतले प्रावीण्य आणि चापल्य पाहायला मिळते. चक्राकार, गोलाकार सामूहिक खेळ असो अथवा आंधळी कोशिंबिरीसारखे खेळ असो, प्रत्येक खेळ यातून त्याची समरसता, एकोपा, सौहार्दाचे संबंध अनुभवायला मिळतात.
सोळाव्या शतकात देवकीकृष्णाचे स्थलांतर भाविकांनी चोडण बेटावरून अंत्रुज महालातील वरगावातल्या माशेलात केले. इथल्या भूमिपुत्रांसाठी बालकृष्णाच्या लीला पूर्वापार कथा कहाण्यांतून आकर्षण ठरलेल्या आहेत.
त्यामुळे बालकृष्ण उत्साहाने ज्या नानाविध खेळांत सहभागी झाला होता त्यात आपले वय, पद, शिक्षण, जात विसरून उपस्थितीत मंडळी उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. पारंपरिक लोकगीताच्या गायनाद्वारे श्रीकृष्ण, गोविंद, गोपाळ यांचा जयघोष करत सवंगडी सहभागी होतात. त्यांचा हा चिखलकाला पाहणे प्रेक्षकांसाठी अपूर्व असा सोहळा ठरल्याने त्याचा आविष्कार अनुभवणे त्यांच्यासाठी हर्षोल्हास ठरलेला आहे.
जीवनातील ताणतणाव आज माणसाच्या जगण्यातला आनंद हिरावून घेत असल्याने चिखल काल्यासारखा सोहळा काही काळापुरते का होईना सहभागी सवंगड्यांना देहभान विसरून समरसतेचा अपूर्व असा अनुभव देऊन सुखसमृद्धी प्रदान करण्यात कारणीभूत ठरलेला आहे.
श्रीकृष्ण आणि श्रीविठ्ठलाच्या भगवद्भक्तीच्या परिसस्पर्शाने वारकरी संप्रदायातल्या भाविकांचे जीवन अर्थपूर्ण झाल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाल्याने, चिखल काल्यात होणारा चिखलाचा स्पर्श पूर्वीच्या काळी कष्टकरी जाती जमातींना भारावल्यागत भासायचा आणि त्यामुळे चिखलात हात पाय माखलेले असतानादेखील त्याचा त्यांच्यावरती प्रतिकूल परिणाम होत नसे. त्यामुळेच ती मंडळी आनंदाचे डोही, आनंद तरंग चिखल काल्यात अनुभवतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.