
गणेशचतुर्थी अवघ्या सात दिवसांवर आली असताना कार्यकर्ते, हितचिंतकांचा आर्त आवाज देवाने ऐकला, दिगंबर मंत्री बनले. नुकतीच गोकुळाष्टमी झाली, गोरगरिबांच्या डोक्यावर छत बांधणाऱ्या तवडकरांना ‘गोविंदा’ पावला.
मडगाव, काणकोणातच नाही तर प्रियोळातही फटाके फुटले, कार्यकर्ते आनंदले. बराच काळ रखडलेला मंत्रिमंडळ फेरबदल अखेर झाला असला तरी खात्यांसाठी पुन्हा नवागतांना ताटकळत ठेवले हे काही बरे नाही. बदलासाठी लोकांनी, कार्यकर्त्यांनी बराच कालावधी वाट पाहिली. हा खटाटोप करण्यामागे प्रशासन गतिमान व्हावे हा खरेच उद्देश असल्यास खाती वाटपास विलंब नको.
सद्य:स्थितीत मुख्यमंत्र्यांकडे ३५हून अधिक खाती आहेत. काब्रालांना डच्चू दिल्यानंतर त्यांच्याकडील बांधकाम खाते असेल वा गावडेंकडील अधिभार असेल, मुख्यमंत्र्यांकडे व्याप मोठा आहे. शिक्षण, खाण, वित्त, गृह, आदिवासी कल्याण!
मुख्यमंत्री कुठे-कुठे लक्ष देणार? खात्यांच्या विकेंद्रीकरणाची नितांत आवश्यकता आहे. तशी रचना दिसल्याच बदलाला अर्थ आहे. तवडकर, दिगंबर जुने, अनुभवी नेते आहेत. कामतांनी यापूर्वी पाच वर्षे मुख्यमंत्रिपद सांभाळले आहे. मोठी, जबाबदारीची खाती द्वयींकडे सोपवावीत. अनुभवाचा सरकारला उपयोग होईल.
कामत यांना खाण खाते मिळाल्यास त्यांना आनंदच होईल. एरव्ही ह्या खात्याचे काम अडले आहेच. कामत मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रादेशिक आराखडा संमत करून घेतला होता. त्यासाठी अनेक कार्यकर्ते व एनजीओंना त्यांनी एकत्र आणले होते.
कामत तशी किमया खाण व बांधकाम खात्यांसंदर्भात करू शकतात. याच कामतांनी पर्रीकरांच्या मंत्रिमंडळात वीज खाते उत्तमपणे हाताळले होते. ते साऱ्यांना सोबत घेऊन जाणारे नेते आहेत. तवडकरांना क्रीडा खात्याचा अनुभव आहे. आदिवासींच्या उत्थानासाठी त्यांनी वेळोवेळी बहुमोल योगदान दिले आहे.
गावडे जी खाती सांभाळत होते ती तवडकर यांना दिल्यास ते यथोचित न्याय देऊ शकतील, अशी समर्थकांना खात्री आहे. सावंत सरकारचा दुसरा कार्यकाळ अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. इथून पुढे सरकारची लोकाभिमुख अनुभूती आल्यासच फेरबदल सार्थकी लागला म्हणता येईल. मुख्यमंत्र्यांना गृहखात्याकडे अधिक गांभीर्याने पाहावेच लागेल.
पोलिस दलाची प्रतिमा दिवसेंदिवस खालावते आहे. कळंगुट येथे पर्यटकाने काढलेल्या एका व्हिडिओमुळे पोलिस व पंचायतीचे वाभाडे निघालेत. शपथविधीपूर्वी पत्रकारांशी बोलताना ‘पुढील काळात आणखी बदल होऊ शकतात’, असे मुख्यमंत्र्यांनी सूचक विधान केले आहे. उमद्या चेहऱ्यांची आशा कायम ठेवण्यास ते उपयुक्त ठरेल.
परंतु लोकांना हवा तो बदल न दिसल्यास भाजप प्रदेशाध्यक्षांच्या कामगिरी मूल्यमापनालाही काडीची किंमत राहणार नाही. आता मिळालेली मंत्रिपदे ही राजकीय सोय व ‘आणखी बदल’ हे इच्छुकांसाठी गाजर, एवढाच बदलाचा परिणाम दिसल्यास त्याचे वाईट संकेत लोकांत जातील. उभयतांना वेळ कमी असला तरी अनुभव प्रचंड आहे.
लोकांच्या व कार्यकर्त्यांच्या अपेक्षांवरही त्यांना खरे उतरावे लागेल. कुठली खाती मिळतील हे गौण असल्याचे जरी कामत म्हणत असले तरी त्याचा अर्थ ‘एवढ्यात उघड करायचे नाही’, एवढाच आहे. दिलेला कालावधी पाहता अपेक्षा त्यामानाने खूप आहेत. ओळीने येणाऱ्या निवडणुका चढत्या क्रमाने जिंकणे व विधासभेसाठी मतदारसंघ राखणे ही खरी स्पष्ट आव्हाने आहेत.
ऐन चतुर्थीच्या तोंडावर झालेला हा मंत्रिपदाचा श्रीगणेशा पुढे कोणती बाराखडी गिरवायला लावेल, हे आत्ताच सांगणे कठीण आहे. गणांचा अधिपती असलेल्या गणपतीसमोर ठेवलेले हे ‘नवे’ तसे जुनेच आहे, मुरलेले आहे. त्याचा लोकांना लाभ व्हावा. श्रेष्ठींचे निर्णय काहीही असले तरी जनता व तिचे मत हेच श्रेष्ठ असते, यात दुमत नसावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.