

डॉ. मधू स. घोडकिरेकर
कालच्या लेखात मी, ‘दैनिक ‘गोमन्तक’ने केलेल्या गौप्यस्फोटात गुन्हा नोंद करण्याइतपत माहिती उपलब्ध आहे’, असे नमूद केले आहे. यावरून अनेक जणांनी माझ्याशी त्याविषयी विचारपूस केली, तर काहींनी शंका निरसन करण्याची विनंती केली. या शंका निरसनासाठी आज हा लेखप्रपंच करत आहे.
पहिली शंका विचारली गेली की प्रदीप व सुशांत हे गोवा कला अकादमीसारख्या निमसरकारी संस्थेचे कर्मचारी असल्याने त्यांना ‘पब्लिक सर्व्हन्ट’ म्हणजे लोकसेवक म्हणता येते काय? कायद्यानुसार करदात्याच्या पैशातून पगार घेणारे सगळेच लोकसेवक ठरतात.
त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यात येणारे लोकसेवकांविषयीचे कलम लागू पडते. या कलमात लोकसेवकांनी आपल्या कामादरम्यान इतर कुणालाही वशिला लावल्यास किंवा लाच देण्याचा प्रयत्न केल्यास तो गंभीर गुन्हा ठरतो.
दैनिक ‘गोमन्तक’ने जो तपशील प्रसिद्ध केला आहे, तो जर खरा आहे असे पुरावे समोर आल्यास, पोलिसांना या दोघांनाही गुन्ह्याचे संशयित मानून त्यांच्याविरुद्ध वरील कलमानुसार गुन्हा नोंद करणे शक्य आहे. तो करण्यासाठी आवश्यक प्रक्रियेला सुरुवात होणे गरजेचे आहे.
पोलिसांना गुन्हा तपास करण्यासाठी सर्वांत आधी लागते ती तक्रार. पूर्वी प्रचलित पद्धतीत तक्रारकर्ता हा एक तर गुन्ह्यातील पीडित असला पाहिजे किंवा साक्षीदार असला पाहिजे, अशी अट होती. पण आता आलेल्या नवीन भारतीय न्याय संहितेनुसार, गुन्ह्याची माहिती असलेला कुणीही सुजाण नागरिक तक्रार नोंदवू शकतो.
एकदा तक्रार आली की पोलिसांना १४ दिवसांच्या आत दिलेल्या तक्रारीतील तपशिलाची शहानिशा करून, यात दखलपात्र गुन्हा घडलेला आहे की नाही हे ठरवावे लागते. समजा जर पोलिसांना पटले नाही की तक्रारीतला मजकूर गुन्हा नोंद करण्यास पुरेसा आहे, तर त्या तक्रारकर्त्या सुजाण नागरिकाला कोर्टात जाऊन हा गुन्हा नोंदवून घेता येतो.
आता प्रस्तुत प्रकरणात, पोलिसांकडे कोणी जावे, हा प्रश्न आहे. येथे प्रसिद्ध झालेल्या तपशिलानुसार, दाखवलेले आमिष आज स्वरूपात घेतले नसल्यामुळे येथे थेट गुन्ह्याचा पीडित असा कोणी ठरत नाही. साक्षीदार तक्रार करू शकतात, येथे ते अशी तक्रार करणार असे वाटत नाही. अशावेळी दोन पर्याय बाकी राहतात.
पर्याय एक, कला अकादमीच्या प्रशासनाने ही तक्रार पोलिसांत दाखल करावी. दुसरा पर्याय म्हणजे गोव्यातील नाट्यप्रेमींनी एक ‘सुजाण नागरिक’ या अधिकाराने पोलीस तक्रार करावी. कला अकादमी प्रशासनासाठी पोलीस तक्रार करण्यासाठी सरकारने निश्चित केलेली प्रक्रिया व नियम आहे. त्यांनी काय करावे हे आम्ही सांगण्याची गरज नाही. त्याऐवजी आपण ‘सुजाण नागरिकांना ही तक्रार पोलिसात कशी देता येईल’ याविषयी पाहूया.
सतर्क नागरिकांसाठी प्रसिद्ध झालेला दैनिकातील मजकूर तक्रारीसाठी मुख्य स्रोत म्हणून वापरता येतो. हा प्रसिद्ध झालेला मजकूर व त्यातील तपशील इतका सविस्तर आहे की या बातमीचे कात्रण संपूर्ण गुन्ह्याची घटना लेखांकित करण्यास पुरेशी आहे.
यासोबत जाणाऱ्या तक्रारवजा पत्रात, दोन गोष्टी नमूद कराव्यात. एक यात आरोपी कोण, ते लोकसेवक कसे ठरतात व यात गुन्हा घडलेल्या घटनेचे कोणकोण साक्षीदार आहेत यांची यादी जोडावी लागेल. या मजकुरात तीनपैकी एका परीक्षकाचे नाव दिले आहे, उर्वरित दोघांची नावे कला अकादमीकडून घ्यावीत असे नमूद केले आहे.
याशिवाय कला अकादमीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनाही साक्षीदाराच्या यादीत टाकावे. एकदा पोलिस तपास सुरू झाला की या साक्षीदाराच्या यादीत अजून नावे जोडली जातील. थोडक्यात येथे साक्षीदारांचा तुटवडा नाही.
एकदा पोलिसांना साक्षीदारांची यादी दिली की त्यांच्याकडून माहिती मिळवायची जबाबदारी पोलीसाची. प्रसिद्ध झालेल्या मजकुराव्यतिरिक्त, ‘परीक्षकांना भली मोठी लाच देऊन या संशयितांना कोणता लाभ उठवायचा होता?’ याचा थोडा अधिक तपशील तक्रारदाराला जोडावा लागेल. पोलिसांसाठी तांत्रिक पुरावा सहज मिळेल.
प्रसिद्ध झालेल्या मजकुरात दावा केल्याप्रमाणे, स्पीकरवर दोन संशयितांदरम्यान झालेल्या कथित संभाषणाचा वेळ व कालावधी, साक्षीदाराच्या जबानीशी जुळत असेल तर, पोलिस सरळ गुन्हा नोंद करून मोकळे होतील. प्रसिद्ध झालेल्या मजकुरात आणखी एक दावा करण्यात आला आहे की गावकर त्या रात्री घटनास्थळीच झोपले.
हा दावा खरा की खोटा हे मोबाइल लोकेशनवरून सहज सिद्ध होईल. या तक्रारीत अधिक सहआरोपी कोण हे नमूद करता येणार नाही, पण या मागचा सूत्रधार कोण असू शकतो, याची शक्यता व्यक्त करता येते.
मराठीप्रेमी खरेच हुशार असतील तर या संधीचे सोने करीत, स्वत: तक्रार दाखल करून त्यात ‘हे नाटक ज्या मूळ कोकणी पुस्तकावर आधारित आहे त्या पुस्तकाचे लेखक हे या एकूण कटकारस्थानाचे मुख्य सूत्रधार असू शकतात, त्याविषयी तपास करावा’ अशी टिप्पणी जोडल्यास मावजोंना पोलिसस्थानकाच्या एक दोन चकरा माराव्या लागणार.
तसेच नाटक सादर करणाऱ्यास, संस्था प्रमुखाला सहआरोपी सहजगत्या करता येत नसले तरी, त्यांनी जर निकालाविरुद्ध काही लिखित तक्रार वगैरे पाठविली असेल तर तोच त्यांच्याविरुद्ध पुरावा तयार होऊन, त्यांना पोलिस सहआरोपीच्या यादीत बसवतील.
शेवटचे पण महत्त्वाचे; मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? म्हणजे पोलिस तक्रार कोण दाखल करणार? सोशल मीडियावर खमंग चर्चा करणारे आमचे मराठीप्रेमी मित्र अशी पोलिस तक्रार करणार की अन्यायग्रस्त कोकणी-मराठी नाट्यप्रेमी ही जबाबदारी स्वीकारणार, हे मला माहीत नाही. खरे तर दामोदर मावजोंनी ज्ञानपीठ पुरस्काराची बूज राखण्यासाठी ही तक्रार स्वत: पोलिस स्थानकात जाऊन द्यायला हवी, व आपल्या साहित्यकृतीशी असे गुन्हेगारी कृत्य खपवून घेणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी जारी करायला हवा.
त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे नाट्यदेवतेची बूज राखणाऱ्यासाठी या नाटकाचे अनुवादक नाही तर नाटक सादरकर्त्या संस्थेने व बंदिवडे परिसरातील नाट्यक्षेत्रातील बुजुर्गांनी, पोलिसांत तक्रार देऊन, आमच्या नावावर असे कलंक खपवून घेणार नाही, हे दाखवून द्यावे. अर्थात हे सगळेच जर या षड्यंत्रात स्वत: सहभागी असतील तर, या मंडळींकडून अशा सौजन्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल.
काय करावे, काय करू नये हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न; पण गोमंतकीय रंगदेवतेच्या झालेल्या वस्त्रहरणात या सर्वांनी धृतराष्ट्राची भूमिका स्वीकारल्याचा शिक्का या सर्वांच्या कपाळावर कायमचा राहणार, हे त्यांनी लक्षात ठेवावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.