
सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी जगात ’माहिती’ नावाच्या एका नव्या पंथाची स्थापना झाली होती. त्याचे संस्थापक अॅपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन यांसारख्या महाकाय टेककंपन्या आणि त्यात काम करणारे टेनोक्रॅट्स आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. या नवपंथाचा उद्देश आक्रमक जाहिरातबाजी करून आपला माल विकणे व अमाप पैसा कमावणे हाच होता. मात्र जी माहिती प्रसारित केली जातेय ती चांगली आहे की वाईट? तिने सामाजिक स्वास्थ्य टिकून राहील की भंग होईल? किंवा त्यामुळे देशाची अखंडता टिकून राहील की नाही? अशा प्रश्नांचे या पंथाला काहीच कर्तव्य नव्हते.
तटस्थतेच्या आवरणातून मतलबी बातम्या प्रसारित करणे या पंथाचे प्रमुख वैशिष्ट्य असून जगभरात अपयशी ठरलेल्या डाव्या विचारसरणीचे चलाखीने प्रसारण करणे हे याचे दुसरे वैशिष्ट्य आहे. आज आम्ही या पंथाचे कळत न कळत गिर्हाईक झालो आहोत. या पंथाच्या प्रसारामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे अमाप पीक येऊन अराजकतावादी विचारसरणीचे आकर्षण वाढू लागलेय.
विशिष्ट अजेंडा असलेल्या माहितीचा प्रसार सुरू असलेल्या समाजात कुठली अभिव्यक्ती उपकारक आणि कुठली अपकारक याचा निर्णय करणे कठीण होते. अनावश्यक, मतलबी, तटस्थ व अनैतिक माहितीच्या कचऱ्यातून सत्याचे कण वेचून काढणे भल्याभल्यांना शक्य होत नाही, तर मग सामान्यांची काय कथा? पण जेव्हा एकाच सत्याबद्दल दहा निरनिराळी कथानके सत्य म्हणून सादर केली जातात तेव्हा कुठले कथानक सत्य आणि कुठले भ्रामक याचा निर्णय अशक्य होऊन जातो. आपण सारेच या संभ्रमाचे बळी झालो आहोत.
या संभ्रमाचे शिल्पकार दुसरे तिसरे कोणी नसून स्वतःचा राजकीय अजेंडा राबवणारे राष्ट्रीय पातळीवरचे अभिजनवादी संपादक व पत्रकारच आहेत. त्यांची नावे इथे घेण्याची गरज नाही इतके ते वाचकांना परिचित आहेत.मात्र सर्वच पत्रकारांबद्दल असे म्हणता येणार नाही. आजही गावोगावच्या अनेक पत्रकारांनी सत्यधर्माला जागून वृत्तांकन सुरूच ठेवले आहे.
या गळेकापू स्पर्धेतही सत्याचे भान व स्वत्व राखून ठेवणारे अनेक स्थानिक पत्रकार कार्यरत असले तरी गेल्या दहा वर्षांमध्ये इलेट्रॉनिक व प्रिंट पत्रकारितेच्या क्षेत्राला पार्टी प्रपोगांड्यावर आधारित फेकन्यूजचे ग्रहण लागले आहे हे नाकारता येणार नाही. सनसनाटी निर्माण करणाऱ्या या खोट्या बातम्या गावपातळीपासून तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला करिष्मा रोज दाखवत असतात. त्यांना मग उतावळे वाचक विजेच्या वेगाने व्हायरल करतात. फेकन्यूजच्या प्रसारणात उतावळ्या वाचकांचे योगदान भरघोस असते.
युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पुतीनला असाध्य रोग जडल्याच्या बातम्या आठवून बघा, उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोन उन मृत झाल्याच्या बातम्या आपण नियमित वाचल्या आहेत. चीनचे अध्यक्ष शी जीन पिंग तर दरवर्षी मृत होतात आणि कालांतराने जिवंत! अशा बातम्यांचा स्रोत आंतरराष्ट्रीय प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया असते.
त्याशिवाय सीएनएन, बीबीसी या वृत्तसंस्था आणि न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट यांसारखी अमेरिकी वृत्तपत्रे प्रगतिपथावर असणाऱ्या नव्या भारताला बदनाम करणाऱ्या बातम्या सहेतुक प्रसारित करतच असतात. त्यांना व्हायरल करणारे हितशत्रू आनंदाने या बातम्या सामाजिक माध्यमांद्वारे आपआपल्या मित्रांना फॉरवर्ड करतात. त्यामुळे क्षणिक आनंद तर मिळतोच पण मनात दशकभर संगळलेल्या राजकीय निराशेचे विरेचनसुद्धा होते. तसेही विरेचन प्रकृतीस्वास्थ्यासाठी चांगले असते.
कोण्या एके काळी, म्हणजे पत्रकारितेच्या सुवर्ण काळात, आपण बातम्या वाचत असू; कारण जगात नेमके काय सुरू आहे हे आपल्याला कळून घ्यावेसे वाटत होते. आज अनेक जण मनाला समाधान मिळेल अशा बातम्यांच्या शोधात असतात. या दोन ध्येयांमध्ये गुणात्मक फरक आहे. एकात सत्याची आस आहे तर दुसऱ्यात निराशेचा निचरा करण्याची इच्छा. ही इच्छा पूर्ण करणारी ‘कॅथार्टिक जर्नालिझम’ म्हणजे विरेचक पत्रकारिता आज तेजीत दिसते.
अनेक वर्षांपूर्वी मी नागपूरहून गोव्यात वास्तव्याला आल्यानंतर पणजीतल्या सुप्रसिद्ध वर्षा बुक स्टॉलला प्रथम भेट दिली होती. तेव्हा तिथे रोज दुपारी मुंबईतून प्रकाशित होणारी राष्ट्रीय वृत्तपत्रे विमानाने येत. सायंकाळी त्यांना विकत घेणारे सुविद्य नागरिक वर्षाच्या काउंटरवर गर्दी करत. मी पण त्या गर्दीचा भाग होऊन जमेल तितकी राष्ट्रीय वृत्तपत्रे विकत घेऊन घरी यायचो. ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘इंडियन एक्स्प्रेस’, ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘लोकसत्ता’ ही चारही वृत्तपत्रे तेव्हा मी अधाश्यासारखा वाचून काढत असे. त्याशिवाय दैनिक ‘गोमन्तक’ सुरू होताच.
दर्दी वाचकांना आठवत असेल, त्याकाळी म्हणजे तीसेक वर्षांपूर्वी मुंबईहून निघणाऱ्या ‘द इंडेपेंडंट’ नावाच्या एका महागड्या इंग्रजी वृत्तपत्राची खूप चर्चा होती. तेव्हा त्यांच्या संपादकांना लाखाहून जास्त पगार होता असे म्हणतात. सुमारे आठ ते दहा रुपयांचा हा इंग्रजी पेपरसुद्धा मी विकत घेत होतो. घरात खेळणारा दीडेक वर्षाचा मुलगा, ड्यूटी करणारी डॉक्टर पत्नी या गडबडीत मी वृत्तपत्रांच्या ढिगासमोर बसून एकेक बातमीचा फडशा पाडत राहायचो. माझ्या सासूबाई म्हणायच्या, ‘अरे, इतके पेपर्स रोज कशाला वाचतोस?’ त्यांचा प्रश्न वाजवी होता. मी म्हणायचो, ‘याची रद्दी विकून भरपूर पैसे येतील!’ असा हा वेडेपणा.
पण तो मी निष्ठेने करायचो कारण वृत्तपत्रे, विशेषतः त्यांमधले संपादकीय वाचून आपल्या ज्ञानात भर पडेल हा माझा दृढ विश्वास होता. स्थानिक व राष्ट्रीय पातळीवरची मुख्य वृत्तपत्रे वाचून आपले सामाजिक भान वाढेल व आपण सामाजिक सत्याच्या अधिकाधिक जवळ जाऊ, अशी एक अतूट श्रद्धा त्याकाळी माझ्या मनात वसत होती. आज फेकन्यूजच्या प्रादुर्भावामुळे माझ्या या श्रद्धेला कायमचा तडा गेलेला आहे!
‘फेक न्यूज’चे साम्राज्य इतके घनघोर आहे की ते आज भेदणे अशक्य वाटू लागलेय. असे वाटते या जगाचे जे व्हायचे ते होवो, पण या पुढे राष्ट्रीय व स्थानिक वृत्तपत्रांच्या वाचनातून, टेलिव्हिजनच्या बातम्यांमधून किंवा यूट्यूबच्या व्हिडिओतून सामाजिक सत्याचा शोध थांबवलेलाच बरा. सत्यनिष्ठा, तथ्यांचे बातमीतले प्रमुख स्थान, निःस्पृह पत्रकारिता या उच्च कल्पना नव्या पत्रकारितेच्या पर्यावरणात हास्यास्पद ठरल्या की काय? नेमके कोण चुकतेय? सत्याची किमान अपेक्षा करणारा माझ्यातला पारंपरिक वाचक की स्वतःच्या राजकीय विचारधारेनुसार सत्याची व्याख्या करणारा ‘पोस्टट्रूथ’ जगणारा नवसंपादक?
माझे प्रश्न वृत्तपत्रांना गांभीर्याने घेणाऱ्या एका मुरलेल्या वाचकाचे आहेत. पण त्याचे निनाद जर वृत्तसंस्थांच्या कचेऱ्यांत उमटत नसतील तर ते निरर्थक ठरतील. त्यातून सत्याचीच हानी होईल आणि असत्याची प्रतिष्ठापना. अशा भ्रमित कालखंडाला कोणी जर ‘कलियुग’ म्हणत असेल तर त्यात काय चुकले? असो, एकूणच पत्रकारितेच्या प्रतिष्ठेसाठी हा अटीतटीचा काळ आहे. आपल्यातले अनेक संवेदनशील पत्रकार व संपादक हे ओळखून आहेत. पण आभाळच फाटले असेल तर त्याला कोण, किती ठिकाणी ठिगळे लावू शकेल?
‘फेक न्यूज’ हे पत्रकारितेच्या जगाला लागलेले लांच्छन आहेच. त्यात भर म्हणजे आम्ही बातम्यांना स्कॅन करून त्यांच्यातला फेक भाग एडिट करतो असा दावा करणारे काही ‘फॅक्ट चेकर्स’ आज कार्यरत झालेले दिसतात. हे सत्याचे ठेकेदार सोशल मिडियात वाढू लागले आहेत. त्यांचे बोलावते धनी कुठल्या देशात राहतात आणि त्यांची नावे काय आहेत हे प्रत्येक जागरूक वाचकाला माहीत आहे.
‘फॅक्ट चेकिंग’च्या नावाने ‘फेक न्यूज’चे पीक येणे आणि त्याला अमाप ग्राहक मिळणे हे देशासाठी दुर्दैवी आहे. या ‘फॅक्ट चेकर्स’ना कुठून पैसा मिळतो़, त्यांचे परदेशी मालक कोण आहेत, त्यांचा अजेंडा काय आहे, हे गुपित राहिले नाही, पण त्याची या ‘फॅक्ट चेकर्स’ना पर्वा नाही. कारण त्यांनी संपादित केलेल्या बातम्यांना प्रचंड वाचक लाभतात. जिथे वाचकच आपले इमान विकायला तयार आहे तिथे पत्रकाराने आपले इमान राखावे असे कुठल्या तोंडाने म्हणायचे? इमान किंवा ‘इंटिग्रिटी’ ही लेखक व वाचक या दोघांनी मिळून टिकवून ठेवण्याची मौल्यवान गोष्ट आहे. जेव्हा हा करार दोन्ही बाजूंनी मोडला जातो तेव्हा ‘फेक न्यूज इज गुड न्यूज’ हे समीकरण रूढ होते. आणि हे भयावह आहे.
पत्रकारितेची प्रतिष्ठा राखण्यासाठी प्रत्येक पत्रकाराने व प्रत्येक वाचकाने सत्यनिष्ठा हे मूल्य प्रत्यक्ष जगायला हवे. त्याची किंमत चुकवण्याची तयारी ठेवायला हवी. मुख्य म्हणजे सत्यात डावे-उजवे असे काही नसून ते फक्त ‘असते’ हे ओळखून सत्यासत्य विवेक करावा लागेल. जेव्हा तोच हरवतो तेव्हा असत्य म्हणून सत्याची प्रतिष्ठापना होते आणि अवघा समाज नैतिक गर्तेत ढकलला जातो.
एखाद्या नव्या उद्योजकाने उद्या जर ’फेकन्यूज ब्रॉडकॉस्टिंग कार्पोरेशन’सारखी स्वायत्त संस्था उभारली तर तिचे समभाग रातोरात दुप्पट-तिप्पट भावाने विकले जातील आणि ही कॉर्पोरेशन प्रचंड नफा कमावेल अशी भीती वाटते. हे कधीही होऊ नये एवढीच प्रार्थना आपण करू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.