Dhave: सफर गोव्याची! पणजीतून पहिली कदंबा ज्या गावी आली, सत्तरीतला पहिला मुक्तीसंग्रह जिथे सुरु झाला असे स्वातंत्र्यसैनिकांचे 'धावे' गाव

Dhave Sattari Village Goa: गावाबद्दल किती काय आणि कसं लिहावं? गाव म्हटलं की मी आठवणींच्या जंजाळात हरवून जातो.
Village Goa
Village GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गावाबद्दल किती काय आणि कसं लिहावं? गाव म्हटलं की मी आठवणींच्या जंजाळात हरवून जातो. आमच्यासारख्यांचा नोकरीधंद्यानिमित्ताने ज्यांचा गाव सुटतो, त्यांच्या मनात तर गाव अजून पक्कं घर करून वास्तव्यास असतो. माझ्या गावाबद्दल काय सांगावं?

गोवा मुक्तिसाठी सत्तरीतला पहिला संग्रह ज्या गावातून सुरू झाला तो माझा गाव, ज्या गावात गोविंद भट्ट भावे शास्त्री सारखे संस्कृतचे पंडित आणि थोर स्वातंत्र्यसेनानी जन्माला आले तो माझा गाव, मराठी संस्कृती कोशाची निर्मिती करणारे पं. महादेवशास्त्री जोशी यांचे आजोळ ज्या गावी तो माझा गाव,

यावर्षीचा प्रतिष्ठित असा साहित्य अकादमी पुरस्कार ज्या लेखकाला प्राप्त झाला त्याचा गाव तो माझा गाव, हो आणि गोव्यातील परिवहन सेवेतील क्रांती ठरावी अशी कदंबा वाहतूक सेवेची पहिली गाडी पणजीतून निघून ज्या गावात आली तो माझा गाव... होय धावे माझा गाव!

एक समृद्ध अशी परंपरा माझ्या गावाला लाभली आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी तर आमच्या गावात मांदियाळी होती. मी मोहन रानडे यांचे ‘सतीचे वाण’ हे पुस्तक वाचत होतो त्यात विष्णू वझे यांचं नाव वाचलं आणि मग लक्षात आलं....

हे तर भाऊ वझे ज्यांच्या घरी आपण दिवाळीचे पोहे खायला जायचो जे कित्येकवेळा आमच्या घरी बाबांसोबत गप्पा करण्यासाठी यायचे. आमच्या घरच्या वाटेला दादा जोशींच घर लागायचं ते तीन-चार वर्षे तुरूंगात होते ते मला कधीतरी क्रुरकर्मा मोंतेरोच्या गोष्टी सांगायचे.

प्रत्येक घरात एक स्वातंत्र्यसैनिक होता. आमच्या घरापुढील वायंगण वासू गावकार करायचा सर्वजण त्याला ‘मिशाळो’ म्हणायचे धिप्पाड शरीरयष्टी…वाळवलेल्या मिशा.. तो ही स्वातंत्र्यसैनिक. त्याला पाहून पोर्तुगीजांचे पोलिस नक्कीच घाबरले असतील. कधी विनायक जोशींच्या घरी गेलो, की ते शिकारीच्या गोष्टी सांगायचे.

त्यांच्यासारखा गावठी औषधे माहिती असणारा तर पंचक्रोशीत कोणी नव्हता. गोव्याच्या आणि महाराष्ट्राच्याही विविध भागातून लोक त्यांच्याकडे गावठी औषधे नेण्यासाठी यायचे. आईने मला सांगितलेली एक गोष्ट तर खूप हृदयस्पर्शी आहे. आमचं घर बागीत म्हणजे बाकिच्या गावापासून बरंच दूर अगदी एकांतवासात पण माझा जन्म झाला त्या दिवशी घरी गावचे भूषण गोविंदभट्ट भावेशास्त्री आले होते.

Village Goa
Agonda: सफर गोव्याची! स्वच्छ किनारा लाभलेले, लोककलेचा वारसा जपणारे 'आगोंद'

ज्यांनी या गावात पाठशाळा सुरू व्हावी म्हणून खूप कष्ट घेतले, ज्यांच्या प्रेरणेतून धाव्यात लोकांनी सत्याग्रह केला जो आजही इतिहासात ‘धावण्याचा सत्याग्रह’ म्हणून प्रसिद्ध आहे. पं. महादेवशास्त्री जोशी यांचे आजोळ आमच्या गावी आणि त्यांचे आजोळ ज्या घरात त्याच घरात नंतर माझी चुलत बहीण लग्न करून दिली होती.

त्यांचे आत्मपुराण वाचताना ते शिकायला काही वर्षे आमच्या गावात येऊन राहिले होते, त्यामुळे आमच्या गावातील अनेक आठवणी त्यात आहेत.त्या आठवणी वाचताना मी खूप सुखावतो. गावचा सुपुत्र डॉ. प्रकाश पर्येकर याला प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

Village Goa
Dharbandora: सफर गोव्याची! थंडीत रंगणारा धालोत्सव, मांडावर येणाऱ्या ‘रंभा; धारबांदोड्याच्या आठवणी

कै. ॲड. अविनाश वझे जे प्रख्यात वकील गोवा लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होते ते ही आमच्या गावचे प्रसिद्ध उद्योजक उदय जोशीही आमच्याच गावचे अशी कितीतरी नावे सांगता येतील ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने गावाचे नावही उज्ज्वल केले आहे.

प्रा. डॉ. विनय बापट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com