Mahatma Gandhi: अन्यायकारक दरडोई ‘कर’ सत्याग्रहामुळे इंडियन रिलीफ ऍक्ट, १९१४मार्फत रद्द केला गेला; गांधीजींचे समाजशास्त्र

Gandhi social philosophy: साम्राज्यवादाने किंवा भांडवलशाहीने हिरावून घेतलेले उद्योग गांधींना स्वदेशीमार्फत भारतीयांना परत करायचे होते. म्हणूनच गांधींची समाजहिताची उद्दिष्टे वैश्विक होती.
Gandhi social philosophy
Gandhi social philosophyDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. नाऊ वरक

गांधींना भारतीय म्हणणं, गांधींना अभिमानी हिंदू म्हणणं, गांधींना कॉंग्रेसचं म्हणणं, हे सगळे अत्यंत फोल आहे. गांधीजी सर्वांत आधी वैश्विक होते!’ असे उद्गार सहा वर्षांपूर्वी लोकसत्ताचे माजी संपादक कुमार केतकर यांनी लुई फिशर लिखित ‘महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ’ या मराठी अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात काढले.

बऱ्याचदा गांधी-टिळक वाद, गांधी-आंबेडकर वाद या विशिष्ट चौकटींमध्ये गांधींच्या राजकीय आणि सामाजिक विचारांचे विश्‍लेषण केले जाते. सामान्य मनुष्याप्रमाणे गांधींचे जीवन उत्तरोत्तर बदलत जाते. राजकीयदृष्ट्या गांधीजींच्या तत्त्वज्ञानाची जगभर नोंद घेतली गेली आहे. मात्र त्यांचे समाजशास्त्र तेवढ्या चिकित्सकतेने अभ्यासले न गेल्याचे जाणवते.

त्यांना समाजशास्त्र किंवा राजकीय घडामोडींचे अभ्यासक न समजता त्यांच्याकडे फक्त तत्त्वज्ञ म्हणून पहिले गेले. त्यांचे समाजाविषयीचे ज्ञान हे तत्कालीन प्रस्थापित समाजशास्त्रज्ञांच्या विश्‍लेषणावर आधारित असल्याचे आढळते. पण त्यांच्यातला तत्त्वज्ञ हा ज्ञानपरीघ ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या लेखात गांधींच्या बदलत जाणाऱ्या सामाजिक तत्त्वज्ञानाचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे.

गुजरात पोरबंदरहून स्थलांतरित झालेले दक्षिण आफ्रिकास्थित दादा अब्दुल्ला झवेरी गांधींना वकील म्हणून आपला व्यावसायिक खटला ब्रिटिश न्यायालयात लढण्यास नियुक्त करतात.

यावेळी दक्षिण आफ्रिकास्थित भारतीय व्यापाऱ्यांना म्हणजेच मुक्त भारतीयांना ते ‘आर्य’ म्हणून संबोधतात. ते ब्रिटिश आणि भारतीय लोक हे एकाच वंशाचे लोक आहेत, त्यामुळे त्यांच्याशी भेदभाव करू नये, अशी याचिका सादर करतात.

भारतातून व्यावसायिक कारणांसाठी स्थलांतरित व्यक्तींना दक्षिण आफ्रिकेत मतदानाचा हक्क मिळावा यासाठी गांधी याचिका दाखल करतात. सर विलियम विल्सन हंटर यांच्या लिखाणाचा संदर्भ देत मुक्त भारतीय आणि इंग्रज हे एकाच वंशाचे असल्याचे मत ठामपणे मांडतात.

‘हरिजन’ या साप्ताहिकात लिहिताना गाव किंवा वाडे हे आर्य लोकांच्या प्रजासत्ताक वसाहती होत्या, असे त्यांचे मत होते. गांधी हे मॅक्समूलर आणि बाळ गंगाधर टिळक यांच्याप्रमाणेच इंडो-आर्यन या जाणिवेतूनच गाव या संकल्पनेकडे पाहतात.

याचवेळी आफ्रिकेत भारतातून ‘करारबद्ध मजूर (ईण्डेनचर्ड लेबरर्स)’ म्हणून स्थानांतरित केलेले बरेचसे मजूर ब्रिटिश गुलामीविरुद्ध झगडत होते. हे मजूर डोंगर-दऱ्यांमधून सामान वाहतुकीचे, हस्तकलांत पारंगत तसेच विविध स्थानिक सरदारांकडे सैनिक म्हणून काम करणाऱ्या समूहांतील लोक होते.

तसेच ते गाव व्यवस्थेत ‘गावकर’ म्हणून गणले जात नसत. तर ग्रामीण भारतातील हा उद्योजक वर्ग होता. साम्राज्यवादी सत्तांनी वसाहतीकरण करत असताना भारताचे निरुद्योगिकीकरण केले आणि अशा औद्योगिक वर्गाला आफ्रिका तसेच कॅरेबिअन बेटांवर उसांच्या मळ्यांवर गुलाम म्हणून रुजू केले.

परकीय राजवटीत गाव आणि खेडे या दोन भिन्न संकल्पना अस्तित्वात आल्या. प्रशासनिक कार्यालये, बाजारपेठ व प्रामुख्याने जमीनदार घराण्यांशी मर्यादित गाव ही संकल्पना उदयास आली. उलटअर्थी, खेडे ही स्थानिक व जागतिक अर्थव्यवस्थेशी निगडित संकल्पना आहे.

१९१३नंतर दक्षिण आफ्रिकेतील या ‘करारबद्ध’ मजुरांच्या हक्कांविषयी गांधींना तळमळ दिसू लागली. त्यांच्यावर लादलेल्या अन्यायकारक दरडोई ‘कर’ गांधीजींच्या सत्याग्रहामुळे इंडियन रिलीफ ऍक्ट, १९१४मार्फत रद्द केला गेला.

येथूनच गांधींची गाव या संकल्पनेची आकलनशक्ती प्रगल्भ होत गेली. गांधींचा ग्रामीण अर्थकारणाकडे ओढा होता. स्वदेशीचा पुरस्कार आणि प्रचार करत असताना गांधींनी ‘खेड्यांकडे चला’ असा संदेश दिला. सामान्यतः खेडे आणि गाव या दोन्ही संकल्पना एकाच अर्थाने वापरल्या जातात.

गाव हे प्रशासनिक कामकाजासाठी आणि राजकीय नियंत्रणासाठी उभारलेली व्यवस्था होती. तर खेडे हे ग्रामीण अर्थव्यवस्था दर्शविणारी संकल्पना होती. त्यामुळे गांधींचे ‘खेडे’ समजून घेणे महत्त्वाचे आहे. गांधींनी स्वदेशीचा प्रयोग खेड्यांतील उद्योजक समूहांमध्ये राबविण्यास सुरुवात केली. दख्खनच्या पठारावरील धनगर समूहातील महिलांना चरख्याची ओळख करून दिली.

Gandhi social philosophy
'Mahatma Gandhi 140 कोटी जनतेचे राष्ट्रपिता', अखेर गुजरात सरकारने उच्च न्यायालयात असे का म्हटले?

सूत कातणे किंवा लोकर कातण्याचे प्रशिक्षण ह्या महिलांना देण्यात आले आणि त्यांनी या गांधींच्या उपक्रमात हिरिरीने सहभाग दर्शविला. गांधी ११ मे, १९२१च्या ‘यंग इंडिया’ च्या अंकात लिहितात की, १९२०मधील दुष्काळामुळे मध्यमवर्ग भरडला गेला आहे आणि त्यामुळे सूत किंवा लोकर कातण्यात तरबेज असणाऱ्या धनगर महिलांमध्ये चरख्याची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात केली.

नंतर पुढे रामोशी समाजातील महिलांनीही या उपक्रमामध्ये सहभाग दर्शविला. अनेक महिला चरख्यावर सूत कातण्यासाठी चौकशी करू लागल्या आणि पुढाकार घेऊ लागल्या. पिंजारी समाजातील महिलाही या उद्योगात सहभागी झाल्या. लोकर कातण्याच्या या उद्योगाने गती घेतली आणि पुढे यातून वेगवेगळे विभाग सुरू करण्यात आले.

Gandhi social philosophy
Mahatma Gandhi: मैत्रीण, अध्यात्मिक पत्नी, राजकीय सोबती... महात्मा गांधींशी संबंध असलेल्या 'त्या' 8 महिला

गांधी ‘यंग इंडिया’मध्ये लिहितात, या उद्योगातून पुढे धनगर महिलांनी ‘पंढरपूर’ आणि ‘देवगिरी’ पद्धतीची घोंगडी विकसित केली. गांधीजींनी सुरू केलेल्या उपक्रमाला एका आधुनिक उद्योगाचे स्वरूप त्यांनी दिले व वेळोवेळी नवीन सुधारणा आत्मसात केल्या.

‘खेड्यांकडे चला’ या घोषणेचा अर्थ होता की परकीय सत्तांनी जे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे निरुद्योगिकीकरण केले होते, तिचे औद्योगिकीकरणात रूपांतरण करणे. साम्राज्यवादाने किंवा भांडवलशाहीने हिरावून घेतलेले उद्योग गांधींना स्वदेशीमार्फत भारतीयांना परत करायचे होते. म्हणूनच गांधींची समाजहिताची उद्दिष्टे वैश्विक होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com