Coconut: ..रावणाने भगवान शिवास आपली 10 शिरकमले अर्पण करण्यास प्रारंभ केला! समर्पणाचे प्रतीक 'नारळ'

Coconut Significance: गावातील आराध्य दैवतासमोर केलेल्या आवाहनानुसार आपले इच्छित ध्येयपूर्ती झाल्याबद्दल नवसफेड करताना नारळ फोडतात किंवा अर्पण केला जातो.
Coconut Significance
Coconut Significance GoaDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय धर्म, संस्कृतीत नारळ या फळाला अनन्यसाधारण महत्त्व लाभले आहे. आपल्या आराध्य दैवताला प्रसन्न करून घेण्यासाठी इथल्या लोकमानसात शेकडो वर्षांपासून नारळ अर्पण करण्याची परंपरा रूढ आहे. कधीकाळी देवतेला प्रसन्न करून तिचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी भाविक आपले शिरकमळ धडावेगळे करून अर्पण करण्यापर्यंत मजल गाठायचा.

रामायणकालीन सम्राट रावणाने भगवान शिवाची आपणास अक्षय कृपादृष्टी लाभावी म्हणून चक्क आपली दहा शिरकमले अर्पण करण्यास प्रारंभ केला आणि शेवटचे शिर अर्पण करण्यास सिद्ध असताना त्याच्यासमोर शिव प्रकट झाल्याची कथा प्रचलित आहे. आराध्य दैवताला प्रसन्न करण्यास नरबळीची प्रथा जगभर वेगवेगळ्या संस्कृतीत रूढ होती. भारतातही नरबळी प्रथा प्रचलित होती. कालांतराने जेव्हा प्रशांत महासागरातील कोको बेटावरून सागरी पाण्यातून नारळ पोहोचला आणि माडाची लागवड इथे रूढ झाली.

त्याबरोबर नारळाचा जेवणखाणात वापर सुरू झाला, तेव्हा असोला नारळ सोलताना त्याला असलेला मानवी कवटीसारखा आकार आणि तीन डोळे, त्याच्या भोवताली केसासारखे आवरण, फोडल्यावर त्यातून ओतणारे पाणी, खोबरे या साऱ्यातून नरबळीला समर्थ पर्याय मिळाल्याची धारणा निर्माण झाली. त्यामुळे शिरकमळ अर्पण करण्याऐवजी नारळ फोडण्याची किंवा अर्पण करण्याची परंपरा प्रचलित झाली असावी. श्रावणात येणाऱ्या पौर्णिमेनंतर मान्सूनच्या कोसळणाऱ्या पावसाचा जोर कमी होत जातो.

वादळी वारे तसेच प्रलयकारी सागरी लाटांचे तांडवही शिथिल होऊ लागते आणि त्यामुळे मासेमारी मौसमाला प्रारंभ करण्यासाठी मच्छीमार समाजाला पोषक हवामानाबरोबर विपुल माशांची पैदास झाल्याने

मासेमारी सुरू केली तर ती लाभदायक ठरणार असल्याची खात्री असते आणि त्यासाठी नारळी पौर्णिमा हा पर्वदिन ठरतो. या दिवशी समुद्राला देव मानून नारळ अर्पण करण्याची परंपरा गोवा कोकणात रूढ आहे. नारळ हे श्रीफळ मानलेले असल्याने, तो अर्पण केल्याने मासेमारीवेळी जाळ्याद्वारे चांगले मासे निर्धोकपणे मिळतील अशी खात्री असते.

गावातील आराध्य दैवतासमोर केलेल्या आवाहनानुसार आपले इच्छित ध्येयपूर्ती झाल्याबद्दल नवसफेड करताना नारळ फोडतात किंवा अर्पण केला जातो. मंगलकार्याच्या प्रसंगी पाण्याने भरलेल्या कलशावरती आम्रवृक्षाच्या हिरव्यागार पानांनी अलंकृत केलेला सोललेला नारळ ठेवता जातो. लग्नसोहळ्यातही सोललेला नारळ अलंकृत करून वर आपल्या हाती धारण करतो.

पूर्वी नववधू सासरी जायला निघाली, की तिला एक असोला नारळ दिला जायचा हा नारळ तिच्याच हस्ते रुजत घातला जायचा. त्यातून निर्माण होणारा माड बहुप्रसव असल्याने नववधूही पुत्रपौत्र संपन्न व्हावी अशी धारणा असते. त्यासाठी काही संतान व्हावे या अपेक्षेनं सुवासिनी आराध्य दैवतासमोर नारळ फोडण्याचा किंवा नारळाचे तोरण बांधण्याचा संकल्प करायची.

सुवासिनी स्त्रिया दुसऱ्या सुवासिनीची ओटी भरताना पानसुपारी आणि तांदूळ यांच्यासह नारळ अर्पण करते. भारतात नारळाचे आगमन वेदोत्तर झाल्याने यज्ञविधीत नारळाचा वापर करण्याची जुन्या काळी प्रथा प्रचलित नव्हती. गोव्यात नारळाला श्रीफळाचा सन्मान लाभल्याकारणाने वार्षिक काला - जत्रौत्सवात नारळाचा प्रामुख्याने वापर केला जातो.

वार्षिक शिगमोत्सवात ग्रामदैवताच्या मंदिरासमोर होळी म्हणून खांब उभा केल्यावर तेथे ठेवलेल्या दगडावर सोललेला नारळ ताकद आणि कौशल्याने मारून फोडतात आणि त्यातले खोबरे प्रसाद म्हणून घरी नेतात.

कुळे, काले येथील शिगम्यात सावरी वृक्षाचा खांब दुरीग म्हणून मंदिरासमोर उभा करून त्याच्यावरती ठेवलेला नारळ गुळगुळीत खांबावर चढून प्राप्त करणारा गावातल्या लोकमानसाच्या सन्मानास पात्र ठरतो.

गोव्यात महिषपालक असणाऱ्या गवळी - धनगर समाजात दसऱ्याच्या वार्षिक उत्सवावेळी जेव्हा कुलदेव पुजले जातात त्यावेळी छप्पराला लोंबकळलेल्या माटोळीला आम्रवृक्षाच्या हिरव्या पानांच्या गुच्छात नारळांचे तोरण हमखास बांधण्याची परंपरा रूढ आहे.

नारळ सोलल्यावर जो तंतू उपलब्ध होतो त्याच्यापासून प्रामुख्याने दोऱ्या, दोरखंड, पायपुसणी तयार केली जायची. खोबरे काढल्यावर जी टणकदार करवंटी उपलब्ध व्हायची त्याच्यापासून अन्न ताटात घेण्यासाठी ‘दवली’ नामक पळी तयार केली जायची.

गणेशचतुर्थीच्या काळात ही करवंटीची दवली फणसाच्या लाकडापासून तयार केल्या जाणाऱ्या उलट्या माणीवर चुलीतली राख घालून लोकसंगीत निर्माण करण्यासाठी वापरली जायची. नारळाचे खोबरे गोवा, कोकणात आमटी तयार करताना मसाल्यासोबत वापरतात. त्याच्यापासून सोलकडीही तयार करतात आणि प्रामुख्याने खोबरेल तेलाची निर्मितीही करतात. करवंटीचा अत्यंत कल्पकतेने वापर हस्त-कारागीर अलंकार निर्माण करण्यासाठी करतात.

Coconut Significance
Goa Coconut Price: चतुर्थीच्या तोंडावर नारळ महागले! राज्यातील उत्पादनात घट; कर्नाटक व तमिळनाडूतून आयात

करवंटीपासून कर्णभूषणे, बांगड्या आणि अन्य आभूषणे तयार करतात. खोबरेल तेल काढल्यावर जो पदार्थ शिल्लक उरतो त्याचा वापर गुराढोरांना पेंड देण्यासाठी करतात. किसलेले खोबरे चतुर्थीवेळी तयार केल्या जाणाऱ्या नेवऱ्यांना गोडवा आणण्यासाठी वापरतात. त्याचप्रमाणे नैवद्यासाठीही गूळ आणि किसलेले खोबरे जसे वापरतात त्याचप्रमाणे माधूर्यपूर्ण मिठाई करण्यासाठीही करतात.

नव्या भातापासून गूळ, दूध आणि खोबरे घालून जो पायस करतात तो देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करतात. गोव्यातल्या बऱ्याच मिठाईत खोबऱ्याचा वापर प्रामुख्याने केला जातो. त्याचबरोबर करवंटीचा वापर अग्नी प्रज्वलित करण्यासाठी ही केला जातो.

Coconut Significance
Coconut Shell Scraper :एका तासात 500 किलो नारळाच्या कचऱ्याची विल्हेवाट; सोनसोडोत यंत्राचे उद्‌घाटन, खतासाठी होणार वापर

नारळी पौर्णिमेच्या विधी उत्सवात समुद्र देवतेला प्रसन्न करण्यासाठी नारळ अर्पण केला जातो. गोव्यात सागर किनारा आणि त्याच्याशी संलग्न प्रदेशात डोलणारे माड हे वैभवाचे संचित आहे. गोव्यात बाणावली, कळंगुट आणि नादोडा या गावातून नारळाच्या प्रजाती विकसित झालेल्या असून, इथल्या लोकजीवनात माडांनी पूर्वापार कल्पवृक्षाचे स्थान प्राप्त केलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com