
निसर्ग चळलाय. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’, हे सृष्टीचे कवतिक कधीच ओसरलेय. अवेळी, अवकाळी पावसाने सृष्टिचक्र, मोसम, ॠतू धुऊन नेलेत. उन्मळून पडले असे अनेक शब्द. वाहून गेलीय पर्यावरणीय संरचना. हेच घडतेय सांस्कृतिक क्षेत्रातही.
धालो, झळाळून पेटत्या पाच वातींचा जुना पुराणा लामणदिवा व असोला नारळ. इंत्रुज - आपल्या शिगम्याचीच याद येते. तिसवाडीतील डोंगरी पंधराव्या शतकाच्या प्रारंभीच पोर्तुगिजांच्या तावडीत आल्यानंतर तेथील शिगमा बंद पाडण्यात आला. गावातील काही चतुरांनी इंत्रुज नावे तेच विधी, तोच उत्साह, तसाच उत्सव साजरा करण्याची परवानगी शासनाने त्वरित इंत्रुज अभिधान असल्याने त्वरित मंजूर झाली. होत राहिला शिगमा, त्या तिथे डोंगरी इंत्रुज या नावाने.
कणसां फेस्त, चांदरचा मुसळां खेळ, दांडलां, तालगडी, राखणदाराला सोरो-रोंट, पूर्वाश्रमींच्या देवतेला अमृतपड, कुठे मासळी, कौल-प्रसाद,धर्मच्छलांत परागंदा देवतांचे स्मरण, जागोर-इंत्रुजसाठी देंवचारासह पूर्व देवतांना पारंपरिक गीताद्वारा आवाहन, नमन. प्रसंगी नारळ-विडा, तेलाचा दिवा, पेटती पणती. रूढी, प्रथा, विश्वास अन् भ्रमही.
पंधराव्या शतकातील विविध सांस्कृतिक मुद्रा चिकटून होत्या येथील ख्रिस्ती समाजात. सुमारे पाचशे वर्षे परधर्मात राहूनही न सुटलेल्या. नाही तुटल्या. हे आज किती जणांना माहीत असेल? सत्तरच्या दशकात प्रत्यक्ष बघितलेले, अनुभवलेले. सासष्टीतील कोंसुआ, वेर्णा, नुवें या किमान तीन ठिकाणी हे सारे तसेच चालू राहिले. अगदी अलीकडच्या काळापर्यंत. पण गावांची नावे देणे टाळायला हवे. कारण?
गाव कळंगुट-म्हाड्डावाडो. तेथे जागराचा मांड दोन खणी गाभारा व चौक लाभलेल्या छोट्या मंदिरागत चर्चमध्ये गावकऱ्यांची सकाळी प्रार्थना. तेथून मांडावर. घुमट, म्हादळे, कासांळे अशा वाद्यसाथीत मंत्रपठण व्हावे तसे गीताद्वारा गावातील सर्व देव, दैवते, देवचार यांना साद घालायचा ‘जागराला या-या‘. सायंकाळी जागोर आविष्करण. परंपरेनुसार सार काही.
साप्ताहिक सदरात सविस्तर लिहिले गेले एका इंग्रजी दैनिकात. पुढल्याच वर्षी चर्चमधून पाद्रीबाबांचा गावकऱ्यांना फतवा आला, ‘तुम्हांला कोकण्या देवांना आमंत्रण करायचे असेल तर प्रार्थनेसाठी चर्च कायमची बंद‘. जागर बंद पडला तो कायमचाच. अजून काही विधी होतात, पण सायंकाळी होतो तो तियात्र खेळ.
आपला धालो महिलांचा, शिगमा पुरुषांचा. मांड हे अधिष्ठान. तेल वातीने झळझळून पेटलेला लामणदिवा असतो साक्षीला, खास करून कुणबी गावडा समाजात. धालोत काळपट, मातकट, रंग ल्यालेला पेटता लामणदिवा व असोला नारळ ‘म्हणाय‘ या लाकडी पाटावर दोन्ही प्रतीके बसतात. दोन बाजूंना बायकांच्या फाती मागेपुढे डोलत असतात त्या लामणदिव्याच्या प्रकाशात.
आमगेल्या मांडारी पेटयला दियो
त्या दिया पाया तुम्ही पोडाय गे
आयच्यान धालो कोराय गे
हे प्रारंभ गीत नमनाचे. प्रत्यक्ष नमस्कार नाही घडत. अभिव्यक्त होतो गीतमाध्यमातून. मग धालोतल्याचसारखे काही खेळ. प्रत्येक रात्री ‘काण्णावर पाय‘ मारल्याखेरीज त्या रात्रीचा धालो थांबत नाही. ही प्रथा. चोवीस-सव्वीस ऑक्टोबर, तीन दिवस हा धालो उत्सव होतो मांडावर. काही कारणास्तव धालो झाल्या नाहीत तर पुरुषांचा ‘इंत्रुज‘ होत नाही. नमूद व्हावे.
इंत्रुज हा शिगमाच. आजच्या कार्निवालचे दिवस मुळात इंत्रुजचे. कार्निवाल ब्राझिलमधून आयात केला गेलेला. गोवामुक्तीनंतर थोड्याच वर्षात पणजीतील काही पोर्तुगीज वा पाश्चिमात्य संस्कृती प्रेमी, तत्कालीन धेंडांनी. इंत्रुजची एन्ट्री आणि सांगता मांडावरती. तोच तो लामणदिवा. पाच वाती पेटवत मांडावर माटवांत टांगलेला. साखर नव्हे गुळाचीच शिरणी, पावळी, आंगवण. सारे काही तेच-तसेच. नमन. चर्च-कपेल समोरील व गावातील घरांच्या अंगणात मेळ प्रमाणेच होणारे खेळ. सांगायलाच हवे असे.
येदी येदी सांगशी सांबराची
तेतुत आसा सायबीण भांगराची
दुसरीकडे सायबीणच्या जागी ‘सांतेर‘ विराजते.
शेवते झाडाच्यो लांब ताळ्यो,
शेवते फुलकळ्यो
गीतपंक्ती जशाच्या तशा पूर्ण दक्षिणेत. काणकोण ते मुरगाव. धर्म भेद बाजूला ठेवून गायल्या जाणाऱ्या.
धर्म व्यक्तीचा, फार तर कुटुंबाचा असतो. गोव्यात तर तो परधर्मच. संस्कृती त्या मातीची. या तांबड्या मातीशी इमान राखणाऱ्या संपूर्ण मानववंशाची, जातीची, धर्माची, पंथाची. म्हणूनच असेल कदाचित, गोव्यातला ख्रिश्चन जगभरात कोठेही असो, चिरनिद्रा या मातीतच घ्यायची असते त्याला. जुलूम, जबरदस्ती, धर्मच्छल, मंदिर विध्वंस, देवता स्थलांतर सारे सोसून, सहन करूनही पूर्वाश्रमींच्या सांस्कृतिक कलात्मक आविष्करणासह गतीविधींचे जतन केलेला हा समाज. याद व्हावी असे, प्रसिद्ध चित्रकार मारियो मिरांडा सांगायचा ‘मी सरदेसाई‘. त्याची शेवटची इच्छा. दफन नव्हे दहन झाले.
धार्मिक व सांस्कृतिक छळ किती सहन केला या समाजानं. गणती नाही. इन्क्विझिशनच्या यमयातना. सोळा हजाराहून अधिक गोमंतकीय, नव ख्रिस्तींनी गमावलेला जीव. पण यातूनही कायम टिकून राहिली गोव्याची, या मातीची संस्कृती. शतकी वर्षे गोव्यावर राज्य करणाऱ्या पोर्तुगिजांचा, त्यांच्या ‘कल्चर’चा पराभव करीत.
या मातीची संस्कृती जपत सुखेनैव सारे चालू होते. तसेच पूर्वीप्रमाणे पूर्वाश्रमीच्या संस्कृतीतून जपत आणलेले. यावर बंदी आली नाही; अगदी पोर्तुगीज काळातही. कारण? चर्चमध्ये येणारा पाद्रीबाबा याच मातीचा. संस्कृती मुशीतून जन्मलेला तो. धर्म दीक्षा घेऊनही वार्षिक गुणसूत्र सर्वांगी भिनलेला. म्हणूनच हे चालू होते. मुक्तीनंतरची बरीच काही वर्षे.
अखेर जे व्हायचे ते झाले. ‘सेक्युलरिझम’ नावाच्या अधर्मी भुताने पछाडलेला जमाना आला. आणि त्या काली धार्मिक शिक्षण घेतलेला, धर्मदीक्षा घेतलेला फादर चर्चमध्ये आला. जन्म, विवाह, मृत्यू यांखेरीज कधीही चर्चमध्ये न जाणारा, मरणानंतरचे धार्मिक विधी होणार नाहीत या भीतीने केवळ त्या पाद्रीबाबाच्या फर्मानाला बळी पडला. तेलाचा दिवा लावला जातो म्हणून अशा सांस्कृतिक ग्रस्तांना मांडावर जायचीच बंदी घातली. सांस्कृतिक गतीविधी धोक्यात. हाच तो काळ.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.