

जयराम अनंत रेडकर
अमेरिकेतील लास वेगास हे ठिकाण कॅसिनोसाठी सुप्रसिद्ध आहे. भारतातील लास वेगास म्हणजे गोवा, अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. कोणतीही गोष्ट एका रात्रीत तयार होत नाही. त्यासाठी कित्येक वर्षे जावी लागतात. कॅसिनोच्या बाबतीतदेखील इथे तसेच घडले आहे.
गेल्या आठवड्यात पर्वरी येथील एका कॅसिनोच्या व्यवस्थापकावर जीवघेणा हल्ला झाला यासंबंधीची बातमी सर्व प्रसारमाध्यमांत झळकली. व्यवस्थापक बालंबाल बचावला ही गोष्ट अलाहिदा. परंतु ज्या ज्या ठिकाणी जुगारासारखे धंदे चालतात, त्या त्या ठिकाणी अनैतिक गोष्टी घडत असतात. त्यात खून, मारामाऱ्या, महिलांची छेडछाड, नशिल्या द्रव्यांचा व्यवहार या गोष्टी ओघानेच येत असतात. पैसा हे त्याला कारण असते. हॉलीवूड चित्रपटसृष्टीतील जेम्स बॉंड यांच्या चित्रपटात या बद्दलची दृश्ये दाखवली जातात, हे अनेकांनी पाहिले असेल. बॉलिवूड आणि टॉलीवूडदेखील आता त्याच मार्गाने जात आहे. पडद्यावर जे दिसते तेच आज गोव्यासारख्या छोट्या राज्यात घडते आहे.
जुगार ही संस्कृती आजकालची आहे, असे मुळीच नाही. महाभारत काळातही जुगार खेळला जात असे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कौरव आणि पांडव यांच्यात युद्ध सुरू होण्याआधी सारीपाट मांडून नशिबाचा खेळ अजमावला गेला होता आणि त्यात पांडव हरले होते. या खेळात त्यांनी आपल्या पत्नीलाही डावावर लावले आणि हा नशिबाचा खेळ हरल्याने त्यांच्यावर नामुष्की ओढवली. प्रत्येक जुगाऱ्याला आपण आता नाही तर पुढच्या डावात जिंकू आणि जे गमावले ते सर्व परत मिळवू, असा दुर्दम्य आशावाद वाटत असतो. पण नेहमी नशिबाची साथ मिळतेच असे नाही. खरे तर ते एक मृगजळ असते.
गोव्यातही गावागावातून होणाऱ्या जत्रोत्सवात जुगार खेळला जातो. तीन पत्ती, रमी, फ्लश अशाप्रकारचा हा खेळ असतो. चढत्या क्रमाने डावाची बोली लावली जाते आणि जो जिंकतो त्याला ती सर्व रक्कम मिळते. यात खेळणारे क्वचितच मालामाल होतात, पण खेळवणारे नक्कीच मालामाल होतात. सार्वजनिक ठिकाणी पत्त्यांचा हा जुगार अवैध मानला जातो आणि हा खेळ खेळणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. परंतु कायद्याचे रक्षकच याला छुपा पाठिंबा देत असतील तर काय करणार?
जुगाराचा छोटा भाऊ म्हणजे मटका ! जुगार प्रतिबंधक कायदा १८६७ अन्वये कायद्याने यालाही बंदी आहे आणि तरीही शहरातील गल्ली बोळात आणि गावातील कोपऱ्यावर मटका नावाचा जुगार पोहोचला असून यात शाळकरी मुले, त्यांचे पालक, काही शिक्षक आणि स्त्रियाही सहभागी झाल्याचे आढळून येते. मध्यंतरी तर मटका जुगार कायदेशीर केला जावा, अशी मागणी केली गेली होती. अर्थात तसे झाले नसले तरी पोलीस यंत्रणेच्या छुप्या पाठिंब्यावर हा खेळ बिनबोभाट चालतो हे उघड सत्य आहे.
अमेरिकेतील लास वेगास हे ठिकाण कॅसिनोसाठी सुप्रसिद्ध आहे. भारतातील लास वेगास म्हणजे गोवा, अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. कोणतीही गोष्ट एका रात्रीत तयार होत नाही. त्यासाठी कित्येक वर्षे जावी लागतात. कॅसिनोच्या बाबतीत देखील इथे तसेच घडले आहे. पर्यटन विकासाच्या नावाखाली मनोरंजन म्हणून कॅसिनोला परवानगी देण्यात आली. १८६७ चा जुगार प्रतिबंधक कायदा बाजूला ठेवून लॉटरी आणि काही पंच तारांकित हॉटेल्समध्ये स्लॉट मशीनचा वापर करण्यासाठी परवानगी १९७६ साली राज्य सरकार कडून देण्यात आली. यात खरे परिवर्तन आले ते १९९२ साली. याच वर्षी इलेक्ट्रिक स्लॉट मशीन्स उच्च श्रेणीच्या लक्झरी हॉटेल्समध्ये लावली गेली. सन १९९९ मध्ये ऑफ शोअर कॅसिनो हा गोव्याचा लॅंडमार्क झाला.
उत्तर भारतातील मोठे उद्योगपती, राजकीय नेते यांनी या व्यवसायात गुंतवणूक करायला सुरुवात केली. पुढे यात वाढ होऊन ऑफ शोअर कॅसिनो बरोबरच भूमीवरील पंचतारांकित हॉटेल्समध्ये कॅसिनो चालवायला परवानगी देण्यात येऊ लागली. मुंबई, दिल्ली, बंगलुरू इत्यादी ठिकाणाचे लक्ष्मीपुत्र कॅसिनोची मजा लुटायला येऊ लागले. भ्रष्ट मार्गाने जे पैसे कमावतात, असे सरकारी बाबूही यात सामील झाले. ज्या भागात कॅसिनो आहेत, तिथे शनिवार-रविवारच्या दिवशी प्रचंड गर्दी उसळते. रस्ते वाहनांनी भरून जातात. पार्किंगचा मोठी समस्या उद्भवते.
कॅसिनो संस्कृतीमुळे तरुण पिढी वाममार्गाला लागते, ऑफ शोअर कॅसिनोमुळे पर्यावरणाचा विनाश होतो, समुद्रकिनारे गलिच्छ बनतात यासाठी ऑफ शोअर कॅसिनो बंद करावेत अशी जोरदार मागणी अधूनमधून होत असते. परंतु कॅसिनोमुळे राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो, पर्यटन वाढीमुळे रोजगाराच्या संधी वाढतात, छोट्या उद्योगांना चालना मिळते, व्यापार वाढतो अशा सबबी सांगितल्या जातात आणि विरोधकांची तोंडे बंद केली जातात.
तरुण पिढीला सनसनाटी गोष्टी आकर्षित करतात. ऑफ शोअर कसिनोमध्ये चालणाऱ्या उन्मादक मनोरंजनाच्या रात्री या पिढीला हव्या हव्याशा वाटू लागतात. डिजेच्या तालावर चालणारे कर्कश आवाजातील संगीत आणि त्या तालावर ललनांची थिरकणारी पावले आणि मादक अंगविक्षेप यांची ओढ लागते. यातूनच वेश्या व्यवसाय सुरु होतो. मदिरा आणि मदिराक्षी यांचे संयुक्त आकंठपान इथे करता येते. विविध प्रकारची मादक द्रव्ये इथे सुलभतेने उपलब्ध होतात आणि कोणतीही बंधने न पाळता त्यांचे सेवन करता येते अशी धारणा कॅसिनोमध्ये येणाऱ्या लोकांची झालेली आहे.
१९७०च्या दशकात एका कोनाड्यात चाललेल्या जुगाराचे प्रस्थ २०२६ उजाडता उजाडता सर्वदूर विस्तारित झाले आहे. यासाठी लागणारी परवाना फी आणि नुतनीकरण फी यातून सरकारला प्रचंड महसूल प्राप्त होतो. काही राजकीय नेत्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील यातून कृपाप्रसाद मिळत असावा असा लोकांचा कयास आहे आणि म्हणूनच कॅसिनो बंदीचा विषय टाळला जातो, अशी लोकांची समजूत होऊन गेली आहे.
माणूस एकदा एखाद्या व्यसनात गुंतला, की तो सहजासहजी त्यातून बाहेर पडू शकत नाही. कॅसिनोने वेढलेल्या या सुंदर प्रदेशाची सुटका होईल असे वाटत नाही. याचे कारण द्रव्यं सर्व भूषणम् ही माणसाची मनोवृत्ती झाली आहे. यात येणारी पिढी उध्वस्त होईल याचे भान कुणाला राहिलेले नाही. व्यसन पूर्तीसाठी व्यक्ती कोणत्याही थराला जाते हे अलीकडच्या काळात प्रकर्षाने जाणवू लागले आहे. चोरी, मारामाऱ्या, खून, दरोडे, भांडण-तंटे यांचे प्रमाण याच काळात वाढले आहे आणि हे यापुढे वाढतच जाणार यात तिळमात्र शंका नाही. पर्वरी येथे जो खुनी हल्ला झाला ती केवळ एक झलक आहे. पिक्चर अभी बाकी आहे,असे म्हटले तर वावगे ठरू नये.
२१ व्या शतकात चंगळवादी जीवनाची लालसा वाढत गेली. आपले पारंपारिक सण, उत्सव यांनाही त्याची लागण झाली. भजन कीर्तन, आरत्या आणि नाट्य संगीत यात रमणारा गोमंतकीय आता उडत्या चालीवरच्या डीजे संगीताला आणि धागड धिंगाण्याला अधिक प्राधान्य देऊ लागला आहे. कॅसिनोच्या निमित्ताने वाढलेल्या रहदारीमुळे रस्त्यावर ताण वाढला, बेफाम वेगाने चालविली जाणारी वाहने आणि होणारे अपघात यांचे प्रमाणही वाढले. १९७० सालातील मी पाहिलेला गोवा हा असा कधीच नव्हता. शांत, सुंदर, आपुलकी जपणारा, कायद्याला भिऊन वागणारा, धार्मिक सलोखा जपणारा, अगत्यशील, स्वागतशील गोवा आता शिल्लक उरलेला नाही याचे मनोमन वैषम्य वाटते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.