मांडवी-जुवारीचा एकोपा ठेवणारे कुंभारजुवे बेट

Cumbarjua island Goa history: आज कुंभारजुवे बेटावर पूल आणि फेरीबोटीने प्रवास सुखकर झाला आहे. मात्र त्या बेटासभोवारील चार नाविक तारींचा रस्ता कालबाह्य झाल्याने माणसाचे नदीकडील नाते हरवले आहे.
Cumbarjua island Goa
Cumbarjua island GoaDainik Gomantak
Published on
Updated on

आज कुंभारजुवे बेटावर पूल आणि फेरीबोटीने प्रवास सुखकर झाला आहे. मात्र त्या बेटासभोवारील चार नाविक तारींचा रस्ता कालबाह्य झाल्याने माणसाचे नदीकडील नाते हरवले आहे.

निसर्ग हा चित्रकार आणि संगीतकार आहे, तो गातोही. हवा, पक्षी, पाणी, नद्या, झरे, ओहळ, जनावरे, प्राणी, कीटक, वृक्ष हे त्याचे घटक विणा, सारंगी, सतार, पेटी, तबला, मृदंग, पखवाज, ढोलकी, शहनाई अशा वाद्याचे स्वर काढून त्याने संगीत निर्माण केले. वृक्ष, वेली, पाणी, गवत, रोप, झुडपे, पाने, फुले, फळे, पाऊस, ढग, गडगडाट, वीज, सुनामी यांच्याकडून शिक्षण घेऊन माणसाने नृत्य कथ्थक, भरतनाट्य, तालगडी गोफ, फुगडी, धालो अशा कलेत प्रावीण्य मिळवून आपला विकास साधला.

निसर्गाने एकगठ्ठा भूमीचे तुकडे करून तिला अलिप्त केले. त्याने तिचे खंड झाले. अशा प्रकारे सागर, पर्वत, नद्या, डोंगर यांच्यात परिवर्तन घडून त्यांच्यात बदल झाले. आपल्या गोव्यात प्राचीन काळी समुद्र आणि पश्‍चिम घाट यांच्यात धरणी कंपाने उलथा पालय होऊन गोवा सात भागात विभागून सात नद्यांचा जन्म झाला. त्याचा केंद्रबिंदू मांडवी, जुवारी नद्यांचे मुख असल्याने पश्‍चिम घाटाचा काही भाग कोसळून समुद्रात ढकलला गेला.

Cumbarjua island Goa
Goa Municipal Elections: पालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये? कायद्यात दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मंजुरी; वटहुकूम लवकरच जारी होणार

त्याने मांडवी आणि जुवारीची मुखे वेगळी झाली. तरी त्या दोन बहिणींनी आपले नाते तोडले नाही. त्यांनी बाणास्तरी नदीला जन्मास घालून आपले नाते अबाधित ठेवले. मात्र त्यांचा वाहण्याचा मार्ग तिसवाडी या सर्वांत मोठ्या बेटाने वेगळा झाला. विशाल मांडवीने आपल्या पात्रात कुंभारजुवा, जुवे (सान्तईस्तेव) आखाडा, दिवाडी, वाशी, चोडण, कालवी आणि पोनाळे, खोर्जुवे या पालवी आठ तुकड्यांना आपल्या पात्रात सामावून घेतले.

विद्वान मानवाचा रस्ता बंद करून वाहणाऱ्या चिंचोळ्या पात्रातून येण्या-जाण्यास वाट मोकळी ठेवली. बुद्धिमान माणसाने लाकडी ओंडक्याचा आधार घेऊन त्या आठ बेटावर पाय ठेवला आणि त्या निसर्गरूप स्थळांवर माननीय विकासाला सुरुवात झाली. त्या आठ बेटावर मांडवीने आपल्या प्रवाहातून आणलेले गोड पाणी आणि मुखातून आत येणारे खारे पाणी थोपवून धरण्याचे काम या बेटावर सोपवले. त्यात महत्त्वाचे काम कुंभारजुवा बेट करते. जवारीच्या मुखाकडून येणारे समुद्रीय खारे पाणी हे बेट थोपवून धरीत गोड पाण्यात त्याचे मीलन घडवते. या बेटाची रचना मांडवीच्या तीन उपनद्यांनी केली आहे.

खांडोळा आणि सान्तईस्तेव गावामधून वाहणारी नदी तिवरे -जुवारवाडा परिसरात धावजीकडून येणारी गवंडाळी उपनदीत संगम घेऊन तिचे बाणस्तारी नाव धारण करते. पुढे भोम, करमळी, कुंडई, आजोशी, मडकई, मंडूर, डोंगरी, नेवरा, आगशी गावांच्या शेत जमिनीतून प्रवासाने पिलार, मडकई-टोक भागात जुवारीस मिळते. गवंडाळी ‘रामाची तार’ भागातून जाणारी उपनदी सान्तइस्तेव आणि कुंभारजुवा वाडसा शेतामधून प्रवास करीत माडपय भागात खांडोळा उपनदीस मिळते.

तीन उपनद्यांच्या संगमाने कुंभारजुवे बेटास उपनद्यांच्या परिक्रमेने वेढून लंबकार बेटाची निर्मिती झाली आहे. हे बेट जरी आकाराने लहान असले तरी त्याला उत्तर-दक्षिण दिशांनी बरीच लांबी आहे, पूर्व-पश्‍चिम दिशांनी ते कमी प्रमाणात रुंद आहे. या बेटाला कांदळवनाचा वर्तुळाकार किनारा लाभला आहे.

Cumbarjua island Goa
Goa Tourism: जानेवारी, फेब्रुवारीत पर्यटक 'फुल्ल'! मार्चला 'युद्धा'चा फटका; गतवर्षीच्या तुलनेत पहिल्‍या तिमाहीत 32,500 पर्यटकांची वाढ

या बेटावरील शेतजमीन वर्षभर हिरवळीने नटलेली पाहावयास मिळते. पावसाळ्यात भातपीक मोठ्या प्रमाणात पिकते. बेटावरील शेती, खाजन असल्याने कळगुट, आजगो, खोचरी, मुणे, नेरमार जातीचे बियाणे वापरून व पाळीव जनावरांचे शेणखत वापरून स्थानिक लोक भात पिकवीत होते. हिवाळा, उन्हाळ्यात मिर्ची, कांदा, मुळा, लालभाजी, वांगी, भेंडी, तेणली, नावलकोबी, मका या भाज्यांच्या मळ्यांनी सर्व शेतात हिरवळ दिसायची.

कुंभारजुवे बेट जरी नदीत असले तरी चूरन, कणेर, भेसड, करवंद, बकुळी, जांभूळ, आवाळी, चिंत, आदम, आंबा, फणस, काजू, नारळ असा रानमेवा आणि जीवनास लागणारी फळे या बेटाने मानवास दिली आहेत. पावसाळ्यात मिळणारी काकडी, दोडगी, भेंडीचे मळे तयार केल्यावर या बेटाला श्रावणमासी हर्ष भरायचा. कुंभारजुवेची काकडी गोव्यात फार प्रसिद्ध आहे.

मला माझ्या बालपणाची आठवण झाली. मराठी पाचवी शिकण्यासाठी मी खांडोळा गावाकडून कुंभारजुवे चालत जात होतो. त्याकाळी होडीतून नदी पार करावी लागे. शाळा दोन वेळा असल्याने सकाळी जेवण घेऊन जावे लागे. सात बेटांचे मांडवी पात्र असल्याने खारे आणि गोड पाण्याच्या मीलनाने या बेटामधील पाण्यात शेवटा, काळुंद्र, खरचाणी, तामसा, पालू, तुडूशी, शेतुक, करकरा, चोणकूल, मुत्रा, लेप धोडयारा, बुराटा, झिंगे, खेकडे, घोळशी, मुटका, भेगुंल्ली अशी रुचकर मासळी मिळण्याचे हे नदीचे जाळे आहे.

तिथला मच्छीमारी समाज जाळी, वेणी, काटाळी, खुटावणी जाळ अगर रात्री दिपावणी करून मासळी पकडून आपले संसार चालवतात. या बेटाला शेतीच्या रक्षणासाठी पूर्वजांनी सहा मानसा उभारून खाऱ्या पाण्याला थोपवून धरले आहे. त्या मानशींना जाळे लावून मोठ्या प्रमाणात मासळी पकडतात. संपूर्ण बेट जरी खाऱ्या पाण्याने वेढलेले असले, तरी दाट लोकवस्ती असलेल्या लोकांच्या घराकडील विहिरींना गोड पाणी मिळते. या बेटावर प्रत्येकाच्या घराकडे विहीर पाहावयास मिळते. बेटावरील माटीर भागात मॅगनीस, खाण होती.

हे बेट तळपवाडा, सुरचेभाट, गोळवाडा, खडपवाडा, मळपवाडा, तारीवाडा आणि गावात भागांनी ओळखले जाते. कुंभारजुवा बेटावरून जाण्यायेण्यास चार जलमार्ग होते. गवंडाळी तार, माशेल तार, वाडशाची तार आणि उदाभाटी तार. पोर्तुगिजांनी तिसवाडी, जरी प्रथम जिंकले, तरी त्या बेटावर त्यांचा प्रभाव कमी प्रमाणात दिसतो. कारण तिथे हिंदू संस्कृती आजही पाहावयास मिळते. हिवाळ्यात साजरा होणारा धालोत्सव सात वाड्यावर आजही साजरा होतो. धालोत्सव खेळताना सौभाग्यवती स्त्रिया, कांदळ, बकुळ, अडुळसा, अंबोली फुलांच्या माळा माळून धालोत्सव साजरा करतात. तसेच पुरुष मंडळी शिगमोत्सव सांगोड मोठ्या उमेदीने पार पाडतात.

तिथल्या जाणकारांकडे कुंभारजुवेकरीण शांतादुर्गा देवीची माहिती जाणून घेतली. श्रीशांतादुर्गा देवीचे प्रथम मंदिर धुळापी मानगाद या ठिकाणी होते. पोर्तुगिजांच्या भीतीपोटी पूर्वजांनी देवीची मूर्ती कुंभारजुवे बेटावर आणली. तरीही पोर्तुगीज देवीच्या मूर्तीवर एखाद्यावेळी अतिक्रमण करतील याची भीती होतीच. म्हणून ती मूर्ती वरगाव गावातील माशेल ठिकाणी पुनर्स्थापित करून त्या ठिकाणी भव्य मंदिर उभारलेले पाहावयास मिळते. त्या देवीवर बेटावरील लोकांची अपार श्रद्धा आहे. कुंभारजुवे-बेट जरी लहान असले तरी प्राचीन काळी ते मोठे व्यापारी बंदर होते. त्या बेटावर अनेक श्रीमंत लोकांची मोठमोठी नक्षीदार घरे पाहावयास मिळतात.

आज कुंभारजुवे बेटावर श्रीराम, रामय सती, हनुमान, महादेव, साईबाबा मंदिरे स्थापन करून त्या बेटाला भक्तिमय स्वरूप आले आहे. बेटावर शैक्षणिक संस्था असून तिथल्या मुलांनी त्या हायस्कुलात शिक्षण घेऊन ते मोठमोठ्या हुद्द्यावर पोहोचले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळीही डॉक्टर, ऍडव्होकेट, लेखक, संगीतकार, भजनी कलाकार, व्यापारी, इंजिनिअर, शिक्षक आणि स्वातंत्र्यसैनिक होऊन गेले. पोर्तुगीज राजवटीत १९६०-६१ सालात खांडोळा गावात मला मराठी दुसरी, तिसरी शिकवणारे मुकूंद शेट हे कुंभारजुवे गावचे होते. ते स्वातंत्र्यसैनिक होते, हे आम्हा मुलांना नंतर समजले. तसेच मला रंगमंचावर प्रथम आणणारे संगीत दिग्दर्शक शिवा मोरे कुंभारजुवेचे होते. त्यांच्या दिग्दर्शनाखाली मी अनेक नाटकांतून भूमिका साकारल्या. शिक्षणात आणि नाट्य कलेत ते माझे गुरुवर्य आहे.

पूर्वीचे निसर्गसंपन्न कुंभारजुवे बेट आज मानवाच्या विकासाने बदलताना दिसत आहे. आज कुंभारजुवे बेटावर पूल आणि फेरीबोटीने प्रवास सुखकर झाला आहे. मात्र त्या बेटासभोवारील चार नाविक तारींचा रस्ता कालबाह्य झाल्याने माणसाचे नदीकडील नाते हरवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com