
दिगंबर कामत शपथ घेत होते, तेव्हा राजभवनात झुंबड उडाली होती, असे वृत्त साऱ्या माध्यमांनी दिले आहे. कामत आणि रमेश तवडकर आपली समर्थक मंडळी घेऊन राजभवनावर आले होते. परंतु यात मडगावातील तथाकथित प्रतिष्ठित मंडळी दिसली नाहीत.
ती जाहीरपणे तोंड दाखवत नाहीत, परंतु मग ते कामतांच्या घरी जाऊन हस्तांदोलन करून आले. यात मडगावमधील भाजपची जुनी मंडळी नव्हती. परंतु मडगावातील ‘पसरकारां’ना सत्तेवर असलेल्या प्रत्येकाकडे आपली जवळीक असावी, असे वाटते. काही काम उद्भवले तर त्यांच्या घरी जाण्याची सोय असावी, असे मानणारा हा वर्ग आहे. परप्रांतीयांना मात्र, सत्तेच्या सावलीत जीवन कंठणे सोपे जाते.
या शपथविधीपासून मनोहर पर्रीकरांना मानणारा वर्ग मात्र कटाक्षाने दूर राहिला. अगदी पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्तेही!
मी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याशी बोलत होतो. त्यांनी पर्रीकरांबरोबर काम केलेय. खेड्यापाड्यात फिरून त्यांनी लोकांची मने वळवण्याचे काम केले. मगोपबद्दल भ्रमनिरास झालेली बहुजन समाजातील मंडळी आपल्याबरोबर नेण्याची ही मोहीम बरीच वर्षे त्यांनी चालवली.
पक्षासाठी घाम गाळलेली ही पिढी. या नेत्याची प्रतिक्रिया होती, ‘पर्रीकरांनी ते जेथे कोठे आहेत, शरमेने मान खाली घातली असेल! कारण दिगंबर कामत यांनी केलेला दगाफटका पर्रीकारांना खोल जखम करून गेला. पर्रीकरांनी कामत यांना आपल्या बरोबरीचा नेता मानले होते, भावासारखे!’ परंतु ते मोठ्या भावासारखे वागत यात तथ्य आहे. काहीजणांना ती ‘घुसमट’ कशी वाटू शकते.
पर्रीकर आपल्या स्वभावाप्रमाणे पक्षातील साऱ्यांकडे ‘मोठ्या’ भावासारखेच वागत. ते थोडे फटकळही होते. भाजपची उमेदवारी मिळविताना दिगंबर कामतांना पर्रीकर कसे आहेत, हे माहीत नसण्याचे कारणच नव्हते. पर्रीकरांनी मोजक्या कार्यकर्त्यांबरोबर खस्ता खाऊन पक्ष उभारला. तेव्हा दिगंबर कुठेच नव्हते.
तेव्हा ते काँग्रेस पक्षाच्या सावलीत होते. कामत यांना कायम सत्तेच्या सावलीत राहायला आवडते. शिवाय ते व्यवसायाने कंत्राटदार. त्यांनी सत्ताधारी काँग्रेसला निकट राहून सत्तेचा लाभ घेतला. मडगावात त्यावेळी बाबू नायक प्रबळ. त्यांना निकट राहून ते एक नगरसेवक बनले. त्या काळात प्रतापसिंग राणेंशी त्यांचा संपर्क आला, त्यांना ते निकट राहिले.
कामत यांनी कधीही आंदोलनात्मक राजकारण केले नाही. ते कधी विद्यार्थी चळवळीत सामील झाले नाहीत. मडगावातील संघर्षात्मक नागरी चळवळीत ना कधी सामाजिक चळवळीत त्यांचा सहभाग दिसला.
उलट पर्रीकरांची प्रवृत्ती संघर्षात्मक राहिली. ते बॉर्न लीडर, त्यांची प्रवृत्ती लढवय्याची. शिंगावर घेण्याची. ते भूमिका घेणारे, बोलणारे नेते होते. तोंड झाकून सोयीचे राजकारण त्यांनी कधीही केले नाही. शिवाय संघाची मनोवृत्ती त्यांच्यात भिनली होती. साधी राहणी व मध्यमवर्गीय मानसिकता, म्हणजे चारित्र्याला जपणे. मनोहर पर्रीकरही व्यवसायामध्ये होते, परंतु कंत्राटदारी मनोवृत्ती त्यांच्यात नव्हती. त्यांनी निगुतीने व्यवसाय केला. राजकारणात त्यांची सरमिसळ होऊ दिली नाही. उलट चारित्र्य जपताना व्यवसाय मागे पडेल, याची पर्वा केली नाही.
पर्रीकर आणि कामत यांची प्रवृत्ती परस्परविरोधी होती. त्यामुळे नेमस्त दिगंबरांनी भाजपमध्ये अंग चोरून काम केले. कामत यांना माहीत होते, हा पक्ष रुजवला, जोपसला पर्रीकरांनी. परंतु कामत यांची महत्त्वाकांक्षा नेहमी पर्रीकरांना खटकत असे.
पहिल्यांदा पर्रीकरांनी कामतांना उमेदवारी दिली. त्यावेळी भाजपबरोबर असणाऱ्या मडगावातील उच्चभ्रू व्यावसायिकांनीच कामत यांचे नाव सुचविले होते. पहिल्या निवडणुकीत १९८९मध्ये कामत काँग्रेसच्यावतीने लढले, त्यांचा बाबू नायक यांनी पराभव केला होता. १९९४मध्ये कामत यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही तरी पक्षासाठी निवडणुकीत काम करेन अशी शपथ घेतली होती.
राम मंदिर आंदोलनाचा फायदा आपणाला होऊन हिंदू मतांचे ध्रुवीकरण होऊ घातले आहे, हे धूर्त कामत यांनी ओळखले होते. त्यांनीही भाजपच्या उमेदवारीसाठी लॉबिंग केले. या निवडणुकीत बाबू नायक यांनी संतोष रायतूरकरांना आपला नैतिक पाठिंबा दिला होता, तरीही कामत जिंकले. भाजपने दिलेली उमेदवारी त्यांना आमदार बनायला उपकारक ठरली.
दिगंबर कामत हे भाजपच्या पाठिंब्याने फ्रान्सिस सार्दिन यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारात पहिले मंत्री बनले. विशेष म्हणजे पर्रीकरांनी मंत्रिपद स्वीकारले नव्हते. आपल्या चारित्र्यावर डाग लागू नये, यासाठी ही खबरदारी.
परंतु सार्दिन सरकाराचे खरे धनी पर्रीकरच होते. सार्दिन यांच्या अर्थसंकल्पावर पर्रीकरांची छाप दिसते. या काळात पर्रीकरांची छबी आणखी चमकली व दिगंबरांचे राजकीय कर्तृत्वही. कामतांचे वीज खात्यातील काम खरोखरीच वाखाणण्याजोगे होते.
शिवाय त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा वापर मतदारांवर प्रभाव घालण्यासाठी केला. त्यांची मते वाढली. परवा प्रमोद सावंतांनी जे म्हटले, ‘भाजप सत्तेत असूनही विरोधी पक्षाची मानसिकता बाळगतो, भाजपला स्वतःसाठी सत्ता राबवता येत नाही.’, या गोष्टीचा येथे प्रत्यय येतो.
दिगंबर कामत व भाजपचे मूळ तिघे- जे पहिल्यांदा १९९४मध्ये जिंकून आले. त्यांच्यात हा मानसिक फरक होता. कारण पुढच्या निवडणुकीत पर्रीकर-कामत वगळता इतर सारे पराभूत झाले, पक्षाचे सर्वांत ज्येष्ठ नेते श्रीपाद नाईकही. दिगंबर कामतना सत्ता स्वतःसाठी कशी राबवावी, याची संपूर्ण माहिती होती.
हाच पर्रीकर आणि त्यांच्यातील मुख्य फरक असल्याने कामतांकडे ते संशयानेच पाहत. राजकीय तत्त्वांचाही हा भाग आहे, तोपर्यंत हा पक्ष वाजपेयी-अडवाणी यांनी खतपाणी घालून वाढवला होता व मध्यमवर्गीय चारित्र्यवान नेत्यांचा पक्ष म्हणून- काँग्रेससारख्या पुंजीपती व भ्रष्ट नेत्यांना पर्याय म्हणून त्यागाची भगवी शाल ते पांघरत.
त्यामुळे कामत यांनी पक्ष सोडला तेव्हा पर्रीकरांनी तो स्वतःवरचा हल्ला मानला. कारण कामत आता पक्षात बंडखोरीचा नवा पायंडा पाडणार होते. बंडखोरी करून सत्ताधारी पक्षात जाऊन मंत्री-मुख्यमंत्रिपद मिळविण्याचा घातक पायंडा!
दिगंबर कामत पक्ष सोडून काँग्रेसमध्ये जाण्याची चर्चा सतत चालू होती व पर्रीकरांनाही ती वार्ता अनेकदा अडचणीची ठरत असे. मनोहर पर्रीकरांनी अनेक मुलाखतींमध्ये आपल्या आयुष्यातील सर्वांत अधिक खटकलेली बाब म्हणजे दिगंबरांचा दगाफटका हेच असल्याचे नमूद केले आहे. शिवाय पक्षाचे ज्येष्ठ नेतेही सांगतात, दिगंबरांनी शपथेवर आपण पक्षाची निष्ठा सोडणार नाही, असे वचन दिले होते.
कामतांच्या एका अत्यंत निकटच्या नातेवाइकानेही कामतांनी पक्ष सोडला तर आपण प्राणत्याग करू अशी जाहीरपणे ग्वाही दिली होती. परंतु काही क्षणापूर्वी पर्रीकरांना शब्द देणारे कामत एका खाण चालकाच्या गाडीत बसून काँग्रेसच्या राजमार्गावर निघून गेले.
या घटनेनंतर पर्रीकरांनी कामत यांना कधीही क्षमा केली नाही. कामतांचे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये म्हणून त्यांनी जिवाचे रान केले. आपल्या निर्णयात पक्षश्रेष्ठींनाही हस्तक्षेप करू दिला नाही. भाजपचे सरकार येण्यासाठी कामतांना पक्षात घेण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्या असत्या तर पर्रीकरांनी खात्रीने राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली असती!
मी एका ज्येष्ठ भाजप नेत्यांशी बोलत होतो. त्यांनी गोविंद गावडेंचे उदाहरण दिले. गावडेंनी जाहीर वक्तव्य करून आदिवासी कल्याण खात्यावर शरसंधान केले असले तरी मुख्यमंत्र्यांवर तो निशाणा होता. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला हे खाते दिले नाही, आपल्याचकडे ठेवले, याचा त्यांना राग होता.
यावेळी पक्षाच्या गाभा समितीने सावंतांना बदनाम गावडेंना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. सावंतांनी त्या मानल्या नाहीत व दोन महिने पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची वाट पाहिली. नेत्यांच्या मते सावंतांनी ही कारवाई केली असती तर पक्षश्रेष्ठींनी फारसा हस्तक्षेप केला नसता. पर्रीकरांनी कोणाचेही ऐकले नसते. ते दुसऱ्या टोकाचे होते.
परंतु वागण्यात बाणेदारपणा होता व पक्षश्रेष्ठी त्यांना ओळखून होते. सूत्रांच्या मते पक्षश्रेष्ठी व मुख्यमंत्री यात कायम सुप्त संघर्ष असतो. पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्र्यांचे कायम पाणी जोखत असतात. परंतु हा समतोल व घटनात्मक पदाची प्रतिष्ठा राखणे मुख्यमंत्र्यांचे काम असते. पर्रीकर व कामत या दोघांच्या मुख्यमंत्रिपदावरील शैलीची तुलना करता पर्रीकरांनी सतत नवकल्पना आणलेल्या दिसतात.
तर दिगंबर यांनी लोकानुरंजक मुख्यमंत्री बनण्याच्या नादात राज्याचे अर्थकारण घरंगळत जाऊ दिले. अनेक मंत्री त्यांना डोईजड झाले. त्यामुळे सरकारची प्रतिमा खराब झाली. या काळात राज्यात प्रखर आंदोलनांनी उच्चांक गाठला होता.
परंतु कामत यांनी सर्वानुमते प्रादेशिक विकास आराखडा तयार केला व राज्याच्या वारसा-सांस्कृतिक मूल्यांना प्राधान्य दिले. परंतु हे सरकार राजकीयदृष्ट्या अनेक बाबतीत चुकीचे निर्णय घेत गेले. खनिज प्रश्न तर राज्याचे प्रचंड नुकसान करू लागला. या क्षेत्राने पर्यावरणाची अधोगती निर्माण केली- ती खाणचालकांच्या छत्रछायेखाली कामतांनी होऊ दिली.
कामत यांचे दैव बलवत्तर होते, म्हणूनच असेल कदाचित; जायका व खाण घोटाळ्यात ते तुरुंगात जाण्यापासून वाचले. त्याउलट पर्रीकरांची प्रतिमा सतत उंचावत गेली. जी अगदी शेवटचा काळ सोडल्यास नेहमी उजवी मानली जाते.
म्हणूनच कामतांसारखा पाच वर्षांचा काळ पूर्ण करू न शकताही बांदोडकरांनंतर पर्रीकरांचेच नाव घेतले जाते. भाजपमध्ये बंड करून गेलेले कामत काँग्रेसमध्ये वर्षभरात मुख्यमंत्री बनले हे पर्रीकरांना जास्तच खटके. कामतांचे सरकार पाच वर्षे टिकले. स्वतःचे टिकले नाही - या विचाराने ते सतत घायाळ होत!
कामतांबद्दल वाईट अनुभव असतानाही पर्रीकर विजय सरदेसाईंना का निकट गेले, हा प्रश्नही चर्चेला येतो. पर्रीकरांनी कामतांना स्पर्धक मानले विजयना नाही. विजयकडे त्यांनी ‘बच्चा’ म्हणूनच पाहिले. कामत नेहमीच त्यांना अधिक लोकप्रिय शिवाय स्पर्धक वाटले. खनिज निर्यातदार पर्रीकरांना नेहमी खुपत. त्यातील अनेकांना ते बराचवेळ बसवून ठेवत. मात्र, कामतांची मनोवृत्ती त्यांच्या कलाने घेण्याची होती.
मडगावमध्ये ज्या पद्धतीने कामत आपली मतदारसंख्या वाढवत चालले आहेत, त्याबद्दल पर्रीकर संतापाने बोलत. विशेषतः मोती डोंगरावरील खरुजासारखी वाढणारी झोपडपट्टी, त्यांच्या डोळ्यांना खुपत असे.
त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने दिलेली माहिती आजच्या सर्वच नेत्यांच्या डोळ्यांत अंजन टाकणारी आहे. पणजीतील १८ जून मार्गावरील शेर-ए- पंजाबसमोर बसणारा एक पानवाला, जे भाजपची सारी सर्वेक्षणे करीत-त्या यशवंत ठकारना निकटचा होता. पर्रीकरांनी पणजीत थुंकण्याच्या प्रवृत्तीविरुद्ध फर्मान काढले, त्यात पानवाले हटवले जाणार होते.
हा उत्तर प्रदेशातील पानवाला, ठकारांचा वशिला घेऊन मुख्यमंत्री बंगल्यावर आला. परंतु पर्रीकरांनी त्याला योग्य शब्दात सुनावले. तुम्ही युपीवाले भाजपचे पाठीराखे असाल, परंतु एक येताच आणखी पाचजणांना घेऊन गोव्यात येतात. आम्हांला असले मतदार नको आहेत.
दुसऱ्या बाजूला गोव्यातील सध्याच्या बहुतांश नेत्यांनी ज्या पद्धतीने आपल्या मतदारसंघात झोपडपट्ट्या वाढू दिल्या- ज्या पद्धतीने एकगठ्ठा मतदानाची तजवीज केली, ती सध्या गोव्याच्या अस्तित्वावर घाला घालते आहे. झोपडपट्ट्यांमधील मुले तरी सरकारी शाळेत जातात.
परंतु ज्या प्रकारे सध्या दिल्लीतील श्रीमंतांनी मोकळ्या जमिनीवर कब्जा करणे चालवले, ती गोव्यावरील आक्रमणाची एक नवीनच पद्धत आहे. बार्देशमधील उपजिल्हाधिकारी कार्यालयात सरकारी कृपेने कागदपत्रे तयार केली जातात. सध्या तर जाहीररीत्या कोमुनिदाद व सार्वजनिक जमिनी हडप करणाऱ्यांचे कायदेशीर समर्थन करणे सुरू आहे. पर्रीकरांचा आत्मा विव्हळत असेल.
परंतु ‘असले’ पर्रीकर अनेक वर्षांत एकदाच निर्माण होतात. शिवाय सध्याचे राजकारण संधिसाधूंनीच भरले आहे. मात्र काँग्रेस पक्षाची ३२-३५ टक्के मते अद्याप कायम आहेत. भाजपला तर कायम सत्तेवर राहायचे आहे. एकेकाळी प्रतिष्ठा व मानसन्मान याचे रक्षण करण्यासाठी नेत्यांना विरोधी पक्षात बसायला आवडे.
आज पक्षश्रेष्ठींनाही सत्ता सोडायची नाही. या पार्श्वभूमीवर पर्रीकरांचीही अडचण - गोची झाली असती. ते कालबाह्य ठरण्याची भीती होती. त्यामुळे काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये मोकळीक मिळते. भाजप मंत्रिमंडळात काँग्रेसजन वरचढ बनलेले आपण गेली १५ वर्षे पाहत आहोत, परंतु अवघे काही तत्त्वनिष्ठ, प्रखर निष्ठावान सोडून ते इतर कोणालाच अडचणीचे वाटत नाही!
मी याच भाजपच्या ज्येष्ठ नेत्याशी वाद घालू लागलो. तेव्हा तो म्हणाला, भाजपला सत्तेवर राहायचे आहे. आम्ही कामत यांच्याविरोधात कित्येक वर्षे स्थानिक भाजप नेत्यांना उमेदवाऱ्या देत आलो. शर्मद रायतूरकरांच्या पाठीमागे पर्रीकर सतत उभे राहिले. परंतु कामतांचा पराभव करणे मडगावातील भाजपला शक्य झाले नाही.
भाजपवाले स्वतःच्या हिकमतीवर बहुमत आणू शकत नाहीत. गोव्यात काँग्रेसी पठडीतील नेत्यांबरोबर तडजोड करावीच लागते. पक्षश्रेष्ठी कार्यकर्त्यांना उद्देशून हेच नवे तत्त्व सांगत असतात. तुमचे सरकार टिकले तरच पक्षाच्या मूलभूत धोरणाची कास धरणे आम्हांला शक्य होईल, तेव्हा आमच्या डावपेचांना साथ करा.
परंतु पर्रीकरांनी स्वतःचा डावपेच पुढे आणला नसता का? आपल्या स्वतःच्या तत्त्वावर विश्वास ठेवून त्यांनी जिवापाड मेहनत करून सरकारला नवे पाठबळ मिळवून दिले नसते का? पर्रीकरांनी हा पक्ष रुजवताना अनेक अनोळखी कार्यकर्ते उभे केले, अनेक नवखे चेहरे आमदार म्हणून जिंकून आणले, त्यांना मंत्री बनवले. पक्ष स्वतःच्या विचारसरणीवर उभा राहायला हवा, केवळ भगवे शेले पांघरून पक्षश्रेष्ठी सांगतात म्हणून वरवर मान डोलवणारे आयात केलेले नेते त्यांना नको होते. सत्ता त्यांना गोव्याचे भले करण्यासाठी हवी होती. गोवा विकून स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी नव्हे. आपल्या वैयक्तिक स्वार्थापेक्षा मूल्याधारित राजकारणावर त्यांनी अधिक विश्वास ठेवला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.