Chhatrapati Sambhaji Maharaj: शंभूराजे धावून आले, पावसाने पोर्तुगीजांचा दारूगोळा भिजवला; फोंड्याच्या पीराची रंजक कहाणी

Portuguese Invasion: पोर्तुगीजांनी मुघलांशी हातमिळवणी केल्याने, मराठे मुघलांच्या धोक्यापुढे झुकतील, असे गृहीत धरून पोर्तुगिजांनी फोंडा कोट जिंकण्यासाठी फोंड्यावर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला.
Portuguese Invasion
Chhatrapati Sambhaji MaharajDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सर्वेश बोरकर

फोंड्यात सन १५५५ च्या काळात अब्दुल्ला खान नावाचा आदिलशाही सुभेदार फोंडा कोटावर मोठ्या पराक्रमाने पोर्तुगीजांचे आक्रमण परतवून लावताना लढाईत वीरमरण आल्याने या पीराचा उल्लेख लोक ‘शहीद गाझी अब्दुल्ला खान’ असा करतात.

पोर्तुगीजांनी मुघलांशी हातमिळवणी केल्याने, मराठे मुघलांच्या धोक्यापुढे झुकतील, असे गृहीत धरून पोर्तुगिजांनी फोंडा कोट जिंकण्यासाठी फोंड्यावर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. २७ ऑक्टोबर १६८३ रोजी व्हॉइसरॉयने सीमेवरील आगशी गावात तळ ठोकला. त्यांनी नदी ओलांडली आणि फोंडाच्या पश्चिमेकडील दूरभाट गावात पोहोचले, व्हॉइसरॉय फ्रान्सिस्को डी ताव्होराने ३,७०० सैनिक आणि लांब पल्ल्यांच्या तोफांसह फोंडा किल्ल्याच्या दिशेने कूच केले. दूरदृष्टी असलेले राजे छत्रपती संभाजी महाराज यांना पोर्तुगिजांच्या संभाव्य धोक्याची कल्पना होती आणि त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांनी गोव्यातील फोंडा किल्ला आधीच सुरक्षित केला होता.

Portuguese Invasion
Goa Politics: शिवराळ भाषा, सालस थापा आणि राजकीय सभ्यता; गोव्याच्या राजकारणाचा नवा चेहरा!

या लहानशा पण सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या किल्ल्याचे रक्षण शूर येसाजी आणि कृष्णाजी कंक या पिता-पुत्रासह इतर ६०० मावळ्यांनी केले होते. पोर्तुगीज व्हॉइसरॉय फ्रांसिस्को डी ताव्होरा बहादूर सेनापती होते, गोव्याचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी अंकोला येथे गव्हर्नर म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती. फोंडा किल्ल्याच्या संरक्षणावर अचूक हल्ला करण्यासाठी त्याने आपल्या माणसांना तोफा शेजारच्या टेकडीवर ठेवण्याचे आदेश दिले आणि तोफा, बंदुकीचा मारा सुरू केला. तोफांच्या सततच्या हल्ल्यामुळे फोंडा किल्ल्याची बाहेरील भिंत कोसळली. ओसंडून वाहणाऱ्या नदीच्या पाण्याप्रमाणे पोर्तुगीज सैन्य किल्ल्यात घुसले. मात्र येसाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक त्यांच्यासमोर ढालीप्रमाणे उभे होते.आपल्या नेत्याने शत्रूला धाडसी लढा दिल्याचे पाहून ६०० मावळे घोड्यावर स्वार झाले आणि सिंहासारखे लढले.

या फोंडा कोटातील सैनिकांनी पोर्तुगिजांच्या आक्रमणामुळे जी जिवावर बेतणारी धामधुमीची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे देवाचा धावा करून या कोटातील हवालदाराने कोटातील पीर हजरत अब्दुल्ला खानाच्या दर्ग्यास नवस बोलला की, पोर्तुगिजांचे फोंडा कोटावरील संकट दूर होऊ दे. त्याप्रमाणे चमत्कार घडल्यासारखेच संभाजी महाराज विलक्षण गतीने अचानक कोणाच्या ध्यानीमनी नसताना २,००० पायदळ आणि ८०० घोडेस्वारांसह फोंड्याच्या बचावासाठी सैन्य घेऊन मदतीस धावून आले आणि त्याच दिवशी जोरदार पाऊसही सुरू झाला. नोव्हेंबर महिना असूनही अचानक अवकाळी पाऊस पडून पोर्तुगीजांचा दारूगोळा भिजून तोफा, बंदुका थंड पडल्या आणि मराठ्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे पोर्तुगीजांना किल्ल्यावरून माघार घेण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.

यातील एका चकमकीत शूरवीर कृष्णाजी कंक हे गंभीर जखमी झाले, काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. पोर्तुगिजांचे बळ संपुष्टात येऊन पोर्तुगीज जबरदस्त मार खाऊन पळून गेले. ही सर्व परिस्थिती अचानक अनुकूल झाली ती सर्व या पीराची करामत अशी समजूत दृढ होऊन हा पीर जागृत आहे, अशी सैनिकांना खात्री पटली. या पीराचा उल्लेख लोक ‘शहीद हजरत गाझी अब्दुल्ला खान’ असा करतात. फोंड्यात सन १५५५ च्या काळात अब्दुल्ला खान नावाचा आदिलशाही सुभेदार फोंडा कोटावर मोठ्या पराक्रमाने पोर्तुगीजांचे आक्रमण परतवून लावताना लढाईत वीरमरण आल्याने या पीराचा उल्लेख लोक ‘शहीद हजरत गाझी अब्दुल्ला खान’ असा करतात.

१६८३ साली फोंडा कोटातील सैनिकांनी पोर्तुगीजांचे आक्रमण परतवून लावल्यामुळे व तो नवस पूर्ण झाल्यावर या पीराच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पीरास काही तरी देण्याची जबाबदारी कोटातील हवालदार धर्माजी नागनाथवर आली. त्याने ही गोष्ट छत्रपती संभाजी महाराजांना सांगितली असावी. महाराजांनी लगेच आपले मुख्य कारभारी कवी कलश यांना आदेश देऊन पीराच्या दर्ग्यास वर्षभर दिवाबत्तीचा खर्च आणि पीराची देखभाल करणारा मुख्य सेवक मुजावर यास वेतन देण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे लगेच दि. ४ जानेवारी १६८४ रोजी कवी कलश यांनी वेतन पत्राची सनद मुजावराकडे दिली.

उत्तरेत औरंगजेब बादशाह बनल्यापासून रयतेवरील जुलूम वाढला होता. त्याने इतर धर्मांचा छळ सुरू केला. धार्मिक स्थळांची विटंबना केली. त्याच्या अन्यायाला कंटाळून अनेक विद्वान लोक दक्षिणेत येऊ लागले. त्यांना एकच आधार दिसत होता तो म्हणजे शिवरायानी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य. याच काळात कवी कलश देखील उत्तरेतून महाराष्ट्रात आला असावा व त्याची युवराज संभाजी महाराजांशी भेट झाली.संभाजी महाराजांचा कवी कलशावर इतका विश्वास होता की तो शेवटपर्यंत सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत राहिला. जेव्हा स्वराज्याचा खात्मा करण्यासाठी मुघल बादशहा औरंगजेब स्वतः दक्षिणेत उतरला तेव्हा त्याचा सामना कसा करायचा याची योजना बनविण्यासाठी संगमेश्वर येथे संभाजी महाराजांनी निवडक लोकांची बैठक घेतली. त्यात कवीराज कलशही हजर होते.

Portuguese Invasion
Goa Garbage Problem: स्वच्छतेनंतर अवघ्या 24 तासांत पुन्हा कचरा! कारापूर पंचायतीचा इशारा धाब्यावर

पण दुर्दैवाने औरंगजेब बादशहाला ही बातमी कळाली व त्याने पन्हाळ्याजवळ असणाऱ्या मुकर्रब खानाला संभाजी राजांना पकडण्याच्या गुप्त मोहिमेवर पाठवले. घात झाला. संगमेश्वरी शंभूराजे मुघलांच्या तावडीत सापडले. कवी कलश तेव्हाही राजांसोबतच होते. तेही लढता लढता महाराजांच्या सोबत कैद झाले. मुकर्रब खानाने त्यांना बहादूरगडावरील औरंगजेबाच्या छावणीकडे नेले. संभाजी महाराजांसोबत त्यांंचेही अतोनात हाल करण्यात आले. असे म्हणतात की या प्रसंगी कवी कलशाने संभाजी महाराजांवर एक काव्य रचलं होतं आणि साखळदंडानी बंदिस्त अशा अवस्थेत औरंगजेबासमोर ते म्हणूनही दाखवलं होतं.

चिडलेल्या औरंगजेबाने त्याची जीभ हासडण्याची आज्ञा दिली. संभाजी महाराज व कवी कलश या दोघांचेही डोळे फोडण्यात आले. त्यांची विदूषकाचे कपडे घालून धिंड काढली. पण त्यांनी हे अत्याचार सहन केले, स्वराज्य धर्माचं रक्षण करणारे संभाजी महाराज व त्यांच्या सोबतीला कवी कलश यांचा शिरच्छेद करण्यात आला. त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. पण त्यांचं हौतात्म्य वाया गेलं नाही. त्यांच्याच रक्ताची शपथ घेऊन अनेक मावळे पेटून उठले व स्वराज्याची कीर्ती अटकेपार पोहचवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.