कुठे चालला आहे हा सुंदर गोवा?

Goa Vision 2035 Saptasutra: गोवा सरकारच्या विनंतीवरून त्यांनी ‘व्हिजन २०३५’ हा प्रगतीचा मार्ग दाखवला आहे. २०३५साली गोवा कसा असावा याचे स्वप्न जणू त्यांनी या आपल्या या संकल्पनेतून दाखवले आहे.
Goa Vision 2035 Saptasutra
Goa Vision 2035 SaptasutraDainik Gomantak
Published on
Updated on

दिनांक १६ एप्रिल रोजी जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक आणि मूळ गोमंतकीय डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा ‘गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्स’ आणि ‘वर्ल्ड पीस युनिवर्सिटी’ यांच्या वतीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ‘गोमंत गौरव सन्मान’ देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. माशेलकर यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक पुरस्कार आणि मानसन्मान मिळाले आहेत; परंतु जेव्हा मायभूमीकडून सन्मान होतो तेव्हा तो सर्वोपरी असतो. म्हणूनच हा पुरस्कार स्वीकारताना डॉ. माशेलकर याना आपल्या दिवंगत मातोश्रींची आठवण झाली आणि ते फार भावुक झाले.

गोवा सरकारच्या विनंतीवरून त्यांनी ‘व्हिजन २०३५’ हा प्रगतीचा मार्ग दाखवला आहे. २०३५साली गोवा कसा असावा याचे स्वप्न जणू त्यांनी या आपल्या या संकल्पनेतून दाखवले आहे. यासाठी त्यांनी सुरम्य गोवा, सुसंस्कृत गोवा, संतुलित गोवा, सुविद्य गोवा, समृद्ध गोवा, सुशासित गोवा आणि स्वानंदी गोवा अशी सप्तसूत्रे सांगितली आहेत. यातील सुरम्य गोवा, सुसंस्कृत गोवा, सुविद्य गोवा, समृद्ध गोवा ही चार सूत्रे आधीपासूनच अस्तित्वात होती आणि आहेत.

उरलेल्या तीन सूत्रांवर सरकारला गंभीरपणे विचार करावा लागेल. संतुलित गोवा आणि सुशासित गोवा झाला तर आपोआपच स्वानंदी गोवा निर्माण होईल. मात्र आजची परिस्थिती पाहता पुढच्या नऊ दहा वर्षांत आपण हे उद्दिष्ट गाठू शकू का, हा प्रश्न आहे. याचे कारण असे की, मूळचा गोवा आता शिल्लक उरलेला आहे असे वाटत नाही. मुक्तीपूर्वीचा गोवा आणि मुक्तीनंतरचा गोवा यात जमीन-अस्मानाचा फरक पडला आहे.

सोशल मिडीयावर १९६०सालातील काही दृश्ये दाखवली जातात. त्यात त्यावेळी गोवा कसा होता हे दृष्टीस पडते. कौलारू घरे आणि इमारती, अरुंद रस्ते, मर्यादित वाहतूक साधने, मर्यादित लोकसंख्या, परस्परांविषयी आपुलकीची भावना, खून, मारामाऱ्या, चोरी असे तुरळक अपराध घडणारे हे राज्य होते. शासकांचा वचक जनतेवर होता त्यामुळे अपराध करताना माणूस शंभर वेळा विचार करीत असे. अपराध्यांना थारा नव्हता.

आज लोकशाही प्रस्थापित झाली. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा घेतला गेला आणि इथेच सगळे बिघडले. अपराधांच्या बाबतीत हा सुंदर प्रदेश जणू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवाहात सामील झाला. कष्टाने मिळणारी शीत-कढी आता गोड वाटेनाशी झाली. चंगळवादी जीवनाची चटक लागली त्यासाठी गैरमार्गाने पैसा मिळवण्याकडे इथला माणूस वळला.

Goa Vision 2035 Saptasutra
Goa Weather Update: निसर्गाचा दुहेरी खेळ: गोव्यात उष्णतेची लाट आणि पावसाचीही शक्यता, नागरिक हैराण

आज कुठलेही वर्तमानपत्र उघडल्यास खून, मारामारी, चोरी, दरोडा, बलात्कार, फसवणूक, आत्महत्या, अग्नितांडव यांच्याच बातम्या ठळकपणे दृष्टीस पडतात. रस्ते चौपदरी झाले परंतु मनोवृत्ती संकुचित झाली. माणुसकी हरवली.

सत्तरच्या दशकात काही परदेशी पर्यटक इथे आले. इथला निसर्ग त्यांना आवडला. विदेशातून येणारे हे पर्यटक आधी सर्व मर्यादा पाळत होते परंतु नंतर हिप्पी संप्रदायाचे पर्यटक इथे येऊ लागले आणि पर्यटनाला गालबोट लागले. या हिप्पींच्या येण्याने त्यांच्याबरोबर ड्रग्स आले. आणि तेव्हापासून ड्रग्सचा व्यापार इथे सुरू झाला.

कॅसिनो, वेश्या व्यवसाय आणि ड्रग्सचा व्यापार हे झटपट पैसा मिळवून देणारे धंदे! याची चटक लोकांना लागली. वर्दळ वाढली. वाहनांची संख्या जबरदस्त वाढली. त्यामुळे अपघात वाढले. महागाईचे प्रमाण वाढले. यात सामान्य माणूस भरडला गेला. नवीन पिढीवर नको ते संस्कार होऊ लागले. प्रामाणिक माणसाला काही किंमत उरली नाही. सुसंस्कृत स्थितीकडून विकृत स्थितीकडे वाटचाल सुरू झाली. ध्येयवादी शिक्षक उरले नाहीत, आदर्श नेते उरले नाहीत, राजकारणाचे गजकर्ण झाले. त्यामुळे ध्येयवादी पिढी निर्माण झाली नाही.

आदर्शवादाची तुरळक उदाहरणे ओयासिससारखी कुठे कुठे दिसतात एवढेच समाधान! आंदोलने, मोर्चा, धार्मिक कलह यांनी इथली शांतता बिघडवली गेली. इथले सुंदर समुद्रकिनारे गलिच्छ झाले. नद्या प्रदूषित झाल्या. वनराईची कत्तल होऊन सिमेंटची जंगले वाढली. यालाच विकास समजला जाऊ लागला.

इथल्या शेतजमिनी, डोंगर परराज्यातील धनदांडग्यांच्या घशात गेल्या. आज याचे दुष्परिणाम दिसत नसले तरी भविष्यात इथल्या भूमिपुत्रांना फार मोठ्या संकटाशी सामना करावा लागणार हे निर्विवाद सत्य आहे. निसर्गावर केलेली कुरघोडी माणसाने मानली तरी निसर्ग मान्य करीत नाही आणि त्याचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागतात.

सर्वच क्षेत्रात आज भ्रष्टाचार माजलेला दिसतो. वैचारिक भ्रष्टाचार आणि आर्थिक भ्रष्टाचार हातात हात घालून चालू लागले आहेत. आज जे खून, मारामाऱ्या, बलात्कार, आत्महत्या, अग्नितांडवाच्या घटना आढळतात याचे मूळ या भ्रष्टाचारी वृत्तीत आहे आणि म्हणूनच डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी स्वानंदी गोवा निर्माण करण्यासाठी जो स्वप्न मार्ग दाखवला आहे तो मार्ग आपणाला सापडेल का हा प्रश्न मनात निर्माण होतो.

Goa Vision 2035 Saptasutra
Goa Politics: केजरीवालांबाबत भाजपकडून दिशाभूल! वाल्मिकी नाईक यांची आमदार साळकर यांच्‍यावर टीका

खरोखरच ‘व्हिजन २०३५’ अस्तित्वात आणायचे असेल तर सरकारला अधिक जागरूक आणि कठोर व्हावे लागेल. नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शहा यांनी जसे धाडसी निर्णय घेतले आणि त्यांची त्वरित अंमलबजावणी केली तसे धाडसी निर्णय घेऊन सर्व भ्रष्टाचारी लोकांना आणि अनैतिक धंद्यात गुंतलेल्यांना वेसण घालावे लागेल.

अपराधी मग तो कुणीही असो त्याला कायद्यानुसार आणि त्वरित शिक्षा करावी लागेल. प्रामाणिकपणे कष्ट करायला ज्यांची तयारी नाही त्यांना कोणत्याही सरकारी सुविधा आणि अन्य लाभ देणे बंद करावे. असे झाले तरच अधोगतीकडे चाललेला हे राज्य पूर्वपदावर येऊ शकेल. पण प्रश्न आहे तो म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?

जयराम रेडकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com