

अधिकाराच्या जागेवर असलेल्यांनीच मर्यादा ओलांडल्या तर मुलांनी कुणाकडून आदर्श घ्यायचा? समाजातील विकृती रोखण्याची भाषा करण्यापूर्वी तिचे पोषण करणाऱ्या बेफिकिरीकडे पाहावे लागेल. समाजातील विकृती एका दिवसात जन्माला येत नाही. तिची बीजे आसपासच्या वातावरणात रुजत असतात. कधी ती एखाद्या व्यक्तीच्या वर्तनातून दिसतात, कधी व्यवस्थेतील उणिवांतून.
गोव्यात अलीकडे उघडकीस आलेल्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटनांकडे याच दृष्टीने पाहायला हवे. डिचोलीत सरकारी अनुदानित शाळेतील नववीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा एकतर्फी प्रेमातून मानसिक छळ केल्याच्या आरोपाखाली शिक्षकाला अटक झाली आहे. जूनपासून हा प्रकार सुरू होता. विद्यार्थिनीशी जवळीक साधण्यासाठी शिक्षकाने अन्य विद्यार्थ्यांची मदत घेतल्याचेही समोर आले आहे. पालकांच्या तक्रारीनंतर शाळा व्यवस्थापनाने पोलिसांत धाव घेतली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या शिक्षकाकडूनच असे वर्तन होणे गंभीर आहे.
गेल्या काही दिवसांत अल्पवयीन मुलींच्या शोषणाच्या घटना उजेडात आल्या आहेत. जुने गोवे येथे पोलिस अधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, म्हापशात चिमुरडीवरील अत्याचार, तिसवाडीतील विद्यालयात १३ वर्षीय विद्यार्थ्याकडून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याचे स्वच्छतागृहात लैंगिक शोषण व आता डिचोलीतील शिक्षकाचे प्रकरण. त्याशिवाय दक्षिण गोव्यातील काही कथित महिला शोषणाच्या तक्रारी. उपरोक्त घटनांचे स्वरूप वेगवेगळे असले तरी त्याद्वारे समाजातील बदलत्या मानसिकतेचे काही पैलू समोर येतात. शिक्षकांकडून विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.
शिक्षणव्यवस्थेत स्त्रीविषयक आदराची भावना कमी होत आहे का, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. दुसरे असे - लैंगिकतेचे वस्तुकरण होत आहे. म्हापशातील घटनेत लहान मुलीविषयी विकृत लैंगिक आकर्षण दिसून आले. समाजाचा वचक, कायद्याची भीती कमी झाल्यानेच अशा प्रवृत्ती उघडपणे व्यक्त होऊ शकतात. त्यावर यापूर्वीही या स्तंभातून आम्ही परखड भाष्य केले आहे. घटनेकडे फक्त गुन्हा म्हणून पाहिल्यास त्यामागील सामाजिक बदल लक्षात येत नाहीत. पौगंडावस्थेत मुलांना विरुद्धलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, आकर्षण व लैंगिक शोषणात मोठा फरक आहे.
मुलांच्या वर्तनाला योग्य दिशा देण्यात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. तिसवाडीतील घटनेतील आरोपी अवघ्या १३ वर्षांचा आहे. या वयात त्याच्याकडून असे कृत्य घडण्यामागील मानसिकता समजून घ्यायला हवी. मुलांच्या मित्रांपासून समाजमाध्यमांवरील वावरापर्यंत पालकांचे लक्ष नको का? मुलांशी वयाला अनुरूप विषयांवर संवाद होत नसेल, तर त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांना चुकीच्या ठिकाणी उत्तरे मिळू शकतात. पालकांचा वचक म्हणजे बंधने घालणे नव्हे, मुलांच्या वर्तनाची जाणीव ठेवणे होय.
पोलिस अधिकारी, शिक्षकांकडून घडलेले शोषण अधिक धोकादायक आहे. अशा व्यक्तींना समाजात अधिकाराचे स्थान असते. त्यांच्याकडून विश्वास अपेक्षित असतो. त्याचा गैरफायदा घेऊन लैंगिक मर्यादा ओलांडल्यास तो समाजाने ठेवलेल्या विश्वासाचा भंग असतो. विशेषतः शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतो. इतर पेशांच्या तुलनेत शिक्षकी पेशाचे सामाजिक महत्त्व वेगळे आहे. उद्याची पिढी शिक्षकांकडे पाहून अनेक गोष्टी शिकते. त्यामुळे शिक्षकांच्या वैयक्तिक व सार्वजनिक वर्तनालाही नैतिकतेची चौकट हवी.
समाजमाध्यमांवर फोटो किंवा अन्य मजकूर प्रसिद्ध करतानाही शिक्षकांनी पेशाचे भान ठेवावे. विद्यार्थ्यांशी वागताना योग्य अंतर, मर्यादा राखणे हा व्यावसायिक शिस्तीचाच भाग आहे. डिचोलीतील प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचण्यापूर्वी काही काळ सुरू होते. पालकांनी तक्रार केल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने पोलिसांकडे धाव घेतली. अनेकदा शाळेची बदनामी होईल किंवा विद्यार्थिनीच्या भवितव्यावर परिणाम होईल, या भीतीने अशा घटना दडपल्या जातात. त्यामुळे तक्रार करण्याची वेळ येईपर्यंत प्रकरण किती वाढले असेल, याचा अंदाज करता येतो.
एकूणच समाजात लैंगिकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. लैंगिकतेच्या वस्तुकरणासोबत ‘सिच्युएशनशिप’सारख्या संकल्पना रुजत आहेत. कायमस्वरूपी बांधीलकीपेक्षा तात्पुरत्या जवळिकीला महत्त्व दिले जातेय. या बदलत्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब तरुणांच्या नातेसंबंधांतही दिसू लागले आहे. मनोविकारतज्ज्ञांकडूनही बदलत्या सामाजिक वर्तनाविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. गैरविचार माणसाच्या मनात पूर्वीही होते; पण त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या सामाजिक मर्यादा होत्या.
कायद्याच्या परिणामांची जाणीव महत्त्वाची होती. आज काही घटनांतून या मर्यादांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. आत्मसंयमाचा अर्थही हाच आहे. मनात आलेल्या प्रत्येक इच्छेनुसार वागणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. दुसऱ्याच्या संमतीसह त्याच्या मर्यादा ओळखणे ही कोणत्याही व्यक्तीच्या वर्तनाची मूलभूत अट आहे. याचे शिक्षण शालेय पातळीपासून हवे. आकर्षण व संमतीत गल्लत झाली की शोषणाला सुरवात होते. समाजातील विकृती रोखण्याची भाषा करण्यापूर्वी तिचे पोषण करणाऱ्या बेफिकिरीकडे पाहावे लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.