

आज विकासाच्या नावाने डोंगर पठारावर कारखानदार मेगा प्रकल्पवाले, गृहनिर्माण प्रकल्पवाले सरकारी दाखले न घेता गुपचूपपणे पाण्याची व्यवस्था करतात. पठार डोंगरावर मारलेल्या बोअरवेल शंभर सव्वाशे मीटर खोल मारून नदीच्या तळाकडील पाणी खेचल्याने खालच्या बागायती, शेती, झरी, तलावांना मिळणारे पाणी बंद होऊन, दुष्काळाला निमंत्रण मिळते.
आपल्या पूर्वजांनी पृथ्वीवरील पाणी, हवा, प्रकाश, जमीन यांना तत्त्वे मानली आहेत. त्याचप्रकारे समुद्र, सरोवरे, नद्या, डोंगर, पर्वत जंगले, पठारे, शेती, वनस्पती, जनावरे, मत्स्य, या जैविक संपत्तीला पृथ्वीची आभूषणे मानले आहे. या साऱ्या जैवसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी निसर्गाने माणसाला जन्म दिला.
जन्म देणाऱ्या मानवाला निसर्गाने बुद्धी दिली पण तिचा विकास कसा करावा हे त्याला माहीत नव्हते. जन्मानंतर त्याची कैक वर्षे विकास साधण्यास गेली. पुढे हळूहळू त्याने जनावरे, पक्षी, सरपटणारे प्राणी कीटक, वारा, पाऊस, वादळ, ऊन थंडी यांना सामोरे जात तो हळूहळू आपली प्रगती साधू लागला. आपल्या भविष्याची प्रगती साधताना त्याला स्वार्थाने घेरण्यास सुरुवात झाली.
त्याने तो इतर आभूषणांच्या व्यवहारात लुडबुड करून इतरांचे हक्क हिरावून घेत स्वतःच्या भल्यासाठी जीव घेऊ लागला. हे सारे करून शेवटी तो आपल्याच मानव जातीच्या उरावर बसून पृथ्वीच्या अंगावरील खंडाचे कृत्रिम तुकडे पाहून आपल्यास हवे ते करू लागला आहे व वसुंधरेच्या चक्रव्यूहात बंदिस्त होऊन राहिला आहे. मात्र बोलू न शकणारी जनावरे, सरपटणारे प्राणी, मत्स्यधन कीटक, पक्षी यांनी अजूनपर्यंत या पृथ्वीवर स्वत:च सीमा आखलेल्या नाहीत. त्यांच्या सीमा पृथ्वीच्या निसर्गाने ठरवल्या आहेत.
पृथ्वीने आपल्या भौगोलिक आकाराचे प्रथम दोन खंड पाडले. नंतर कोटी वर्षांनी त्यांचे पाच खंड केले. तरीसुद्धा आफ्रिकेतील चतकोर आणि मौसमी पावसाला बोलावणारा चातक अगर इतर पक्षी तिथून हजारो किमी प्रवास करून आशिया खंडात येतात. ऑस्ट्रेलियात जन्म घेणारी निलगिरी, केशिया अथांग सागराच्या लाटा वर तरंगत आशिया खंडात पोहोचल्या.
समुद्रात राहणारा कासव पृथ्वीच्या पाचही खंडाचा प्रवास करून शेवटी आपल्या स्थानिक जाग्यावर येऊन आपले कुटुंब वाढवतो. पण विकास साधलेल्या माणसाला शेजारच्या सीमेकडील देशात जाण्यास पासपोर्ट, व्हिसा करावा लागतो. पृथ्वीच्या अंगावर इतर आभूषणांप्रमाणे माणूसही एक आभूषण आहे. पण तो आपल्या विकासाच्या स्वार्थासाठी बाकी आभूषणांवर हत्यारे चालवून जैवविविधतेची साखळी तोडून साऱ्यांचा रस्ता बंद करतो. जन्मास घालणाऱ्या भूमातेलाच तो नकोसा झाला आहे.
संतांचा उपदेश वाचल्यास त्यांनी सांगितले आहे, की ‘मी, माझे, मला असे करणे आपण सोडून दिले पाहिजे’. पृथ्वी जमिनीतील पाणी स्वतःसाठी कमी वापर करून बाकी सर्व आभूषणांना वाटून देते, तरी मानव आपला वाटा संपवून दुसऱ्याचाही वाटा संपवून टाकतो. हे करताना त्याला दुसरी आभूषणे दिसत नाहीत. ज्यांना पाण्याची जास्त गरज आहे, त्या आभूषणांना वसुंधरा जास्त पाणी देते. औदुंबर, वड, पिंपळ, सातीण, भिल्लमाड हे वृक्ष जास्त पाण्याच्या जागी वाढतात. शास्त्रज्ञांच्या मते जास्त झाडे असणाऱ्या भागात माणसाची गुन्हेगारी कमी प्रमाणात असते. पृथ्वी स्वतःकडे काहीच ठेवीत नाही, तिच्याकडे असलेले तत्त्वे ती सर्व सजीवांना देते. त्यातले पाणी हे सर्वांना संजीवनी देणारे आहे. पण माणूस त्याचा दुरुपयोग करून सर्वांना संकटात टाकतो.
आपल्या गोव्यात जलदेवेतची कृपा मोठी होती. कुदळ मारील त्या जागी पाणी सापडत होते. डोंगरघळीमधून झरी, ओहळ वाहत तलाव नद्यांना भरपूर पाणी मिळायचे. त्याने कृषी क्षेत्र भरपूर पीक द्यायचे. गोवा अनेक उंच डोंगर, विशाल पठारे, विस्तीर्ण शेती, लांबरुंद बागायती, दाट जंगले, खोल दऱ्यांच्या आभूषणांनी सजला होता. काणकोणचे भगवती पठार, बेतुलचे पठार, वेर्णा पठार, साकवाळ पठार, बांंबोळी पठार, कदंबा पठार, म्हारवासडा पठार, भूतखांब पठार, गिधाडसडा पठार, कुंडई पठार, मडकई पठार, धाट पठार, मायणी पठार, हरवळे पठार, पर्वरी पठार, सालीगाव पठार, आसगाव पठार, कुडचिरे पठार, मावळींगे पठार, थिवी पठार, साळ पठार, मोपा पठार, तुये पठार कारापूर सर्वण पठार ही गोव्याची आभूषणे आहेत.
या पठारांच्या सभोवार त्यांच्या पायथ्याशी मानवी संस्कृतीचे आभूषण जगून पठारांच्या पाण्यावर अन्न पिकासाठी बागायती, शेती निर्माण करून गावे वसवलीआहेत. मानवी संस्कृतीचे आभूषण घडण्यास मानवाच्या शेकडो पिढ्या रक्त आटवून घाम गाळीत हुतात्मा झाल्या आहेत. हे सारे घडताना, स्वातंत्र्य, पारतंत्र्य, अत्याचार हे सारे मानवीय संस्कृतीच्या इतिहासाला सहन करावे लागले आहे.
गोव्यात सम्राट, राजे, मुसलमान, ख्रिश्चन, मराठे, कदंबा, बौद्ध अशा राजवटींनी सत्ता भोगून शेवटी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात गोवा लोकशाहीत विलीन झाला आणि वाऱ्याप्रमाणे धावणाऱ्या विकासाच्या घोड्यावर गोवा स्वार होऊन चपळाईने धावू लागला. त्याने जैवविविधतेतील प्रत्येक जिवाला म्हातारपण आणले आहे. मात्र भकास विकासाच्या घोड्यावरील स्वाराला आपल्यात म्हातारपण दिसत नाही, तो स्वतःला चिरंजीवी स्वार म्हणतो. त्याने विकासाच्या नावाने गावांची शहरे केली, हिरवी शेती, बागायती, हिरव्यागार डोंगरावर कॉंक्रीटची नवी आभूषणे जन्मास घालून पृथ्वीच्या नैसर्गिक आभूषणांना गिळून टाकले.
पठारे आभूषणावर कुर्हाड, पिकास, फावडा, शेवाळ, जे.सी.बी. चालवून पाणी या संजीवनीची नैसर्गिक टाकी फोडून टाकाली. कारखाने, मेगाप्रकल्प, बंगले, प्लॅट, उभे करून कीटक अशा आभूषणांची साखळी नष्ट करून जैविक संपत्तीची पर्यावरणीय आभूषणे नष्ट करण्याचा सपाटा लावला. गावागावांतील मानवीय संस्कृती नष्ट करून परकीय संस्कृतीला मिठी मारण्याचा मार्ग आरंभल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे, देशाबरोबर गोव्याचे ही हवामान बदलण्यास सुरुवात झाली आहे.
गोव्यातील वेर्णा, साकवाळ, बेतोडा, कुंडई, मडकई, म्हारवासडा, कदंबा, मायणी, हरवळे, पर्वरी, साळगाव आसगाव थिवी तुये बांबोळी ही पठारे गेल्या पन्नास साठ वर्षांपूर्वी निसर्ग आभूषणांची पर्यावरणीय खाण होती. आज त्या पठारांना मानवी लोकसंख्या आणि विकसित कारखान्यामुळे त्या पठारांनी स्मशानांचे रूप घेतलेले पाहावयास मिळते. रस्ते, प्लॉट तयार करताना पठारावरील झुडपे वृक्ष कापल्याने मैलोमैल जमीन ओसाड दिसते.
त्याने पक्षी औषधी वनस्पती, झुडपे, वेली जमिनीत पाणी टिकवणारे गवत पठारावरील जांभा कातळाच्या छिद्रातून जमिनीत मुरणारे पावसाचे पाणी या आभूषणावर वाईट परिणाम होतो. पठारावरील मोठमोठे खडक तोडल्याने जमिनीत जिरणारे पाणी झऱ्यांच्या रूपाने ओहळ, तलावात न जाता पावसाचे पाणी लाल बनून मिळेल त्या वाटेने खाली जाते. लोकांची घरे, बागायती, शेती, सरपटणारे प्राणी, मत्स्य, हिंस्र आणि दुभती जनावरे या आभूषणांची साखळी तुटते. गावाने उभारलेली पूर्वजांच्या घामाने घडवलेली कृषी संस्कृती नष्ट होते, गावे ओसाड होतात.
पठाराच्या अंतरंगात पावसाच्या पाण्याचा साठा नसल्याने विहिरी, झरे, ओहोळांना पाणी मिळत नाही. आज विकासाच्या नावाने डोंगर पठारावर कारखानदार मेगा प्रकल्पवाले, गृहनिर्माण प्रकल्पवाले सरकारी दाखले न घेता गुपचूपपणे पाण्याची व्यवस्था करतात.
पठार डोंगरावर मारलेल्या बोअरवेल शंभर सव्वाशे मीटर खोल मारून नदीच्या तळाकडील पाणी खेचल्याने खालच्या बागायती, शेती, झरी, तलावांना मिळणारे पाणी बंद होऊन, दुष्काळाला निमंत्रण मिळते. त्यामुळे, गावात राहून गरिबांनी सजवलेली वसुंधरा पाण्याविना मरून जाते. नांदणारी मानवी संस्कृती नष्ट होते. पृथ्वीच्या कोपाला आमंत्रण देण्याचे काम सरकार नावाचा मानवच करीत आहे हे खरे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.