Goa Politics: गोव्यात 2027 च्या निवडणुकीत यश संपादन करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा काँग्रेस पक्ष कुठे आहे? उत्तरदायित्व

BJP Goa political strategy: एक निवडणूक संपल्यावर लगेच ते दुसऱ्याच्या तयारीला झटून कामाला लागतात. जनमत बदलून ते मतदान प्रक्रियेत रूपांतर करण्यात हा पक्ष तरबेज बनला आहे, त्या उलट काँग्रेस आहे!
Goa BJP
Goa BJPDainik Gomantak
Published on
Updated on

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन गोव्यात आले. त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. प्रसारमाध्यमांमध्येही ते गाजले. भाजपाने माध्यमांमध्ये प्रचंड जाहिरातबाजी केल्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षांची गोवा भेट गाजली असे नव्हे. राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर ताबडतोब त्यांची गोवा भेट ठरली, त्यांनीही गोव्याला प्राधान्य दिले. नव्या अध्यक्षांची वाणी, कार्यपद्धती, रणनीती याचे औत्स्युक्य माध्यमांना होते. नेत्यांनाही ते होतेच.

नवीन यांनी अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर ताबडतोब गोव्यात यायचे का निश्‍चित केले? गोव्यात लागलीच कुठे निवडणुका आहेत? वास्तविक २०२६मध्ये तमिळनाडू, केरळ, पश्‍चिम बंगाल, आसाम व पुदूचेरी या राज्यांमध्ये निवडणुका आहेत.

त्या राज्यांसह गोव्यात निवडणुका घेण्याची योजना असेल असे सध्या तरी वाटत नाही. शिवाय ती राज्ये खूप महत्त्वाची आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये त्यांना मुसंडी मारायची आहे. तरीही राष्ट्रीय अध्यक्ष सर्वप्रथम भेट द्यायला गोव्याची निवड करतात. ही खात्रीने विश्रांतीसाठीची भेट नाही.

भाजपा नेत्यांना विश्रांती कुठे माहीत आहे? विश्रांती हवी असेल तर ‘घरी झोपा जा’ असे त्यांना अमित शहा सुनावतील. नरेंद्र मोदी व त्यानंतर अमित शहा यांना जेथे विश्रांती माहीत नाही, तो शब्द त्यांच्या शब्दकोशातच नाही आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक सांगतात त्याप्रमाणे तो आता भाजपाच्या शब्दकोशातूनच काढून टाकण्यात आला आहे, तेथे नवे अध्यक्ष विश्रांतीची बात करू लागले तर त्यांची धडगत असेल काय?

दुसरी गोष्ट म्हणजे भाजपा संघटना दोन टप्प्यांवर काम करते. नितीन नवीन यांच्या मनात संघटनात्मक कार्यक्रम, त्यांची रूपरेषा असेलच.

त्यानुसार ते काही कार्यक्रम आखतीलही, परंतु अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली पक्ष काही व्यूहरचना तयार करेल. काही व्यूहनीतीवर काम करेल. तसा त्यांना एक सुस्पष्ट कार्यक्रम आखून दिला जाईल. त्यामुळे कसे पुढे जायचे याबद्दल नवीन यांच्या मनात काही संदेह नसेल. कदाचित नवीन आपल्या व पक्षाच्या नीतीविषयी ताळमेळ घालण्याचा प्रयत्नही करतील.

महत्त्वाचे काय तर नवीन यांनाही आपली कारकीर्द उजवी ठरलेली आवडेल व त्यासाठी ते झटून कार्य करतील. कालपर्यंत तसे ‘अनोळखी’ - राज्यातही फार मोठी चमकदार कारकीर्द गाजवली नसली तरी - सर्व रथीमहारथींमधून शहा - मोदी यांच्या नेतृत्वाने आपल्याला शोधून एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे - याची जाणीव असल्याने ते स्वतःही जरासुद्धा उसंत घेणार नाहीत.

- त्यांच्यापुढे तसा जगत प्रकाश नड्डा यांचा आदर्श आहे. वाजपेयी, अडवाणी, मुरली मनोहर जोशी, नायडू, राजनाथ सिंग, अमित शहा या दिग्गजांच्या पाठोपाठ एवढी मोठी जबाबदारी जेव्हा नड्डांकडे आली तेव्हा आपल्याला अयशस्वी ठरविण्यासाठीच तर हे पद दिलेले नाही ना, असा संभ्रमही त्यांच्या मनात निर्माण झाला असेल, परंतु त्यांनी एकापाठोपाठ निवडणुका जिंकत संपूर्ण संघटनेत नवा उत्साह निर्माण केला.

मोदी - शहांच्या बरोबरीने स्वतःची प्रतिमा निर्माण केली. म्हणूनच त्यांच्याकडे नंतर आणखी मोठी जबाबदारी सोपविण्यात आली. नाहीतर अयशस्वी म्हणून त्यांच्या नावापुढे फुली मारण्यात पत्रकार टपलेलेच होते!

अनेकांना असेही वाटले की मोदी-शहाच सर्व रणनीती तयार करीत असल्याने पक्षाध्यक्षांना फारसे महत्त्व कुठे असते? परंतु भाजपात अध्यक्षांना निश्‍चित उत्तरदायित्व आहे आणि त्यांच्या कामाची पद्धतही घालून देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे झपाटून काम आणि प्रत्येक निवडणुकीत ‘झेंडा उंचा रहे हमारा!’

नड्डांची कामगिरी यशस्वी का मानली गेली, कारण अनेक राज्यांमध्ये त्यांनी पक्षाला यश मिळवून दिले तर पश्‍चिम बंगालमध्ये जोरदार लढत देतानाच इतर अनेक राज्यांमध्ये युती आणि आघाड्यांना महत्त्व दिले.

कोविड काळातही त्यांनी पक्ष संघटनेत उत्साह कायम ठेवला. महागाई, बेकारी, भ्रष्टाचारासारखे प्रमुख प्रश्‍न सतावत असतानाही पक्षाचे नीतीधैर्य गळू न देता सतत विजयाची पताका उंचावत ठेवणे, आपली मतदारसंख्या वाढवत नेणे, मोदींची प्रतिमा चकाकती राखणे यात त्यांचे काम वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. काँग्रेस पक्षावर सतत कुरघोडी करीत त्या पक्षाच्या नेत्यांची प्रतिमा देशभरात मलीन करण्याचेही श्रेय पक्ष संघटनेला दिले जाते.

नितीन नवीन यांच्यात हीच ‘काबिलियत’ आहे - म्हणून तर त्यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी आली आहे.

ते पाचवेळा आमदारपदी निवडून आले. भूतपूर्व मंत्री आहेत हे गुण असले तरी पक्षसंघटनेत युवकांना जोडण्याबरोबरच पक्षाची ‘डिजिटल युद्ध मोहीम’ राबवण्याचे श्रेय त्यांना जाते. पश्‍चिम बंगाल व तमिळनाडूमध्ये त्यांनी पायाभूत कार्य केले आहे. तेथे यावर्षी निवडणुका होत असल्याने त्यांची कसोटी लावण्याचे पक्षनेतृत्वाने ठरविले असावे. त्यांची कार्यशैली पाहाता पश्‍चिम बंगाल व तमिळनाडूत ते झटून काम करतील यात शंका नाही.

- तरीही त्या सर्व राज्यांहून आधी गोव्यात येणे त्यांनी पसंत केले.

कारण काय असेल? गोव्यात त्या पक्षाची पाठीराख्या आमदारांची संख्या ३३ आहे. विरोधी पक्ष ढेपाळला आहे. सरकार स्थिर आहे. पक्ष संघटनाही दामू नाईक यांच्या नेतृत्वाखाली तडफेने काम करते.

दामू नाईक व अन्य काही संघटनात्मक नेत्यांशी नव्या अध्यक्षांची चांगलीच ओळख आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याबरोबर त्यांनी प्रत्यक्ष कार्य केले आहे. दोघांबद्दलही दिल्लीत चांगली प्रतिमा आहे.

परंतु एक महत्त्वाचा राजकीय प्रश्‍न राहातोच - भाजपा गोव्यात स्वबळावर सत्तेवर येऊ शकतो का? भाजपाच्या आडोशाला आलेले काही प्रबळ आमदार-मंत्री भाजपाला ‘आपला’ पक्ष मानतात काय? उद्या केंद्रात सरकार बदलले तर हे तीन-चार प्रबळ आमदार - मंत्री काय भूमिका घेतील? सरकारात एक दोन नेते महत्त्वाकांक्षी नेते असे आहेत - ज्यांनी मुख्यमंत्रिपदाची आपली लालसा कधी लपवली नाही. ते छुप्या कारवाया निवडणुकीत आपल्याच सरकारविरोधात करतात, हे सांगायला राजकीय पंडितांची आवश्‍यकता आहे काय?

त्यामुळे केंद्रीय भाजपा नेते गोव्याकडे सतत लक्ष ठेवून असतात. पक्ष संघटनेत सतत उत्साह निर्माण करीत राहातात.

स्थानिक नेतृत्वाला शाश्‍वती देण्यासाठी त्यांनी १० विरोधी सदस्य फोडून आणले - त्यातील प्रत्येक जण स्वतःच्या लांड्यालबाड्यांवर पांघरूण घालण्यासाठी आले - काहीजण पैशांच्या आमिषाने, त्यामुळे गोवा राजकीयदृष्ट्या किती भरवशाचा सवंगडी आहे याचा पक्षनेतृत्वालाही प्रश्‍न पडला तर नवल ते काय! (येथे कार्यकर्त्यांच्या मनातही चलबिचल असते आणि रा. स्व. संघही फुटू शकतो)

शिवाय गोव्यात जनआंदोलकांनी सतत जोर धरलेला असतो. आयआयटीसारख्या प्रकल्पांना - आमदारांचा एवढा भरघोस पाठिंबा असतानाही - जागा मिळू शकत नाही, नेते लोकांची मते बळकावण्यात कमी पडतात - याचीही जाणीव पक्षनेतृत्वाला नसेल, असे समजता येईल काय?

त्यामुळेच, गोवा चिमुकला असला, राजकीयदृष्ट्या दिल्लीत गोव्याला क्षुल्लक महत्त्व असले तरी भाजपाने या राज्याचे महत्त्व कमी केलेले नाही.

एकाच वेळा यापूर्वी गोव्याला केंद्रीय मंत्रिमंडळात दोन पदे मिळालेली आहेत. गोव्याने संरक्षण मंत्रिपद भूषविलेले आहे. नरेंद्र मोदींनी तर आपल्याला पंतप्रधानपद मिळवून देण्यात गोव्याने बजावलेल्या भूमिकेचा वारंवार उल्लेख केला आहे. नितीन गडकरी यांच्याही मनात गोव्याला नेहमीच उजवे स्थान असते.

एवढे गुण असूनही गोवा चिमुकला आहे म्हणून भाजपाने गोव्याकडे कधी दुर्लक्ष केलेले नाही. विकासकामे असोत वा निवडणूक खर्च त्या पक्षाने कधी हात आखुडता घेतलेला नाही. येथील निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाण मांडून बसलेले असतात. मुख्यमंत्री बनल्यावर प्रमोद सावंतांकडेही इतर राज्यांच्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपविल्या जातात.

याचाच अर्थ असा - मोठी पदे ही जबाबदारीची असतात. उत्तरदायित्व निभावण्याची असतात. राज्य छोटे असो वा मोठे, कामे तेवढ्याच तडफेने, चिवटपणे करायची असतात. तेथे कसलीही कसर सोडता नये. तेथे कामात कमी पडले तर त्यांची गच्छंती ठरलेली. तेथे दयामाया नाही. हा पक्ष कॉर्पोरेट पद्धतीने काम करतो.

राजकारणात टिकून राहायचे - यशाची कमान सतत उंच ठेवायची तर अशा परिश्रमाला, दिवसरात्र मेहनतीला पर्याय नाही हा या पक्षाचा मंत्र आहे. काही वर्षापर्यंत या पक्षाच्या दिमतीला रा. स्व. संघ असायचा. अंगमेहनतीपासून बौद्धिक रणनीती ठरविण्यात ती संघटना वाकबगार!

परंतु मोदी-शहांच्या जिद्दी जोडगोळीने ती शिस्त आणि लष्करी बाणा पक्षसंघटनेत लीलया निर्माण केला, एवढेच नव्हे तर ते मेहनतीचातुर्य रुजवलेही! त्यामुळे आज भाजपा संघटनेला संघ दिमतीला असण्याची फारशी गरज असतेच असे नाही!

आणखी एक महत्त्वाचे तत्त्व म्हणजे भाजपात मंत्री महत्त्वाचे असतात, परंतु सरकारएवढेच पक्षसंघटनेला महत्त्व. मुख्यमंत्र्यांना संघटनेला जबाबदार राहावे लागते. पक्षाची गाभा समिती मुख्यमंत्र्यांना जाब विचारू शकते. या समितीच्या बैठकींना मंत्रिमंडळ बैठकांएवढेच महत्त्व प्रसारमाध्यमांमध्ये मिळते.

पक्षसंघटनेच्या मतदारसंघ कार्यक्रमांना मंत्र्यांना जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात. सध्या तर अनेक ख्रिस्ती आमदार आपल्या निष्ठा सिद्ध करण्यासाठी देवळांमध्येही पूजाअर्चा निभावताना दिसतात, ज्यांनी काँग्रेस पक्षात असताना किंवा स्वतः काँग्रेसचे सर्वात मोठे नेते असणाऱ्या प्रतापसिंग राणेंनीही पक्षाची जबाबदारी कधी निभावल्याचे जाणवले नाही!

-उगाच हा पक्ष साऱ्या निवडणुका मोठ्या फरकाने लीलया जिंकत नाही. पक्षाचे सुस्पष्ट धोरण व कठोर शिस्त या तत्त्वातच हे यशाचे इंगित लपलेले आहे!

त्याच मार्गाने ‘आप’ जातो आहे. गोव्यात स्वबळावर जिंकून येण्याची शाश्‍वती नसतानाही या पक्षाचे प्रमुख केजरीवाल सतत गोव्यात येतात. त्यांच्या माजी मुख्यमंत्री आतिशी गोव्यात तळ ठोकून असतात. जि. प. निवडणुकीतही योगदान देतात. त्यांचा समाजमाध्यमांवर काम करणारा एक गट गोव्यात सतत राबतो. प्रसारमाध्यमांवर खर्च करताना ते हात आखुडता घेत नाहीत. कारण हा पक्षही तेवढाच चिवट आहे आणि निवडणूक त्यांना जिंकू किंवा मरू पद्धतीने लढवायची आहे...

Goa BJP
Goa Opinion: गेल्या 65 वर्षांच्या गोव्याच्या बदललेल्या चित्रात गोवेकर कुठेच आढळत नाही; मग ‘अस्मिताय’, ‘अस्मिताय’ हे कशाला म्हणायचे?

त्या तुलनेने गोव्यात २०२७च्या निवडणुकीत यश संपादन करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा काँग्रेस पक्ष कुठे आहे? त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे एकदाही गोव्यात आलेले नाहीत. राहूल गांधी यांनी गोव्याला खिजगणतीत घेतलेले नाही.

त्या पक्षाला पक्षनिष्ठेपेक्षा ‘गांधी कुटुंबाची निष्ठा’ महत्त्वाची वाटते. स्वतंत्र प्रज्ञेला येथे वाव नाही. झटून कार्य केले, राज्यात पक्षाला प्राणपणाने जिंकून आणले तरी नेत्याला वाव मिळेल याची शाश्‍वती नसते. संघटनात्मक नेते अयशस्वी झाले तरी गांधी कुटुंबाला निष्ठ राहिले तर त्यांची पदे शाबूत राहातात.

Goa BJP
Goa Opinion: शिरगाव चेंगराचेंगरी, हडफडे, चिंबल आंदोलन; प्रत्येक प्रकरणात सरकार बॅकफूटवर जातेय

त्यामुळे पक्ष संघटना ‘पराभूत’ मानसिकतेत गेली आहे. हीच परिस्थिती हेरून भाजपाने अण्णा हजारेंच्या आंदोलनाद्वारे २०११मध्ये भ्रष्टाचारविरोधी आंदोलन छेडले व काँग्रेसचा सहज पराभव केला, त्यातून काँग्रेस पक्ष सावरूच शकला नाही...

काँग्रेसचा पराभव करणाऱ्या त्याच मुद्यांच्या चिखलात आज भाजपा फसला असला तरी ते मुद्दे बनवून सत्तेच्या निकट येण्याचेही धाडस आणि चातुर्य काँग्रेस पक्ष बाळगू शकत नाहीच. त्या पक्षाचे गोवा प्रभारी फारसे गंभीर नाहीत. गोव्याच्या पक्षाचा आढावा घेतला जात नाही. हा पक्ष सासष्टी सोडून इतर ठिकाणी अस्तित्वातही नाही. तरीही त्यांचा विरोधी पक्षनेता मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने पाहातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com