
मडगाव: मडगावच्या तमाम कार्यकर्त्यांचे लाडके ‘बाबा’ असलेल्या दिगंबर कामत यांना मंत्रिपद मिळाल्यावर आज त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे मडगावात जंगी स्वागत केले. त्यात आजी-माजी नगरसेवकांचाही समावेश होता. भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष रूपेश महात्मे यांनी स्वतः तासा वाजवून आपला आनंद साजरा केला.
१४ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर दिगंबर पुन्हा मंत्री झाले आहेत, त्यामुळे मडगावकरांचा १४ वर्षांचा वनवास संपला, अशी भावना त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करत असताना दिसत होते. मडगावच्या पिंपळकट्ट्यावर कामत यांचे न्यू मार्केट संघटनेच्या वतीने स्वागत करताना संघटनेचे अध्यक्ष गोपाळ नाईक यांनी तीच भावना व्यक्त केली.
दामबाबांच्या कृपेने आम्हा मडगावकरांच्या नशिबी मागची १४ वर्षे वनवास होता तो आज संपुष्टात आला, असे नाईक म्हणाले. गुरुवारी दुपारी मंत्रिपदाची शपथ घेऊन सायंकाळी कामत मडगावात आले. सर्वप्रथम त्यांनी फातोर्डा येथे दामबाब लिंग मंदिरात जाऊन श्री दामोदराचे दर्शन घेतले आणि नंतर ते पिंपळकट्ट्यावर आले. येथे त्यांच्या स्वागतासाठी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांच्या तोंडावर आनंद ओसंडून वाहत होता.
‘मी मंत्री नसतानाही मागची १४ वर्षे मडगावात आमदार म्हणून काम केले आहे. मी काय काम केले ते सर्वांना माहीत आहे. मात्र, मंत्री झालो तर मी अधिक अधिकारवाणीने काम करू शकेन, असे माझ्या कार्यकर्त्यांना वाटत होते. त्यामुळे मी मंत्री व्हावे असे ते देवाकडे मागत होते. देवाने त्यांची ही मागणी ऐकली,’ अशी प्रतिक्रिया कामत यांनी व्यक्त केली.
त्यांच्याबरोबर यावेळी त्यांच्या पत्नी आशा आणि पुत्र योगीराज हेही होते. लाडक्या बाबांचे स्वागत करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी भलामोठा फुलांचा हार आणला होता. तो कामत दाम्पत्याच्या गळ्यात त्यांनी घातला. मंत्री झालेल्या बाबांचे आपल्या मोबाईलवर फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जणू अहमिका लागली होती, असे येथे पाहिल्यावर दिसून येत होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.