
प्रमोद प्रभुगावकर
अखेर गेले अनेक महिने उत्कंठेने प्रतीक्षा केली जात असलेल्या गणपतीचे आगमन झाले व गणेशभक्त धन्यही झाले. दीड व पाच दिवसांचा गणेशोत्सव पार पडला व आता सात नऊ, अकरा दिवसांच्या उत्सवात भाविकांच्या रांगा लागत आहेत. गोव्यात आता अनेक भागांत एकवीस दिवसीय गणेशोत्सवाची प्रथाही सुरू झालेली पाहायला मिळते.
त्यातूनही गणेशभक्तांची संख्या वर्षागणिक वाढत असल्याचे आढळून येते. त्यात वावगेही काही नाही म्हणा! कारण गणपती हे शेवटी सर्वसामान्यांचे दैवत मानले जाते व ते तसे आहेही. केवळ गोव्यातच नव्हे तर देशभर, किंबहुना जगाच्या अधिकतम भागांत गणेशचतुर्थी उत्साहात साजरी केली जात असते.
विविध देशांत कामाधंद्यानिमित्त मुक्काम ठोकून असलेले भारतीयच नव्हे तर त्या त्या देशांतील लोकही या उत्सवात रममाण झालेले पाहायला मिळतात. त्यामुळे भविष्यात गणेशोत्सव जागतिक उत्सव ठरू शकतो असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
आपल्या गोव्यात व विशेषतः कोकण किनारपट्टीत गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कामाधंद्यानिमित्त अन्य भागांत, विदेशातसुद्धा मुक्काम ठोकून असलेला गोमंतकीय या उत्सवासाठी हमखास आपल्या गावात येत असतो.
त्यासाठीची त्याची तयारी वर्षभर चालू असते. चतुर्थीसाठी गावांत येऊन आपल्या वडिलोपार्जित जुन्या घरांत मुक्काम करणे व वर्षभराचा शीण घालविणे यातच तो धन्यता अनुभवत असतो. चतुर्थीनिमित्त केलेला हा आठ दिवसांचा मुक्काम त्याला वर्षभर काम करण्याची ऊर्जा देत असतो, असे अनेक जण सांगताना आढळतात.
पूर्वी अधिकतम गोमंतकीय जास्त करून कामाला मुंबईत असत पण आता ते देशाच्या विविध भागात व अनेक जण तर विदेशांतही असतात. पण, चतुर्थीच्या निमित्ताने ते गावात आलेले पाहायला मिळतात. एक प्रकारे गणपतीच त्यांना आपल्या भूमीकडे खेचून आणत असतो, असे म्हणावे लागते.
तसे पाहिले तर पूर्वी म्हणजे साठ-सत्तरच्या दशकात या उत्सवात भव्यतेला, थाटमाटाला वाव नव्हता. कारण त्यावेळी लोकांच्या हातात तसा पैसाही खेळत नव्हता. पण नंतरच्या काळात आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात सुधारली व साहजिकच त्याचे प्रतिबिंब या उत्सवात उमटताना दिसू लागले.
वर उल्लेख केलेल्या सत्तरच्या दशकात मोठ्या प्रमाणात स्वस्ताई होती तिचे वर्णन केले तर आताच्या पिढीला ते खरे वाटणार नाही, पण ती वस्तुस्थिती होती. त्यावेळी गणपतीच्या मूर्तीसाठी आठ ते दहा रुपये विड्यावर ठेवले जात असत.
मूर्तिकार स्वतः त्या घडवीत व रंगवतही असत व हे काम पावसाळा सुरू झाला की सुरू होई, आज केवळ मूर्तीच नव्हे तर उत्सवासाठी लागणाऱ्या सगळ्याच वस्तू बाजारांतून विकत आणण्याची पद्धत सुरू झाली आहे. कारण कोणाकडेच वेळ म्हणतात तो नाही. पूर्वी हा प्रकार नव्हता. गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवसापासून चतुर्थीसाठी घरात साफसफाई, शेण सारवणी वगैरे सुरू होई, माळ्यावर ठेवलेले लाकडी मखर खाली काढून ते साफ करणे व रंगीत कागद लावणे हे कामही हाती घेतले जाई.
तर महिलावर्ग मिठाई-खाऊ करण्याच्या कामाला लागत असे; कारण त्यावेळी हा खाऊ बाजारांत मिळत नसे व मिळाला तरी विकत आणण्याची कोणाची तयारी नसे. कदाचित ऐपतसुद्धा नसावी. त्याच्या जोडीला सुवासिनींनी पुजावयाच्या वायनांची सफाई, त्यांना कुंकू, काजळ, हळद लावणे , पिड्डुकांचे दोर बांधणे हे कामही केले जाई.
बहुतेकांकडे चतुर्थीच्या दिवशी सकाळीच मूर्ती आणली जाई कारण बहुतेक वाड्यांवर एकेक चित्रशाळा असायची. त्या अगोदर माटोळीसाठी साहित्य जमविण्याचा सोहळा होई, वाड्यावरील मुलांची टोळी ते काम उत्साहाने आपल्या खांद्यावर घेई.
रानातील फळे जमविली जात अनेकांकडे त्यावेळी गुरे असत व त्यामुळे गुराखी रानफळे आणून देत. त्या बदल्यात त्याला वायन व करंज्या दिल्या जात. पण अन्य फळावळीचा प्रश्नच नसे कारण बहुतेकांच्या अंगणात पावसाळी फळवेलींची लागवड केली जाई. त्यामुळे काकडी, भेंडी, दोडकी. भोपळा वगैरे घरातच मिळे.
त्यावेळी सफरचंद, मोसंबी, संत्रीसारखी फळे पाहायलासुद्धा मिळत नसत. मग माटोळीला ती बांधण्याचा प्रश्नच नसे. आज हे चित्र बदलले आहे. शहरातून घरी जाताना वाटेत बसलेल्या विक्रेत्यांकडून माटोळीची सामग्री सर्रास नेली जात असलेली पाहायला मिळते.
केवळ फळावळच नव्हे तर कांगोणा, करमला, माट्टीचे घोसच नव्हे तर गौरीसाठी लागणारी पत्रीसुद्धा विक्रीस ठेवलेली आढळते. त्यामुळे या सर्व वस्तू गोळा करण्यात मिळणाऱ्या आनंदातून आताची पिढी वंचित झालेली आहे खरी.
आमच्या वेळी संपूर्ण श्रावण महिन्यातील आयतारसाठी तसेच गोकुळाष्टमीसाठी लागणारी पत्री, तुळशी, दूर्वा, फुले, बेल वगैरे साहित्य आम्ही वाड्यावरील मुलेच भल्या पहाटे जाऊन गोळा करायचो. त्यावेळी वाघचाफा, केवडा यासाठी आम्हा मुलांमध्ये जणू स्पर्धा लागायची. खरेच त्या दिवसांची आठवण अजून बालपणात घेऊन जाते.
पण आज सगळे चित्रच बदलले आहे. कोणाची त्रास घेण्याची तयारी नाही. पैसे मोजले की सगळे दारात हजर होत असल्याने ही नवीच मानसिकता विकसित झालेली आढळते. तशातच वाढलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवांनीही या मानसिकतेत जास्त भर घातलेली आहे.
पूर्वी कामाधंद्यानिमित्त अनेक मंडळी गोव्याबाहेर होती; पण आज ती गोव्यातच विविध शहरांत मुक्काम ठोकून आहेत. चतुर्थीसाठी घरी आल्यानंतर त्यातील बहुतेकांना घराबाहेरदेखील पडावेसे वाटत नाही त्यामुळे पूर्वीसारखे या उत्सवामुळे आता चैतन्य तयार झालेले आढळून येत नाही.
यंदा तर चतुर्थीकाळात पावसाने असा काही धुमाकूळ घातला, की बहुतेकांनी घराबाहेर पडणेच टाळले. त्यामुळे या उत्सवाच्या दिवसात गावात जी रहदारी दिसायची तीही दिसली नाही. लहानपणी आम्हा मुलांमध्ये वाड्यांवर व गावात फिरून गणपती पाहण्याची स्पर्धा लागायची. पण आज तशी ती कोणामध्ये दिसत नाही. परिणामी विशेष कोणी कोणाला भेटतानासुद्धा दिसत नाहीत. त्यामुळे गणेशोत्सवाचा मूळ हेतूच हरवल्यासारखा दिसला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.