भारतीय हवाईदलाच्या विमानांनी 18 डिसेंबरच्या पहाटे दाबोळी विमानतळावर बॉम्बवर्षाव करून 'गोवा मुक्ती मोहिमे'चा शुभारंभ केला..

Goa Liberation Day 2025: ही भूमी, निसर्ग, पर्यावरण, संस्कृती यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी आम्ही कार्यरत राहिलो, तरच तिच्या मुक्तीसाठी पूर्वजांनी दिलेले बलिदान सार्थकी लागेल!
Goa Liberation Day 2025
Goa Liberation Day 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

राजेंद्र पां. केरकर

गोवा पोर्तुगीज सत्तेच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन, पुन्हा अभिमानाने भारतभूमीशी एकरूप झाल्याचा १९ डिसेंबर हा गौरव दिन. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत ब्रिटिशांच्या जोखडातून जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा गोवा, दमण ,दीव, दादरा, नगरहवेली हे प्रांत अल्पावधीतच भारतभूमीशी एकात्म होतील ही आशा बराच काळ मृगजळ ठरली.

त्यामुळे पोर्तुगिजांच्या गुलामगिरीच्या साखळदंडातून हे प्रांत विमुक्त करण्याचे स्वप्न एका टोकावरच्या पंजाबातल्या कर्नालसिंग बनिपालपासून उत्तर प्रदेशातल्या पन्नालाल यादवासारख्या निर्भयी तरुणांनी पाहिले होते

आणि त्याच्या पूर्ततेसाठी त्या निःशस्त्र सत्याग्रहींनी पोर्तुगिजांच्या बंदुकांतील गोळ्या निधड्या छातीने झेलत हौतात्म्य पत्करले होते.

गोवा मुक्ती संग्रामाची ज्योत डॉ राम मनोहर लोहिया यांनी असोळणाचे डॉ. ज्युलियांव मिनेझिस यांच्या आग्रहाखातर आल्यावर मडगाव येथील जाहीर सभेतून जरी पेटवली असली

तरी सोळाव्या शतकापासूनच कुंकळ्ळीच्या शूरवीरांनी अदम्य वीर अक्षौहिणीचे सामर्थ्य दाखवून धर्मांधांना प्रचंड हादरा देऊन गोमंतकीयांच्या स्वाभिमानी बाण्याचा आविष्कार घडवला होता. १७८७ सालचे पिंटोचे बंड असो अथवा सत्तरीतल्या राणेंनी आरंभलेले बंड असो, त्याद्वारे शौर्याचेच दर्शन घडवले होते.

गोमंतकीयांना भारतीयत्वापासून दुरावून लॅटिन संस्कृतीधार्जिणे बनवण्याचे षड्यंत्र राबवले जात होते. तत्कालीन पोर्तुगीज कॅथलिक चर्चने पोर्तुगीज सत्तेचा पुरस्कार करण्याचे धोरण स्वीकारले असतानाच फ्रान्सिस्कु लुईज गोम्ससारख्या लोकांनी इथल्या जनतेची पाळेमुळे महाभारत, रामायणात कशी रुतलेली आहे, ते दाखवून दिले.

लुईज द मिनेझिस ब्रागांझा यांनी ‘ओ हेराल्ड’ या पोर्तुगीज भाषेतल्या वर्तमानपत्रांतून साम्राज्यवादी आणि इथल्या जनतेचे आर्थिक शोषण, धार्मिक संचितांचे उच्चाटन करणाऱ्या राज्यकर्त्याच्या धोरणांवरती कडाडून टिका करण्याचे धाडस दाखवले होते.

डॉ. त्रिस्तांव ब्रागांझ कुन्हा यांनी गोव्याच्या स्वातंत्र्याच्या चळवळीला दिशा देण्यासाठी १९२८साली गोवा नॅशनल कॉंग्रेसची स्थापना करून, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कलकत्ता येथील अधिवेशनात मान्यता मिळवली.

पोर्तुगीज सरकारने १९१७साली गोव्यातल्या जनतेच्या नागरी स्वातंत्र्यावरती निर्बंध लादले, तर १९३०साली राजकीय सभा, मोर्चा यांच्यावर बंधने लादली. परंतु असे असताना गोमंतकीयांबरोबर स्वाभिमानी भारतीय तरुणांनी सत्याग्रहाद्वारे गोवा मुक्ती लढ्यात भाग घेतला. ‘आझाद गोमंतक दला’ने तर क्रांतीची मशाल गावोगावी नेली आणि त्यामुळे मरणप्राय यातना भोगत असताना मयते अस्नोड्याचा बाळा राया मापारी हा स्वातंत्र्यसैनिक, क्रूरात्मा आजिंतु कास्मिरू मौतेरू यांच्यासमोर मृत्यूला निर्भीडपणे सामोरा जात, आधुनिक मुक्ती लढ्यात पहिला हुतात्मा ठरला.

पोर्तुगिजांच्या सत्तेला हादरा देण्यासाठी भगतसिंगाच्या शस्त्रांच्याच भाषेद्वारे उत्तर देण्याचा विडा ‘गोवा लिबरेशन आर्मी’ने उचलला आणि त्या काळातल्या आशिया खंडात नावारूपाला आलेल्या शिरगावच्या लोह खनिज खाणीला खिळखिळी करण्याची कामगिरी बजावली.

१९४४साली पीटर आल्वारिस यांनी पोर्तुगिजांना गोवा सोडण्याचे आवाहन करणारा ठराव मंजूर केला. भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर गोवा मुक्ती लांबत असल्याने शेवटी भारत सरकारने सैनिकी कारवाई करण्याचे ठरवले.

भारतीय हवाईदलाच्या बॉम्बवर्षक विमानांनी १८ डिसेंबरच्या पहाटे दाबोळी विमानतळावर बॉम्बवर्षाव करून गोवा मुक्ती मोहिमेचा शुभारंभ केला तर भारतीय नौदलाने बंदरांची नाकेबंदी केली आणि अंजेदीव बेटावर तोफांचा भडिमार केला.

भारतीय पायदळाने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतून शस्त्रसज्ज सैन्यांद्वारे कारवाई आरंभली आणि त्यामुळे शेवटी इथल्या पोर्तुगीज गर्व्हनर वासाल द सिल्वा याने शरणागती पत्करली. मांडवी नदीच्या किनारी वसलेल्या आदिलशाही राजवाड्याची स्मृती जागवणाऱ्या जुन्या सचिवालयासमोर असणाऱ्या ध्वजदंडावर भारतमातेचा तिरंगा ध्वज यशस्वीरीत्या फडकवण्यातआला.

कित्येक शतकांनंतर गोव्यात मुक्तीचा दिवस अवतरला, तो भारतीय स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या राज्यघटनेच्या तत्त्वांचा पुरस्कार करत. इथल्या पशूतुल्य जनतेला सुसंस्कृत करण्याची भाषा सांगणाऱ्या पोर्तुगिजांनी धर्मांतरांचा वरवंटा निर्दयपणे फिरवताना इथल्या धर्म, संस्कृतीचे र्‍हासपर्व जणू सुरू केले

आणि त्यामुळे गोव्यातील पोर्तुगीज पूर्वकाळातील एकापेक्षा एक शिल्पकलेच्या अत्युच्च नमुना असलेल्या मंदिरांचे समूळ उच्चाटन झाले. गोव्यातल्या पोर्तुगीज राजवटीत ज्या पद्धतीने इथल्या लोकसंस्कृती, परंपरा, खाण्याजेवणाच्या पद्धतींवर अतिक्रमण करण्यात आले आणि लोकमानसाचा जसा तेजोभंग करण्यात आला तसा प्रकार अन्यत्र अपवादात्मक पाहायला मिळाला होता.

त्यामुळे . मुक्तीनंतर सत्तास्थानी आणि विरोधी पक्षांत असणाऱ्या आपल्या पुढाऱ्यांनी इथल्या सांस्कृतिक, सामाजिक, पर्यावरणीय, धार्मिक, आर्थिक संचितांचे नियोजनबद्ध पुनरुज्जीवन करण्याची नितांत गरज होती.

परंतु दुर्दैवाने तसा अपवादात्मक प्रयत्न झाल्याने, आज गोव्याच्या विकासाची दिशा भरकटलेली आहे. त्याची कटू फळे स्थानिकांच्या वाट्याला आलेली आहेत. दूरगामी विचार करणाऱ्या पर्यावरणवाद्यांच्या प्रयत्नांमुळे एक चतुर्थांश जंगलांनी समृद्ध भूभाग आसुरी विकासाच्या विळख्यापासून आजतागायत मुक्त आहे.

Goa Liberation Day 2025
Goa liberation History:मंदिरे मोडून चर्च उभारु पाहणाऱ्या 5 पाद्रीना ठार केले, वचपा म्हणून पोर्तुगिजांनी कुंकळ्‍ळीच्‍या 15 लाेकांवर गोळीबार केला; गाथा मुक्तीसंग्रामची

पण, त्याचे लचके तोडण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या नीतीचे षड्यंत्र राबवले जात आहे. एकेकाळी रुपेरी वाळू आणि निळ्याशार समुद्राच्या पाण्यासाठी ओळखली जाणारी गोव्याची किनारपट्टी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ताब्यात गेली आहे.

तेथे काही स्थानिक आणि संधीसाधूंची युती होऊन तेथे दुर्दैवाचे दशावतार सुरू आहेत. मद्यपान, धूम्रपान, अमलीपदार्थ सेवन, स्त्रियांचे लैंगिक शोषण, केरकचऱ्यांचे डोंगर, सांडपाण्याच्या विस्कळीतपणाची व हवा, पाणी, मृदा यांच्या जहरी प्रदूषणाची परिसीमा गाठलेली जागोजागी दृष्टीस पडत आहे.

Goa Liberation Day 2025
Goa Liberation Day 2025: गोवा मुक्तीचा 'तो' ऐतिहासिक लढा...! संयुक्त राष्ट्रात भारतासाठी रशियाने घेतला संपूर्ण जगाशी पंगा; फेल झाली अमेरिका-ब्रिटनची चाल

डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यांत सागरी किनारपट्टीवर ध्वनिप्रदूषणाबरोबर केरकचरा यांच्या गैरव्यवस्थापनाची सर्वत्र चलती असलेली गोवाभर पाहायला मिळत असते. हे भयाण चित्र समोर असताना वर्षपद्धतीप्रमाणे गोवा मुक्तीदिनाचा सोहळा साजरा करण्यास आम्ही बरबटलेल्या हातांनी सिद्ध झालो आहोत.

असीम त्यागाने स्वातंत्र्यसैनिकांनी भारतीय सैनिकांच्या विजय मोहिमेद्वारे आम्हाला आजचा मुक्तिदिन लाभला आहे. ही भूमी, निसर्ग, पर्यावरण, संस्कृती यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी आम्ही कार्यरत राहिलो, तरच तिच्या मुक्तीसाठी पूर्वजांनी दिलेले बलिदान सार्थकी लागेल!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com