Kala Academy: कला अकादमी स्वच्छ होईल का?

Kala Academy Cleanliness Issue: इतके पैसे अशा कार्यक्रमावर खर्च करण्यापेक्षा देशात गरिबांच्या शिक्षणाच्या किंवा इतर इतक्या समस्या आहेत त्या सुधारण्यावर खर्च केले तर ते अधिक योग्य होईल, असे मनात येत राहते.
Goa Kala Academy
Goa Kala AcademyDainik Gomantak
Published on
Updated on

अलका दामले

काल कला अकादमीत आंतरराष्ट्रीय लोकसंगीत लोकनृत्य कार्यक्रमाला गेले होते. भारत सरकारची सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) या कार्यक्रमाचे आयोजन करते. कला अकादमीच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रस्तुत केला गेला. ५ वाजता सुरू होणारा कार्यक्रम मंत्री महोदय ६ वाजता आल्याने एक तास उशिरा सुरू झाला.

पण जे काही मोजके प्रेक्षक उपस्थित होते ते शांतपणे आपापल्या मोबाइलमध्ये तरी डोकं खुपसून बसले होते नाही तर बरोबरच्यांशी गप्पा गोष्टी करून कार्यक्रम सुरू होण्याची हताशपणे वाट बघत होते.

कार्यक्रमासाठी अमाप खर्च केल्याचे एकंदरीत सजावटीवरून आणि ध्वनी, प्रकाश संयोजानावरून लक्षात येत होते. गोवा राज्यातील दोन लोककलाकारांची पथके, पोलंड आणि माल्टा ह्या दोनच देशातून आलेले त्या मानाने मोजकेच कलाकार आणि केवळ शंभर-दोनशे प्रेक्षक ह्या ‘इंटरनॅशनल (?)फोक फेस्टिवल’ला उपस्थित होते.

कार्यक्रम जरी बर्‍यापैकी होता तरी एकंदरीतच प्रेक्षकांची उपस्थिती अगदीच नगण्य असल्याने कुठेतरी असं वाटत राहिलं की लाखो, कोटी रुपये खर्च करून असे कार्यक्रम करतात तरी कशाला? या कार्यक्रमांचा मूळ उद्देश, सांस्कृतिक मूल्ये, संस्कृती यांची देवणघेवाण;

तो खरेच साध्य होतो का? कुणालाही हा प्रश्‍न पडत नाही. त्यामुळे, हा खर्च अनाठायी किंवा कुणाची तरी सोय म्हणून केला जातो, संस्कृतीच्या भल्यासाठी नाही. नाव ‘इंटरनॅशनल’ असे भारीतले दिले म्हणून कार्यक्रम आंतरराष्ट्रीय होत नाही.

इतके पैसे अशा कार्यक्रमावर खर्च करण्यापेक्षा देशात गरिबांच्या शिक्षणाच्या किंवा इतर इतक्या समस्या आहेत त्या सुधारण्यावर खर्च केले तर ते अधिक योग्य होईल, असे मनात येत राहते. कला अकादमीच्या स्थितीबद्दल तर बोलून पालथ्या घड्यावर पाणी अशी स्थिती झाली आहे.

कला अकादमीचे सभागृह थोडेसे प्रेक्षक असले, की प्रमाणाबाहेर थंड होते. किती प्रेक्षक आहेत, त्यावरून तापमान नियंत्रित करण्याची सोय नाही. असेलच अस्तित्वात तर व्यवस्थापन कमिटी(?) वातानुकूल यंत्र सुसह्य होईल असं तापमान करण्याकडे का लक्ष देत नाही?

प्रसाधनगृहांची तर हालत इतकी भयानक की नाकाला खुले ठेवण्याची हिंमतच होत नाही. बरे झाले पोलंड आणि माल्टा हे दोनच देश आले आहेत. अन्यथा ही घाण लाइव्ह व्हिडिओ, रील यामार्फत जगभर क्षणाधार्त पोहोचली असती.

एक तर कार्यक्रम असूनसुद्धा कुणीही सफाई कर्मचारी तिथे नव्हते. लादी पुसण्याचे आणि इतर साफसफाईचे घाणेरडे कपडे तीन शौचालय खोल्यांच्या कड्यांना एक गलिच्छ अशी दोरी बांधून त्यावरच वाळत घातले होते. असे वाटले जणू आता कमी होत चाललेल्या कलेची लक्तरेच कला अकादमीने वाळत टाकली आहेत!

सर्वत्र घाण वास तर इतका होता, की नाक दाबूनच आत जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. ही अस्वच्छता, हा गलिच्छपणा पाहून परदेशातून आलेले कलाकार परत कधी यायला तयार होतील का? किंबहुना, भारतात सर्वत्र असलेला गलिच्छपणा एव्हाना जगप्रसिद्ध झालेलाच आहे.

त्यामुळेच असेल कदाचित संपूर्ण जगातले केवळ पोलंड आणि माल्टा हे दोनच देश ह्या तथाकथित ‘इंटरनॅशनल फेस्टिवल’मध्ये सहभागी झाले असतील. परदेशात स्वच्छतागृहात टॉयलेट पेपर वापरला जातो व भारतात पाणी; त्यामुळे, टॉयलेट पेपर गायब.

Goa Kala Academy
Kala Academy: 'कला अकादमीची काय दुरुस्‍ती केली'? खंडपीठाने मागितला अहवाल; अधिकाऱ्यांना देखरेख ठेवण्याचे निर्देश

टॉयलेट पेपर असलेल्या हॅन्डलवर धुण्याचा स्प्रे पाइप अडकवून ठेवला होता. स्प्रे पाइप लावायचे हॅन्डल मोडल्यामुळे हे ‘जुगाड’ करून ठेवले होते. गळ्यात स्प्रे पाइपची माळ घातलेल्या कमोडवर कुणी कसे बसायचे व कसे धुवायचे, हे व्यवस्थापन स्वत: त्या जागी बसून सांगेल का? या देखभालीकडे लक्ष कुणी द्यायचे? काढलाच कुणी त्याचा व्हिडिओ व फोटो तर काय त्या माल्टा व पोलंडच्या कलाकारांनी कुणी तरी सुपारी दिली असेल, अशी मखलाशी करायची?

गोव्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची नेहमीच रेलचेल असते .पण कुठेही जायचं तर ह्या ’स्वच्छ’ सुविधेच्या अभावी विशेषतः आम्हा ज्येष्ठ नागरिकांना नेहमीच एक संकट वाटते.

Goa Kala Academy
Kala Academy: 'कला अकादमी' सुसज्ज करण्याचे काम IIT Mumbai कडे; सल्लागार म्‍हणून नेमणूक, लवकरच अहवाल करणार सादर

कमोड कसे वापरावे हे खरे तर बहुतांश महिलांना आणि सफाई कामगारांनासुद्धा ठाऊक नसते. बसायची सीट ते टॉयलेटची जमीन कोरडी ठेवावी हे माहीतच नसते. त्यामुळे सगळीकडे ओलेचिप्प झालेले असते. फ्लश न केल्यामुळे किंवा कधी लहान मुलांना जमिनीवरच बसवल्यामुळे सगळीकडे घाण वास असतो.

स्वच्छ प्रसाधनगृह हा कार्यक्रमाच्या नियोजनाचाच भाग असतो. बांधल्यानंतर काही दिवस ज्या अवस्थेत असते त्याच अवस्थेत ते कायम ठेवण्याची जबाबदारी आयोजकांची असते. कुठेही कार्यक्रमाचे आयोजन करताना स्वच्छ प्रसाधनगृह कसे देता येईल, ठेवता येईल याकडे आयोजकांनी आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनीही लक्ष देणे जरुरी आहे. सुज्ञास अधिक न लगे सांगणे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com