Curti: सफर गोव्याची! झाडांची गच्च सावली, मातीच्या सुगंधात आठवणारे 'कुर्टी'

Curti Village Goa: गावचे शेतकरी जे काही शेतात पिकत असे ते सर्व काही फोंडा येथील आठवडी बाजारात अथवा म्‍हार्दोळ मंगेशीच्या बाजारात जाऊन विकत आणि आपला गुजारा चालवित.
Curti Village Goa
Curti Village GoaDainik Gomantak
Published on
Updated on

कुर्टी हा गाव फोंडा शहराच्या कुशीचा गाव. लहान बाळजसा आईच्या कुशीत असावा तसा हा गाव. या गावची ख्याती पसरली ती दुग्ध वितरण व्यवस्था पाहणाऱ्या सहकारी तत्वावरील मोठ्या कंपनीच्या अर्थात गोवा डेअरीच्या नावावरून. तत्पूर्वी या गावचे शेतकरी जे काही शेतात पिकत असे ते सर्व काही फोंडा येथील आठवडी बाजारात अथवा म्‍हार्दोळ मंगेशीच्या बाजारात जाऊन विकत आणि आपला गुजारा चालवित.

अशा या कुर्टीत आमच्या वडिलांनी नवीन घर घेतले. आम्ही रामनाथी सोडून येथे आलो. त्यावेळी फोंड्याहून केरी-सावईवेरे जाणारा एकच डांबरी रस्ता. बाकी आतले रस्ते मातीचे. शाळेला जाताना याच लालमातीच्या रस्त्याची साथ होती.उघड्या पायाने, खाकीत दप्तर घेऊन आम्ही या मातीच्या रस्त्यावरून बिनधास्त चालत जात होतो. त्यावेळी पायाला फक्त माती लागत असे. पण आता डांबरी रस्त्यावरून जाताना ती लागत नाही.

कुर्टी गाव त्यावेळी अविकसित होता. फक्त एक दुग्‍ध वितरण फॅक्टरी, वीजखाते, सीएमएम फॅक्टरी, अन् काही छोट्या मोठ्या कंपन्या, ज्यात कामावर जाणारे, येणारी कामगारांची वस्ती या कुर्टी गावात या गावाचे पोट चालवणारे मुख्य शहर फोंडा. त्यामुळे फोंडा शहरातील आठवडी बाजारातील सामान विक्रेते हे ज्यादा करून फोंड्याच्या आजूबाजूचे असले तरी कुर्टी गावातील सर्व जातीचे धर्माचे लोक एकत्र येऊन बुधवारचा बाजार गजबजून जाई.

सकाळी सायकलने जाणारे अन् बाजार घेऊन कुर्टी गावात सायकलने येणारे अनेक गावकऱ्यांना आम्ही लहान असताना न्याहाळत असू. लहान असताना आईचा हात धरून आम्ही मिलिटरीच्या भिंतीला बघत मारूती मंदिराकडे येत असू. बाजारातून सामान घेऊन सर्वजण मग सायकल अथवा गाडीने पुन्हा गावात पोचत असू. वाटेत तहान लागली तर कुणाच्या घरातून पेलाभर पाणी मागून तहान भागवायची. पण आतातर त्या घराकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेला बघून खूप दुःख होते.

Curti Village Goa
Querim Ponda: सफर गोव्याची! 4 डोंगरांनी वेढलेले, निसर्गाचा वरदहस्त लाभलेले 'केरी-फोंडा'

एकवेळ पाणी देणाऱ्याचा धर्म आमची आई बघत नसे, पण आज सार उलटं झालेले पाहून खंत वाटते. तरीसुध्दा या गावाबद्दल/मातीबद्दल जिव्हाळा आहे. पूर्वीचे शाळेतील कॉलेजमधील मित्र-मैत्रीण आईबाबा झाले तरी भेटल्यावर जुन्या आठवणी काढून मनमुराद बोलतात. बदलणे हा निसर्गाचा समाजजीवनाचा एक भाग आहे.

Curti Village Goa
Vajari: सफर गोव्याची! पांडवकालीन इतिहासाचा वारसा सांगणारे, निसर्गसंपन्न 'वजरी'

तरीही बदलत्या या मानवी भावना, मानसिकता, व्‍यवहार यामध्ये एक चिरंतन गोष्ट राहते. अन् ती म्हणजे मानवता. आमच्या कुर्टी गावात माणसं जशी मोठमोठ्या बंगल्यात राहतात. तशीच ती निसर्गाच्या सान्निध्यातही राहतात. त्यामुळे शेतीतील जंगलातील हिरवाई मनाला गारवा देऊन जाते. कुर्टीमधून तुम्ही जेव्हा सावईवेरेच्या रस्त्याला लागताच त्यावेळी झाडांची गच्च सावली तुमच्यावर छत्री धरून चालत असल्याचा भास होतो. मुद्दाम या अनुभवासाठीच मी माझ्या गावाच्या या मातीचा सुगंध या चार शब्दात मांडू शकतो.

विनोद नाईक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com