
गोव्यातील टॅक्सी व्यवसाय नियंत्रित करण्यासाठी सरकारने कॅब अॅग्रीगेटर धोरण राबवण्याच्या दिशेने पावले टाकली. त्याला स्थानिक टॅक्सीचालकांनी प्रचंड विरोध केला. ओला, उबरसारखे अॅग्रीगेटर गोव्यात येणार नाही, असे आश्वासन देऊनही धोरणच रद्द करावे, अशी टॅक्सीचालकांची मागणी आहे.
परंतु कॅब अग्रीगेटर धोरणाच्या बाजूने मोठा ग्राहक वर्ग आहे; तर ‘स्थानिक, पारंपरिक टॅक्सी व्यावसायिकांच्या हिताआड येणारे धोरण’ म्हणत ठाम भूमिकाही घेतली जात आहे. नाण्याच्या दोन्ही बाजूंचा घेतलेला वेध.
‘ओला उबर सारख्या अग्रीगेटर्सना गोव्यात प्रवेश देणार नाही’, ही मुख्यमंत्री डॉ. सावंतांनी केलेली घोषणा निश्चितच स्वागतार्ह आहे. त्यावर लवकरच अंमलबजावणी करून त्यांनी परिवहन मंडळातर्फे जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे ताबडतोब रद्द करून म्हटल्याप्रमाणे सर्व घटकांना एकत्रित आणून त्यावर तोडगा काढावा.
गोव्यात पर्यटन धोरण लागू होण्याच्या आधी साठ-सत्तरच्या दशकात येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या सोयीसाठी पर्यटन व्यवसाय जेव्हा गोव्यात सुरू झाला तेव्हापासून किनारपट्टी भागांतील लोक या टॅक्सी व्यवसायात आहेत.
हे मूळचे कष्टकरी, बहुजन वर्गातील लोक ज्यांनी आपल्या पारंपरिक कामापलीकडे जाऊन पर्यटनातून येणाऱ्या मिळकतीवर आपल्या कुटुंबाला गरिबी आणि अनिश्चिततेतून वर काढले. पर्यटन धोरणामुळे त्यांची पारंपरिक शेती, मासेमारी यावर परिणाम झाला, जमिनीचे दर वाढले आणि ते अशा एका व्यवस्थेचा भाग बनले ज्यावर त्यांचा पूर्ण अंकुश नव्हता.
त्याच न्यायाने त्या भागांत येणाऱ्या पर्यटनाच्या नफ्यांवर पहिला हक्क हा तिथल्या स्थानिक लोकांचा असला पाहिजे. स्थानिक रोजगार निर्मितीची हमी देऊनच तर तिथे पर्यटन व्यवसायाचा घाट घातला होता ना? तर आज त्यांचे हित दुय्यम ठरवून त्यांना धंद्यातून हद्दपार करणारे अग्रीगेटर्स आणणे हे निश्चितच बरोबर नाही.
गोव्यातला टॅक्सी व्यवसाय हा इतरत्र चालतो तसा चालत नाही. गोव्यात टॅक्सीला सर्वांत जास्त मागणी ही किनारपट्टी भागात असते. तसेच स्थानिक मागणी नगण्य आहे. गोव्यातला टॅक्सी व्यवसाय हा सहकारी तत्त्वावर उभारलेला आहे, जिथे नियमित दरापेक्षा कमी दराने भाडे घेणे किंवा दुसऱ्या टॅक्सीचालकांच्या हद्दीतून प्रवासी उचलणे यासारखे प्रकार निषिद्ध आहेत.
अॅप आधारित टॅक्सी त्या तत्त्वावर काम करत नाही आणि तशी पद्धत जर इथे सुरू झाली तर स्थानिक टॅक्सी व्यवसायाच्या मुळावरच घाव घातला जाईल, अशी रास्त भीती इथल्या व्यावसायिकांमध्ये आहे.
अॅप-आधारित टॅक्सी कंपन्या, जसे की ओला आणि उबर, व्हेंचर कॅपिटलच्या पाठबळावर सुरुवातीला कमी दरात सेवा पुरवतात, ज्या मागचा उद्देश स्थानिक स्पर्धा नष्ट करून बाजारात मक्तेदारी प्रस्थापित करणे हा असतो.
नंतर त्या ’सर्ज प्राइसिंग’द्वारे जास्त दर आकारतात, ज्यामुळे दरांच्या प्रमाणीकरणाचा प्रश्न सोडवण्याऐवजी तो अधिक जटिल होतो. या कंपन्यांमधील चालकांच्या अमानवीय कामाच्या परिस्थिती आणि शोषणाचे प्रश्नही जागतिक स्तरावर चर्चिले जातात.
स्थानिक टॅक्सी चालकांवर काम करण्याची अनिच्छा असल्याचा आरोप होतो, परंतु त्यांच्यासमोरील आर्थिक आव्हाने गंभीर आहेत. वाहनांचे हप्ते, कर, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि कामातील अनिश्चिततेमुळे त्यांचे जीवन तणावग्रस्त आहे.
त्यांचा लढा केवळ स्वतःच्या उपजीविकेसाठी नसून, स्थानिक आणि सहकारी व्यवसाय मॉडेलला कॉर्पोरेट मक्तेदारीपासून वाचवण्यासाठी आहे. म्हणून, हा मुद्दा फक्त तात्कालिक सोयीच्या दृष्टिकोनातून न पाहता, स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांचा विचार करणे गरजेचे आहे.
सेवेचा दर्जा आणि त्याचा पाया, माणसे जोडण्यावर अवलंबून आहे. सरकारने वाहतूक संकलक नेमण्याची तयारी सुरू केली. बाहेरचे अॅग्रिगेटर आल्यास आपल्या अस्तित्वावर गदा येईल, असे स्थानिक टॅक्सीचालकांना वाटू लागले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ओला उबरसारखे बाहेरील अॅग्रीगेटरांना गोव्यात स्थान नाही, असे ठामपणे म्हटले आहे. सोबतच टॅक्सीचालक वैयक्तिक पातळीवर ठरवतील तो दर, असे न होता सर्वांसाठी सर्वांना माहीत असेल अशी दरपद्धत प्रणाली विकसित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
असे असले तरी बाहेरचे अॅग्रीगेटर स्थानिक व्यवसाय संपवतील ही टॅक्सीचालकांची भीती कितपत योग्य आहे, याचा आपण विचार करू. मी एक डॉक्टर आहे ज्याचे स्वतःचे छोटे खाजगी क्लिनिक आहे.
समजा हे क्लिनिक म्हणजे माझी स्वतःची टॅक्सी आहे. गोव्यात रुजणाऱ्या कॉर्पोरेट रुग्णालयांकडून माझा डॉक्टरी व्यवसाय गिळंकृत केला जाईल या भीतीपोटी मी त्यांचा विरोध करावा का? मला ते योग्य वाटत नाही. कारण, ज्यांना मी देत असलेल्या आरोग्यसेवेवर आणि माझ्या क्षमतेवर विश्वास आहे ते माझ्याकडेच आरोग्य तपासणीसाठी येतील. गरज आहे ती त्यांच्याशी प्रेमाने वागण्याची आणि त्यांना योग्य उपचार देण्याची. मी दुर्गम भागात राहत असल्याने ते येत नसतील तर कॉर्पोरेट रुग्णालयामार्फत सल्ला, सेवा देणे किंवा अन्य मार्ग शोधणे हे पर्याय माझ्यासमोर आहेत.
‘सर्वे गुणा: कांचनमाश्रयंती’ या उक्तीनुसार सत्ताधीशांचा कल नेहमी धनवानांचा बाजूने असतो. त्यामुळे, कॅब अॅग्रीगेटर लॉबीला झुकते माप दिले जाऊ शकते. पण, त्यामुळे स्थानिक टॅक्सी व्यवसाय धोक्यात येईल, असे वाटत नाही.
उलट या स्पर्धेत सचोटी, प्रामाणिकपण आणि माणसे जोडण्याची कला यात इथले स्थानिक सरस ठरतील. पूर्वीपेक्षा जास्त व्यवसाय मिळेल. पराकोटीचे आर्थिक निकष स्वार्थी समाजाचे लक्षण आहे. त्यात मानवी बांधीलकीला काही स्थान नसते.
ज्यांना लोभाचे बळी पडायचे आहे त्यांना तसे करू द्या. आपण त्याला बळी न पडल्यास त्यांची संख्या अजूनही एकाने कमी होईल. म्हणून माझे मत असे आहे की, बाहेरील अॅग्रीगेटरना गोव्यात येऊ द्या. गोव्यातील व गोव्याबाहेरील पर्यटकांना पर्याय असू द्या.
टॅक्सीचालक संघटनेचे स्वतःचे अॅग्रीगेटर अॅप तयार झाल्यास ते गोवा सरकार आणू इच्छित असलेल्या अॅग्रीगेटरच्या बरोबरीने कार्यरत होऊ द्या. दोघांमधून निवड करण्याचा अधिकार पर्यटकाला असू द्या.
वास्तविक, अॅग्रीगेटर ही भीती नाही तर व्यवसाय करण्याच्या पद्धतीत बदल करावे लागतील, अधिक पारदर्शक व्हावे लागेल, ही भीती आहे. अन्यथा मीटर बसवण्यास, ठरावीक दरपत्रक असलेले स्वत:चे अॅप तयार करण्यासही टॅक्सीचालक का विरोध करतात?
आपली मक्तेदारी, दादागिरी व आपण म्हणू तेवढे पैसे मोजण्याची तयारी ग्राहकांनी ठेवावी, हा हट्टाग्रह आहे. म्हणूनच स्पर्धा नको. निकोप स्पर्धा स्थानिकांचा व्यवसाय वाढवेल. पर्यटकांसमोर पर्याय उपलब्ध असल्यास पर्यटन क्षेत्रावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल. या दीर्घकालीन समस्येचे निराकरण बदल स्वीकारण्यात आणि या बदलांशी जुळवून घेण्यात आहे; विरोध करण्यात नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.