Artificial Intelligence: 'एआय'चा प्रभाव, वकील नामशेष होणार की आणखी सक्षम?

Artificial intelligence in law: एआयच्या वापरामुळे कायद्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक बनेल ह्यात दुमत नाही. पण शेवटी न्याय देण्याचे काम माणसांचेच आहे.
Artificial Intelligence
Artificial IntelligenceDainik Gomantak
Published on
Updated on

एआयच्या वापरामुळे कायद्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक बनेल ह्यात दुमत नाही. पण शेवटी न्याय देण्याचे काम माणसांचेच आहे. तंत्रज्ञानामुळे उद्याची न्याययंत्रणा अधिक डिजिटल, पारदर्शक आणि सुलभ होईलच; पण प्रगल्भता, करुणा, विवेक, सहानुभूती आणि नैतिकतेची जोड नसेल तर ती सदैव अपूर्णच राहील.

‘भावी पिढीतील वकिलांना केवळ मानवी सहकाऱ्यांशीच नव्हे, तर कृत्रिम बुद्धिमत्तेशीही स्पर्धा करण्यासाठी स्वतःला तयार करायला हवे’, असा सल्ला दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस यांनी गेल्या आठवड्यात मडगावच्या कायदा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिला.

कायद्याचे जुजबी ज्ञान असलेले काही पक्षकारही आता वकिलांची मदत न घेता, चॅटजीपीटीसारख्या एआय साधनांद्वारे स्वतःचे अर्ज आणि प्रतिसादपत्रे स्वतःच तयार करायला लागले आहेत, असा अनुभव त्यांनी नमूद केला. आजच्या काळात तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे ही केवळ पर्यायाची गोष्ट राहिलेली नसून, अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे, असे स्पष्ट करत जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना एआय युगाच्या प्रखर वास्तवाची जाणीव करून दिली.

Artificial Intelligence
Goa Weather Update: राज्यात मध्यम पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी

यानंतर कुतूहल म्हणून मी न्यायव्यवस्थेसाठी अशी कोणती एआय संसाधने उपलब्ध आहेत हे शोधू लागले, तेव्हा लक्षात आले की एआयने याही क्षेत्रात बरीच बाजी मारली आहे.

न्याययंत्रणेत यापूर्वी कोर्टापुढे आलेल्या केसेसच्या संदर्भांना आणि संबंधित माहितीच्या सखोल संशोधनाला अतिशय महत्त्व असते. एखाद्या वकिलाचा संबंधित प्रकारच्या केस हिस्ट्रीबद्दलचा व्यासंग जेवढा गाढा तेवढी त्यांची केस जिंकण्याची आणि पर्यायाने व्यावसायिक म्हणून यशस्वी होण्याची शक्यता अधिक, असे समीकरण आजपर्यंत होते.

एआयमुळे ह्या समीकरणाला आणखीन एक पैलू जोडला गेलाय. एआयच्या डेटाबेजमध्ये जगभरच्या लाखो कोट्यवधी केसेसचे संदर्भ आणि संबंधित माहिती आज उपलब्ध आहे. एआय टूल्स प्रभावीपणे वापरून, ही माहिती आपल्या हातातील केसच्या फायद्यासाठी अशी करून घेतली जाऊ शकते हे एआयच्याच माध्यमातून जाणून घेऊन, एआयच्याच साहाय्याने केस कोर्टासमोर मांडण्यासाठीच वकूबही आजघडीस या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अतिशय गरजेचे आहे.

योग्य वापर केला तर अशील, पक्षकारांना आणि एकूणच सामान्य नागरिकांसाठी एआय फार उपयुक्त होऊ शकते. कायद्याचे औपचारिक ज्ञान नसतानाही स्वतःच्या केसचे वेगवेगळे पैलू समजून घेण्यास हे टूल्स वापरले जाऊ शकतात. ज्या गोष्टी समजत नसतील त्या एआयला विचारून समजून घेतल्या जाऊ शकतात. एवढेच नव्हे तर केस चालू असतानाही, वकील केस योग्य तर्‍हेने पुढे नेतोय की नाही, जे युक्तिवाद करतोय ते योग्य आहेत की नाहीयेत हेही तपासून घेतले जाऊ शकते.

आपल्या भारतामध्येही कायदेविषयक तंत्रज्ञानाचे क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. कायदा व्यावसायिक आणि सामान्य जनतेला मदत करण्यासाठीची अनेक एआय साधने वापरात येत आहेत आणि तयारही होत आहेत.

खटला भरणे, पुरावे, साक्षीदार, सुनावणी, निर्णय यांसारख्या न्यायालयीन प्रक्रिया, मालमत्ता वाद, कुटुंब न्यायालयातील प्रकरणे, घटस्फोट, वारसा, करार, कर्ज वसुली यांसारख्या सिव्हिल तसेच शासनाच्या धोरणांविषयी खटले, नागरिकांच्या तक्रारी, माहितीचा अधिकार संबंधित खटले अशा प्रशासकीय व शासकीय बाबी, नोंदणी, स्टॅम्प पेपर, वकिलांचा सल्ला, सार्वजनिक सूचना, कागदपत्रांची पडताळणी यांसारख्या इतर कायदाविषयक सेवा, या सर्वांमध्येच एआयचा वापर करण्यासाठीची अनेक साधने उपलब्ध आहेत.

Artificial Intelligence
Goa Live News: अवजड वाहन अंगारून गेल्याने युवक ठार

यातले चॅटजीपीटीवाल्या ओपन एआयचे एक वापरायला सोपे टूल आहे, एआय लॉयर (AI Lawyer). न्यायगुरु(Nyayguru) /डिजिलॉयर(DigiLawyer) हे सामान्य लोकांसाठी कायदा वापरणे सुलभ बनवण्याचे उद्दिष्ट ठेवून बनवलेले टूल आहे. लॉसिम्प्ल (LawSimpl) हे भारतीय कायद्यासाठी खास तयार केलेले टूल, टीममध्ये सुरक्षितपणे काम करण्यासाठीच्या सुविधा देते. ड्राफ्ट बोट प्रो (Draft Bot Pro) कायदा व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसाठी खास तयार केले गेलेय.

केस माईन (CaseMine) या कायदाविषयक संशोधन प्लॅटफॉर्मचा जनरेटिव्ह एआय (Generative AI) साहाय्यक, अमिकस (AMICUS) वकील आणि याचिकाकर्ते या दोघांसाठीही एक उपयुक्त साधन आहे. न्यायालयीन निर्णय शोधून त्यांचे विश्लेषण करून मसुदे तयार करू शकणारे Order.law, भारतीय भाषा केंद्रित Legal Desk AI (MAYA), विश्लेषण, करारनामा, पुनरावलोकन इत्यादींत मदत करणारे Pacta.ai, NearLaw AI. अशी शेकडो प्रभावी टूल्स आज उपलब्ध आहेत आणि रोज त्यात आणखीन भर पडतच आहे .

मानवी वकिलांच्या सखोल कायदेशीर समजाची आणि अनुभवांची जागा ही टूल्स घेऊ शकणार नाहीत हे जरी खरे असले तरीही न्यायव्यवस्थेतील व्यावसायिक आणि नागरिकांनाही त्यांच्या वापराचा खूप फायदा होतोय आणि होऊ शकतो ह्याबद्दलही दुमत नसावे.

पण हे टूल्स वापरण्याचे दोन प्रमुख धोके आहेत ज्यांच्यावर आडनजर होणार नाही ह्यावर संबंधितांना आणि यंत्रणेलाही कटाक्षाने लक्ष द्यावे लागेल. यातला पहिला धोका आहे या टूल्सना केसिस तयार करण्यासाठी ऑनलाइन दिल्या जाणाऱ्या खाजगी माहितीचा गैरवापर होण्याच्या शक्यतेचा. असे होणार नाही यासाठी जाणीवपूर्वक आणि फुलप्रुफ उपाय योजना करण्याची दक्षता घेतली गेलीच पाहिजे.

दुसरा धोका आहे तो एआयच्या हॅलिस्युनेशनाच. वापरकर्त्याला खूश ठेवणे हे सर्वांत महत्त्वाचे ध्येय ठरवून एआय टूल्स निर्माण केलेली असतात. ह्या प्रयत्नांत ती अनेकदा भ्रमिष्टासारखी निखालस खोटी, अगदी अस्तित्वातही नसलेल्या गोष्टी आणि संबंधित माहितीची अगदी शून्यातून म्हणावी तशी पैदास करतात; आणि हे एवढ्या बेमालूमपणे केले जाते की ही माहिती खोटी असल्याचे कोणी गंभीरपणे पडताळून पाहिले नाही, तर सहजासहजी लक्षातही येत नाही.

एआयच्या ह्या हॅलिस्युनेट होण्याच्या स्वभावधर्माने अनेक एआय टूल्स वापरणाऱ्या वकिलांना जगभर अडचणीतही आणलेय. एआयने दिलेले अस्तित्वातही नसलेल्या केसेसचे संदर्भ -कधी अनवधानाने तर कधी जाणूनबुजून देऊन तयार केले गेलेले खटले जेव्हा कोर्टासमोर येतात तेव्हा, जागरूक न्यायाधीशांमुळे सत्य समोर आल्यानंतर कितीतरी वकिलांवर कारवाई झाल्याची उदाहरणे आहेत. अशाच केसीसची एक जागतिक डेटाबेसही https://www.damiencharlotin.com/hallucinations/ ह्या संकेतस्थळावर तयार केली गेलीय.

एकूणच, भविष्यात एआयच्या वापरामुळे कायद्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक बनेल ह्यात दुमत नाही. पण शेवटी न्याय देण्याचे काम माणसांचेच आहे. तंत्रज्ञानामुळे उद्याची न्याययंत्रणा अधिक डिजिटल, पारदर्शक आणि सुलभ होईलच; पण प्रगल्भता, करुणा, विवेक, सहानुभूती आणि नैतिकतेची जोड नसेल तर ती सदैव अपूर्णच राहील. तिला सर्वार्थाने पूर्ण करण्याची जबाबदारी मात्र सर्वस्वी आमचीच राहील!

- संगीत नाईक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com