Goa Festival: ‘गोंयकारांनो’ उठा! नृत्य-संगीताच्या आवाजात महत्वाचे प्रश्न विसरू नका; सणांत घुसलेले राजकारण

Political Influence on Festivals: भारतात, उत्सव कला प्रत्येक टप्प्यावर आधुनिकता आणि मिथकांना विणत आली आहे. होळीचे रंग सामाजिक दरी मिटवतात, नवरात्रीचे दांडिया शोभायमानतेची ऊर्जा आणतात.
Political Influence on Festivals
Goa Festival PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

विकास कांदोळकर

प्राचीन संस्कारांपासून ते आधुनिक उत्सवांपर्यंत, समुदाय-आनंद-परंपरांना एकासूत्रात बांधणारी उत्सव कला, रंग-नृत्य-नाट्य-वादन-गायन-खान-पान-खेळ-भक्ती-आभार’ या साधनांनी साकारलेल्या मानवी अभिव्यक्तीचे सजीव दर्शन आहे. उत्सव कला इंद्रियांना जागृत करून सामान्य दिवसांना सर्जनशीलतेच्या असाधारण क्षणांमध्ये रूपांतरित करते.

शोकांतिका आणि विनोदी रंगभूमीला जन्म देणारा ग्रीसचा ‘डायोनिसिया’, सामाजिक नियमांना आव्हान देणारा प्राचीन रोममधील सॅटर्नलिया, अधिकाराची खिल्ली उडविणारा मध्ययुगीन कार्निव्हल, पुनर्जागरण काळातील शौर्याच्या टेपेस्ट्री, व्हिक्टोरियन युलेटाइडचे कार्ड्स-कॅरोल, राजकीय बंधांपासून मुक्त ‘बर्निंग मॅन’, आयर्लंडस्थित लाचखोरीपासून मुक्त ‘सेंट पॅट्रिक डे’, राजकारणविरहित तुर्कीचे ‘व्हर्लिंग दर्विश’, इत्यादी, जागतिक स्तरावरील उत्सव कलेची महती दर्शवितात.

भारतात, उत्सव कला प्रत्येक टप्प्यावर आधुनिकता आणि मिथकांना विणत आली आहे. होळीचे रंग सामाजिक दरी मिटवतात, नवरात्रीचे दांडिया शोभायमानतेची ऊर्जा आणतात, गणेश चतुर्थी नृत्य-गायन-वादन यांचा सुंदर संगम घडवते, तर दुर्गापूजेचे मंडप-रस्ते पौराणिक भव्यतेची आठवण करतात. तरीही, या उत्साही कलात्मकतेखाली, भारतीय राजकारण्यांनी एका गडद कलेवर प्रभुत्व मिळवले आहे.

आपल्या चुका लपवण्यासाठी सणांचा वापर करत, ते सामान्य लोकांना आनंदाने ‘विचलित’ करून आपले ‘घोटाळे’ दृष्टीआड करतात. मंडप, दिवे आणि मेजवानीसाठी ते उत्सवांमध्ये पैसे ओततात. चकित करणारे देखावे-फटाक्यांच्या तेजात त्यांचा भ्रष्टाचार विरघळून जातो, भव्य मूर्ती-मिरवणुकांमध्ये गरिबीकडे दुर्लक्ष केले जाते, पायाभूत सुविधा विसरल्या जातात. बहुतेकदा राजकीय निधीद्वारे उत्सवांचे साजरीकरण झाल्यामुळे शिक्षण-रोजगार-आरोग्य याकडे दुर्लक्ष होते.

राजकारण्यांनी होळी-चतुर्थी-दिवाळी-ईद-नाताळासाठी कॅमेऱ्यासमोर स्मितहास्य करत केलेली आर्थिक मदत त्यांची दुष्कृत्ये लपविण्याची एक धोरणात्मक चाल असते. मूर्ती विसर्जनामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान नद्या-समुद्र प्रदूषित करत असूनही ते पर्यावरण सुधारण्यासाठी वावरत नाहीत.

उत्सवाच्या कलात्मकतेत मग्न असलेल्या लोकांचे, जल्लोष आणि प्रार्थनेत रमबाण झाल्याने, राजकारण्यांमुळे अवतीभवती ढासळलेल्या सामाजिक व्यवस्थेकडे दुर्लक्ष होते. राजकारण्यांनी आपली सत्ता टिकवण्यासाठी परंपरेचा बाऊ करून, लोकांना उत्सवाच्या सादरीकरणात व्यग्र ठेवल्यामुळे बेरोजगारी, शेतकऱ्यांची विवंचना, शिक्षण, कामधंदा, महागाई यासारखे प्रश्न आनंद-नृत्य-संगीताच्या आवाजात विरून जातात.

उत्साही-उत्सवी गोव्यात, वरील राजकीय युक्त्या विशेष ‘कपटी’ स्वरूपात दिसून येतात. गणेश चतुर्थीच्या वेळी, राजकारणी अर्ध्या-एक किलोच्या तांदूळ, गहू, गूळ आणि डाळींच्या पिशव्या गणपतीच्या सन्मानार्थ उदारतेचे कृत्य म्हणून वाटतात. मोठ्या प्रमाणात हसत-गाजत, मंत्री-आमदार-दलाल मतदारसंघातील कुटुंबांना किराणा मालाचे किंवा ‘सोन्या-चांदीचा’ मुलामा केलेल्या भांड्यांचे वाटप करत,

मतदारांचा सणांचा तात्काळ भार कमी करतात. त्यांच्या गुप्त हेतूचे विश्लेषण केल्यास दिसून येते की या सद्भावनेच्या भेटवस्तू नसून, निवडणुकीत मते मिळवण्याच्या उद्देशाने उत्सवाच्या आनंदात लपवलेली ‘लाच’ आहे. गणपतीला वाहिलेल्या अशा ‘भिकेच्या पोळीपेक्षा’ भक्तांच्या स्वतःच्या कष्टांच्या ‘भाकरीचा’ प्रसाद नक्कीच पावन होईल.

दिवाळीतही गोव्यात अशाच युक्त्या पाहायला मिळतात. राजकारणी उत्सवाचा आनंद वाटण्याच्या नावाखाली फटाके-मिठाई-कपडे वाटतात. भव्य नरकासुर-आकाशकंदील स्पर्धा राजकीय हेतूने आयोजित केल्या जातात. दिव्यांचा सण असलेल्या दिवाळीतील चमकणारे दिवे, अशा कृत्यांमुळे गडद छाया पसरवितात.

ईदला मठाई, ख्रिसमसला मुलांसाठी खेळणी आणि प्रौढांसाठी समृद्धीच्या नावाने दारू वितरित करून, सणांच्या पावित्रतेशी खेळ मांडून, राजकीय फायद्यासाठी सांप्रदायिक बंधनाचा गैरफायदा घेण्याच्या घृणास्पद पद्धतीने, श्रद्धा आणि लोकशाहीची थट्टा मांडली जाते. भावनिक आणि सांस्कृतिक वजनाचा फायदा घेऊन, मतपेटीवरील निष्ठा सुनिश्चित करण्यासाठी, अवलंबित्व निर्माण करण्यासाठी, मतदारांना भौतिक वस्तूंचे वाटप करून, ‘उत्सव कला’ व्यवहाराच्या खेळात बदलली जाते.

Political Influence on Festivals
Goa Opinion: गोव्यात मंत्रिमंडळ बदल करण्यास एक वर्ष का लागले?

‘गोंयकारांनी’ सण राजकीय फसवणुकीसाठी नसून, एकता-चिंतन-आनंदासाठी असतात हे आवर्जून लक्षात ठेवावे. राजकारण्यांनी दिलेली ‘धान्याची पोटली’, मिठाईचा डबा किंवा इतर भेटवस्तू म्हणजे ‘अपेक्षित’ मतदानासाठी दिलेली लालूच असते. अवलंबित्वाच्या चक्रात अडकल्यामुळे, नागरिकांना भ्रष्टाचार आणि कमकुवत लोकशाहीला सामोरे जावे लागते.

मंत्री-आमदाराच्या मतदारसंघात एखादा शंभर कोटींचा ‘इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट’ आला तर भ्रष्टाचारातून पंचवीस-तीस कोटी कमावले जातात, असे बोलले जाते. यातून पाच वर्षांतील सर्वच सणांना, मतदारांसाठी एक-दोन कोटी खर्च करणे सहज शक्य आहे.

Political Influence on Festivals
Goa Politics: ‘शपथविधी’त गर्दीचा उच्चांक! कामत, तवडकरांची छाप; मूळ भाजप कार्यकर्ते मात्र अनुपस्थित

सणांच्यावेळी राजकारण्यांच्या भेटवस्तू आणि हास्यातून, अपयशांपासून लक्ष विचलित करण्याच्या रणनीतीतून, शुद्धता हरवल्यामुळे, उत्सव कला राजकारणी, दलाल व जमीन-माफियांच्या हातातील ‘बाहुले’ बनल्याचे, गेल्या वर्षीपासून मोरजी-पेडणे येथे स्थानिकांना त्यांच्या पारंपरिक स्थळावर गणेश विसर्जनाला झालेल्या विरोधातून दिसून येते.

‘गोंयकारांनो’ उठा! राजकारणी-दलाल ‘लेंबडे’ बनले तरी आपला ‘स्वाभिमान’ सोडू नका. गोव्यात उत्सव कला सक्षम असावी, गुलाम बनू नये यासाठी राजकीय व्यक्तीकडून किराणा मालाची ‘भीक’ न स्वीकारता, जबाबदारीची मागणी करून, फसवणुकीचे चक्र तोडून, उत्सव कला त्यांच्या खेळातील ‘मोहरा’ नसून संस्कृतीचा ‘दिवा’ आहे हे दाखवून द्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com