Drugs In Goa: 'पार्किंग स्टेशन' ते ड्रग्जचे ग्राहक केंद्र; गोव्याचे झिंगलेले वर्तमान

Goa Drug Trafficking: गोवा हे ड्रग्जसाठी ‘पार्किंग स्टेशन’ असल्याचे चार-पाच वर्षांपूर्वी पोलिस यंत्रणेतील उच्चपदस्थ सांगत होते. आज गोवा हे ड्रग्जचे ग्राहक केंद्र बनले आहे.
Drugs Recovered In Goa
Goa Drug TraffickingDainik Gomantak
Published on
Updated on

दिल्ली विमानतळावर वा पोर्टवर परदेशातून आलेले कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केल्यानंतर त्याचा बऱ्याचदा गोव्याशी संबंध जोडला गेला आहे. स्थानिक पोलिसांनी अशा प्रकरणांत कानावर हात ठेवणेच पसंत केले असले तरी राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून वेळोवेळी सत्य समोर आले आहे.

नुकताच गुन्हा शाखेने थायलंडहून गोव्यात अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्याने आंतरराष्ट्रीय नकाशावर ड्रग्ज तस्करांच्या अजेंड्यावर गोवा असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. ‘हायड्रोफॉनिक विड’ हा अमली पदार्थ थायलंडहून नेपाळमार्गे गोव्यात आणला जात होता. त्यात हाती लागलेला संशयित हा ने-आण करण्याची जबाबदारी बजावत होता.

गोव्यात कुणासाठी ड्रग्ज आणले जात होते याचा तपास सुरू आहे. हे झाले विदेशी कनेक्शन. नजीकच्या सिंधुदुर्गातून रस्तामार्गे गोव्यात ड्रग्ज आणण्याचा प्रकारही पोलिसांनी नुकताच उघडकीस आणला आहे. पत्रादेवी तपासणी नाक्यावर कुडाळातील तरुणाकडून ‘एक्स्टसी’मानक गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

शेजारील राज्यांतून रस्तामार्गे होणारी अमली पदार्थांची आयात हे नवे आव्हान उभे ठाकले आहे. ‘अलीकडच्या काळात ड्रग्जविरोधी कारवाया वाढल्या आहेत, ज्यामुळे त्याची व्याप्ती मोठी असल्याचे भासते’, असा सरकारचा दावा आहे. मात्र, कारवाई हे हिमनगाचे टोक आहे. गोवा आणि ड्रग्ज हा संबंध पूर्वीपासून दिसून आला आहे. त्या विरोधात कमी अधिक फरकाने कारवाया होतात; पण या विळख्यात स्थानिक अडकत आहेत आणि त्याची उघड चर्चा होत नाही, हे चित्र चिंताजनक आहे.

गोवा सरकारची मानसिक आरोग्यासाठी ‘टेलिमानस सेवा’ कार्यरत आहे. उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळांमध्ये मनोविकारांवर उपचारांसाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. तेथे ड्रग्‍जमुळे उपचारांसाठी वा समुपदेशनासाठी येणाऱ्यांमध्ये होणारी वाढ वरील चिंतेला पुष्टी देते.

विदेशासह देशभरातील ड्रग्ज व्यावसायिकांचे प्रामुख्‍याने गोवा लक्ष्‍य राहिले आहे. आपला हेतू साध्य करण्यासाठी स्थानिकांना हाताशी धरण्याचे त्यांचे नेहमीच ईप्सित राहते. ड्रग्जचा विळखा पूर्वी किनारी भागांत होता जो आता ग्रामीण भागांतही दिसून येत आहे. ‘डिलिव्हरी बॉय’ संकल्पनेतून अल्पावधीत मोठ्या मिळकतीच्या आमिषाला बळी पडून १४ ते २५ वयोगटातील युवा-तरुण वाममार्गाला लागत आहेत, असेही एक निरीक्षण आहे.

काही महिन्यांपूर्वी ड्रग्जच्या संदर्भात एक आकडेवारी प्रसिद्ध झाली होती. त्यात स्थानिक तरुणांत ड्रग्ज सेवनाचे आणि ड्रग्ज तस्करीत सहभागी असल्याचे प्रमाण भौमितिक श्रेणीने वाढत असल्याचे स्पष्ट झाले होते. अपवादात्मक स्थिती आहे; परंतु शाळांतील मुलांच्या हाती अमली पदार्थ लागत आहेत.

Drugs Recovered In Goa
Goa Drug Case: रेल्वेतून गांजा तस्करी? अल्पवयीन मुलाकडून 8.18 किलोचा मुद्देमाल जप्त, कोकण रेल्वे पोलिसांची कारवाई

सत्तरीसारख्या ग्रामीण तालुक्यातील गावांनाही अमली पदार्थाचा विळखा पडू पाहत आहे. ताण तणावातून मुक्‍त होण्यासाठी नादाला लागणारे कमी नाहीत. समुपदेशन केंद्रांमधून समोर येणारी माहिती स्तंभित करते. घरातील युवक व्यसनी झाल्याचे बाहेर सांगताही येत नाही आणि उपाय सहज साध्यही होत नाही, अशा ताणातून जावे लागणे भयंकर ठरते.

सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्ममुळेही युवांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहेत. सिनेमा सॅन्सॉर करणारी यंत्रणा असते. ओटीटीचे काय? त्यात धाडसाशी संबंध जोडून थेट अमली पदार्थाचे उदात्तीकरण केले जाते. ड्रग्जचे सेवन करणे याचे ओटीटीवरील वेबसिरीजमधून सामान्यीकरण केले जात आहे.

Drugs Recovered In Goa
Goa Drug Case: पार्टीत ड्रग विक्री करायाचा होता प्लॅन, गोवा पोलिसांनी सिंधुदुर्गातल्या खानला रंगेहात केली अटक; 25 लाखांचे ड्रग्ज जप्त

घरातील ज्येष्ठ, पालक, आईवडील, शिक्षक यांचे चित्रीकरण अक्षरश: खलनायकी पद्धतीने केले जाते. त्यांच्याविरुद्ध विद्रोह करणे, तोही अमली पदार्थांचे सेवन करून हे किती ‘कूल’ आहे हे बिंबवले जात आहे. स्त्रीपुरुष समानता येण्यासाठी तरुणींचे कुटुंबाविरुद्ध जाऊन नाइटक्लबमध्ये जाणे, दारू पिणे, ड्रग्ज घेणे सामान्य करण्यात आले आहे. यामुळे ताणतणावाच्या प्रसंगी आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी, आईवडिलांशी बोलण्याऐवजी मुले अमलीपदार्थांच्या आहारी जात आहेत.

ही केवळ नांदी आहे. ड्रग्जविरोधात कारवाया होत राहतील, फांद्या नेहमीच छाटल्या गेल्या आहेत, मुळावर घाव बसत नाही; परंतु वाच्यता न होणाऱ्या सामाजिकदृष्‍ट्‍या गंभीर बनणाऱ्या समस्येकडे दुर्लक्ष झाल्यास ती मोठी हानी ठरेल. शाळा, महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांसह पालकांचे व्यापक प्रबोधन हा त्यावर किमान उपाय ठरेल. काही कमवत नसताना महागड्या गाड्या घेऊन फिरणाऱ्या मुलांना जाब विचारण्याची पालकांना हिंमत होत नाही, अशी उदाहरणे कमी नाहीत. गोवा हे ड्रग्जसाठी ‘पार्किंग स्टेशन’ असल्याचे चार-पाच वर्षांपूर्वी पोलिस यंत्रणेतील उच्चपदस्थ सांगत होते. आज गोवा हे ड्रग्जचे ग्राहक केंद्र बनले आहे. परदेशी साखळ्या भेदण्‍यासह शेजारील राज्यांतून होणारी अमली पदार्थ वाहतूक रोखण्यासोबत सामाजिक समस्या सोडविण्याचे आव्हान पेलावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com