Bandora: उंच पठारांवर पडणारा पाऊस, झऱ्यांचे रूपाने सखल भागांकडे धाव घेतो; बांदोडा गावची जैवविविधता

Goa Bandora Village: फोंडा तालुक्यातील फर्मागुडी पठाराने बांदोडा गावाला जैवविविधतेचे आगर बनविले आहे. पश्चिम घाटाची एक रांग फोंडा तालुक्याच्या मध्य भागातून अरबी समुद्राकडे येते.
Goa Bandora Village
Goa Bandora VillageDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा तालुक्यातील फर्मागुडी पठाराने बांदोडा गावाला जैवविविधतेचे आगर बनविले आहे. पश्चिम घाटाची एक रांग फोंडा तालुक्याच्या मध्य भागातून अरबी समुद्राकडे येते. त्या रांगेने वाघाच्या पंजाप्रमाणे विस्तारित अनेक रांगांच्या घळी बनवल्या आहेत. घळीच्या माथ्यावर लांब रुंद पठारे निर्माण केली आहेत.

त्या उंच पठारांवर पडणारा पाऊस उतारावरील घळीतून झऱ्यांचे रूप घेत ओहोळांच्या रूपाने सखल भागांकडे धाव घेतो. उतारावरील वृक्ष, गवत, झुडपे, वेली यांना पाणी पुरवीत खाली येतो. नदीस गोड्या पाण्याचा पुरवठा करतो. मानवनिर्मित तलाव भरतो. त्या पाण्यावर पूर्वजांनी बागायतींचे, शेतीचे सिंचन केले. या पाण्यावर कृषी व ग्रामसंस्कृती उभी राहिली.

बांदोडा गावाच्या निर्मितीस फर्मागुडी पठाराने मोठा हातभार लावला आहे. बांदोडा गावाच्या पूर्व आणि उत्तर दिशेने त्या पठाराचे छत्र उभे ठाकले आहे.

त्या पठाराच्या घळीत धोणशी तलाव, वाघतळी, चिर्पूटे तळी, चाफेरानतळी, पाटणेतळी, नावतान तळी, गावणे तळी यांच्या पाण्यावर तिथली कुळागरे, बागायती आणि शेती जगली आहे. फर्मागुडीचा पठार म्हटला, की त्या पठारावरील ‘कटमगाळी राखणदारा’चे नाव घ्यावे लागते. कारण संपूर्ण बांदोडा आणि परिसरातील लोक आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी त्याला नवस करतात व तो फेडतातही!

फर्मागुडीच्या पठारावर बांदोडा, चिर्पूटे पाटणे गावणे खाजन वेलींग आणि प्रियोळचे लोक पावसाळ्यात भाजीपाल्याचे मळे मोठ्या प्रमाणात लावतात. भेंडी, पडवळ, कुवाळा, दोडकी, काकडी, भोपळा, कारली पीक मोठ्या प्रमाणात घेतात.

साधारण संपूर्ण पावसाळा शेतकरी डोंगरावर पिकाची राखण करतात. कारण साळ, डुक्कर, ससा, गवे, पिकाची नासाडी करतात. त्यांना पकडण्यास बिबटे, काळे बिबटे येतात. घोरपड, मुंगूस, धामण, सर्प, फुरशे, खतमांडोळ, घोणस आणि इतर सरपटणारे प्राणीही मोठ्या प्रमाणात वावरतात. हे पठार बेडूक, खेकडे, कृमी कीटक, मधमाश्यांचे वसतिस्थान आहे.

चंदन, सुरंग, बकुळी, केवडा, पारिजातक अशी परिमळणारी झाडे या पठाराने निर्माण केली आहेत. मारट, किंदळ, नाणा, हेद, अर्जुन, दाबण, हेद, जांबा, करमळ, कवच, शिरस, खैर, साम्र अशा झाडांनी त्या पठाराला सावली दिली.

आटकी, एळंब, चानाडा, रुमड, जिना, सातीण, कुरमा, हुरा, पिंपळ, वड, पंगारा, सावर, इरई, कारा, खष्ट, मोय, हुसकी, कुडा, कात्रेवाल, वाघचाफा खौलेवाल, गुंजी, पालकाणे, घोडशेरा, गोडवाल, दावा, चानीवेल, अशा वनौषधींनी, वनस्पतींनी पठारावर आपले औषधालय स्थापले आहे.

येथील झाडांना जांभूळ, चुरण, करवंद, कणेर, हासळ, चार, फातरफळ, आंबटमिरी, पिडकोळ, जंगम, चिंच, बकुळीफुल, हरकुली, घोष्ट, फागल, भेसड, फातरफळ रानमेव्याच्या वेलींनी आपल्या केशसंभाराने सजवले आहे.

हा पिकलेला रानमेवा देऊन निसर्गाने पक्षी काटांडर, वटवाघूळ, खार, माकड अशा मुक्या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या अन्नाची व्यवस्था करून ठेवली आहे. हा रानमेवा खाण्यास शाळकरी मुले जंगलाची सफर करतात. चिर्डा, सुरंग, बकुळी, केवडा, जाई, मोगरा सुगंधित फुलातील मध खाण्यास मधमाश्या टपलेल्या असतात.

फर्मागुडी पठारावरील जंगलात बेडकांच्या अनेक जाती आणि कृमी कीटक मोठ्या प्रमाणात वावरतात. त्यांना पकडण्यास साप दबा धरून बसतात. सापांना खाण्यास गरुडपक्षी, मुंगूस, घोरपड, दबा धरून बसतात.

फर्मागुडी पठाराच्या घळीतून उगम पावलेल्या झऱ्यांचे पाणीतळीस अगर ओहोळाला बांध घालून पाणी अडवले जाते. पाटाच्या साहाय्याने तिथल्या कुळागरांना उंचावरून खालच्या मैदानी भागापर्यंत मोठमोठ्या बागायतींना तेच पाणी उपयोगी ठरते. धोणशी, नावतान, पाटणे, गावणे भागात पठाराच्या उतारावर तिथल्या पूर्वजांनी बागायती तयार केल्या आहेत.

त्या कुळागरांना पाणी पुरवून ओहळ खालच्या भागातील तलाव विहिरींना पाणी पुरवून माणसांची तहान भागवतो. त्या पुढील प्रवासात धान्य पिकवण्यास शेताकडे जातो. ओहोळाच्या गोड्या पाण्याने वरून आणलेला कुजका पालापाचोळा मासळीला पुरवून अन्नाची व्यवस्था करतो.

कासव, थिगुर, सांगट, वाळेर, पिठ्ठोळ, कडुखा, करणकाटका, बेडूक, खेकडे यांना खाण्यास पाणसर्प टपलेले असतात. शेतातील ओहोळाचे पाणी सूर्याच्या उष्णतेने तापू नये म्हणून पूर्वजांनी ओहोळाच्या काठावर बोणगी, केगदी, रूमड, चानाडा, जिना, अशा झाडांची पैदास केली होती. शेणखत वापरल्याने शेतात कोंगा, शंख शिंपले जन्म घेतात; ते गांडुळाप्रमाणे शेतात नैसर्गिक खत निर्माण करून भाताचे पीक भरघोस मिळते.

हे भात शेतकऱ्याचे धन आहे. फर्मागुडी पठाराच्या सान्निध्यात कुंफळ, कांगल, माट्ट, नागलकुडा, रान आंबाडा, हर्ने, शेखड, रान-हळद, चिर्डा, दूर्वा, बेल, पारिजातक, म्हातारी, छत्री, सितावेल, आवाळी, कासाळी, दवले, चानीफूल, मांड या प्रकारची पत्री आदित्यपूजनासाठी आणि चतुर्थीच्या माटोळीस लागणारी रानफळे मिळतात.

इथल्या कुळागरात, आंबाडा, शेवगा, सुपारी, तोरींग, नारळ, आंबा, फणस, जाम, जायफळ, मिरी, केळी, मावळींग, अशा फळांनी इथली कुळागरे भरलेली आहेत. फर्मागुडी पठारावर पावसाळ्यात अनेक प्रकारची अळंबी उगवतात, अळंबी फुलल्यावर त्यावर कीटक, किडे तुटून पडतात, ते खाण्यास सर्प वारुळातून बाहेर येतात.

अळंबी हे अन्न निसर्गाने सरपटणाऱ्या प्राण्यासाठी निर्माण करून जैवविविधता वाढण्यास मदत केली आहे. मात्र हावऱ्या मानवास त्या अळंब्यांची चव कळल्याने हल्लीच्या काळात सर्वत्र त्या अळंब्यांवर संक्रांत येऊन निसर्गाच्या साखळीला बाधा पोहोचली आहे.

तसेच आज गोव्यात अनेक डोंगरावर खनन करून मेगाप्रकल्प, बंगले उभे ठाकल्याने उंच डोंगरांची झीज झाली आहे. वृक्ष, झुडपे तोडल्याने पठारावरील जलस्रोतांचे व जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या विषयावर खरे तर प्रत्येक गावात, शहरात जनजागृती होणे आवश्यक आहे.

या विषयावर जनजागृती करण्यासाठी ऑगस्टच्या दोन तारखेला बांदोड्याच्या ‘संजीवनी’च्या अध्यक्ष व गोव्याच्या ज्येष्ठ समाजसेविका आशाताई सावर्डेकर यांच्या पुढाकाराने पाणी आणि पर्यावरण वाचवण्यासाठी एक दिवसाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. महालक्ष्मी देवालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला बांदोडा गावच्या जैवविविधता मंडळाचे सहकार्य लाभले.

Goa Bandora Village
Goa Tourism: सफर गोव्याची! चोर्ला घाटातून दिसणारा 3 नद्यांचा उगम, पोर्तुगीज पुस्तकात रेखाटलेले गुळ्ळेच्या धबधब्याचे सुंदर चित्र

विषय होता, ‘प्लास्टिक वापराने आणि डोंगर खननाने ओहळ, नद्यांतील पाणी प्रदूषणाने होणारा पर्यावरणाचा र्‍हास’. कार्यक्रमाला आशाताई सावर्डेकर, बांदोडा जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेल तिळवे, गोव्याचे पर्यावरणतज्ज्ञ, अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर, भूगर्भ तज्ज्ञ वॅन्सी मेंडीस, फोंडा येथील ‘निर्मल विश्व’ या संस्थेच्या अध्यक्ष गुलाब बोरकर आणि ‘विवेकानंद साहित्य संस्कृती अभिवृद्धी’ संस्थेच्या अध्यक्ष पौर्णिमा केरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

महात्मा गांधी हायस्कूल - बांदोडा, वागळे हायस्कूल - मंगेशी, शिक्षासदन - म्हार्दोळ, जे. सी. आल्मेदा - फोंडा, फातिमा हायस्कूल - कुर्टी, जी. व्ही.एमस्. - बांदोडा, स्वस्तिक हायस्कूल - प्रियोळ, नवदुर्गा हायस्कूल - मडकई, शांतादुर्गा गुरुकुल - कवळे आणि संजीवन उच्च माध्यमिक हायस्कूल - बांदोडा, या विद्यालयांचे विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. पर्यावरणाचे महत्त्व भावी पिढीत रुजवण्याच्या दृष्टिकोनातून केलेला हा प्रयत्न खूप कौतुकास्पद आहे.

Goa Bandora Village
Shigao: सफर गोव्याची! दूधसागराच्या खोऱ्यातून भटकंती करत आलेल्या आदिमानवाची पावले 'शिगावा'त काही काळ स्थिरावली होती

भूतकाळ, वर्तमानकाळ, आणि भविष्यकाळ यांकडे पाहताना पृथ्वीवरील पाणी, हवा, प्रकाश, मृदा, वनराई, डोंगर, नद्या, ओहळ, शेती, बागायती सांभाळणे किती महत्त्वाचे आहे, याविषयी आपले विचार विविध वक्त्यांनी मांडले. आशाताईंनी राबवलेला हा उपक्रम व त्याला लाभलेला प्रचंड प्रतिसाद, किमान पुढची पिढी तरी सजग होईल, अशी आशा मनात निर्माण करतो.

या कार्यक्रमास आलेल्या विद्यार्थ्यांनी कचरा, प्लास्टिक फेकताना थोडासा विचार केला व जलस्रोत नष्ट होणार नाही, याची काळजी घेतली आणि इतरांनाही प्रवृत्त केले तर खरोखरच खूप बदल घडेल. आमच्या पिढीबद्दल जरी मी निराश असलो तरी भावी पिढीकडून खूप अपेक्षा बाळगतो. त्यांनी ओहोळांसारखे सर्व जलस्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्यक्ष कृती केली तर आशाताईंचा हा कार्यक्रम व माझी ही लेखमाला सफल, संपूर्ण झाली याचे समाधान मला लाभेल!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com