अग्रलेख: ऑनलाइन अपॉइंटमेंट सुविधा! एक स्तुत्य पाऊल; दिशा योग्य, तसाच प्रवासही व्हावा

Online Opd Appointment Goa: क्षमता आहे, म्हणून अपेक्षाही आहेत. लोकांच्या अपेक्षा, विश्वास आणि गरजा केंद्रस्थानी ठेवून ही व्यवस्था पुढे गेली, तर गोव्यातील आरोग्यसेवा केवळ सक्षमच नव्हे तर माणुसकीचा आदर्श ठरेल.
Online Opd Appointment Goa
Online Opd Appointment GoaDainik Gomantak
Published on
Updated on

आजच्या धावपळीच्या युगात आरोग्यसेवा म्हणजे केवळ भव्य रुग्णालये, अत्याधुनिक यंत्रे किंवा महागडी औषधे एवढ्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. रुग्णांच्या वेदना समजून घेणारी, वेळेवर दिलासा देणारी आणि माणुसकी जपणारी व्यवस्था हीच खऱ्या अर्थाने सक्षम आरोग्यसेवा ठरते. त्या निकषांवर पाहता गोव्यातील आरोग्यव्यवस्थेत घडत असलेले बदल आश्वासक आणि दिलासा देणारे म्हणावे लागतील.

गोव्यातील आरोग्यसेवा इतर अनेक राज्यांच्या तुलनेत अधिक सक्षम आहे, अशी सर्वसाधारण धारणा आहे. या व्यवस्थेतील सातत्यपूर्ण सुधारणा आणि बदलांमागे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता महत्त्वाची ठरली आहे.

त्यामुळेच आरोग्यसेवेत गरज ओळखून बदल होतील, अशी अपेक्षा लोकांमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गोमेकॉत बाह्यरुग्ण विभागासाठी सुरू होत असलेली ऑनलाइन अपॉइंटमेंट सुविधा ही केवळ तांत्रिक सुधारणा न राहता रुग्णकेंद्री विचारांची प्रचिती देणारी ठरावी.

प्रारंभी सामान्य औषध, सामान्य शस्त्रक्रिया, कान-नाक-घसा, ऑर्थोपेडिक आणि त्वचारोग विभागांमध्ये मर्यादित संख्येने ऑनलाइन स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

पहाटेपासून रांगेत उभे राहण्याची वेळ अनेक रुग्णांसाठी मानसिक आणि शारीरिक त्रासदायक ठरत होती. ज्यांना हे शक्य नाही, त्यांच्यासाठी ही ऑनलाइन सुविधा निश्चितच दिलासादायक आहे.

त्यामुळे रांगा तत्काळ कमी होतील, असे ठामपणे सांगता येणार नसले तरी बदलाची दिशा योग्य असल्याबद्दल शंका नाही. ऑनलाइन आणि ऑफलाइन रुग्णांमधील वेळेचे संतुलन साधणे हे आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान असेल; मात्र कोणतीही नवी व्यवस्था स्वीकारताना अशा अडचणी येतातच आणि त्यातूनच पुढील सुधारणा घडतात.

उत्तर गोव्यासाठी तुये येथे सुरू होत असलेले गोमेकॉ संलग्न १०० खाटांचे इस्पितळ हा आरोग्यसेवेतील महत्त्वाचा टप्पा ठरेल. गोमेकॉमध्ये उपलब्ध असलेल्या अनेक सेवा आता स्थानिक पातळीवर मिळणार असून, तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थितीही तेथे असेल.

पेडणे आणि डिचोली तालुक्यातील नागरिकांसाठी हे इस्पितळ मोठा आधार ठरणार आहे. मात्र सेवा एकाच वेळी पूर्ण क्षमतेने सुरू व्हाव्यात, अशी जनतेची अपेक्षा रास्त असून त्या अपेक्षांचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाशी संबंधित प्रलंबित प्रश्न सुटणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मुळात गोमेकॉवर वाढणारा ताण आणखी का वाढतो आहे, याचा सखोल आणि प्रामाणिक विचार करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील सामाजिक आरोग्य केंद्रे आणि तालुका पातळीवरील रुग्णालये अधिक सक्षम आणि क्रियाशील झाली, तर ‘रेफरल’ व्यवस्थेबाबत निर्माण झालेला नकारात्मक समज दूर होईल.

यामुळे गोमेकॉवरील भार कमी होऊन संपूर्ण आरोग्ययंत्रणा अधिक संतुलित बनेल. सध्या वाढत असलेली गर्दी पाहता भविष्यात आणखी एक आपत्कालीन कक्ष सुरू करण्याचा विचार आताच सुरू होणे आवश्यक आहे. आरोग्यविमा ही आज अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे.

मात्र विमा कंपन्यांकडून काही इस्पितळांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास त्याचा अप्रत्यक्ष फटका रुग्णांनाच बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे प्रकार घडत आहेत. दीनदयाळ आरोग्य विमा योजनेबाबत अधूनमधून उपस्थित होणारी प्रश्नचिन्हे गांभीर्याने हाताळली गेली पाहिजेत.

भविष्यात आरोग्यव्यवस्थेत सातत्याने बदल करणे अपरिहार्य ठरणार आहे, कारण कर्करोग आणि मूत्रपिंड विकारांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. ही आव्हाने पेलण्याची क्षमता राणेंसारख्या मंत्र्यांकडे आहे, असा विश्वास जनतेमध्ये आहे.

आरोग्यसेवेत त्रुटी असू शकतात, पण त्या वेळच्या वेळी ओळखून दूर करणारी, केवळ कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात कार्यरत असलेली यंत्रणा उभी राहणे गरजेचे आहे. आरोग्यसेवा ही योजना किंवा आकडेवारीपुरती मर्यादित नसून ती माणसांच्या आयुष्याशी थेट जोडलेली संवेदनशील बाब आहे.

Online Opd Appointment Goa
Tuyem Government Hospital: तुये इस्पितळासाठी 'फास्ट ट्रॅक' तयारी! कंत्राटी कर्मचारी भरतीचाही मार्ग मोकळा; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

म्हणूनच होणाऱ्या तक्रारी, वाद यांनाही त्याच पातळीवर घेणे गरजेचे आहे. त्या सकारात्मक घेऊन तसे बदल केल्यास एकदा आलेली अडचण पुन्हा उद्भवणार नाही. त्यासाठी विनाकारण होणारे वादंगही कठोरतेने शमवावे लागतील.

ओपीडीबाहेरची गर्दी अनेकदा अनियंत्रित असते. त्यात रांग डावलून वशिल्याने घुसणारेही असतात. व्यवस्था माहीत नसल्याने पहाटेपासून रांगेत ताटकळणारे यांच्यातील वाद हा नित्याचा भाग आहे. कुठल्या ओपीडीला किती रुग्णांची गर्दी असते, याचा डेटा गोळा करून त्याप्रमाणे ओपीडी वाढवण्याचीही आवश्यकता आहे.

Online Opd Appointment Goa
Tuyem Hospital: प्रतिक्षा संपली! तुये इस्पितळात 12 वर्षांनी सुरू होणार बाह्यरुग्ण विभाग, 2 फेब्रुवारी रोजी होणार उद्‌घाटन

आहे ते कमी नाही, ते व्यवस्थित होण्याची आवश्यकता आहे. त्या व्यवस्थितीकरणाच्या दृष्टीने टाकलेले हे ऑनलाइन अपॉइंटमेंट सुविधा हे एक स्तुत्य पाऊल आहे. क्षमता आहे, म्हणून अपेक्षाही आहेत. लोकांच्या अपेक्षा, विश्वास आणि गरजा केंद्रस्थानी ठेवून ही व्यवस्था पुढे गेली, तर गोव्यातील आरोग्यसेवा केवळ सक्षमच नव्हे तर माणुसकीचा आदर्श ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com