Fish Pollution: गोमंतकीयांसाठी एक गंभीर समस्या 'मत्स्यप्रदूषण'; वाचा गोमन्तकचा Special Report

Microplastics in Fish: ‘गोमन्तक टीव्ही’च्या ‘स्पेशल रिपोर्ट’ने मत्स्यप्रदूषणाविषयी चिंता व्यक्त केलीच, पण सोबतच सुज्ञपणे विचार करण्यासही प्रवृत्त केले. अशा चर्चांचे रूपांतर प्रत्यक्ष कृतीत व्हायला हवे.
Fish Pollution Goa
Fish Pollution GoaDainik Gomantak
Published on
Updated on

संदेश गवंडळकर

करंझाळे येथील मत्स्यप्रदूषणाला वाचा फोडल्याबद्दल ‘गोमन्तक टीव्ही’चे मनापासून कौतुक. राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. बबन इंगोळे यांनी मांडलेले मुद्दे आम्हा गोमंतकीयांसाठी फार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे, हा अत्यंत महत्त्वाचा आणि योग्य वेळी झालेला चर्चेचा विषय आहे असे मला वाटते. हा तांत्रिक आणि वैज्ञानिक विषय सामान्य प्रेक्षकांपर्यंत, कोणतीही विनाकारण भीती न घालता ज्या पद्धतीने मांडला गेला, ते कौतुकास्पद आहे.

ही संपूर्ण चर्चा अभ्यासपूर्ण होती. मासळीमधील ’हेवी मेटल्स’ (जड धातू) आणि ’मायक्रोप्लास्टिक्स’ (सूक्ष्म प्लॅस्टिक)बाबत त्यांनी दिलेले स्पष्टीकरण हे पर्यावरणातील प्रदूषण थेट आपल्या अन्नसाखळीत कसे शिरते, याचे दर्शन घडवणारे होते.

अनेकांना अजूनही असे वाटते की प्रदूषण फक्त समुद्रकिनाऱ्यावरील कचऱ्यापुरते मर्यादित आहे, परंतु ही ’अदृश्य’ प्रदूषके किती घातक असू शकतात, हे या चर्चेतून अधोरेखित झाले. ‘गोंयकार’ मासळीशिवाय जगूच शकत नाही त्यांच्यासाठी आणि गोव्यासारख्या किनारी राज्यांसाठी, जिथे मासे हा दैनंदिन आहाराचा अविभाज्य भाग आहे, तिथे ही जागरूकता अत्यंत आवश्यक आहे.

मायक्रोप्लास्टिक्स आणि धातू माशांच्या शरीरात कसे साठतात आणि खाण्याद्वारे मानवी शरीरात कसे पोहोचतात, हे सांगणारा भाग डोळ्यांत अंजन घालणारा होता.

राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थे(एनआयओ)सारख्या संशोधन संस्थांनी यापूर्वीच पचनसंस्था, रोगप्रतिकारशक्ती आणि एकूणच आरोग्यावर या प्रदूषणाच्या होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांचे दस्तऐवजीकरण केले आहे.

अर्थात ही माहिती बरीच तांत्रिक असल्याने अनेक सामान्य लोकांना ती सहज समजणे कठीण जाते. ही वैज्ञानिक माहिती सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे असते. त्यातही विनाकारण भीती पसरण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी ती नेमक्या स्वरूपात पोहोचवावी लागते. ते काम ‘गोमन्तक टीव्ही’ने केले, ही या कार्यक्रमाची सर्वात जमेची बाजू होती.

‘स्पेशल रिपोर्ट’ या कार्यक्रमात मासळी टिकवून ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ’फॉर्मेलिन’च्या जुन्या प्रश्नालाही योग्य स्पर्श करण्यात आला. अनेकांना असे वाटते की हा प्रश्न आता सुटला आहे; परंतु वस्तुस्थिती वेगळी असल्याचे उपलब्ध माहिती, अभ्यास आणि आरोग्य सूचनांचा संदर्भ दिल्याने लक्षांत आले.

कडक देखरेख नसल्यास हे प्रकार पुन्हा घडू शकतात व ते अजूनही आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, याची जाणीव प्रेक्षकांना झाली. अन्नसुरक्षेसाठी बाजारावर अवलंबून असलेल्या ग्राहकांसाठी हा विषय पुन्हा मांडला जाणे अत्यंत आवश्यक होते.

कार्यक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे करंझाळे येथील मच्छीमारांशी साधलेला संवाद. त्यांच्या विचारांमुळे चर्चेला एक समतोल प्राप्त झाला. ’मासे हे कोणत्याही एका विशिष्ट क्षेत्राचे नसून समुद्र ही एक खुली परिसंस्था आहे’, हा त्यांनी मांडलेला मुद्दा अत्यंत रास्त होता.

Fish Pollution Goa
Goan Fish: मासळीतील अतिरिक्त धातू आरोग्यास हानिकारक! समुद्र विज्ञान विभागाचे संशोधन; समुद्रात जाणारे प्लास्‍टिक, धातू रोखण्याची गरज

मासे मोठ्या सागरी क्षेत्रात संचार करतात, त्यामुळे प्रदूषण ही केवळ एका भागापुरती मर्यादित समस्या मानता येणार नाही. यामुळे विनाकारण कोणावरही दोषारोप न होता, मोठ्या पर्यावरणीय आव्हानावर लक्ष केंद्रित केले, हे चांगले झाले. त्यामुळे, या प्रदूषण समस्येच्या नेमक्या कारणांपर्यंत पोहोचणे व ती समस्या सोडवणे यात निश्‍चितच मदत होईल.

थोडक्यात सांगायचे तर, हा कार्यक्रम कोणत्याही सनसनाटीपणाशिवाय जनजागृती करण्यात यशस्वी ठरला आहे. सनसनाटी निर्माण करण्याच्या नादात अनेकदा भीती घातली जाते. जिथे काळजी घेतली पाहिजे, तिथे भीतीमुळे त्या विषयालाच हात घातला जात नाही.

Fish Pollution Goa
Goa Air Pollution: गोव्यासाठी धोक्याची घंटा! पर्वरी, पणजी परिसरात घसरली हवेची गुणवत्ता; नागरिकांच्या आरोग्याला धोका

या कार्यक्रमाने मत्स्यप्रदूषणाविषयी चिंता व्यक्त केलीच, पण सोबतच सुज्ञपणे विचार करण्यासही प्रवृत्त केले. अशा चर्चांचे रूपांतर प्रत्यक्ष कृतीत व्हायला हवे. संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी या विषयाची दखल घेऊन तज्ज्ञांमार्फत सखोल वैज्ञानिक अभ्यास करावा आणि त्याचे निष्कर्ष पारदर्शकपणे जनतेसमोर मांडावेत, हीच अपेक्षा आहे.

विज्ञान, सरकारी धोरणे आणि सामान्य जीवन यांमधील दरी सांधण्याचे काम असे कार्यक्रम करतात. या महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल आणि तज्ज्ञांसह स्थानिक लोकांचे म्हणणे मांडल्याबद्दल ‘गोमन्तक टीव्ही’चे मनःपूर्वक आभार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com