Goa Opinion: ‘सोवळे सोडून ठेवले आहे व ओवळे सापडत नाही’, गोव्यात भाजपची अवस्था

Corruption in Goa: मडकईकर हे काही धुतल्‍या तांदळासारखे नाहीत. परंतु असली-नसली विश्वासार्हता जमेस धरूनही भाजपला त्‍यांचे आरोप पचवणे जड जाईल, अशीच चिन्हे आहेत.
Pandurang Madkaikar Allegations
Pandurang MadkaikarDainik Gomantak
Published on
Updated on

Pandurang Madkaikar Allegations

‘राज्यात सर्वत्र लूट सुरू आहे. सध्या मंत्री पैसे मोजण्यात व्यग्र आहेत’, अशा शेरेबाजीसह थेट आरोप करून माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी भाजपच्या भ्रष्टाचारमुक्त सरकारच्या प्रतिमेला आव्हान दिले आहे. मडकईकर हे कुणी विरोधक नाहीत. ते भाजपचे सदस्य आहेत. शिवाय भाजप सरकारच्या राजवटीत त्यांनी वीज खाते सांभाळले आहे.

म्हणूनच छत्रपती शिवरायांचा जयघोष करणाऱ्या, स्वत:ला त्यांचे पाईक म्हणवून घेणाऱ्या राज्य सरकारवर स्वपक्षीय नेत्याने केलेले आरोप गंभीर ठरतात. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष गोव्यात असताना, त्यांची भेट घेतल्यानंतर मडकईकर यांनी सरकारच्या कारभाराची कथित चिरफाड केली आहे.

‘अलीकडेच एका छोट्या कामासाठी मी एका मंत्र्याच्या पीएला १५ ते २० लाख रुपये दिले’, असे मडकईकर यांनी म्हटले आहे. दावा करताना त्यांनी नाव घेणे टाळले. सरकारला पुढील शहानिशा करावी लागेल. एक तर मडकईकर खोटे बोलताहेत किंवा आरोप खरे आहेत, यापैकी काहीतरी एक होऊ शकते.

पक्ष सोडला तर निश्चितपणे त्याचे नाव उघड करेन, असे मडकईकर म्हणत आहेत. परिणामी पुढे काय होते ते पाहणे रंजक आहे. मडकईकरांचे आरोप खरे आहेत, असे क्षणभर मानल्यास सामान्य माणसाचे काय होत असेल, याची कल्पनाच न केलेली बरी.

अलीकडच्या काळात राज्य सरकारवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होत आले आहेत. दुर्दैवाने ‘ते’ मुद्दे तडीस गेले नाहीत. यापूर्वी बाबूश मोन्सेरात यांनी बांधकाम अभियंता भरतीमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. पाऊस्कर बांधकाम मंत्री होते. भरती प्रक्रिया रद्द झाली. परंतु भ्रष्टाचारी कोण, याचा उलगडा झाला नाही. भरती नव्याने घेण्यात आली, याचाच अर्थ सरकारने गैरव्यवहार झाल्याचे मान्य केले. मग दोषी कोण?

काब्राल बांधकाममंत्री असताना तशाच आरोपांची पुनरावृत्ती झाली होती. अलीकडच्याच काळात उद्योजक दत्ता नायक यांनी फाईल मार्गी लावण्यासाठी ‘पीडीए’कडून पैशांची मागणी झाल्याचे जाहीररीत्या म्हटले होते. कुठेतरी पाणी मुरते म्हणूनच आरोप होतात.

पांडुरंग मडकईकर हे २०१७ मध्‍ये पर्रीकर मुख्यमंत्री झाल्यावर भाजपमध्ये आले; मात्र आजारपणानंतर पक्षाकडून ते दुर्लक्षित राहिले. कुंभारजुवे मतदारसंघातून त्यांना आगामी विधानसभेसाठी भाजपकडून तिकिटाची अपेक्षा आहे. त्यामुळेच ते आरोप करतात, असा दावाही केला जाईल. मडकईकर हे दबावासाठी आरोप करतात असे जरी मानले तरी भविष्यात त्यांना नाव जाहीर करावेच लागेल. अन्यथा ते खोटे ठरतील.

Pandurang Madkaikar Allegations
Goa Politics: भाजपच्या गळाला गोव्यातील अपक्ष आमदार; 2027 ची विधानसभा BJP कडून लढण्याची व्यक्त केली इच्छा

सरकार हे जनतेच्या हितार्थ आहे. नेत्यांच्या सोईसाठी नाही. तूर्त ‘आरोप आहेत’, म्हणून त्यांचे महत्त्व कमी होत नाही. भ्रष्टाचार झाल्याचे सरकार अप्रत्यक्षपणे मान्य करते; पण कुणी केला हे सांगण्याचे धाडस मात्र दाखवत नाही, हा पूर्वानुभव आहे. गुन्हा घडतो पण शिक्षा कुणालाच होत नाही, हे सुशासन नाही.

पांडुरंग मडकईकर यांनी टाकलेला हा बॉम्ब कुठल्या मंत्र्याचे तिकिट कापेल, हे काही सांगता येत नाही. पण, ती फार पुढची गोष्ट झाली. ‘सोवळे सोडून ठेवले आहे व ओवळे सापडत नाही’, अशी सध्या भाजपची अवस्था झाली आहे. ‘वरून आलेल्या आदेशांचे’ काटेकोर पालन हा पक्ष म्हणून भाजपने घातलेल्या राजकीय शिस्तीचा वस्तुपाठ होता. त्यामुळे प्रत्येक आमदार, मंत्री यांच्या चारित्र्याची जबाबदारी आपसूकच संघटना उचलत असे.

Pandurang Madkaikar Allegations
Corruption In Goa: 'एका फाईलसाठी मंत्र्याला दिली 20 लाखांची लाच, गोव्यात भ्रष्टाचार नव्हे लूट सुरुये'; माजी मंत्र्यांचा खळबळजनक आरोप

कितीही गंभीर मतभेद असले तरी त्याची वाच्यता बाहेर होत नसे. आता तशी स्थिती गोव्यात तरी उरली नाही. किंबहुना भाजपनेच स्वत:हून ती घालवली आहे. भ्रष्टाचाऱ्यांना पवित्र करणारे ‘वॉशिंग मशीन’ आता इतके घाणेरडे झाले आहे की, त्यात घातलेल्यांचे डाग निघता निघत नाहीत. मडकईकर हे काही धुतल्‍या तांदळासारखे नाहीत.

परंतु असली-नसली विश्वासार्हता जमेस धरूनही भाजपला त्‍यांचे आरोप पचवणे जड जाईल, अशीच चिन्हे आहेत. कोणी किती पैसे खाल्ले किंवा कोण खात आहे, यापेक्षाही लोकांचे प्रश्न, समस्या फारच महत्त्वाच्या आहेत. छत्रपतींचा वारसा सांगणे खूप सोपे आहे. पण, त्यांच्यासारखे कठोरपणे राज्य चालवणे फारच कठीण. उत्तरे द्यावीच लागतील. उत्तरदायी व्हावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com